Posts

विचार शलाका – ०४

दुःखभोगामध्ये रमणारी आणि त्याची इच्छा बाळगणारी अशी तुमच्यामध्ये जी गोष्ट असते ती मानवी प्राणाचाच (vital) एक भाग असते. या गोष्टींचेच वर्णन आम्ही प्राणाचा अप्रामाणिकपणा व त्याचा विकृत पीळ असे करतो; प्राणाचा तो भाग दुःख व संकटे यांच्याविरुद्ध गळा काढतो आणि ‘ईश्वर’, जीवन व इतर सारे त्याला छळत असल्याचा त्यांच्यावर आरोप करतो. पण बव्हंशी दुःख-संकटे येतात आणि स्थिरावतात याचे कारण, प्राणातील त्या विकृत भागालाच ती हवी असतात! प्राणातील त्या घटकापासून पूर्णपणे सुटका करून घ्यायलाच हवी.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 178)

सद्भावना – २६

(प्राणामध्ये (Vital) दोन प्रवृत्ती आढळतात – एक म्हणजे निराशेची आणि दुसरी अतिउत्साहाची. या दोन प्रवृत्तींना कसे हाताळावे, याविषयी चर्चा सुरू असताना, श्रीमाताजी पुढे सांगत आहेत…)

अगदी काळजीपूर्वक टाळलाच पाहिजे असा हा एक मोठा अडथळा आहे. असमाधानाचे किंवा चिडचिडेपणाचे अगदी बारीकसे लक्षण जरी आढळले तरी, लगेचच आपण आपल्या प्राणाला असे सांगितले पाहिजे की, ”माझ्या मित्रा, तू शांत राहणार आहेस, तुला जे करायला सांगितले आहे तेवढेच तू करणार आहेस, अन्यथा माझ्याशी गाठ आहे.” आणि दुसरीकडे, “आत्ताच्या आत्ता सारे काही झालेच पाहिजे,’’ असे म्हणणारा, जो अतिउत्साही (प्राण) असतो त्याला असे समजावून सांगितले पाहिजे की, “थोडा शांत हो, तुझी उत्साहशक्ती चांगलीच आहे पण ती अशी पाच मिनिटांतच वाया घालविता कामा नये. आपल्याला ती पुढेही दीर्घकाळ लागणार आहे, तिचे काळजीपूर्वक जतन कर, आणि मला जेव्हा तिची आवश्यकता भासेल तेव्हा मी स्वतःहून तुझ्या सद्भावनेला हाक देईन. तेव्हा तू सद्भावनेने परिपूर्ण आहेस हे दाखवून देशील, तू आज्ञा पाळशील, तू कुरकूर करणार नाहीस, तू विरोध करणार नाहीस, तू बंड करणार नाहीस, तू म्हणशील, ‘हो, हो. मी करीन.” तुला जेव्हा विचारण्यात येईल तेव्हा तू किंचितसा त्याग करशील आणि म्हणशील, “हो, मी अगदी मनापासून करीन.” (प्राणाच्या अतिउत्साहाला तुम्ही अशा प्रकारे आवर घातला पाहिजे.)

– श्रीमाताजी
(CWM 04 : 249)

सद्भावना – २५

व्यक्ती ज्यावेळी अतिशय सतर्क आणि अतिशय प्रामाणिक असते तेव्हा, तिने हाती घेतलेल्या कामाचे किंवा ती करत असलेल्या कृतीचे मूल्य किती आहे किंवा काय आहे यासंबंधी, तिला एखादी आंतरिक पण सुस्पष्ट सूचना मिळू शकते. खरोखर, जिच्यापाशी पुरेपूर सद्भावना आहे अशी एखादी व्यक्ती असेल म्हणजे जी व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणाने, तिच्या अस्तित्वाच्या समग्र जाणिवयुक्त भागानिशी, योग्य कृती, योग्य प्रकारे करण्याची इच्छा बाळगत असेल तर नेहमीच अशा प्रकारची अंतःसूचना मिळते. कोणत्याही कारणाने का असेना पण जर का तिने कमीअधिक घातक अशी एखादी कृती करायला सुरुवात केली तर, तिला अशा प्रत्येक वेळी आज्ञा-चक्रापाशी (solar plexus) एक प्रकारच्या अस्वस्थतेची जाणीव होते. ही अस्वस्थता आक्रमक नसते, नाट्यमयरित्या काहीतरी करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी ती बळाचा वापर करत नाही, परंतु तरीही सतर्क व्यक्तीसाठी ती अस्वस्थता अगदी सुस्पष्ट असते; ती काहीशी पश्चात्तापासारखी किंवा असहमतीसारखी असते. कधीकधी असहकार पुकारण्या इतपतदेखील या अस्वस्थतेची मजल जाऊ शकते. पण मला येथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, त्या अस्वस्थतेमध्ये कोणतीही आक्रमकता नसते, तिच्यामध्ये कोणताही क्रूर असा स्वाग्रह (self-assertion) नसतो. म्हणजे असे की, ती अस्वस्थता कोणताही गोंगाट करत नाही, इजा पोहोचवीत नाही, काहीशी बेचैनी असते इतकेच.

परंतु जर का तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष केलेत, तिच्याकडे लक्ष दिले नाहीत, तिला काही महत्त्व दिले नाहीत तर, कालांतराने ती पूर्णपणे निघून जाते आणि मग पुढे पुढे तर, अशी अस्वस्थता जाणवणेच बंद होते.

असे दुर्लक्ष झाले तर वाढत्या चुकांच्या प्रमाणात अस्वस्थता वाढण्याऐवजी, उलट, ती अस्वस्थता जाणवेनाशी होते आणि चेतना झाकोळून जाते.

पण म्हणून, हेच याचे निश्चित लक्षण आहे असे व्यक्ती म्हणू शकत नाही; कारण जर का तुम्ही ही अशा प्रकारशी लहानशी अंतःसूचना अनेक वेळा डावलली असेल, तर, कालांतराने ती सूचना येईनाशी होते. परंतु मी तुम्हाला सांगते की, अगदी प्रामाणिकपणे तुम्ही तिच्याकडे लक्ष दिलेत तर, ती अंतःसूचना एक अत्यंत खात्रीलायक आणि मोलाची मार्गदर्शक ठरते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 31-32)

सद्भावना – २४

प्रश्न : आजारपण येणे म्हणजे योगमार्गातील परीक्षा असते का?

श्रीमाताजी : परीक्षा? अजिबातच नाही. प्रगती करावी म्हणून व्यक्तीला हेतुपुरस्सर आजारपण देण्यात येते का? नाही, नक्कीच ते तसे नाही. वास्तविक, तुम्ही हीच गोष्ट दुसऱ्या बाजूने विचारात घेतली पाहिजे आणि मग तुम्ही असे म्हणू शकता की, काही माणसं अशीही असतात की, ज्यांची अभीप्सा इतकी सातत्यपूर्ण असते आणि त्यांची सद्भावना इतकी समग्र असते की त्यांच्याबाबतीत जे जे काही घडते त्या साऱ्या गोष्टींकडे ते प्रगती करण्यास उद्युक्त करणारी अशी मार्गावरील कसोटी म्हणून पाहतात. मला अशी काही माणसं माहीत आहेत की जी आजारी पडतात तेव्हा, आजारपण म्हणजे प्रगती करण्यासाठी साहाय्य करणाऱ्या ‘ईश्वरी कृपे’चा पुरावा आहे, असे मानत असत. ती स्वतःला असे सांगत असत की, ही चांगली खूण आहे, आता मी माझ्या आजारपणाचे कारण शोधीन आणि मग आवश्यक ती प्रगती मी करून घेईन. मला अशा प्रकारची जी काही मोजकी माणसं माहीत आहेत, ती अगदी वेगाने प्रगती करतात. आणि काही जण याउलट असतात. ते या गोष्टीचा प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याऐवजी, कोलमडून पडतात. हे त्यांच्यासाठी अतिशय वाईट असते. पण व्यक्ती आजारी पडली तर, तिने योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे तो असा की, ”असे काहीतरी आहे की जे बरोबर चाललेले नाही, ते काय आहे त्याचा मी शोध घेईन.” ‘ईश्वरा’ने तुमच्यावर मुद्दामहून आजारपण धाडले आहे, असा विचार तुम्ही कधीच करता कामा नये….

– श्रीमाताजी
(CWM 05 : 168-169)

सद्भावना – २३

केवळ चैत्य अस्तित्वातून आलेली प्रेरणाच खरी असते. प्राण आणि मन यांच्याकडून येणाऱ्या प्रेरणा या निश्चितपणे अहंकारमिश्रित असतात आणि अनियंत्रित असतात. बाहेरील संपर्काला प्रतिक्रिया म्हणून व्यक्तीने कृती करता कामा नये तर, प्रेमाच्या आणि सद्भावनेच्या अपरिवर्तनीय (Immutable) दृष्टिकोनातून कृती केली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 334)

सद्भावना – २२

सर्वांत बाह्यवर्ती शारीरिक चेतना आणि चैत्य चेतना (Psychic Consciousness) या दोहोंमध्ये नित्य संपर्क प्रस्थापित करणे हे स्वाभाविकपणेच अतिशय कठीण असते. आणि या शारीरिक चेतनेपाशी भरपूर सद्भावना असते; ती अतिशय नियमित असते, ती खूप धडपड करते, पण ती मंद आणि जड असते, तिला खूप वेळ लागतो, ती प्रगत होणे कठीण असते. ती थकत नाही, पण ती आपणहून प्रयत्नही करत नाही, ती तिच्या मार्गाने, शांतपणे वाटचाल करत असते. बाह्य चेतनेला चैत्य पुरुषाच्या संपर्कात येण्यासाठी (कदाचित) कित्येक शतकेदेखील लागू शकतात. परंतु या ना त्या कारणास्तव प्राण (vital) त्यामध्ये हातभार लावतो. एक आवेग त्याचा ताबा घेतो. ते कारण नेहमी आध्यात्मिकच असते असे नाही, पण या ना त्या कारणासाठी, प्राणाला तो संपर्क हवाहवासा असतो. तो संपर्क प्रस्थापित व्हावा अशी त्याची मनीषा असते. आपल्या साऱ्या ऊर्जेनिशी, आपल्या साऱ्या सामर्थ्यानिशी, साऱ्या आवेगांनिशी, जोमानिशी त्याला तो संपर्क हवा असतो : तीन महिन्यांमध्ये ती गोष्ट साध्य होऊ शकते.

त्यामुळे प्राणाला हाताळताना फार काळजी घेतली पाहिजे. त्याला मोठ्या काळजीपूर्वकतेने वागणूक द्या पण त्याच्यासमोर नमते घेऊ नका. अन्यथा तो तुम्हाला सर्व प्रकारच्या त्रासदायक आणि अप्रिय प्रयोगांकडे खेचून नेईल. परंतु या ना त्या प्रकारे तुम्ही जर का त्याला पटवून देण्यात यशस्वी झालात तर, तुम्ही मार्गावर प्रचंड प्रगती करू शकाल.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 257-258)

सद्भावना – १५

ईश्वराशी एकरूप होण्याच्या आंतरिक अनुभूतीद्वारेच अंतरंगातील एकाकीपण दूर होऊ शकते, कोणतेही मानवी संबंध ही पोकळी भरून काढू शकत नाहीत. त्याच प्रकारे, आध्यात्मिक जीवनासाठी इतरांशी असलेला सुसंवाद हा मानसिक आणि प्राणिक आपुलकीवर आधारित असता कामा नये तर, दिव्य चेतना आणि ‘ईश्वरा’शी ऐक्य यांच्यावरच आधारित असला पाहिजे. जेव्हा व्यक्तीला ‘ईश्वर’ गवसतो आणि व्यक्ती ‘ईश्वरा’मध्ये इतरांना पाहू लागते तेव्हा, खरा सुसंवाद घडून येतो. दरम्यानच्या काळात, सामायिक दिव्य ध्येयाबद्दल असलेल्या भावनेच्या आधारावर आणि आपण सारी एकाच ‘माते’ची लेकरे आहोत, या भावनेच्या पायावर सद्भावना आणि एकोपा साधता येणे शक्य आहे. आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक पायावरच खरा सुसंवाद निर्माण होणे शक्य असते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 310-311)

सद्भावना – १३

एकदा तुम्ही (योगमार्गाच्या वाटचालीस) सुरुवात केलीत की मग मात्र तुम्ही अगदी अंतापर्यंत गेलेच पाहिजे. माझ्याकडे मोठ्या उत्साहाने जेव्हा लोकं येतात तेव्हा मी कधीकधी त्यांना सांगते की, “थोडा विचार करा, हा मार्ग सोपा नाही, तुम्हाला वेळ लागेल, धीर धरावा लागेल. तुमच्याकडे तितिक्षा (Endurance) असणे गरजेचे आहे, पुष्कळशी चिकाटी आणि धैर्य आणि अथक अशी सद्भावना असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत का ते पाहा आणि मगच सुरुवात करा. पण एकदा का तुम्ही सुरुवात केलीत की मग सारे संपते, तेथे परत फिरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तुम्हाला शेवटपर्यंत गेलेच पाहिजे.”

– श्रीमाताजी
(CWM 06 : 441)

सद्भावना – ०७

(श्रीअरविंद यांच्या पत्रामधून…)

इतरांविषयी आप-पर भाव, पसंती-नापसंती या गोष्टी मानवाच्या प्राणिक प्रकृतीमध्ये भिनल्यासारख्या आहेत. याचे कारण काहीजण आपल्या स्वतःच्या प्राणिक स्वभावाशी सुसंवाद राखतात आणि इतरजण मात्र तसे करत नाहीत; तसेच जेव्हा एखाद्याचा प्राणिक अहंकार दुखावला जातो किंवा माणसांनी कसे वागले पाहिजे याबाबतीत त्याच्या असलेल्या कल्पनांनुसार जेव्हा माणसं वागत नाहीत किंवा गोष्टी त्याच्या पसंतीनुसार घडत नाहीत तेव्हा तो असंतुष्ट होतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या आत्म्यामध्ये आध्यात्मिक स्थिरता आणि समता, सर्वांविषयीची एक सद्भावना किंवा एका विशिष्ट अवस्थेमध्ये ‘ईश्वरा’खेरीज इतर सर्वांविषयी एक निश्चल अलिप्तता असते; चैत्य (psychic) अस्तित्वामध्ये सर्वांविषयी मूलभूतपणे समान दयाळूपणा किंवा प्रेम असते परंतु एखाद्याबाबत विशेष नातेही असू शकते – परंतु प्राण (vital) मात्र नेहमीच असमान असतो, पसंती-नापसंतीने भरलेला असतो.

साधनेद्वारे प्राणाला स्थिर-शांत केलेच पाहिजे; ऊर्ध्वस्थित आत्म्याकडून सर्व वस्तुमात्रांबाबतची त्याची शांत सद्भावना आणि समता आणि चैत्य अस्तित्वाकडून त्याचा सार्वत्रिक दयाळूपणा किंवा प्रेम यांचा स्वीकार प्राणाने करायला हवा. या गोष्टी होतील पण हे घडून येण्यासाठी काही कालावधी जावा लागेल. राग, अधीरता किंवा नापसंतीच्या आंतरिक तसेच बाह्य प्रवृत्तींपासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे.

गोष्टी जर विपरित झाल्या किंवा चुकीच्या पद्धतीने घडून आल्या तर तुम्ही सहजतेने असे म्हटले पाहिजे की, ”श्रीमाताजींना सारे काही माहीत आहे,” आणि कोणत्याही संघर्षाविना शांतपणाने तुम्ही गोष्टी करत राहिल्या पाहिजेत किंवा करवून घेतल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 312)

सद्भावना – ०५

मानवी जीवनामधील सामान्य प्राणिक प्रकृतीचा (Vital nature) भाग असणाऱ्या नातेसंबंधांचे आध्यात्मिक जीवनात काहीच मोल नसते – किंबहुना ते नातेसंबंध प्रगतीमध्ये अडथळा उत्पन्न करतात; (असा अडथळा उत्पन्न होऊ नये म्हणून) मन आणि प्राणसुद्धा पूर्णतः ईश्वराकडेच वळविले पाहिजेत. इतकेच नव्हे तर, साधनेचा हेतूच आध्यात्मिक चेतनेमध्ये प्रवेश करणे आणि साऱ्या गोष्टी एका नव्या आध्यात्मिक आधारावर उभ्या करणे हा असतो; आणि या गोष्टी तेव्हाच शक्य होतात जेव्हा व्यक्ती ईश्वराशी पूर्णतया एकात्म पावलेली असते. तोपर्यंत व्यक्तीमध्ये सर्वांबाबत एक स्थिर सद्भावना असली पाहिजे, परंतु प्राणिक प्रकारच्या नातेसंबंधांचा काहीही उपयोग नाही कारण ते नातेसंबंध व्यक्तीची चेतना ही प्राणिक स्तरावरच ठेवतात आणि चेतनेला उच्च स्तराप्रत उन्नत होण्यास प्रतिबंध करतात.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 283)