Tag Archive for: सेवा

जीवन जगण्याचे शास्त्र – २८

तुम्ही जे कोणते कर्म कराल ते शक्य तेवढे परिपूर्णपणे करण्याचा प्रयत्न करा. मनुष्याच्या अंतर्यामी असणाऱ्या ईश्वराची ही सर्वोत्तम सेवा असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 306)

*

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे. प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ईश्वरी ‘उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म एक उत्तम संधी प्राप्त करून देते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)

आध्यात्मिकता २८

“राजकीय, सामाजिक किंवा यांत्रिक पद्धतीने झालेले अत्यंत आमूलाग्र बदलसुद्धा कोणतेही परिवर्तन घडवून आणू शकलेले नाहीत कारण जुनीच दुखणी नव्या रूपात पुन्हा तशीच टिकून राहतात: बाह्य वातावरणाच्या एखाद्या अंगाबाबत काहीसा फरक होतो पण मनुष्य जसा होता तसाच कायम राहतो. तो अजूनही तसाच अज्ञानी मानसिक जीव आहे जो त्याच्या ज्ञानाचा दुरूपयोग करत आहे किंवा ते ज्ञान परिणामकारक रीतीने तो वापरत नाहीये. तो अजूनही अहंकारानेच संचालित होत आहे आणि अजूनही त्याच्यावर प्राणिक इच्छावासनांची, आवेगांची, शरीराच्या गरजांची सत्ता चालते, त्याचा दृष्टिकोन अजूनही तसाच वरवरचा आहे आणि आध्यात्मिक नसलेला (unspiritual) असाच आहे, तो त्याच्या स्वतःच्या आत्मतत्त्वाविषयी आणि त्याला संचालित करणाऱ्या आणि त्याचा उपयोग करून घेणाऱ्या शक्तींविषयी अजूनही अनभिज्ञच आहे…

केवळ आध्यात्मिक परिवर्तनामुळेच म्हणजे, मनुष्याच्या (सद्यकालीन) उथळ मानसिक अस्तित्वाकडून सखोल आध्यात्मिक चेतनेकडे होणाऱ्या उत्क्रांतीमुळेच खरा आणि परिणामकारक फरक घडून येऊ शकेल. स्वतःमधील आध्यात्मिक पुरुषाचा (spiritual being) शोध लावणे हे आध्यात्मिक मनुष्याचे मुख्य कर्तव्यकर्म असते आणि त्याच उत्क्रांतीच्या दिशेने जाण्यासाठी इतरांना साहाय्य करणे ही मानववंशासाठी त्याने केलेली खरी सेवा असते; जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत एखादी बाह्य मदत ही थोडीफार साहाय्य करू शकते किंवा दिलासा देऊ शकते पण त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही. किंवा काही निष्पन्न झालेच तर ते अगदीच अल्प असते.”

– श्रीअरविंद [CWSA 21-22 : 917-918]

श्रीअरविंदलिखित ‘दिव्य जीवन’ ग्रंथामधील वरील उतारा श्रीमाताजींनी वाचून दाखविला आणि त्यावर एका साधकाने प्रश्न विचारला. त्याला श्रीमाताजी उत्तर देत आहेत. ते आपण उद्यापासून पाहू. (क्रमश:…)

कर्म आराधना – ३७

आळस आणि अक्रियता (inaction) यांचा शेवट तामसिकतेमध्ये होतो; अचेतनेच्या गर्तेत पडण्यासारखे ते असते, या गोष्टी प्रगती आणि प्रकाश यांच्या विरोधी असतात.

स्वतःच्या अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे – हा आपला आदर्श असला पाहिजे. तोच सत्य चेतना प्राप्त करून घेण्याच्या दिशेने जाणारा सर्वात जवळचा मार्ग आहे.
*
योग्य वृत्तीने केलेले कर्म हे ध्यानच असते.

– श्रीमाताजी
[CWM 14 : 297, 298]