Tag Archive for: हृदयकेंद्र

(एका साधकाने विचारलेल्या प्रश्नावरील उत्तर श्रीअरविंदांनी त्यांच्या सचिवांना सांगितले आहे आणि सचिव श्रीअरविंदांच्या वतीने लिहीत आहेत.)

तुम्ही लिहिलेल्या पत्राच्या उत्तरादाखल श्रीअरविंद तुम्हाला असे सांगत आहेत की, तुम्ही हृदयकेंद्रामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करू शकता आणि त्यांना साद घालू शकता. त्यांचे स्मरण करा आणि तुमचे सर्व विचार, तुमच्या सर्व कृती आणि तुमचे संपूर्ण जीवन श्रीमाताजींना अर्पण करा, समर्पित करा. तुम्हाला वाटले तर तुम्ही त्यांच्या नामाचा जप करू शकता. तुमचे अस्तित्व विशुद्ध करण्यासाठी आणि तुमच्या प्रकृतीमध्ये बदल घडवण्यासाठी तुम्ही त्यांना साद घालू शकता.

किंवा प्रथमतः श्रीमाताजींची स्थिरता, शांती आणि नंतर त्यांची शक्ती, त्यांचा प्रकाश आणि त्यांचा आनंद वरून खाली अवतरित व्हावेत म्हणून तुम्ही तुमच्या मस्तकाच्या वरदेखील ध्यान करू शकता. या गोष्टी नेहमीच मस्तकाच्या वर (above the head) असतात. त्या मानवी मनाच्या दृष्टीने अतिचेतन अशा असतात. अभीप्सा आणि एकाग्रतेच्या साहाय्याने मन त्याबाबत सचेत बनू शकते आणि आधार (मन, प्राण आणि शरीर) त्यांच्याप्रत खुला होऊ शकतो; परिणामी त्या गोष्टी खाली उतरून मन, प्राण आणि शरीर यांमध्ये प्रवेश करू शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 154-155)

विचारशलाका – ०३

आंतरिक एकाग्रतेच्या साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो –

१) हृदयामध्ये चेतना स्थिर करणे आणि तिथे ‘दिव्य माते’चे नाम, प्रतिमा किंवा संकल्पना, यांपैकी जे तुमच्यासाठी सहजस्वाभाविक असेल त्यावर, चित्त एकाग्र करणे.

२) हृदयातील या एकाग्रतेच्या साहाय्याने मन हळूहळू आणि क्रमश: शांत शांत करत नेणे.

३) हृदयामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती असावी आणि त्यांनी मन, प्राण आणि कृती यांचे नियंत्रण करावे यासाठी आस बाळगणे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 225]