कर्म आराधना – ३२
एक क्षण असा येईल जेव्हा तुम्हाला प्रकर्षाने जाणवू लागेल की, तुम्ही कार्य-कर्ते नसून फक्त एक साधन आहात. सुरुवातीला तुमच्या भक्तीच्या शक्तीने ‘दिव्य माते’बरोबर असलेला तुमचा संपर्क इतका निकटचा होईल की, तिचे मार्गदर्शन मिळावे, तिची थेट आज्ञा किंवा प्रेरणा मिळावी, कोणती गोष्ट केली पाहिजे यासाठीचा खात्रीशीर संकेत मिळावा, ती गोष्ट करण्याचा मार्ग सापडावा आणि त्याचा परिणाम दिसून यावा, म्हणून तुम्ही सदा सर्वकाळ फक्त एकाग्रता करणे आणि सारे काही तिच्या हाती सोपविणे पुरेसे ठरेल.
कालांतराने मग तुमच्या हे लक्षात येईल की, दिव्य ‘शक्ती’ आपल्याला केवळ प्रेरणाच देते, मार्गदर्शन करते असे नाही तर ती आपल्या कर्माचा आरंभही करते, तीच ते कर्म घडवून आणते; तुमच्या साऱ्या गतिविधी, हालचाली, कृती या तिच्यापासूनच उगम पावतात, तुमच्या साऱ्या शक्ती या तिच्याच आहेत; तुमचे मन, प्राण, शरीर यांना तिच्या कार्याचे साधन बनल्याची, तिच्या लीलेचे माध्यम बनल्याची जाणीव असते; जडभौतिक विश्वामध्ये तिच्या आविष्करणाचे साचे बनल्याची जाणीव असते आणि त्याचा आनंदही असतो. एकत्वाच्या आणि अवलंबित्वाच्या (dependence) अवस्थेएवढी दुसरी कोणतीही आनंदी अवस्था असू शकत नाही; कारण ही पायरी तुम्हाला पुन्हा, अज्ञानातील दुःखपूर्ण व तणावपूर्ण जीवनाच्या सीमारेषेच्या पलीकडे, तुमच्या आध्यात्मिक अस्तित्वाच्या सत्यामध्ये, सखोल शांतीमध्ये आणि त्याच्या उत्कट ‘आनंदा’मध्ये घेऊन जाते.
हे रूपांतरण होत असताना, अहंकाराच्या विकृतीच्या सर्व कलंकापासून तुम्ही स्वतःला मुक्त ठेवण्याची अधिकच आवश्यकता असते. आत्मदानाच्या आणि त्यागाच्या शुद्धतेला कलंक लागेल अशी कोणतीही मागणी वा कोणताही आग्रह धरता कामा नये. कर्म किंवा त्याचा परिणाम यासंबंधी कोणतीही आसक्ती असता कामा नये, त्यावर कोणत्याही अटी लादता कामा नयेत, ‘शक्ती’ मिळावी यासाठी कोणताही दावा करता कामा नये, साधन बनल्याचा कोणताही ताठा, घमेंड किंवा अहंकार असता कामा नये. तुमच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या शक्तींच्या महानतेला, मनाच्या किंवा प्राणाच्या किंवा शरीराच्या कोणत्याही भागाने स्वतःच्या वैयक्तिक आणि स्वतंत्र समाधानासाठी किंवा स्वतःच्या वापरासाठी विकृत करता कामा नये. तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा, तुमच्या अभीप्सेची शुद्धता ही तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या स्तरांना, साऱ्या प्रतलांना व्यापणारी आणि निरपेक्ष असली पाहिजे; तेव्हा मग अस्वस्थ करणारा प्रत्येक घटक, विकृत करणारा प्रत्येक प्रभाव हा तुमच्या प्रकृतीमधून एकेक करून निघून जाईल. (क्रमश:)
– श्रीअरविंद
[CWSA 32 : 12-13]