समत्व-वृत्ती ही खऱ्या आध्यात्मिक चेतनेचा मुख्य आधार असते. जेव्हा एखादा साधक प्राणिक भावावेगाच्या लाटेबरोबर, भावनेद्वारे, वाणीद्वारे वा कृतीद्वारे स्वत:ला वाहवत जाऊ द्यायला संमती देतो तेव्हा, तो साधक या समत्वापासूनच विचलित होतो. स्थिर झालेले समत्व हे नि:संशयपणे खूप मोठ्या प्रमाणात, कधीकधी तर अगदी अमर्यादपणे माणसाची सहनशीलता आणि क्षमाशीलता वाढविते. तरीही ती क्षमाशीलता म्हणजे समत्व नव्हे.
शांत व अविचल मन आणि प्राण म्हणजे समत्व. तुमच्या बाबतीत घडलेल्या किंवा तुमच्याविषयी बोलल्या गेलेल्या किंवा तुमच्याबाबत केल्या गेलेल्या कोणत्याही गोष्टींनी वा घटनांनी अस्वस्थ किंवा विचलित न होता, वैयक्तिक भावभावनांमधून उत्पन्न होणाऱ्या विकारांपासून मुक्त होऊन, त्यांच्याकडे थेटपणे पाहणे आणि त्या गोष्टींच्या पाठीमागे काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे; त्या का घडतात, त्यापासून आपण काय धडा घेतला पाहिजे; आपल्यामध्ये असे काय आहे की, ज्यामुळे त्या गोष्टी आपल्या विरोधात उभ्या ठाकल्या; त्यापासून कोणता आंतरिक लाभ किंवा प्रगती आपण करून घेऊ शकतो, हे सारे स्वच्छ दृष्टीने पाहणे म्हणजे समत्व. प्राणिक आवेगांवरील आत्म-प्रभुत्व म्हणजे समत्व. राग, अति-संवेदनशीलता, गर्व, तसेच इच्छावासना आणि तत्सम गोष्टी या साऱ्या प्राणिक आवेगांवरील आत्म-प्रभुत्व म्हणजे समत्व. तसेच (राग, अति-संवेदनशीलता, गर्व, इच्छावासना इ.) या गोष्टींना आपल्या भावनिक अस्तित्वाचा ताबा घेऊ न देणे, त्यांच्यामुळे आपली आंतरिक शांती बिघडवू न देणे; त्यांच्या भरीस पडून, बोलण्याची किंवा कृती करण्याची घाई न करणे; तर नेहमीच आत्म्याच्या आंतरिक शांत स्थितीत राहून बोलणे आणि कृती करणे म्हणजे समत्व.
असे समत्व पूर्णांशाने आणि परिपूर्ण प्रमाणात असणे ही गोष्ट सोपी नाही, तरीही व्यक्तीने अशा समत्वास आपल्या आंतरिक स्थितीचा आणि बाह्य हालचालींचा पाया बनविण्याचे अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत.
समत्वाचा आणखी एक अर्थ आहे. तो म्हणजे विविध व्यक्ती, त्यांची प्रकृती, त्यांच्या कृती, त्यांना कृतिप्रवण करणाऱ्या शक्ती या सर्व गोष्टींकडे समदृष्टीने पाहणे. (समदृष्टीने पाहताना) त्या व्यक्तीने स्वतःच्या मनातून, त्यांच्याविषयीच्या दृष्टिकोनातील आणि त्यांच्याविषयीचे मत बनविण्यामधील सर्व वैयक्तिक भावभावना दूर सारलेल्या असतात, तसेच त्यांच्याविषयीचे सर्व मानसिक पूर्वग्रह व्यक्तीने मनातून दूर केलेले असतात. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला त्यांच्याविषयीचे सत्य दिसण्यास मदत होते.
वैयक्तिक भावभावनांमुळे नेहमीच विपर्यास होतो आणि इतरांच्या कृतींकडे पाहताना, त्या कृती (वस्तुनिष्ठपणे) पाहण्याचे सोडून, व्यक्ती त्या पाठीमागील गोष्टी (म्हणजे अमुक एका कृतीमागे ती कृती करणाऱ्या व्यक्तीचा हेतू काय होता इत्यादी गोष्टी) पाहायला लागते; वास्तविक, बरेचदा अशा गोष्टी तिथे अस्तित्वातच नसतात. आणि ज्या गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या अशा गोष्टींमध्ये म्हणजे गैरसमजुती, चुकीचे आडाखे अशा गोष्टींमध्ये त्यांचे पर्यवसान होते. छोटे परिणाम करणाऱ्या गोष्टीही मग विक्राळ रूप धारण करतात. मी हे पाहिले आहे की, जीवनातील अनिष्ट घटनांपैकी निम्म्यापेक्षा अधिक घटना याच कारणामुळे घडतात.
परंतु सर्वसामान्य आयुष्यात मात्र वैयक्तिक भावभावना, संवदेनशीलता या बाबी मानवी प्रकृतीचा एक नेहमीचा भाग असतात आणि स्वसंरक्षणासाठी त्यांची गरज पडू शकते. असे असूनदेखील मला असे वाटते की, अगदी तेथेसुद्धा इतरांविषयीचा आणि सर्व गोष्टींविषयीचा एक दृढ, विशाल आणि समत्वपूर्ण दृष्टिकोन हा संरक्षणाचा अधिक चांगला मार्ग असू शकतो. साधकासाठी मात्र, भावभावना, अति-संवेदनशीलता यांवर मात करून, आत्म्याच्या शांत सामर्थ्यामध्ये जीवन जगणे, हा त्याच्या प्रगतीचा एक आवश्यक भाग असतो.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 130-131)







