Posts

प्रामाणिकपणा – १८

सर्व प्रकारच्या अनुभवांची योग्यता ही व्यक्तीच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावर अवलंबून असते. काही जण प्रामाणिक नसतात आणि अद्भुत असे अनुभव रचतात आणि ते अशी कल्पना करू लागतात की, त्यांना तसे अनुभव (खरोखरच) आले आहेत. मी त्यांच्याबाबत येथे काही बोलू इच्छित नाही. पण जे लोक प्रामाणिक असतात, ज्यांना खरेखुरे अनुभव आलेले असतात त्यांच्याबद्दल सांगायचे तर, जेव्हा तुम्हाला ईश्वरी अस्तित्वाची प्रत्यक्षानुभूती मिळते, त्याच्या उपस्थितीची जाणीव होते तेव्हा सर्व जगाने जरी सांगितले की, ‘तुमचा तो अनुभव खरा नाही’, तरी त्याने तुम्ही यत्किंचितही विचलित होत नाही.

– श्रीमाताजी [CWM 04 : 135]

प्रामाणिकपणा – १६

प्रश्न : प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता यांमध्ये काही फरक आहे का ?

श्रीमाताजी : हो, दोन भिन्न गोष्टींमध्ये नेहमीच फरक असतो. अर्थात, मला असे वाटते की, प्रामाणिक नसताना एकनिष्ठ असणे, आणि त्याच्या उलट, म्हणजे, एकनिष्ठ नसताना प्रामाणिक असणे या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड असतात. पण मला अशा काही व्यक्ती माहीत आहेत की, ज्या एकनिष्ठ होत्या पण त्यांच्याकडे प्रामाणिकपणाचा एक प्रकारचा अभाव होता. याच्या उलट म्हणजे प्रामाणिक असूनही एकनिष्ठता नसणे, हे मात्र फारसे दुर्मिळ नाही. एक गुण असेल तर पाठोपाठ दुसरा येतो असे होत नाही, पण हे उघड आहे की, सचोटी, ऋजुता, एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणा या गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे संबंधित असतात.

प्रश्न : एखाद्या गोष्टीशी वा व्यक्तीशी संबंधित असणारी एकनिष्ठता ही सीमित भावना असते ना? यापेक्षा प्रामाणिकपणा अधिक व्यापक असतो ना?

श्रीमाताजी : हो, तसेच असते. एकनिष्ठतेमध्ये एक प्रकारच्या श्रेणीबद्ध संबंधांचा अंतर्भाव होतो, म्हणजे येथे कोणाशी तरी किंवा कोणत्यातरी वस्तुशी एकनिष्ठता असते. त्यामध्ये एक प्रकारचे परस्परावलंबित्व असते. दिलेला शब्द पाळणे, स्वतःचे कर्तव्य अत्यंत काटेकोरपणे बजावणे म्हणजे निष्ठा, अशी सर्वसामान्य समजूत असते. एखादी व्यक्ती अरण्यामध्ये एकटीच जीवन व्यतीत करत असेल तर ती पूर्ण प्रामाणिकपणाने वागू शकते, परंतु निष्ठेचे आचरण मात्र तुम्हाला सामाजिक जीवनातच करता येते, इतर लोकांशी संबंधित असतानाच करता येते. याला अपवाद असा की, एखादी व्यक्ती ईश्वरी ‘उपस्थिती’बाबत (divine Presence) आंतरिक श्रद्धायुक्त कृतीने पूर्णपणे निवेदित असेल तर ती (एकटी असूनही) या ‘उपस्थिती’शी एकनिष्ठ असू शकते.

– श्रीमाताजी [CWM 15 : 299]

प्रामाणिकपणा – १५

तुम्ही जेव्हा पूर्णत: प्रामाणिक व्हाल, तेव्हा तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्यामध्ये पूर्णतः निर्भेळ असे काहीही नाही. मात्र तुम्ही तुमच्या सर्वोच्च चेतनेच्या प्रकाशात, स्वतःकडे स्वतःच्या नजरेला नजर भिडवून पाहिलेत, तर मग, तुमच्या प्रकृतीमधील जे काही काढून टाकायची तुमची इच्छा असेल ते नाहीसे होईल. अशा संपूर्ण प्रामाणिकपणासाठी प्रयत्न केला नाही तर एखादा दोष किंवा त्याची लहानशी पडछाया पुन्हा वर येण्यासाठी, योग्य संधीची वाट पहात एखाद्या कोपऱ्यात टपून बसेल.

मी येथे अशा प्राणाविषयी (vital) बोलत नाही की, जो ढोंगी आहे; तर मी केवळ मनाविषयी बोलत आहे. तुमच्या ठिकाणी एखादी लहानशी अप्रिय संवेदना किंवा थोडीशी जरी अस्वस्थता निर्माण झाली, तर पहा, तुमचे मन किती पटकन त्याविषयी अनुकूल स्पष्टीकरण देते! ते दुसऱ्या कोणावर तरी खापर फोडते किंवा परिस्थितीला दोष देत बसते; ते म्हणते की, “मी जे काय केले ते योग्यच होते; आणि त्याला मी जबाबदार नाही वगैरे वगैरे.” …स्वत:ची किंवा दुसऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून जर एखादे मूल अगदी लहानपणापासून स्वत:चे काळजीपूर्वक परीक्षण करू लागले, प्रामाणिकपणे आत्मनिरीक्षण करू लागले, तर ते त्याच्या अंगवळणी पडेल आणि त्यामुळे त्याचा नंतरचा बराचसा संघर्ष वाचेल.

– श्रीमाताजी [CWM 15 : 298]

प्रामाणिकपणा – १३

जो प्रामाणिकपणे ‘योगमार्गा’चे आचरण करतो त्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य व शांती लाभणे क्रमप्राप्तच असते. पण बहुसंख्य लोक असे असतात की, जे स्वत:लाच फसवतात; त्यांना असे वाटत असते की, ते ‘योगमार्गा’चे अनुसरण करत आहेत पण ते काही अंशीच साधना करत असतात आणि ते विरोधाभासाने भरलेले असतात.

*

मानसिक, प्राणिक वा शारीरिक आवडीनिवडी आणि पूर्वग्रहदूषित कल्पना या बाबी म्हणजे सर्वांगीण, परिपूर्ण प्रामाणिकपणाचे सर्वात मोठे शत्रू असतात. या अडथळ्यांवर मात केलीच पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 14 : 70, 71]

प्रामाणिकपणा – १२

व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आंतरिक संघर्षाची शक्यता असते तोपर्यंत तिच्यामध्ये अजूनही काही अंशी अप्रामाणिकपणा शिल्लक आहे, असा त्याचा अर्थ होतो.

*

स्वतःशी प्रामाणिक राहा – आत्म-वंचना नको.
‘ईश्वरा’प्रत प्रामाणिकपणा बाळगा – समर्पणात व्यवहार नको.
मानवतेप्रत सरळसाधे असा – त्यात ढोंगीपणा वा दिखावा नको.

– श्रीमाताजी [CWM 14 : 68-70]

प्रामाणिकपणा – ११

प्रश्न : मला अगदी प्रामाणिकपणे असे वाटते की, मला दुसरेतिसरे काही नको, केवळ ‘ईश्वर’च हवा आहे. पण जेव्हा माझा दुसऱ्या माणसांशी संबंध येतो, साध्या किरकोळ गोष्टी करण्यामध्ये जेव्हा मी गुंतलेला असतो, त्यावेळी साहजिकच मला माझ्या एकमेव ध्येयाची, ‘ईश्वरा’ची आठवण राहात नाही. हा अप्रमाणिकपणा असतो का? तसे नसेल, या साऱ्याचा अर्थ काय?

श्रीमाताजी : होय. ज्यावेळी व्यक्तीला एकीकडे ‘ईश्वर’ हवा असतो आणि दुसरीकडे वेगळेच काहीतरी हवे असते, त्यावेळी तो त्या व्यक्तीचा अप्रामाणिकपणा असतो. अज्ञान आणि मूढता यांमुळे व्यक्ती अप्रामाणिक असते. पण दृढ इच्छाशक्ती आणि ‘ईश्वरी कृपे’ वर संपूर्ण विश्वास यांमुळे हा अप्रामाणिकपणा नाहीसा करता येतो.

– श्रीमाताजी [CWM 14 : 680]

प्रामाणिकपणा – १०

जे तळमळीचे आणि प्रामाणिक असतात त्यांचा ‘ईश्वर’ नेहमीच सोबती असतो.

*

संपूर्ण प्रामाणिकपणा आणि खरेपणा यामध्येच मुक्ती आहे.

*

‘प्रामाणिकपणा’ व ‘निष्ठा’ हे योगमार्गाचे दोन रक्षक आहेत.

*

जे लोक प्रामाणिक असतात त्यांना मी साहाय्य करू शकते आणि त्यांना ‘ईश्वरा’कडे अगदी सहजपणे वळवू शकते, पण जेथे अप्रामाणिकता असते तेव्हा तेथे मात्र मी फारसे काही करू शकत नाही.

– श्रीमाताजी [CWM 14 : 66-68]

प्रामाणिकपणा – ०८

‘ईश्वरा’प्रत असलेल्या तुमच्या आत्मनिवेदनात तुम्ही प्रामाणिक आणि परिपूर्ण व्हा म्हणजे तुमचे जीवन हे सुसंवादी आणि सुंदर होईल.

*

घाबरू नका, तुमचा प्रामाणिकपणा हेच तुमचे संरक्षक कवच आहे.

*

तुम्ही जर अगदी तळमळीने ‘ईश्वरा’ला म्हणाल की, “मला फक्त तूच हवा आहेस”, तर ‘ईश्वर’ अशी परिस्थिती घडवून आणेल की तुम्हाला प्रामाणिक होणे भागच पडेल.

– श्रीमाताजी [CWM 14 : 65], [CWM 14 : 66], [CWM 14 : 66]

प्रामाणिकपणा – ०७

[स्वत:चीच फसवणूक करणारा प्राणिक अहंकार, मानसिक उद्धटपणा, श्रेष्ठत्वाची चुकीची भावना, पांडित्य-प्रदर्शन, शारीरिक अस्तित्वामध्ये असणारी तमोमय जडता] या गोष्टींपासून सुटका करून घेण्यासाठी अस्तित्वाच्या सर्व अंगांमध्ये संपूर्ण केंद्रवर्ती प्रामाणिकपणा असणे ही एकच अट असते. आणि त्याचा अर्थ असा की, ‘परमसत्याचा’ निरपवाद आग्रह आणि परमसत्याविना दुसरे काहीही नको असणे. मग, कोणतेही समर्थन न करता, स्वयं-आलोचना (self-criticism) करण्याची व्यक्तीची तयारी असेल आणि मिथ्यत्वाचा शिरकाव झाला तर व्यक्तीला एकप्रकारची अस्वस्थता जाणवत असेल आणि व्यक्तीमध्ये प्रकाशाप्रत सतर्क खुलेपणा असेल तर, सरतेशेवटी ही तयारी संपूर्ण अस्तित्वाचेच शुद्धीकरण घडवून आणेल.

– Sri Aurobindo [CWSA 36 : 379]

प्रामाणिकपणा – ०६

तुम्ही जेव्हा पूर्णपणे प्रामाणिक असता तेव्हा, तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च ध्येयाशी, तुमच्या अस्तित्वाच्या तत्त्वाशी सुसंवाद राखून जगण्याचा सतत प्रयत्न करत असता. प्रत्येक क्षणी म्हणजे, तुम्ही जो काही विचार करता, जे काही तुम्हाला भावते किंवा जे जे काही तुम्ही करता, त्या प्रत्येक वेळी शक्य तितक्या संपूर्णपणे, शक्य तितक्या सर्वांगीण रीतीने तुमच्या सर्वोच्च ध्येयाशी सुसंवादी राहण्याचा तुम्ही प्रयत्न करता. आणि तुम्ही जर तुमच्या अस्तित्वाच्या सत्यतत्त्वाविषयी जागृत झाला असाल तर, त्या तत्त्वाशी सुसंवादी राहण्याचा तुम्ही प्रयत्न करता, त्यावेळी तुम्ही खराखुरा प्रामाणिकपणा साध्य केला आहे असे म्हणता येईल.

आणि जर तुम्ही तसे असाल, म्हणजेच खरोखरच तुम्ही कधीही अहंभावात्मक वृत्तीने किंवा वैयक्तिक कारणासाठी कोणतीही कृती करत नसाल, तुमच्या आंतरिक सत्याच्या मार्गदर्शनाने तुम्ही कृती करत असाल, म्हणजेच जर तुम्ही संपूर्णत: प्रामाणिक आणि प्रांजळ असाल, तर जगाने तुमच्याबद्दल काहीही म्हटले, तुमच्याबद्दल चांगला, वाईट काहीही ग्रह करून घेतला, काहीही मत बनविले, तरी तुम्हाला त्याबद्दल काहीच वाटणार नाही, तुम्ही त्याविषयी संपूर्ण उदासीन, संपूर्ण समवृत्तीने राहाल. त्या संपूर्ण प्रामाणिकपणाच्या स्थितीत असताना, चांगले ‘दिसण्याची’ किंवा इतरांनी तुम्हाला चांगले म्हणावे याची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही. कारण तुमच्या आंतरिक खऱ्या चेतनेशी जेव्हा तुम्ही सुसंवादी असता, तेव्हा पहिली गोष्ट ही घडते की, तुम्ही कसे ‘दिसता’, कसे भासता याची तुम्ही चिंता करत बसत नाही. लोक तुम्हाला काहीही म्हणोत; उदासीन, थंड, दूरस्थ किंवा गर्विष्ठ म्हणोत तरी, त्याला तुमच्या दृष्टीने काही महत्त्वच उरत नाही. अर्थात, मी पुन्हा सांगते की, त्यासाठी तुम्ही संपूर्ण प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. म्हणजेच, तुम्ही तुमचे आंतरिक, मध्यवर्ती सत्य व्यक्त करण्यासाठी, प्रकट करण्यासाठी जीवन जगत आहात, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये.

– श्रीमाताजी [CWM 04 : 16-17]