मानवी प्रकृतीत आणि मानवी जीवनात संकल्पशक्ती (कर्मशक्ती), ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती या तीन दिव्यशक्ती आहेत; मानवाचा आत्मा ईश्वराप्रत ज्या तीन मार्गांनी चढत जातो त्या मार्गांचा निर्देश वरील तीन शक्ती करतात. म्हणून या तीन मार्गांचा समुच्चय, तीनही मार्गांनी मानवाचे ईश्वराशी सायुज्य होणे, एकत्व होणे हाच पूर्णयोगाचा पाया असला पाहिजे. Read more

ज्ञानयोगाचे साध्य ईश्वरप्राप्ती हे आहे. आपण ईश्वराला प्राप्त करून घ्यावे आणि आपण आपल्या जाणिवेच्या द्वारे, आपल्या ऐक्याच्या द्वारे, आपल्या मधील दिव्य सत्याच्या प्रतिबिंबाद्वारे आपला ताबा ईश्वराला घेऊ द्यावा. Read more

ईश्वराशी पूर्ण तादात्म्य पावण्याइतकी आमची साधना पूर्णत्वाला जाण्यापूर्वीही ईश्वराची इच्छा आमच्या ठिकाणी अंशतः साकार होऊ शकते. अशावेळी ती इच्छा ‘अनिवार प्रेरणा’, ‘ईश-प्रेरित कर्म’ ह्या स्वरुपात आमच्या प्रत्ययास येते; अशा प्रत्येक वेळी एक उत्स्फूर्त स्वयंनिर्णायक शक्ती आमच्याकडून कार्य करवून घेत आहे अशी जाणीव आम्हाला होते; परंतु त्या कार्याचा अर्थ काय, त्याचे प्रयोजन काय याबाबतचे पूर्ण ज्ञान आम्हाला नंतर केव्हातरी प्राप्त होते. Read more

योगसाधनेमध्ये एका विशिष्ट पातळीपर्यंत जेव्हा साधक जाऊन पोहोचतो तेव्हा, म्हणजे जेव्हा त्याचे मन बरेचसे शांत झालेले असते आणि जेव्हा ते स्वत:च्या मानसिक धारणांची खात्री पुरेशी आहे असे समजून प्रत्येक पावलागणिक स्वत:चेच समर्थन करत बसत नाही; जेव्हा प्राणदेखील स्थिर झालेला असतो, नियंत्रणात असतो आणि स्वत:च्या उतावळ्या इच्छेबाबत, मागण्यांबाबत व वासनेबाबत सतत हट्टाग्रही असा राहत नाही; जेव्हा शरीरतत्त्वही पुरेसे बदलले असते म्हणजे असे की, स्वत:चा बहिर्मुखपणा, अंध:कारमयता वा जडतेच्या ओझ्याखाली आंतरिक ज्योती ते संपूर्णपणे विझवून टाकत नाही; तेव्हा मग प्रदीर्घ काळपर्यंत अंतरंगात दडून असलेले अन्तरतम तत्त्व, ज्याच्या अगदी दुर्लभ अशा प्रभावातून त्याचे अस्तित्व जाणवायचे ते तत्त्व पुढे येऊ शकते आणि तेव्हा ते अस्तित्वाच्या उर्वरित अंगांना उजळवून टाकते आणि साधनेचे नेतृत्व हाती घेते. Read more

मर्यादित बहिर्मुख असणाऱ्या अहंकाराला हद्दपार करून, त्या जागी ईश्वराला सिंहासनावर बसवणे आणि प्रकृतीचा हृदयस्थ शासनकर्ता बनविणे हे आमच्या योगाचे प्रयोजन आहे. Read more

पूर्णयोगाचा साधक जीवन मान्य करीत असल्याने त्याला स्वतःचे ओझे तर वाहावे लागतेच; पण त्याबरोबर जगातीलही पुष्कळसे ओझे वाहावे लागत असते. त्याचे स्वतःचे ओझे काही कमी नसते; पण या बऱ्याचशा जड ओझ्याबरोबरच त्याला जोडून असणारे असे जगाचेही बरेचसे ओझे त्याला वाहावे लागत असते. म्हणून दुसरे योग लढ्याच्या स्वरूपाचे वाटत नसले, तरी हा पूर्णयोग मात्र पुष्कळसा लढ्याच्याच स्वरूपाचा असतो; मात्र हा लढा केवळ वैयक्तिक स्वरूपाचा नसतो; ते जणू सामुदायिक युद्धच असते आणि त्याचे क्षेत्रही मोठे असते. Read more

आमच्या साधनेची पार्श्वभूमी एका आदर्शाकडे निर्देश करते. हा आदर्श पुढील सूत्रात व्यक्त करता येईल.

ईश्वरात राहावे, अहंभावात राहू नये; लहानशा, अहंभावी जाणिवेत राहून नव्हे; तर सर्वात्मक व सर्वातीत पुरुषाच्या जाणिवेत राहून, विशाल पायावर ठामपणे सुस्थिर होऊन, जीवन जगावे. Read more

इतर काय करतात किंवा ते कोणत्या चुका करतात याच्याशी तुमचा संबंध असता कामा नये, तर स्वत:चे दोष, असावधानता यांकडेच तुम्ही लक्ष पुरविले पाहिजे आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी एक सुजाण सूचना अशी की, अशा कोणत्याही गोष्टी, ज्या प्रत्यक्ष कृतीमध्ये कार्यान्वित होत नाहीत, अशा गोष्टींचे वर्णन करताना आपले शब्दपांडित्य खर्च करू नये. कमी बोलावे आणि उत्तम कृती करावी. पोकळ शब्द हे सुगंध नसलेल्या फुलाप्रमाणे असतात.

तुम्ही तुमच्या स्वत:च्या दोषांनी, त्रुटींनी नाउमेद होऊ नका. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगामध्येसुद्धा अतिशय पवित्र फूल उमललेले आढळून येते. मथितार्थ असा की, ज्यामधून विशुद्ध अशा साक्षात्काराचा जन्मच होणार नाही एवढे त्याज्य काहीही नसते. भूतकाळ कसा का असेना, हातून कोणत्याही चुका का घडलेल्या असेना, माणूस किती का घोर अज्ञानात जगलेला असेना, तरीही प्रत्येकाच्या अंत:करणात खोलवर एक परमोच्च असे पावित्र्य, शुद्धता दडलेली असते की ज्याचे सुंदर अशा साक्षात्कारामध्ये रूपांतर होऊ शकते. केवळ त्याचाच विचार करा, त्यावरच लक्ष केंद्रित करा, इतर सर्व अडचणी, अडथळे, संकटे यांची चिंता करू नका.

जे तुम्ही बनू इच्छिता केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करा, तुम्ही जे बनू इच्छित नाही ते संपूर्णपणे, शक्य तितके नि:शेषतया विसरण्याचा प्रयत्न करा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 215)

मूल अगदी लहान असल्यापासूनच जोपासायला हवा असा एक गुण आहे, तो म्हणजे अस्वस्थ करणारी भावना (uneasiness). जेव्हा एखादी चुकीची गोष्ट हातून घडते तेव्हा स्वाभाविकपणे मनात निर्माण होणारी नैतिक असमतोलाची अस्वस्थ करणारी भावना! अमुक अमुक गोष्टी करावयाच्या नाहीत असे सांगितले असते म्हणून नव्हे किंवा शिक्षेला घाबरूनही नव्हे, तर ती अस्वस्थता स्वाभाविकपणे मनात उत्पन्न होते. उदाहरणार्थ, एखादे मूल खोड्या करून जेव्हा त्याच्या वर्गमित्राला इजा करते तेव्हा, जर ते सहज, स्वाभाविक अशा अवस्थेत असेल तर त्याला अस्वस्थ वाटते. त्याला त्याच्या अस्तित्वाच्या खोल आत कुठेतरी दुःख जाणवते, कारण त्याने जे काही केलेले असते ते त्याच्या आंतरिक सत्याच्या विरूद्ध असते.

व्यक्ती कितीही शिकलेली असो, कितीही विचार करणारी असो, तरीही अंतरंगात खोलवर असे काहीतरी असते की ज्याला पूर्णत्वाची, महानतेची, सत्याची संवेदना असते आणि या सत्याला विरोध करणाऱ्या सर्व प्रकारच्या गतिविधींची दु:खदायक संवेदना असते. आणि अवतीभोवतीच्या निंदनीय अशा उदाहरणांमुळे, बाह्य वातावरणामुळे ते मूल बिघडलेले नसेल, म्हणजेच ते त्याच्या सहज स्वाभाविक अवस्थेमध्ये असेल, तर जेव्हा त्याच्याकडून त्याच्या अस्तित्वाच्या सत्याच्या विरोधी असे काही घडते तेव्हा कोणीही काहीही न सांगता देखील, त्या मुलाला एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. आणि म्हणून त्या मुलामध्ये टिकून असलेल्या ह्या अस्तित्वाच्या सत्यावरच त्याच्या प्रगतीसाठीचे पुढचे सारे प्रयत्न आधारले गेले पाहिजेत.

…..केवळ एकच सच्चा मार्गदर्शक असतो, तो म्हणजे आंतरिक गुरु, मार्गदर्शक. जर एखाद्या मुलाला अनर्थकारक असे शिक्षण मिळाले तर, त्या शिक्षणाद्वारे ही छोटीशी आंतरिक गोष्टी नाहीशी करण्याचा जोरकस प्रयत्न होतो. आणि कधीकधी हा प्रयत्न इतका यशस्वी होतो की, त्यामुळे त्या आंतरिक मार्गदर्शकाबरोबरचा सर्व संपर्कच व्यक्ती हरवून बसते. आणि त्याचबरोबर चांगले आणि वाईट यांतील फरक ओळखण्याची शक्तीही ती व्यक्ती गमावून बसते. म्हणून मी सांगत असते की, अगदी बालपणापासूनच मुलांना आंतरिक वास्तवाची, अस्तित्वाची जाणीव करून द्यावयास हवी. हे अस्तित्व त्यांच्या अंतरंगात आहे, पृथ्वीच्या अंतर्यामी आहे, विश्वाच्या अंतर्यामी आहे आणि ती मुलं, ही पृथ्वी, हे विश्व ह्या आंतरिक सत्याचे कार्य या नात्यानेच अस्तित्वात आहेत, आणि त्याविना कशाचेच अस्तित्व असू शकणार नाही. आणि हाच विश्वाचा खरा आधार असल्याने, स्वाभाविकपणे हीच गोष्ट विजयी होणार आहे. आणि जोवर ही गोष्ट अस्तित्वात आहे तोवर तिच्या विरोधी अशी कोणतीच गोष्ट टिकून राहू शकणार नाही.

लहान मुलाला तात्विक स्पष्टीकरण देणे गरजेचे नाही, पण त्याला ह्या आंतरिक स्वास्थ्याच्या, समाधानाच्या भावनेचा अनुभव द्यायला हवा. जेव्हा एखादी चुकीची, विरोधी गोष्ट करण्यापासून ती आंतरिक छोटीशी गोष्ट त्याला अडविते, तेव्हा त्याला जो मनस्वी आनंद होतो त्याची जाणीव त्याला करून द्यायला हवी. आणि अशा प्रकारच्या अनुभवावरच सर्व प्रकारचे शिक्षण आधारित असावे. मुलाची अशी धारणा व्हायला हवी की, जर त्याला हे आंतरिक समाधान मिळाले नाही तर, काहीच टिकू शकणार नाही कारण आंतरिक समाधान हीच एकमेव गोष्ट चिरस्थायी आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 24)