Tag Archive for: समर्पण

 

प्रश्न : माताजी, प्रामाणिकपणाचा खरा अर्थ काय?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाच्या असंख्य श्रेणी आहेत. विचार करायचा एक आणि बोलायचे वेगळेच, मागायची एक गोष्ट पण हवी असते निराळीच गोष्ट, हे असे नसणे म्हणजे प्रामाणिकपणा; ही झाली प्रामाणिकपणाची अगदी पहिली श्रेणी. म्हणजे असे पाहा की, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये उत्कट अभीप्सा आहे, आणि तिला आध्यात्मिक जीवन हवे आहे, असे म्हणत असते आणि अगदी त्याच वेळी… अगदी निर्लज्जपणे, आध्यात्मिक जीवनाच्या पूर्णपणे विरोधी वर्तन करत असते.

(प्रामाणिकपणाची आता दुसरी श्रेणी पाहूया.) बरेचदा असे घडते एखादी व्यक्ती असे म्हणते की, “मला प्रगती करायची आहे आणि मला माझ्यातील दोष काढून टाकायचे आहेत,” आणि अगदी त्याच वेळी, ती व्यक्ती स्वत:च्या चेतनेमध्ये असणाऱ्या त्याच दोषांना खतपाणी घालत असते आणि त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करून, ते काढून टाकू नयेत म्हणून, ते दोष दडवून ठेवण्यासाठी धडपडत असते.

म्हणजे व्यक्तीमधील एखाद्या भागाला असे वाटत असते की, त्याच्यातील सर्व दोष, सर्व अपूर्णता इत्यादी गोष्टी निघून गेल्या पाहिजेत. ती व्यक्ती तसा विचार करत असते, तसे म्हणतही असते आणि तशी अभीप्सादेखील ती बाळगून असते; आणि अगदी त्याच वेळी, त्या व्यक्तीमधील इतर भाग मात्र ते दोष आणि त्या अपूर्णता दडवून ठेवू इच्छित असतात. ते दोष आणि त्या अपूर्णता उघड होऊ नयेत, त्यांच्यावर मात करायला कोणी भाग पाडू नये, अशा रितीने ते अशा गोष्टी अगदी काळजीपूर्वक दडवून ठेवतात. हे अगदी सार्वत्रिक आहे.

आणि हाच मुद्दा आपण अजून विस्ताराने विचारात घेतला तर असे लक्षात येते की, ईश्वराबद्दल असणाऱ्या मध्यवर्ती अभीप्सेला विरोधी असा एखादा भाग जरी आपल्यामध्ये शिल्लक असेल तर तोपर्यंत आपण पूर्णपणे प्रामाणिक आहोत, असे म्हणता येणार नाही. म्हणजेच सांगायचे झाले तर, परिपूर्ण प्रामाणिकपणा ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. आणि बहुधा, अगदी नेहमी, स्वत:च्या प्रकृतीमधील, स्वभावातील ज्या गोष्टी व्यक्तीला आवडत नाहीत त्या गोष्टी, स्वतःपासून सुद्धा लपवून ठेवण्याची धडपड व्यक्ती करत असते; व्यक्ती त्या गोष्टींचे समर्थन करणारी स्पष्टीकरणे देत राहते.

…या सर्व गोष्टींची गणना अप्रामाणिकपणामध्ये होते. जेव्हा अस्तित्वाच्या केंद्रस्थानी दिव्य उपस्थितीची चेतना असते, दिव्य संकल्पाची चेतना असते आणि व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तित्वच जेव्हा दीप्तीमान, स्वच्छ, शुद्ध व संपूर्ण पारदर्शी असते आणि ते त्या दिव्य अस्तित्वाचा सर्व तपशिलांसह आविष्कार करत असते, तेव्हा तेथे संपूर्ण प्रामाणिकपणा अस्तित्वात येतो. आणि तेव्हा तो खराखुरा प्रामाणिकपणा असतो.

व्यक्तीने जेव्हा स्वत:ला ईश्वराप्रत समर्पित केलेले असते, जेव्हा ती फक्त ईश्वराच्याच इच्छेने चालण्याची आस बाळगत असते, तेव्हा तिच्याबाबतीत काहीही घडत असले तरी, ती नेहमीच म्हणजे अगदी कोणत्याही क्षणी, स्वत:च्या समग्र अस्तित्वानिशी ईश्वराला म्हणत असते की, “सारेकाही तुझ्याच इच्छेने घडू दे,” आणि खरोखर तशीच तिची भावना असते. आणि हे असे जेव्हा अगदी उत्स्फूर्तपणे, संपूर्णपणे, समग्रपणे घडते, तेव्हा ती व्यक्ती प्रामाणिक असते.

– श्रीमाताजी (CWM 06 : 397-398)

 

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला केलेले मार्गदर्शन…)

तुमचे मन अपेक्षांनी आणि इच्छांनी अतिव्याप्त आहे. साधना करणे शक्य झाले पाहिजे असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही अपेक्षा आणि इच्छा या गोष्टी तुमच्यामधून काढून टाकल्या पाहिजेत आणि अविचलता, निरपेक्षता, साधेपणा आणि समर्पण या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. सर्वप्रथम तुम्ही याच गोष्टी संपादन केल्या पाहिजेत. बाकीच्या गोष्टी नंतर येतील; कारण (अविचलता, निरपेक्षता, साधेपणा आणि समर्पण) या गोष्टीच साधनेचा खरा पाया आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 139)

असे म्हटले जाते की, “जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा आनंदामध्ये प्रवेश करते.” पण मला तरी हा सर्वात जवळचा मार्ग वाटत नाही. कारण हा आनंद कदाचित काहीसा कोरडा, रुक्ष असू शकतो.

या देहाद्वारेच (वासनामुक्तीची) ही समस्या जर सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून झोकून द्या. वासनांच्या मागे धावण्याचा लांबचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, जर व्यक्तीने साधेपणाने, पूर्णपणे, विनाअट, नफ्यातोट्याची कोणतीही समीकरणे न मांडता, त्या परमोच्च सत्याप्रत, परमोच्च संकल्पशक्ती‌प्रत, परमोच्च अस्तित्वा‌प्रत स्वतःला समर्पित केले; त्याच्या हाती, स्वत:च्या संपूर्ण अस्तित्वाला सर्व अंगांनिशी संपूर्णतया सोपविले, तर तो अहंकारापासून सुटका करून घेण्याचा सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग असतो. लोकं म्हणतील की, तो मार्ग आचरणात आणणे खूप अवघड आहे. परंतु तेथे किमान एक प्रकारची आत्मीयता तरी आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जनशील जीवन आहे.

…संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि देवघेवीविना असे जे आत्मदान असते, त्यालाच मी सकारात्मक मार्ग (Positive way) असे म्हणते. स्वत:च्या स्वार्थाचा कोणताही विचार न करता, स्व-केंद्रित न होता, स्वत:शी काहीही निगडित न करता; सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्येच निमग्न राहणे यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही. ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्यायोग्य आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो. वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, पायरीपायरीने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे यामध्ये जो फरक आहे, तो येथे आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 268-269)

संपूर्ण समता प्रस्थापित होण्यासाठी वेळ लागतो. आंतरिक समर्पणाद्वारे जिवाने ईश्वराला केलेले आत्मदान, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या आध्यात्मिक स्थिरतेचे व शांतीचे अवतरण आणि समतेला विरोध करणाऱ्या अहंकारी, राजसिक आणि त्यासारख्या सर्व भावनांना दृढतापूर्वक, सातत्यपूर्ण व दीर्घकाळ दिलेला नकार या तीन गोष्टींवर समता आधारित असते. त्यासाठी हृदयामध्ये संपूर्ण आत्मनिवेदन व अर्पण भाव असणे ही गोष्ट सर्वप्रथम आवश्यक असते. रजोगुणाचा, अहंकाराचा त्याग इ. गोष्टी परिणामकारक होण्यासाठी आध्यात्मिक स्थिरतेमध्ये आणि समर्पणामध्ये वृद्धी होणे ही स्थिती आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 131)

(कामात गुंतलेले असताना, शांती, स्थिरता टिकून राहत नाही याबाबतची खंत एका साधकाने श्रीअरविंद यांच्यापाशी व्यक्त केली आहे, असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

ज्ञान, सामर्थ्य आणि आनंद या गोष्टी येण्यासाठी स्थिरतेचे, शांतीचे आणि समर्पणाचे पोषक वातावरण आवश्य क असते. तुम्ही कामामध्ये गुंतलेले असताना ते वातावरण टिकून राहत नाही कारण तुमच्या मनाला ही निश्चल-निरवतेची (silence) देणगी अलीकडेच प्राप्त झाली आहे; आणि ती देणगी अजूनपर्यंत तरी फक्त मनापुरतीच सीमित आहे. (आत्ता तुमच्या प्राणाला त्या निश्चल-निरवतेचा फक्त स्पर्श झाला आहे किंवा तिचा प्रभाव जाणवू लागला आहे पण त्या निरवतेने प्राणाचा अजूनपर्यंत ताबा घेतलेला नाही.) जेव्हा नवीन चेतना पूर्णतः तयार झालेली असेल आणि ती जेव्हा तुमच्या प्राणिक प्रकृतीचा आणि शारीरिक अस्तित्वाचा संपूर्ण ताबा घेईल तेव्हा (तुम्ही म्हणत आहात) तो दोष निघून जाईल.

तुमच्या मनाला लाभलेली ही शांतीची अविचल चेतना केवळ स्थिर होणे पुरेसे नाही, तर ती व्यापकही झाली पाहिजे. तुम्हाला ती सर्वत्र जाणवली पाहिजे. म्हणजे, तुम्ही स्वतः आणि इतर सर्वकाही त्या चेतनेमध्येच आहे, असे तुम्हाला जाणवले पाहिजे. तुमच्या कर्मामध्ये स्थिरतेचा पाया निर्माण करण्यासाठीसुद्धा तुम्हाला त्या चेतनेची मदत होईल. तुमची चेतना जेवढी अधिक व्यापक होईल तेवढ्या अधिक प्रमाणात तुम्ही वरून येणाऱ्या गोष्टी (ज्ञान, प्रकाश, प्रेम इ.) ग्रहण करू शकाल. (आणि तसे झाल्यावर मग) दिव्य शक्ती तुमच्या अस्तित्वामध्ये अवतरू शकेल आणि ती त्यामध्ये सामर्थ्य, प्रकाश आणि शांती ओतू शकेल.

तुम्हाला कोंडल्यासारखे, मर्यादित असे जे काही जाणवत आहे ते तुमचे शारीरिक मन (physical mind) आहे; उपरोक्त व्यापक चेतना आणि हा प्रकाश खाली अवतरला आणि त्याने तुमच्या प्रकृतीचा ताबा घेतला तरच, हे मन व्यापक होऊ शकते. तुमच्या देहप्रणालीमध्ये जेव्हा वरून सामर्थ्य अवतरेल तेव्हाच, तुम्हाला ज्याचा त्रास होत आहे ते शारीरिक जडत्व कमी होऊन नाहीसे होण्याची शक्यता आहे.

अविचल राहा, स्वतःला खुले करा आणि स्थिरता व शांती दृढ करण्यासाठी, चेतना व्यापक करण्यासाठी दिव्य शक्तीला आवाहन करा. सद्यस्थितीत जेवढे ग्रहण करण्याची तसेच आत्मसात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे तेवढा प्रकाश व तेवढी शक्ती लाभावी यासाठी दिव्य शक्तीला आवाहन करा. तुम्ही उतावीळ होणार नाही याची काळजी घ्या, कारण त्यामुळे, तुमच्या प्राणिक प्रकृतीमध्ये अगोदरच प्रस्थापित झालेल्या अविचलता आणि समतोल या गोष्टींना पुन्हा धक्का लागण्याची शक्यता आहे. अंतिम परिणामाबाबत विश्वातस बाळगा आणि त्या दिव्य शक्तीला तिचे कार्य करू देण्यास पुरेसा अवधी द्या.

श्रीअरविंद (CWSA 29 : 124-125)

प्रामाणिक अभीप्सेचा परिणाम होतोच होतो; तुम्ही जर प्रामाणिक असाल तर तुम्ही दिव्य जीवनामध्ये उन्नत होता.

पूर्णपणे प्रामाणिक असणे म्हणजे, फक्त आणि फक्त दिव्य सत्याचीच आस बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या एकमेव अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वैयक्तिक मागण्या व वासना यांना नकार देणे; जीवनातील प्रत्येक कृती ईश्वरालाच समर्पण करणे आणि हे कार्य ईश्वराने नेमून दिलेले आहे हे जाणून, त्याच्या आड कोणताही अहंकार येऊ न देता, ते कार्य करणे. हाच दिव्य जीवनाचा पाया आहे.

व्यक्तीमध्ये एकदम, एकाएकी असा बदल घडून येऊ शकत नाही. पण जर व्यक्ती सातत्याने तशी अभीप्सा बाळगेल आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून त्या शक्तीचा अगदी अंतःकरणपूर्वक आणि साध्यासरळ, प्रामाणिक इच्छेने नेहमी धावा करत राहील तर, व्यक्ती या चेतनेमध्ये अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २५

विश्वाची समस्त लीला व्यक्तीच्या विशिष्ट अशा सापेक्ष मुक्त इच्छेवर आधारलेली आहे. ती मुक्त इच्छा साधनेमध्येसुद्धा शिल्लक असते आणि (म्हणूनच) व्यक्तीची सहमती ही प्रत्येक पावलागणिक आवश्यक असते. ईश्वराला समर्पित झाल्यामुळे व्यक्ती अज्ञान, विभक्तपणा आणि अहंकारापासून मुक्त होते परंतु त्यासाठी ते समर्पण प्रत्येक पावलागणिक ‘मुक्त समर्पण’ असणे आवश्यक असते. (मुक्त समर्पण म्हणजे समर्पित व्हायचे की नाही याचे स्वातंत्र्य व्यक्तीला असते.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 68)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २४

साधकाकडून अभीप्सा, नकार आणि समर्पण (aspiration, rejection and surrender) या तीन गोष्टींबाबत प्रयत्नांची अपेक्षा असते. या गोष्टी जर साधकाने केल्या तर उर्वरित गोष्टी स्वतःहूनच श्रीमाताजींच्या कृपेमुळे आणि त्यांचे तुमच्यामध्ये जे कार्य चालू असते त्यामुळे घडून येतात. या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘समर्पण’. विश्वास, भरवसा आणि अडीअडचणींमध्ये देखील धैर्य टिकवून ठेवणे हे या समर्पणाचे पहिले आवश्यक रूप असते.

अभीप्सा असेल तरच विश्वास आणि भरवसा असतो असा काही नियम नाही. उलट, अगदी अभीप्सा नसतानासुद्धा, जडत्वाच्या, तामासिकतेच्या दबावामुळे भरवसा, विश्वास आणि धैर्यसुद्धा टिकून राहू शकते. अभीप्सा झाकोळलेली असताना, जर विश्वास आणि धैर्य अपयशी ठरले तर, तेव्हा साधक स्वतःच्या प्रयत्नांवरच निर्भर आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे असा साधक म्हणत असतो की, “अरेरे, माझी अभीप्सा असफल ठरली, तेव्हा आता मला आशेला काही जागाच नाही. माझी अभीप्साच जिथे कुचकामी ठरली, तेथे आता श्रीमाताजी तरी काय करू शकतील?”

पण याच्या उलट, साधकाला असे वाटले पाहिजे की, “काही हरकत नाही, माझी अभीप्सा पुन्हा पूर्ववत होईल. आत्ता जरी मला श्रीमाताजींची उपस्थिती जाणवत नसली तरीही त्या माझ्या सोबतच आहेत; त्या मला घनांधकारामधूनही पार घेऊन जातील.” हा अगदी पूर्णपणे सुयोग्य असा दृष्टिकोन तुम्ही बाळगला पाहिजे. ज्यांनी असा दृष्टिकोन अंगीकारलेला असतो त्यांच्यावर नैराश्याचादेखील काही परिणाम होऊ शकत नाही; पण समजा अगदी नैराश्य आलेच तर त्या नैराश्यालाच अपयशी होऊन परतावे लागते. हे काही ‘तामसिक समर्पण’ नव्हे.

पण “मी काहीच करणार नाही. श्रीमाताजींनीच सर्वकाही करावे; अगदी अभीप्सा, नकार, समर्पण या गोष्टीदेखील आवश्यक नाहीत. त्या गोष्टीसुद्धा त्यांनीच माझ्यामध्ये घडवून आणाव्यात,” असे जेव्हा व्यक्ती म्हणते, तेव्हा ते ‘तामसिक समर्पण’ असते. हा जो दृष्टिकोन असतो तो काहीही न करणाऱ्या कामचुकार माणसाचा असतो आणि दुसरा दृष्टिकोन असतो साधकाचा. या दोन दृष्टिकोनांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो.

असा साधक जे जे सर्वोत्तम असते ते ते सारे काही करतो, परंतु जेव्हा गोष्टी प्रतिकूल असतात आणि साधक काही काळासाठी अक्रिय होतो तेव्हा असा साधक श्रीमाताजींच्या शक्तीवर विश्वास ठेवून असतो आणि (बऱ्यावाईट) साऱ्या गोष्टींमागे त्यांचीच उपस्थिती आहे असा विश्वास बाळगतो. त्याच्या या विश्वासामुळेच तो विरोधी शक्तीवर मात करतो आणि पुन्हा एकदा साधना करू लागतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 139-140)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

योग हा एक प्रयत्न असतो, ती तपस्या असते. व्यक्ती जेव्हा अतीव प्रामाणिकपणाने उच्चतर शक्तीच्या कार्याप्रत स्वतःचे समर्पण करते; ते समर्पण सतत जागते ठेवते आणि ते परिपूर्ण करत राहते तेव्हाच मग योगाचे तपस्यापण (म्हणजे त्यातील खडतरता) संपुष्टात येते.

योग म्हणजे सुसंगती नसलेली, तर्कहीन अशी काही एक कविकल्पना नाही किंवा योग म्हणजे निव्वळ चमत्कारही नाही. योगाचे स्वतःचे असे काही नियम असतात, काही अटी असतात आणि असे असताना, (स्वत: काहीही प्रयत्न न करता) कोणत्यातरी एखाद्या जबरदस्त चमत्काराद्वारे ईश्वरानेच सारे काही घडवून आणावे अशी तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा कशी काय करू शकता, हेच मला समजत नाही.

‘पूर्णयोग’ निर्धोक आहे असे मी कधीही म्हटलेले नाही, कोणताच योग निर्धोक नसतो. मानवी जीवनातील कोणत्याही महान उद्यमामध्ये असतात त्याप्रमाणेच, प्रत्येक योगमार्गाचे त्याचे त्याचे स्वतःचे असे काही धोके असतात. मात्र व्यक्तीमध्ये केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा असेल तर त्या धोक्यांमधून सहीसलामत पार पडता येते. (केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा) या दोन आवश्यक अटी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 81, 43)

सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक

आमच्या AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

 

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २२

साधनेच्या सुरुवातीच्या काळात प्रयत्न करणे अपरिहार्यच असते. सुरूवातीच्या काळात असे म्हणत असताना, अगदी थोड्या कालावधीसाठी असे मला म्हणायचे नाही; हे लक्षात घ्या. अर्थातच समर्पणसुद्धा आवश्यकच असते, पण समर्पण ही काही एका दिवसात घडून येणारी गोष्ट नाही. मनाच्या स्वतःच्या अशा काही कल्पना असतात आणि मन त्यांना चिकटून बसते. मानवी प्राण समर्पित होण्यास विरोध करतो, कारण सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये तो ज्याला ‘समर्पण’ असे संबोधत असतो ते म्हणजे एक प्रकारचे साशंकपणे केलेले आत्मदान असते आणि त्यासोबत एक मागणीदेखील असते. जडभौतिक चेतना ही जणू काही एखाद्या दगडासारखी असते आणि ती चेतना ज्याला ‘समर्पण’ असे संबोधते ते समर्पण म्हणजे बरेचदा जडत्व असते. समर्पण कसे करायचे हे केवळ चैत्य अस्तित्वालाच (psychic) माहीत असते आणि प्रारंभी हे चैत्य अस्तित्व सहसा बरेचसे झाकलेले असते. जेव्हा साधक चैत्य अस्तित्वाविषयी जागृत होतो तेव्हा ते संपूर्ण अस्तित्वाचे एकाएकी आणि खरेखुरे समर्पण घडवून आणू शकते, कारण उर्वरित भागांच्या अडचणी त्वरेने सोडविल्या जातात आणि त्या नाहीशा होतात. परंतु तोपर्यंत प्रयत्न हे अपरिहार्यच असतात.

अन्यथा, जोपर्यंत व्यक्तीमध्ये ‘दिव्य शक्ती‌’ (जल) प्रपाताप्रमाणे वरून खाली अवतरित होत नाही आणि त्या शक्तीकडून जोपर्यंत साधना हाती घेतली जात नाही, आणि व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रयत्नांवर विसंबून न राहता, ती शक्ती जोपर्यंत स्वतःच अधिकाधिक साधना घडवून आणत नाही तोपर्यंत आणि अगदी तेव्हासुद्धा, म्हणजे ‘ईश्वरी शक्ती’कडून मन, इच्छा, प्राण आणि शरीर यांचा पूर्णपणे ताबा घेतला जात नाही तोपर्यंत तरी, अगदी प्रयत्न नाही तरी किमान, अभीप्सा आणि सतकर्ता या गोष्टी आवश्यकच असतात.

दुसऱ्या बाजूला असे काही लोक असतात की, जे संपूर्ण समर्पणाविषयीच्या एका खऱ्याखुऱ्या आणि कृतिशील इच्छेने आरंभ करतात. ज्या व्यक्तींवर चैत्य अस्तित्वाची किंवा सुस्पष्ट, प्रबुद्ध मानसिक इच्छेची सत्ता चालते त्यांनी ‘समर्पण हा साधनेचा नियम आहे’, ही गोष्ट एकदा का स्वीकारली की मग, ते त्याबाबतीत कोणताही उणे-अधिकपणा खपवून घेत नाहीत आणि अस्तित्वाच्या इतर घटकांनीदेखील चैत्य अस्तित्वाने दाखविलेल्या दिशेचेच अनुसरण केले पाहिजे, असा आग्रह ते धरतात. इथेसुद्धा प्रयत्न असतातच पण ते इतके सिद्ध आणि उत्स्फूर्त असतात आणि त्यांना त्यांच्या पाठीशी असणाऱ्या महत्तर शक्तीची इतकी ठाम जाणीव असते की, त्या साधकाला आपण काही सायास करत आहोत, प्रयत्न करत आहोत असे मुळी जाणवतच नाही.

उलट दुसऱ्या एखाद्या उदाहरणामध्ये, व्यक्तीला स्वतःच्या स्वतंत्र गतिविधी सोडून द्यायच्या नसतात आणि जेथे मन किंवा प्राण स्व-इच्छा टिकवून ठेवू इच्छित असतात अशा उदाहरणांबाबत पृष्ठवर्ती साधन आणि त्या साधनाच्या पाठीशी किंवा वर असणारे दिव्यत्व यांच्यामधील भिंत ढासळेपर्यंत संघर्ष आणि प्रयत्न क्रमप्राप्तच असतात. या बाबतीत निरपवादपणे सर्वांनाच लागू पडेल असा एकच एक नियम सांगता येणे अवघड आहे. मानवी प्रकृतीमध्ये इतकी प्रचंड विविधता आहे की, कोणत्याही एकाच परिणामकारक नियमामध्ये सारी मानवी प्रकृती बसविता येत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 83-84)