Tag Archive for: साक्षात्कार

(पूर्वार्ध)

बरेचदा असे आढळते की, ध्यानधारणादी करण्यासाठी जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या पशुपक्ष्यांशी, झाडांशी मैत्री होते. म्हणजे केवळ एकटे राहिल्यामुळे, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची आणि परमसत्याशी योगयुक्त होऊन राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते, असे अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला अन्य काहीच करण्यासारखे नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित योगयुक्त राहणे सोपे असेलही पण मला काही ते तितकेसे पटत नाही. कारण व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत काही ना काही उद्योग शोधून काढते. (आणि त्यात गुंतून पडू शकते.) मला माझ्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींना ताब्यात ठेवण्यात यशस्वी होते; ईश्वरी कृपे‌ने जी बाह्य परिस्थिती प्रदान केली आहे त्या परिस्थितीमध्ये राहूनच जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील शाश्वत अस्तित्वा‌सोबत एकांतात राहण्याचा प्रयत्न करत असते; अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खरा, अधिक गहन व अधिक चिरस्थायी असतो.

अडीअडचणींपासून पलायन करणे हा पर्याय आकर्षक असला तरी, तो त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते आणि त्या मानसिकतेपोटी ते म्हणत असतात, ”झाडाखाली अगदी एकांतात, एकटे बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे आणि बोलण्याची किंवा काहीतरी करण्याची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल नाही?” या दिशेने त्यांच्या विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 276)

अधिक गहन व आध्यात्मिक अर्थाने सांगायचे झाले तर, ज्या गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे ती गोष्ट, जेव्हा इतर कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षाही अधिक वास्तव व गतिशील आणि चेतनेच्या दृष्टीने अधिक निकट असल्याचे जाणवते, तेव्हा अशा साक्षात्काराला ‘सघन साक्षात्कार’ (concrete realisation) म्हणतात.

अशा प्रकारे सगुण ईश्वराचा (personal Divine) किंवा निर्गुण ब्रह्माचा (impersonal Brahman) किंवा आत्म्याचा (Self) साक्षात्कार हा सहसा, साधनेच्या प्रारंभीच किंवा साधनेच्या पहिल्या काही वर्षांत होत नाही किंवा साधनेला खूप वर्ष झाली तरीही होत नाही. साधनेच्या प्रारंभीच असा साक्षात्कार होणे ही गोष्ट फारच थोड्या जणांच्या बाबतीत घडते. कोणतीही योगसाधना न करतासुद्धा, लंडनमध्ये मला आलेल्या अनुभवानंतर, पंधरा वर्षांनी म्हणजे, मी योगसाधनेला सुरुवात केल्यानंतर, पाचव्या वर्षी मला तो अनुभव आला. आणि तो सुद्धा माझ्या दृष्टीने खूप असाधारणरित्या लवकरच आलेला आहे, जणू जलदगती आगगाडीचा वेगच. अर्थात, यापेक्षाही अधिक लवकर काही उपलब्धी घडून आल्या आहेत, यात शंका नाही.

पण इतक्या लवकर त्याची अपेक्षा बाळगणे आणि त्याची मागणी करणे आणि अनुभव आला नाही म्हणून हताश होणे, तसेच युगा-युगामध्ये दोन तीन व्यक्तींचा अपवाद वगळता, इतरांना हा योग करता येणे अशक्य आहे असे म्हणणे, ही गोष्ट एखाद्या अनुभवी योग्याच्या किंवा साधकाच्या दृष्टीने पाहता, उतावळ्या आणि विकृत अधीरतेमध्ये गणली जाईल. बहुतेक जण हेच सांगतील की, पहिल्या काही वर्षांमध्ये धीम्या गतीने प्रगतीची आशा बाळगणे हे चांगले. आणि जेव्हा प्रकृती तयार होते आणि जेव्हा ती पूर्णपणे ईश्वराभिमुख होते, तेव्हाच असे परिपक्व अनुभव येऊ शकतात.

काही जणांच्या बाबतीत तुलनेने अगदी सुरुवातीच्या काळात देखील, काही पूर्वतयारी करून घेणारे अनुभव अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकतात, पण तेथेही चेतनायुक्त परिश्रम करावेच लागतात, त्यापासून त्यांची सुटका नसते; या प्रयत्नांमुळे पुढे अशा अनुभवांची, चिरस्थायी आणि परिपूर्ण अशा साक्षात्कारामध्ये परिणती होते…

वास्तविक, जी माणसं कृतज्ञ असतात, आनंदी असतात; आवश्यकता पडली तर, अगदी छोटी छोटी पावले का असेनात, पण एकेक पाऊल टाकण्याची ज्यांची तयारी असते, अशी माणसंच खरंतर अधिक वेगाने वाटचाल करतात आणि आणि जे प्रत्येक पावलागणिक निराश होतात, कुरकूर करत राहतात अशा अधीर, उतावळ्या लोकांपेक्षा ही माणसं अधिक खात्रीने वाटचाल करतात. मला तरी नेहमी असेच आढळून आले आहे; याला विरोधी अशीही काही उदाहरणे असतील देखील, पण मला एवढेच सांगायचे आहे की, जर तुम्ही ‘आशा, उत्साह आणि श्रद्धा’ कायम बाळगू शकलात तर, अधिक मोठ्या शक्यतेला वाव असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 112)

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल, प्रसन्न श्रद्धा आणि विश्वास हा साधनेसाठी सर्वोत्तम पाया असतो. उर्वरित गोष्टींसाठी साधकामध्ये अभीप्सेबरोबरच, ग्रहणशीलतेसाठी सातत्यपूर्ण असे संपूर्ण खुलेपण असणे आवश्यक असते. ही अभीप्सा उत्कट असू शकेल पण ती नेहमीच स्थिरशांत आणि अविचल असली पाहिजे. योगाचा संपूर्ण साक्षात्कार अचानक होत नाही. आधाराची (मन, प्राण व शरीर यांची) बरीच तयारी झाली की मग, साक्षात्कार होतो आणि ती तयारी होण्यासाठी कधीकधी खूप दीर्घ कालावधी लागू शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 111-112)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०३

पूर्णयोगामध्ये केवळ ईश्वराचा साक्षात्कार अपेक्षित नाही तर संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे, तसेच जोपर्यंत ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यासाठी व्यक्तीचे आंतरिक व बाह्य जीवन सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत व्यक्तीचे जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. याचा अर्थ असा की, निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्र तपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन (discipline) येथे अभिप्रेत आहे.

पूर्णयोगाचा मार्ग हा इतर बहुतांश योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे. त्यामुळे, आपल्याला अंतरात्म्याकडून हाक आली आहे आणि अंतिम ध्येयाप्रत वाटचाल करत राहण्याची आपली तयारी आहे, या गोष्टीची खात्री पटल्याशिवाय व्यक्तीने या मार्गात प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)

जीवन जगण्याचे शास्त्र – २२

अविचलता (quietness) म्हणजे तामसिकता नव्हे. वास्तविक अविचल स्थितीमध्येच योग्य गोष्टी केल्या जाऊ शकतात. कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता, प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करणे आणि कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न होता, कर्म करणे याला मी ‘अविचलता’ म्हणते.

*

अविचलतेमध्ये एक स्थिरशांत (calm) आणि एकाग्र एकवटलेली अशी ताकद असते, ती इतकी अविचल असते की, तिला कोणीही धक्का लावू शकत नाही. पूर्ण साक्षात्कारासाठीचा हा अनिवार्य पाया आहे.

*

तुम्ही जेव्हा अविचल असाल तेव्हा तुम्हाला अशी जाणीव होईल की, दिव्य शक्ती, तिचे साहाय्य आणि तिचे संरक्षण हे सदोदित तुमच्या सोबत आहे.

*

तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची असते आणि ती म्हणजे शांत, अविचल राहायचे आणि पूर्णतः केवळ ईश्वराभिमुख व्हायचे, मग बाकी सारे ‘त्या’च्या हाती असते.

*

अविचलता, शांती आणि निश्चल-नीरवतेच्या (silence) स्थितीमध्ये आध्यात्मिक शक्ती कार्य करते. व्यक्ती विरोधी शक्तींच्या अंमलाखाली आली की, क्षुब्ध होणे आणि उत्तेजित होणे अशा सर्व गोष्टी होतात.

*

तुम्ही अविचलतेचा शोध बाह्य परिस्थितीमध्ये घेता कामा नये, तर त्याची सुरुवात तुम्ही तुमच्या अंतरंगापासून केली पाहिजे. तुमच्या अंतरंगामध्ये खोलवर शांती असते आणि त्या शांतीमधूनच तुमच्या समग्र अस्तित्वामध्ये एक प्रकारची स्थिरता, अविचलता येते; ती अगदी तुमच्या शरीरापर्यंत जाऊन पोहोचते. अर्थात त्यासाठी तुम्ही तिला वाव दिला पाहिजे. तुम्ही ती शांती मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे; म्हणजे मग तुम्हाला हवी असलेली अविचलता, स्थिरता तुम्हाला लाभेल.

– श्रीमाताजी (CWM 14 : 135, 135, 135, 111, 137, 138)

आत्मसाक्षात्कार – २२

पूर्णयोगाचे मूलभूत साक्षात्कार खालीलप्रमाणे आहेत.

१) संपूर्ण भक्ती ही ज्यायोगे हृदयाची मुख्य प्रेरणा व विचारांची स्वामिनी बनेल आणि ज्यायोगे जीवन व कर्म ‘श्रीमाताजीं’च्या आणि त्यांच्या ‘उपस्थिती’च्या नित्य एकत्वात घडत राहील अशा प्रकारचे चैत्य, अंतरात्मिक परिवर्तन (psychic change) घडणे.

२) शरीराच्या पेशी न्‌ पेशी ज्यामुळे भारल्या जातील अशा प्रकारे, ‘उच्चतर चेतने’च्या ‘शांती, प्रकाश, शक्ती’ इत्यादी गोष्टींचे मस्तकाद्वारे व हृदयाद्वारे संपूर्ण अस्तित्वामध्ये अवतरण होणे.

३) सर्वत्र अनंतत्वाने वसणाऱ्या ‘एकमेवाद्वितीय’ अशा ईश्वराची व श्रीमाताजींची अनुभूती येणे आणि त्या अनंत चेतनेमध्ये वास्तव्य घडणे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)

आत्मसाक्षात्कार – २१

खालील चार गोष्टींवर साक्षात्कार आधारित केला गेला पाहिजे.

१) मनाच्या वर असणाऱ्या केंद्रामध्ये उन्नत होणे
२) वैश्विक चेतनेप्रत खुले होणे
३) चैत्य खुलेपण
४) उच्चतर चेतनेचे तिच्या शांती, प्रकाश, शक्ती, ज्ञान, आनंद इत्यादीसहित अस्तित्वाच्या अगदी भौतिक स्तरापर्यंतच्या सर्व स्तरांमध्ये अवतरण होणे.

श्रीमाताजींच्या शक्ती-कार्याला तुमच्या अभीप्सेची, श्रद्धेची आणि समर्पणाची जोड देऊन, उपरोक्त साऱ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. हाच मार्ग आहे. बाकी साऱ्या गोष्टी म्हणजे या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठीचे प्रयत्न आहेत, आणि त्यासाठी श्रीमाताजी तुमच्यामध्ये जे कार्य करत आहेत त्यावर श्रद्धा असणे आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)

आत्मसाक्षात्कार – १९

ईश्वराचा साक्षात्कार हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि एखादी गोष्ट जर त्याकडे घेऊन जाणारी असेल किंवा त्यासाठी साहाय्यक ठरत असेल किंवा जर ती गोष्ट प्रत्यक्षात आणल्याने तो साक्षात्कार अधिक व्यापक होणार असेल किंवा त्या साक्षात्काराचे आविष्करण होणार असेल, तरच ती गोष्ट इष्ट असते.

साक्षात्कारासाठी वैयक्तिक व सामूहिक साधना आणि ईश्वराचा साक्षात्कार झालेल्या व्यक्तींचे सामुदायिक जीवन ही, ईश्वरी कार्यासाठी समग्र जीवनाचे सुसंघटन किंवा आविष्करण करण्यासाठी आवश्यक असणारी पहिली आवश्यक गोष्ट आहे. आणि यासाठी आवश्यक असणारी दुसरी गोष्ट म्हणजे, ‘प्रकाशा’प्रत वळण्यासाठी आणि त्यामध्ये जीवन जगता यावे यासाठी जगाला मदत करणे. हे माझ्या योगाचे (पूर्णयोगाचे) प्रयोजन आहे आणि तोच त्याचा सर्वार्थ आहे.

परंतु साक्षात्कार ही पहिली आवश्यक गोष्ट आहे आणि त्या भोवतीच सारे काही फिरत असते; अन्यथा, त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीला काही अर्थ नाही.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 784)

आत्मसाक्षात्कार – १८

‘केवळ ईश्वराचा साक्षात्कार पुरेसा नाही’, असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की, असा साक्षात्कार चेतनेमध्ये चिरस्थायी परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेसा नसतो. मानवी प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर, त्यासाठी ‘ईश्वराच्या गतिशील शक्ती’च्या कार्याची आवश्यकता असते.

…‘ईश्वरी चेतना’ धारण करण्याची क्षमता सर्वच आधारांमध्ये, म्हणजे प्राकृतिक रचनांमध्ये नसते, हे खरे आहे आणि या प्राकृतिक साधनाची क्षमता वृद्धिंगत करण्याचा ते कोणता प्रयत्नही करत नाहीत. एकदा का तुम्ही त्या ईश्वरी चेतनेमधून खाली उतरलात की मग, तुम्ही अगदी एखाद्या सामान्य माणसासारखेच होऊन जाता. आणि म्हणून, जेव्हा ईश्वराचे अवतरण होते तेव्हा ते धारण करण्यासाठी म्हणून, व्यक्तीने स्वतःच्या प्राकृतिक साधनाच्या क्षमता, त्याच्या जटिलतेनिशी आणि बहुअंगांनिशी वृद्धिंगत करत नेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.

– श्रीअरविंद (Evening Talks with Sri Aurobindo : 349-350)

आत्मसाक्षात्कार – १६

(जडभौतिक विश्व आणि आंतरात्मिक व आध्यात्मिक विश्व यांच्या अतीत असणाऱ्या ‘परमसत्या’च्या, ‘परमज्ञाना’च्या विश्वाबद्दल येथे संवाद चालू आहे. श्रीमाताजी असे सांगत आहेत की, “हे विश्व उदयाला आले आहे; पण ते अजून संपूर्णपणे अस्तित्वात यायचे आहे. आणि त्यासाठी केवळ एकटा अवतार पुरेसा नाही तर, त्यासाठी ईश्व रप्राप्तीची अभीप्सा बाळगणाऱ्या अनेक माणसांची आवश्यकता आहे.’’ हे ऐकल्यानंतर, एका साधकाने त्यांना प्रश्न विचारला आहे की, आम्ही त्यामध्ये सहभागी होण्यासाठी काय केले पाहिजे?)

श्रीमाताजी : त्यासाठी व्यक्तीने स्वतःच्या अस्तित्वाचा, ‘पुरुषा’चा, ‘आत्म्या’चा साक्षात्कार करून घेतला पाहिजे; स्वतःच्या अस्तित्वाचे जे परम‘सत्य’ आहे, त्याच्याशी सचेत (conscious) नाते जोडले पाहिजे; ते नाते कोणत्याही रूपातील असले, ते कोणत्याही मार्गाने जोडलेले असले, तरी त्याने काही फरक पडत नाही, परंतु हाच एकमेव मार्ग आहे.

प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतरंगामध्ये एक सत्य वागवत असते आणि त्या सत्याशीच व्यक्तीने ऐक्य साधले पाहिजे, तेच सत्य ती जगली पाहिजे. या सत्याप्रत पोहोचण्यासाठी आणि त्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्तीला जो मार्ग अनुसरावा लागेल तोच मार्ग व्यक्तीला त्या (उपरोक्त) परम‘ज्ञाना’च्या अधिकाधिक निकट घेऊन जाईल. म्हणजे असे म्हणता येईल की, (अंतिमतः) वैयक्तिक साक्षात्कार आणि परम‘ज्ञान’ या दोन्ही गोष्टी अगदी एकच आहेत.

– श्रीमाताजी (CWM 10 : 136)