Posts

ईश्वरी कृपा – २४

‘ईश्वरी कृपा’ सदोदित तुमच्यासोबत असते; शांत मनाने तुम्ही तुमच्या हृदयात लक्ष एकाग्र करा, म्हणजे मग तुम्हाला खात्रीपूर्वक, तुम्ही ज्याची आस बाळगून आहात ते साहाय्य आणि इतकेच नव्हे तर, मार्गदर्शनसुद्धा मिळेल.

*

‘ईश्वरी कृपा’ ही सदोदित असतेच, ती शाश्वतपणे अस्तित्वात असते, सक्रिय असते पण श्रीअरविंद म्हणतात की, ‘ईश्वरी कृपा’ स्वीकारण्यासाठी आपण ग्रहणशील स्थितिमध्ये असणे, तिला सांभाळून ठेवणे आणि आपल्याला जे काही प्रदान करण्यात आले आहे त्याचा उपयोग करणे, हे आपल्यालाच अवघड जाते… ‘ईश्वरी कृपा’ ग्रहण करण्यासाठी व्यक्तिपाशी नुसती उत्कट अभीप्सा असणेच पुरेसे नाही तर, तिच्याकडे प्रामाणिक विनम्रता आणि परिपूर्ण विश्वासदेखील असला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 87), (CWM 16 : 250)

ईश्वरी कृपा – २०

एखाद्या व्यक्तीने जेव्हा ‘ईश्वर’प्राप्तीच्या साधनेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याबाबतीत ती व्यक्ती प्रामाणिक असते; म्हणजे असे की, तिचा संकल्प तळमळीचा, प्रामाणिक असून, तो प्रांजळपणे प्रत्यक्षात उतरविला जातो, तेव्हा त्या व्यक्तीने कशाचेच भय बाळगण्याचे कारण नाही; कारण तिच्याबाबतीत जे सारे घडते किंवा जे घडणार आहे ते तिला ईश्वराच्या साक्षात्काराप्रत सर्वात जवळच्या मार्गाने घेऊन जाईल.

हाच असतो ‘ईश्वरी कृपे’चा प्रतिसाद! जीवनातील प्रत्येक गोष्ट अगदी सहज, सुरळीत होणे म्हणजे ‘ईश्वरी कृपा’ असा लोकांचा समज असतो, पण हे खरे नाही.

‘ईश्वरी कृपा’ तुमच्या अभीप्सेची पूर्तता व्हावी यासाठी कार्य करते. आणि तुमच्या अभीप्सेची त्वरेने व वेगाने परिपूर्ती व्हावी म्हणून त्याला अनुरूप अशी प्रत्येक गोष्ट तिच्याकडून घडविली जाते. असे असल्यामुळे घाबरण्यासारखे काहीच नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 180-181)

ईश्वरी कृपा – १८

(व्यक्तीचे शारीरिक आरोग्य, शरीराची स्वास्थ्यकारक वृत्ती, त्याची जडणघडण यावर विवेचन केल्यानंतर श्रीमाताजी ‘ईश्वरी कृपे’बद्दल म्हणाल्या…)

व्यक्तीच्या अंतरंगात जर ‘ईश्वरी कृपे’विषयी अशी श्रद्धा असेल की, ‘ईश्वरी कृपा’ माझ्याकडे लक्ष ठेवून आहे आणि काहीही झाले तरी ‘ईश्वरी कृपा’ आहेच, आणि ती माझ्यावर दृष्टी ठेवून आहे तर, (व्यक्ती अशी श्रद्धा नेहमीच, व आयुष्यभर बाळगू शकते) तिच्या साहाय्याने व्यक्ती कोणत्याही संकटामधून पार होऊ शकते, या श्रद्धेच्या साहाय्याने सर्व अडचणींना सामोरे जाऊ शकते, अशा व्यक्तीला काहीच विचलित करू शकत नाही कारण तिच्यापाशी श्रद्धा असते आणि ‘ईश्वरी कृपा’देखील तिच्यासोबत असते. ती अनंतपटीने शक्तिशाली, अधिक सचेत, अधिक चिरकाळ टिकणारी अशी शक्ती आहे; तुमची शारीरिक ठेवण कशी आहे, तिची अवस्था काय आहे यावर ती शक्ती अवलंबून नसते; ती ‘ईश्वरी कृपे’खेरीज अन्य कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसते आणि म्हणून ती ‘सत्या’वरच विसंबून असते आणि मग तिला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 297)

ईश्वरी कृपा – १३

अज्ञानमूलक चुकांची दुरुस्ती करणे म्हणजे अंधकार नाहीसा करण्यासारखे आहे, जणू तुम्ही दिवा लावता आणि अंधार नाहीसा होतो, पण एखादी गोष्ट चुकीची आहे असे माहीत असूनदेखील, तीच चूक पुन्हा करणे म्हणजे जणू कोणीतरी दिवा लावलेला असावा आणि तुम्ही तो हेतुपुरस्सर विझवून टाकावा… असे करणे म्हणजे, अंधाराला हेतुत: परत बोलावण्यासारखेच आहे.

…ज्यांनी स्वतःला सुधारण्याचा निश्चय केलेला असतो त्यांना साहाय्य करण्यासाठी ईश्वरी ‘कृपा’ नेहमीच उपस्थित असते आणि त्यामुळे, “स्वतःला सुधारण्यासाठी आम्ही खूप कमकुवत आहोत,’ असे ते म्हणू शकत नाहीत. ते फार फार तर असे म्हणू शकतात की, त्यांनी स्वतःला सुधारण्याचा संकल्पच अजून केलेला नाही, म्हणजे त्यांच्या अस्तित्वामध्ये कोठेतरी असे काहीतरी असते की, ज्याने तो संकल्प केलेला नसतो, आणि हे मात्र अधिक गंभीर असते.

कमकुवत असल्याचा युक्तिवाद हे एक निमित्त असते. ज्यांनी संकल्प केलेला असतो त्यांना परमोच्च सामर्थ्य देण्यासाठी ईश्वरी ‘कृपा’ असतेच.

याचा अर्थ असा की, कमकुवतपणाचा युक्तिवाद हा युक्तिवाद नसतो तर तो अप्रामाणिकपणा असतो. आणि अप्रामाणिकपणा म्हणजे शत्रुसाठी नेहमीच मुक्तद्वार असते; म्हणजे तेथे विपरित गोष्टींबाबतची एक सुप्त सहानुभूती असते आणि ती गोष्ट अधिक गंभीर असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 306-307)

ईश्वरी कृपा – ०८

एक अशी ‘सत्ता’ आहे, जिच्यावर कोणताही सत्ताधीश हुकमत गाजवू शकणार नाही; असा एक ‘आनंद’ आहे की, जो कोणत्याही लौकिक यशातून प्राप्त होणार नाही; असा एक ‘प्रकाश’ आहे, जो कोणत्याही प्रज्ञेच्या ताब्यात असणार नाही; असे एक ‘ज्ञान’ आहे की, ज्यावर कोणतेही तत्त्वज्ञान किंवा कोणतेही विज्ञान प्रभुत्व मिळवू शकणार नाही; एक असा ‘परमानंद’ आहे की, कोणत्याही इच्छापूर्तीच्या समाधानातून तसा आनंद मिळू शकणार नाही; अशी एक ‘प्रेमा’ची तृष्णा आहे, जिची तृप्ती कोणत्याही मानवी नातेसंबंधातून होऊ शकत नाही; अशी एक ‘शांती’ आहे, जी व्यक्तिला कोठेच प्राप्त होत नाही, अगदी मृत्युमध्येसुद्धा प्राप्त होत नाही. ही ‘सत्ता’, हा ‘आनंद’, हा ‘प्रकाश’, हे ‘ज्ञान’, हा ‘परमानंद’, हे ‘प्रेम’, ही ‘शांती’ ‘ईश्वरी कृपे’पासूनच प्रवाहित होते.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 380)

ईश्वरी कृपा – ०५

ईश्वरासाठी जो अभीप्सा बाळगत असतो, त्याच्यासमोर नेहमी जी कोणती अडचण उभी राहते तीच स्वयमेव त्याच्यासाठी एक प्रवेशद्वार ठरते; त्या माध्यमातून तो स्वतःच्या व्यक्तिगत पद्धतीने ईश्वराची प्राप्ती करून घेणार असतो; त्याला ईश्वराच्या साक्षात्काराप्रत घेऊन जाणारा त्याचा तो विशिष्ट मार्ग असतो.

अशी देखील वस्तुस्थिती असते की, जर एखाद्याला शेकडो अडचणी आल्या तर, त्याला होणारा साक्षात्कारही विलक्षण असतो – अर्थात, हे उघड आहे की, त्याच्यामध्ये जर धीर आणि चिकाटी असेल, आणि ज्या दोषांमुळे अडचणी निर्माण झाल्या, त्या दोषांविरुद्ध अभीप्सेच्या अग्निची ज्वाला जर तो कायम तेवती ठेवेल, तरच त्याला तो तसा साक्षात्कार होईल.

आणि लक्षात ठेवा की : सर्वसाधारणपणे ईश्वराची कृपादेखील तुमच्या अडचणींच्या प्रमाणातच असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 :143)

ईश्वरी कृपा – ०१

संपूर्ण आविष्करणामध्ये, जग ज्या दुःखामध्ये, अंधकारामध्ये आणि ज्या मूर्खतेमध्ये पहुडले आहे त्यातून या जगाला बाहेर काढण्याचे काम ती अनंत ‘कृपा’ सातत्याने करत असते. अनंत काळापासून ही ‘ईश्वरी कृपा’ कार्यरत आहे, तिचे प्रयत्न अविरत चालू आहेत आणि असे असूनदेखील, अधिक महान, अधिक सत्य, अधिक सुंदर अशा गोष्टींच्या आवश्यकतेची जाणीव होण्यासाठी या जगाला हजारो वर्षे लागली !

आपल्या स्वतःच्याच अस्तित्वामध्ये आपल्याला विरोधाचा जो सामना करावा लागतो त्यावरून, ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याला या जगाचा किती प्रचंड विरोध होत असेल याचे अनुमान, प्रत्येकजण लावू शकतो.

आणि तेव्हाच मग ऊर्ध्वस्थित असलेल्या ‘प्रकाशा’प्रत आणि ‘शक्ती’प्रत आणि जे ‘सत्य’ स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या प्रयत्नात आहे त्या ‘सत्या’प्रत, जर सर्व गोष्टी संपूर्णपणे अर्पण केल्या नाहीत, तर सगळ्या बाह्य गोष्टी, सगळ्या मानसिक रचना, सगळे भौतिक प्रयत्न हे व्यर्थ आहेत, फोल आहेत हे व्यक्तिला उमगते; तेव्हा अशी व्यक्ती निणार्यक प्रगती करण्यासाठी सिद्ध होते. आणि मग ज्याच्यामध्येच सर्वकाही परिवर्तन करण्याची शक्ती आहे अशा, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या त्या ‘ईश्वरा’ला आपल्या अस्तित्वाचे परिपूर्ण, समग्र आणि उत्कट असे आत्मदान करणे, हाच व्यक्तिचा एकमेव खरा प्रभावी दृष्टिकोन असतो.

जेव्हा तुमच्या अंतरंगात असणाऱ्या आत्म्याप्रत तुम्ही खुले होता तेव्हा, जे जीवन खरोखरच जगण्याजोगे आहे, अशा उच्चतर जीवनाची तुम्हाला गोडी चाखायला मिळते आणि त्यानंतर तुमच्यामध्ये त्या जीवनाप्रत उन्नत होण्याची, तेथवर जाऊन पोहोचण्याची इच्छा उदयाला येते, आणि मग ‘हे शक्य आहे’ असा विश्वास निर्माण होतो आणि अंतिमतः त्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याचे सामर्थ्य निर्माण होते आणि अगदी ध्येयाच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाण्याचा संकल्प उदयास येतो.

सर्वप्रथम व्यक्तिने जागे झाले पाहिजे, तेव्हाच व्यक्ती विजय प्राप्त करून घेऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 419-420)

तुम्ही जे काही किंवा ज्या कोणाला ‘ईश्वरा’वर सोपविता, त्या गोष्टीबाबत किंवा त्या व्यक्तीबाबत तुम्ही आसक्त राहता कामा नये किंवा चिंताग्रस्तदेखील राहता कामा नये, तर त्याबाबतीत सर्वोत्तम असे जे असेल ते करावे म्हणून आपण सारे काही ‘ईश्वरा’वर सोपवून दिले पाहिजे.

*

तुम्हाला या योगाची (पूर्णयोगाची) साधना करायची असेल तर आध्यात्मिक सत्य ग्रहण करणे आणि तुमच्या विचारांद्वारे, भावनांद्वारे, कृतींद्वारे आणि तुमच्या प्रकृतीद्वारे त्या सत्याचे आविष्करण करणे ही तुमची एकच एक इच्छा व अभीप्सा असली पाहिजे. तुम्ही कोणाही बरोबरच्या कोणत्याही नातेसंबंधांबद्दल आसक्ती बाळगता कामा नये. साधकाचे इतरांबरोबर असलेले नातेसंबंध हे साधकासाठी अंतरंगातून आलेले असले पाहिजेत, साधकाला जेव्हा खरी चेतना गवसलेली असेल आणि तो साधक जेव्हा प्रकाशात राहत असेल तेव्हा हे नाते निर्माण झाले पाहिजे. असे नातेसंबंध हे अतिमानसिक (supramental) सत्यानुसार, दिव्य जीवनासाठी आणि दिव्य कार्यासाठी, दिव्य मातेच्या शक्तीने आणि इच्छेने त्या साधकाच्या अंतरंगामधूनच निर्धारित केलेले असतील. हे नातेसंबंध त्याच्या मनाने आणि त्याच्या प्राणिक इच्छांनी निर्धारित केलेले असता कामा नयेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे.

श्रीअरविंद
(CWSA 31 : 320, CWSA 32 : 142)

व्यक्ती जेव्हा आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते तेव्हा सामान्य प्रकृतीशी संबंधित असणारे कौटुंबिक बंध गळून पडतात – व्यक्ती त्या जुन्या गोष्टींबाबत तटस्थ होऊन जाते. ही तटस्थता म्हणजे एक प्रकारची मुक्तता असते. त्यामध्ये कटुता असण्याची अजिबात आवश्यकता नाही. जुन्या भौतिक जिव्हाळ्याचे बंध तसेच कायम राहणे म्हणजे सामान्य प्रकृतीला धरून राहण्यासारखे असते आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीला अडसर निर्माण होतो.

*

कौटुंबिक बंध परस्परांमध्ये अनावश्यक व्यवहार निर्माण करतात. आणि ईश्वराकडे पूर्णतः वळण्याच्या मार्गात ते आड येतात. योगमार्गाचा अवलंब केल्यावर, शारीरिक चेतनेच्या सवयींवर आधारित किंवा शारीरिक नात्यांवर आधारित नातेसंबंध हे कमीत कमी असले पाहिजेत आणि ते साधनेवर अधिकाधिक आधारित असले पाहिजेत. म्हणजे हे नातेसंबंध जुन्याच दृष्टिकोनाचे किंवा सामान्य पद्धतीचे असता कामा नयेत; तर एका साधकाचे इतर साधकांशी असावेत तसे असले पाहिजेत, एकाच मार्गावरून प्रवास करणारे जीव असावेत त्याप्रमाणे किंवा एकाच मातेची मुले असावीत तसे असले पाहिजेत.

*

सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती हीच की, तुम्ही अंतरंगातून श्रीमाताजींकडे वळले पाहिजे आणि फक्त आणि फक्त त्यांच्याकडेच वळले पाहिजे. यास साहाय्य व्हावे म्हणूनच बरेचसे बाह्य संपर्क टाळणे आवश्यक ठरते. परंतु लोकांबरोबर असलेले सर्वच संपर्क टाळणे, हे अभिप्रेतही नाही किंवा त्याची आवश्यकताही नाही. जर कोणती गोष्ट आवश्यकच असेल तर ती हीच की, त्या संपर्कांमध्ये तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून न देता, तुमच्या संपर्कातील व्यक्तींना योग्य आंतरिक चेतनेनुसार भेटले पाहिजे. त्या पृष्ठवर्ती गोष्टी आहेत असे समजून त्यांना वागणूक दिली पाहिजे – त्यांच्याशी खूप सलगीने किंवा त्यांच्यामध्येच मिसळून गेल्याप्रमाणे वागता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 291, 291 & CWSA 32 : 459)

आंतरिक एकाकीपण हे केवळ ईश्वराशी एकरूप होण्याच्या आंतरिक अनुभूतीतूनच दूर होऊ शकते. कोणतेही मानवी संबंध ती पोकळी भरून काढू शकत नाहीत. त्याच प्रकारे, आध्यात्मिक जीवनासाठी, इतरांशी असलेला सुसंवाद हा मानसिक आणि प्राणिक संबंधांवर आधारित असता कामा नये तर, दिव्य चेतना आणि ईश्वराशी ऐक्य यांच्यावर आधारित असला पाहिजे. जेव्हा व्यक्तीला ईश्वर गवसतो आणि व्यक्ती ईश्वरामध्ये इतरांना पाहू लागते तेव्हा, खरा सुसंवाद घडून येतो. दरम्यानच्या काळात, ईश्वरी ध्येयाबाबतच्या समान भावनेच्या पायावर आणि आपण सारी एकाच मातेची लेकरे आहोत, या भावनेच्या पायावर सदिच्छा आणि एकोपा साधता येणे शक्य आहे. आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक पायावरच खराखुरा सुसंवाद निर्माण होणे शक्य असते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 310-311)