Tag Archive for: साधना

श्रीमाताजी : बालकाचे आंतरात्मिक जीवन (psychic life) हे त्याच्या मानसिक जीवनाने झाकलेले नसते. बालकाची घडण पक्की झालेली नसल्याने, त्याच्यामध्ये विकासाची मोठी क्षमता असते आणि ते पुरेशा लवचीकतेने प्रगती करू शकते.

साधक : पूर्णयोगामध्ये बालकसदृश मार्गाचा अंगीकार करता येतो, त्याविषयी मला अधिक जाणून घ्यायचे आहे.

श्रीमाताजी : बालकसदृश मार्ग म्हणजे मनामध्ये कोणतीही शंका येऊ न देता ठेवलेला निःसंशय विश्वास, संपूर्ण अवलंबित्व आणि हातचे काहीही राखून न ठेवता केलेले समर्पण.

साधक : हा बालकसदृश मार्ग माझ्यासाठी योग्य राहील असे तुम्हाला वाटते का?

श्रीमाताजी : बालकसदृश मार्ग हा नेहमीच चांगला असतो परंतु तो सोपा नाही, कारण तो अतीव प्रामाणिकपणे आणि उत्स्फूर्तपणे स्वीकारला गेला पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 17 : 121]

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ‘ईश्वर’च स्वत:च्या ‘शक्ति’द्वारे विद्यमान असतो पण तो त्याच्या ‘योगमाये’द्वारे झाकलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारे करत असतो. ‘योगा’मध्येही ‘ईश्वर’ हाच ‘साधक’ आणि ‘साधना’ही असतो; त्याचीच ‘शक्ती’ तिच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे ‘साधना’ शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत ‘साधका’च्या वैयक्तिक प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला वैयक्तिक प्रयत्न म्हणजे अभीप्सा, नकार आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

– श्रीअरविंद [CWSA 32 : 06]

जेव्हा मानववंश प्रथमत: निर्माण करण्यात आला तेव्हा अहम् हा एकीकरण करणारा घटक होता. या अहंभोवतीच अस्तित्वाच्या विविध अवस्थांचे वर्गीकरण करण्यात आले होते; परंतु आता जेव्हा ‘अतिमानवा’च्या जन्माची तयारी चालू आहे, तेव्हा अहंला नाहीसे व्हावेच लागेल, त्याने चैत्य पुरुषाला (psychic being) वाट मोकळी करून देणे आवश्यक आहे; मानवामध्ये ‘दिव्यत्वा’चे आविष्करण व्हावे म्हणून हळूहळू ईश्वराच्या मध्यस्थीने त्याची घडण व्हायला सुरुवात झाली आहे.

‘दिव्यत्वा’चे मनुष्यामध्ये आविष्करण होते ते चैत्य प्रभावाखालीच होते आणि त्याद्वारे अतिमानवतेच्या आगमनाची तयारी होते. चैत्य पुरुष हा अमर्त्य असतो आणि त्याच्याद्वारेच पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे (immortality) आविष्करण होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी की, व्यक्तीने स्वतःच्या चैत्य पुरुषाचा शोध घेतला पाहिजे, त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे. आणि अहंची जागा त्या चैत्य पुरुषाला घेऊ दिली पाहिजे; ज्यामुळे अहंला एकतर रूपांतरित व्हावे लागेल अन्यथा नाहीसे होणे भाग पडेल.

– श्रीमाताजी [CWM 16 : 434]

तुमच्या प्राणिक प्रकृतीची जुनी सवय तुम्हाला पुन्हापुन्हा (तुमच्या अस्तित्वाच्या) बाह्यवर्ती भागात जायला भाग पाडते; परंतु त्या उलट तुम्ही चिकाटीने, तुमच्या खऱ्या अस्तित्वामध्ये म्हणजे तुमच्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहण्याची आणि तेथूनच सर्व गोष्टींकडे पाहण्याची सवय लावून घेतली पाहिजे. तेथूनच तुम्हाला खऱ्या विचारांची, खऱ्या दृष्टीची प्राप्ती होते, तेथूनच तुम्हाला सर्व गोष्टींचे आणि तुमच्या प्रकृतीचे आणि तुमच्या ‘स्व’चे योग्य आकलन होते.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 228]

तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये स्वतःचे एकत्रीकरण अधिक दृढपणे केले पाहिजे. तुम्ही जर स्वतःला सतत विखरत (disperse) राहिलात आणि आंतरिक वर्तुळ ओलांडून पलीकडे गेलात, तर सामान्य बाह्यवर्ती प्रकृतीच्या क्षुद्रतेमध्ये आणि ती प्रकृती ज्या गोष्टींप्रति खुली आहे अशाच गोष्टींच्या प्रभावाखाली राहाल. तुम्ही सतत वावरत राहाल.

अंतरंगामध्ये राहून जीवन जगायला शिका, तसेच नेहमी अंतरंगात राहून, श्रीमाताजींशी नित्य आंतरिक संपर्क ठेवून कृती करायला शिका. सुरुवातीला ही गोष्ट नेहमी आणि समग्रपणे करणे कठीण वाटू शकेल, परंतु व्यक्ती जर नेटाने तसे करत राहिली तर तसे करता येणे शक्य असते, आणि असे करायला शिकणे ही किंमत चुकती करूनच, व्यक्तीला ‘योगा’मध्ये सिद्धी प्राप्त होऊ शकते.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 227]

ज्या प्रकाशाच्या आधारे कृती करायची तो प्रकाशच गवसलेला नसेल तर कृतिप्रवणतेवरील हा सगळा भर निरर्थक ठरतो. योगामधून जीवन वगळता कामा नये, योगामध्ये जीवनाचा समावेश असलाच पाहिजे, याचा अर्थ जीवन आहे तसेच स्वीकारण्यासाठी, म्हणजे त्याच्या अडखळणाऱ्या अज्ञानानिशी, दुःखानिशी, मानवी इच्छा आणि तर्कबुद्धी यांच्या अंधकारमय गोंधळानिशी जीवन स्वीकारण्यासाठी आपण बांधील आहोत, असा होत नाही. जीवन ज्या आवेगांची, उपजत प्रेरणांची अभिव्यक्ती करत असते त्या साऱ्यानिशी जीवनाचा स्वीकार करण्यासाठी आपण बांधील आहोत, असा याचा अर्थ होत नाही.

सातत्याने नवप्रवाह निर्माण करणाऱ्या मानवी बुद्धीमुळे आणि ऊर्जेमुळे सारे काही ठीक होईल असे कृतिप्रवणतेच्या समर्थकांना वाटत असते. परंतु मानवी बुद्धीचा एवढा प्रचंड विकास आणि ज्याला इतिहासामध्ये तुलनाच नाही अशा ऊर्जेच्या अचाट उत्पादनानंतरसुद्धा झालेली जगाची सद्यस्थिती आपण पाहू लागलो तर, कृतिप्रवणतेचे समर्थक ज्या भ्रमामध्ये राहून (त्यांच्या कृतीमुळे सारे काही ठीक होईल या भ्रमामध्ये राहून) परिश्रम करत असतात त्या भ्रमाचा, जगाची सद्यस्थिती म्हणजे सूचक पुरावाच असल्याचे आढळते.

(कृतिप्रवणतेच्या समर्थनाची भूमिका आणि योगाची भूमिका यातील फरक श्रीअरविंद येथे स्पष्ट करत आहेत…) केवळ चेतनेच्या परिवर्तनाद्वारेच या जीवनाचा खरा आधार शोधला जाऊ शकतो, ही ‘योगा’ची भूमिका आहे; अंतरंगाकडून बहिरंगाकडे हा येथे खरंतर नियम असतो. परंतु अंतरंग म्हणजे पृष्ठभागाच्या मागे अर्धापाऊण इंच आतमध्ये असा त्याचा अर्थ होत नाही. व्यक्तीने आत खोलवर जाऊन आपल्या ‘आत्म्या’चा, ‘स्व’चा, आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘दिव्य सद्वस्तु’चा शोध घेतला पाहिजे आणि तेव्हाच आपले जीवन ही खरी अभिव्यक्ती ठरू शकेल; आपण म्हणजे आजवर जी एक अपुरी, अपरिपूर्ण, नेहमीच पुनरावृत्त होणारी गोंधळलेली, धूसर आणि अंध वस्तू होतो त्याऐवजी, आपण काय असू शकतो त्याची, आपले जीवन ही खरी अभिव्यक्ती ठरू शकेल.

आपल्या जुन्याच गोंधळात राहायचे आणि अपघाताने, योगायोगाने का होईना पण कोणतातरी एखादा नवीनच शोध लागेल अशा आशेने अंधारात चाचपडत राहायचे की, जोपर्यंत आपल्या अंतरंगामध्ये व बाहेरही असणाऱ्या देवतेचा शोध आपल्याला लागत नाही आणि आपण आपल्या अंतरंगामध्ये तिची मूर्ती घडवत नाही तोपर्यंत, मागे राहून, अंतरंगातील ‘प्रकाशा’चा शोध घ्यायचा, या दोन्हीमधून आपल्याला एका गोष्टीची निवड करायची आहे.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 444]

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती मिळविण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धिकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा त्यासाठीचा सर्वांत सोपा मार्ग आहे.

(योग्य वृत्तीने केलेले कर्म म्हणजे कोणते कर्म?) – असे कर्म की जे इच्छाविरहित किंवा अहंकारविरहित असते – इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेचच नकार देऊन केलेले कर्म हे योग्य वृत्तीने केलेले कर्म असते; ‘दिव्य माते’चे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि तिने कार्य हाती घ्यावे म्हणून तिची प्रार्थना करून केलेले कर्म, की ज्यामुळे आंतरिक शांततेप्रमाणेच, कर्मामध्येदेखील तुम्हाला दिव्य मातेची उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व जाणवू शकेल; अशा प्रकारचे ‘दिव्य माते’प्रत अर्पण म्हणून केलेले कर्म हे योग्य वृत्तीने केलेले कर्म असते.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 226]

आपल्या कर्मांचा ‘अधिपती’ असणारा ईश्वर, हा आपल्या प्रकृतीचे रूपांतरण करत असतानादेखील आपल्या प्रकृतीचा आदर करत असतो; कोणत्याही स्वैर लहरीनुसार नव्हे तर, तो नेहमीच प्रकृतीच्या माध्यमातून कार्य करत असतो. आपल्या या अपूर्ण प्रकृतीमध्येच आपल्या पूर्णत्वाची सामग्री सामावलेली असते. पण ती अपरिपक्व दशेत असते, ती विरूप झालेली, अस्थानी, कशीही अव्यवस्थितपणे फेकून दिलेली किंवा अगदीच बापुडवाण्या अयोग्य अशा क्रमाने मांडलेली असते.

ही सर्व सामग्री धीराने पूर्णत्वाला नेली पाहिजे, ती शुद्ध केली पाहिजे, तिची पुनर्रचना केली पाहिजे, तिची पुनर्घडण केली पाहिजे, तिचे रूपांतरण केले पाहिजे. तिला कशाही तऱ्हेने छिन्नविछिन्न करता कामा नये वा तिचे भंजनही करता कामा नये, तिला मारून टाकता कामा नये किंवा विकृत करता कामा नये, जोरजबरदस्तीने किंवा नकाराने तिचा नाशही करता कामा नये.

हे जग आणि या जगात राहणारे आपण सर्व म्हणजे ‘त्याची’ निर्मिती आहोत, त्याचे आविष्करण आहोत. आपल्या संकुचित आणि अज्ञानी मनाला समजू शकणार नाही अशा रीतीने तो आपल्याला आणि या विश्वाला हाताळत असतो. जोपर्यंत मन शांत होऊन दिव्य ज्ञानाप्रत खुले होत नाही तोपर्यंत आपल्या मनाला ते समजू शकणार नाही. आपल्या दोषांमध्ये सत्याचे असे एक द्रव्य असते की जे, आपल्या चाचपडणाऱ्या बुद्धीला, त्याचा अर्थ उलगडवून दाखवावा म्हणून परिश्रम करत असते. मानवी बुद्धी दोष काढून टाकते पण त्याचबरोबर त्यामध्ये अंतर्भूत असणारे सत्यही काढून टाकते आणि ती आधीच्या दोषाच्या जागी तितक्याच एका अर्ध-सत्याची, अर्ध-दोषाची स्थापना करते.

परंतु जोपर्यंत आपण त्यामध्ये दडलेल्या आणि प्रत्येक मिथ्या आवरणाच्या खाली सुरक्षित ठेवण्यात आलेल्या सत्याप्रत पोहोचण्याइतपत सक्षम होत नाही तोपर्यंत ‘दिव्य प्रज्ञा’ आपल्या चुका सहन करते. पापाचरणाकडे नव्हे तर पूर्णत्वाकडे जाणे, तसेच ज्याला आपण ‘ईश्वरी गुण’ असे संबोधू शकतो त्याप्रत जाणे हेच ज्या धडपडणाऱ्या ‘शक्ती’चे उद्दिष्ट असते; अशा ‘शक्ती’ची चुकीच्या दिशेने पडलेली पावले म्हणजे आपली पापं असतात. बरेचदा ही पापं म्हणजे जो गुण रूपांतरित केला जाणे आवश्यक असतो अशा एखाद्या गुणावरील आवरणं असतात, त्या ओंगळवाण्या आवरणांपासून तो गुण मुक्त करावा लागतो…

– श्रीअरविंद [CWSA 23 : 245-246]

एकदा का एखाद्याने योगमार्गामध्ये प्रवेश केला की, मग अगदी काहीही झाले, किंवा कोणत्याही अडचणी उद्भवल्या तरी ध्येयापर्यंत जाण्याचा निश्चय दृढ ठेवायचा, एवढी एकच गोष्ट त्याने करायची असते. खरेतर, योगाची परिपूर्ती कोणीही स्वतःच्या क्षमतेद्वारे करू शकत नाही – तुमच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या महत्तर ‘शक्ती’द्वारेच ही परिपूर्ती होऊ शकते – सर्व प्रकारच्या चढउतारांमध्ये, त्या ‘शक्ती’ला नेटाने केलेल्या आवाहनामुळे ही परिपूर्ती होऊ शकते. तुम्ही अगदी सक्रियपणे ‘अभीप्सा’ बाळगू शकत नसलात तरीदेखील, साहाय्य लाभावे म्हणून श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख राहा – ही एकच गोष्ट अशी आहे की, जी नित्य केली पाहिजे.

– श्रीअरविंद [CWSA 32 : 294]

आंतरिक आधार शोधण्यासाठी व्यक्तीने, आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या अत्यंत सखोल गुहेमध्ये बुडी मारली पाहिजे; व्यक्तीने आत अधिक आत, खोल, अधिक खोल उतरले पाहिजे. मनावर उमटलेले सारे ठसे बाजूला सारून, अक्षुब्ध, अविचल शांतीच्या शोधात, एका स्तरानंतर दुसऱ्या स्तरावर, एका चेतनेनंतर दुसऱ्या चेतनेकडे, असे अगदी खोल गाभ्यातच प्रविष्ट झाले पाहिजे. अस्तित्वाच्या या अतीव अचंचलतेमध्ये (quietude), साऱ्या बाह्य गोंगाटापासून दूर, साऱ्या दुःखयातनांपासून दूर, विचार, कल्पनांपासून दूर, साऱ्या संवेदनांपासून अगदी दूर जात, जिथे अहंकार अस्तित्वातच नसतो अशा स्थानी, ईश्वराचे ‘अस्तित्व’ अनुभवण्यासाठी व्यक्तीने अगदी काळजीपूर्वकपणे अंतरंगामध्ये प्रविष्ट झालेच पाहिजे.

तेथूनही अजून पुढे जावे लागते, शोध घेण्यासारखे बरेच काही शिल्लक असते, जेथे सर्व-शक्तिमान, सर्व-सिद्धिदायिनी ईश्वरी ‘शक्ती’ स्पंदित होत असते, त्या शक्तीकडे चेतना अभिमुख करणे आवश्यक असते. जिथे कोणतीही कृती शिल्लक राहात नाही, कोणताही ठसा उमटलेला नाही, अहंकार नाही, स्वतंत्र अस्तित्व शिल्लक नाही, अन्य काहीही नाही तर फक्त आनंदलहरी आहेत, आणि ज्या ठायी एक परिपूर्ण समत्व असते असे एक स्पंदन; असे एक स्पंदन की जे साऱ्याचे उगमस्थान असते, तिथपर्यंत व्यक्तीने खोल खोल गेले पाहिजे. या परिपूर्ण आणि अक्षर, अविकारी शांतीमध्ये एकात्म पावले पाहिजे, ते ऐक्य अनुभवले पाहिजे…

-श्रीमाताजी [The Supreme by Mona Sarkar]