Tag Archive for: संकल्प

लोक तुमच्याविषयी द्वेषपूर्ण उद्गार काढतात, तुम्हाला मूर्खात काढतात त्यामुळे तुम्ही जर चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही (योग)मार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. अशा गोष्टी तुमच्या वाट्याला येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे मुळीच नाही; तर उलट दिव्य चेतने‌ने व दिव्य कृपे‌ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे असा त्याचा अर्थ होतो. तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही खंबीर आहात का, याची पारख करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा कसोटीच्या दगडाप्रमाणे (सोन्याची पारख करण्याचा सोनाराकडे असणारा कसोटीचा दगड) दिव्य चेतनेकडून व दिव्य कृपेकडून वापर केला जात असतो, हे त्यामागचे खरे कारण असते.

म्हणून जर कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदाजनक शब्द उच्चारले तर, तुमच्या खऱ्या गुणांची लोकांना कदरच नाही असे वाटून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्नही होता कामा नये. उलट, अशावेळी पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, तुमच्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे तुमच्याविषयी तसे उद्गार काढले गेले ते तुम्ही अंतर्मुख होऊन पाहिले पाहिजे. एवढेच नव्हे तर, तुमच्यातील कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती तुम्ही दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य कृपे‌विषयी कृतज्ञ असले पाहिजे. दुःखीकष्टी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे समाधानी झाले पाहिजे आणि तुमचे अहित व्हावे असा जो तुमच्या निंदकांचा हेतू होता, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 282)

आंतरिक आध्यात्मिक प्रगती ही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते, तर बाह्य परिस्थितीला आपण अंतरंगातून कशी प्रतिक्रिया देतो यावर ती अवलंबून असते. आध्यात्मिक अनुभवाचा तो नेहमीच अंतिम निष्कर्ष राहिलेला आहे. आणि म्हणूनच योग्य दृष्टिकोन बाळगण्यावर आणि त्यात सातत्य राखण्यावर आम्ही इतका भर देत असतो; बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसणाऱ्या आंतरिक स्थितीवर म्हणजे समतेच्या आणि स्थिरतेच्या स्थितीवर आम्ही भर देत असतो. आंतरिक आनंदाची स्थिती एकाएकी येऊ शकणार नाही पण, जीवनातील धक्के व आघात यांच्या नेहमीच अधीन असणाऱ्या पृष्ठवर्ती मनामध्ये राहण्यापेक्षा, अंतरंगात अधिकाधिक प्रवेश करून, तेथून जीवनाकडे पाहण्यावर आमचा भर असतो. या आंतरिक स्थितीमुळेच व्यक्ती जीवन आणि त्याच्या अस्वस्थकारी शक्तींपेक्षा अधिक शक्तिशाली बनू शकते आणि विजय प्राप्त करण्याची थोडीफार तरी आशा बाळगू शकते.

अंतरंगामध्ये अविचल (quiet) राहणे, अडीअडचणी किंवा चढउतार यांमुळे अस्वस्थ किंवा नाउमेद होण्यास नकार देऊन, त्यामधून सहीसलामत पार होण्याचा दृढ संकल्प बाळगणे, या योगमार्गावरील शिकण्यायोग्य गोष्टींपैकी काही प्रारंभिक गोष्टी आहेत.

या व्यतिरिक्त अन्य काही करणे म्हणजे चेतनेच्या अस्थिरतेस प्रोत्साहन देण्यासारखे आहे, परंतु तुम्ही अंतरंगामध्ये स्थिर आणि अविचल राहू शकलात तर मग, अनुभवांचा प्रवाह काहीशा स्थिरपणाने वाहू लागेल. अर्थात या वाटचालीमध्ये व्यत्यय आणि चढउतार येणारच नाहीत, असे नाही. परंतु या गोष्टी योग्य रितीने हाताळल्या गेल्या तर, या कालावधीमध्ये साधनाच झाली नाही, असे होत नाही. तर हाच कालावधी अडचणी संपुष्टात येऊन, आधी आलेले अनुभव पचवण्यासाठीचा कालावधी ठरू शकतो.

बाह्य परिस्थितीपेक्षा आध्यात्मिक वातावरण हे नेहमीच अधिक महत्त्वाचे असते. साधकाला जर ते प्राप्त होऊ शकले आणि तो स्वतः ज्यामध्ये श्वास घेऊ शकेल व ज्यामध्ये जीवन जगू शकेल असे स्वतःचे आध्यात्मिक वातावरण साधक स्वत: तयार करू शकेल तर, ती परिस्थिती प्रगतीसाठी खरी सुयोग्य परिस्थिती असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 140)

(आज ही मालिका समाप्त होत आहे.)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २७

ज्या ऊर्जेमुळे व्यक्तीला सत्कृत्य करण्याची प्रेरणा मिळते आणि जी ऊर्जा व्यक्तीला दुष्कृत्य करण्यापासून रोखते ती ऊर्जा म्हणजे ‘संकल्पशक्ती’ होय.

*

संकल्प हा चेतनेचाच एक भाग असतो आणि मनुष्यामध्ये तो (कनिष्ठ) प्रकृतीच्या गतीविधींचे नियंत्रण करणारा मुख्य घटक असलाच पाहिजे.

*

आपण जर सातत्याने संकल्पाचा उपयोग करत राहिलो तर आपल्या अस्तित्वाचे इतर घटकदेखील हळूहळू त्या संकल्पाची आज्ञा प्रमाण मानू लागतात आणि मग आपल्या कृतीदेखील प्राणिक भावना वा इच्छावासनांनुसार न होता, त्या संकल्पाच्या बरहुकूम होऊ लागतात. उर्वरित सर्व गोष्टी (भावना, इच्छा इ. स्वयमेव) जर कल्पनेमध्ये किंवा कृतीमध्ये आणल्या गेल्या नाहीत आणि त्यांना जर संकल्पाची जोड दिली गेली नाही आणि त्या मनात उमटतील तेव्हा नुसते त्यांचे अवलोकन केले आणि त्यांना नकार दिला तर, थोड्याशा संघर्षानंतर त्या गोष्टी क्षीण होत जातात आणि कालांतराने नाहीशा होतात.

*

साधकामध्ये जोवर ध्येय साध्य करून घेण्याची इच्छा आणि दृढ संकल्प नसतो तोवर ती ‘दिव्य शक्ती’सुद्धा निश्चित आणि चिरस्थायी परिणाम निर्माण करू शकत नाही.

*

साधकामध्ये जोपर्यंत वरून होणारे ‘दिव्य शक्ती’चे कार्य किंवा अंतरंगातील गहनतर ‘दिव्य संकल्पा’चे कार्य सातत्यपूर्ण रितीने घडून येत नाही तोपर्यंत मानसिक इच्छेची आवश्यकता असतेच.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 718, 716, 716, 720, 720)

नैराश्यापासून सुटका – ०४

 

अडचणींना सामोरे गेलेच पाहिजे आणि जेवढ्या आनंदाने तुम्ही त्या अडचणींना सामोरे जाल, तेवढ्या लवकर तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल. ”अमुक एक गोष्ट मी केलीच पाहिजे आणि ती मी करीनच,” असा दृढ संकल्प कायम राखणे हा यशाचा मूलमंत्र, हा विजयाचा निर्धार तुम्ही केला पाहिजे. हे अशक्य वाटते आहे का? अशक्य अशी कोणती गोष्टच मुळात अस्तित्वात नसते. अडचणी असू शकतात, गोष्टींना वेळ लागू शकतो, पण अशक्य असे काहीच नसते. व्यक्तीने एखादी गोष्ट करण्याचा एकदा का दृढ निश्चय केला की, आज ना उद्या ती शक्य होते.

 

– श्रीअरविंद (CWSA 29 : 116)

जीवन जगण्याचे शास्त्र – २७

प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्या अभीप्सारूपी संकल्पाची भेट (ईश्वराला) देऊ शकता. “हे प्रभो, सारे काही तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे” अशा शब्दांतच ती अभीप्सा शब्दबद्ध होत नाही तर, “जी सर्वोत्तम गोष्ट आहे ती मला शक्य तितक्या चांगल्या रितीने करता येऊ दे,” अशा शब्दात ती अभीप्सा अगदी सहजस्वाभाविक रितीने अभिव्यक्त होते.

सर्वोत्तम गोष्ट कोणती आणि ती कशी करायची हे तुम्हाला प्रत्येक क्षणाला माहीत असतेच असे नाही. परंतु सर्वोत्तम शक्य गोष्ट करण्याच्या दृष्टीने, तुम्ही तुमचा संकल्प ईश्वराच्या हाती सोपवू शकता. त्याचे आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील.

ही गोष्ट चेतनेसहित (with consciousness), प्रामाणिकपणाने आणि चिकाटीने करा. तसे केलेत तर एकेका पल्ल्यामध्ये तुम्ही अफाट प्रगती करत आहात, असे तुम्हाला आढळून येईल. तुम्ही सर्व गोष्टी स्वतःच्या संकल्पाच्या पूर्ण ताकदीनिशी अगदी अंतःकरणपूर्वक, तळमळीने केल्या पाहिजेत. प्रत्येक क्षणी जे सर्वोत्तम शक्य आहे, तेच केले पाहिजे. इतर काय करतात हा तुमच्या चिंतेचा विषय असता कामा नये. “तो ‘क्ष’ हे असे करत नाही, तर तो तसे करतो,” “तो ‘य’ असे करतो, पण त्याने तसे करता कामा नये,” हे असे कधीही म्हणू नका. कारण ती गोष्ट तुमच्याशी निगडित नाही.

तुम्हाला या पृथ्वीवर एका विशिष्ट उद्दिष्टानिशी एक देह देऊन पाठविण्यात आले आहे. तो शक्य तेवढा सचेत बनविणे, तो ईश्वराचे सर्वाधिक परिपूर्ण आणि सर्वाधिक सचेत साधन बनविणे या हेतुने तुम्हाला देह देण्यात आला आहे. ईश्वराने तुम्हाला मानसिक, प्राणिक, शारीरिक या सर्व क्षेत्रांमध्ये विशिष्ट प्रमाणात काही द्रव्यं देऊ केली आहेत. तो तुमच्याकडून ज्याची अपेक्षा बाळगतो त्या प्रमाणात, ती द्रव्यं तुम्हाला प्रदान करण्यात आलेली असतात. तसेच तो तुमच्याकडून ज्याची अपेक्षा बाळगतो त्या प्रमाणात, तिला साजेशी अशीच परिस्थिती तुम्हाला प्रदान करण्यात आलेली असते. आणि म्हणून “माझे जीवन अगदी असह्य आहे, जगातील सर्वात दुःखी जीवन माझ्या वाट्याला आले आहे,” असे जे कोणी म्हणतात, ते मूढ असतात. प्रत्येकाला त्याच्या विकासासाठी यथायोग्य असे जीवन देण्यात आलेले असते, त्याच्या संपूर्ण विकसनासाठी जे अनुभव त्याला उपयुक्त ठरतात, तेच अनुभव त्याला प्रदान करण्यात आलेले असतात आणि त्याच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या त्याच्या संपूर्ण साक्षात्कारासाठी साहाय्यकारी ठरतील अशाच असतात.

– श्रीमाताजी (CWM 04 : 117-118)

जीवन जगण्याचे शास्त्र – २५

धीटपणा, धैर्य आणि चिकाटी हे आवश्यक असे पहिले गुण आहेत. तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे की, तुम्ही जे जाणले पाहिजे त्याच्या तुलनेत तुम्ही जे जाणता ते म्हणजे काहीच नाही; तुम्ही जे करणे आवश्यक आहे त्याच्या तुलनेत तुम्ही जे करू शकता ते म्हणजे काहीच नाही आणि तुम्ही जे बनले पाहिजे त्याच्या तुलनेत तुम्ही आत्ता जे आहात ते म्हणजे काहीच नाही.

तुमच्या प्रकृतीमध्ये ज्याचा अभाव आहे ते प्राप्त करून घेण्याची, तुम्हाला अजूनपर्यंत जे माहीत नाही ते जाणून घेण्याची आणि तुम्हाला अजूनपर्यंत जे करता आलेले नाही ते करता यावे असा एक दृढ, अविचल संकल्प तुमच्यामध्ये असला पाहिजे. वैयक्तिक इच्छा-वासनारहिततेमधून येणाऱ्या शांतीमध्ये आणि प्रकाशामध्ये तुम्ही सतत प्रगती करत राहिले पाहिजे. “नेहमी अधिक चांगले, प्रगतिपथावर अधिक पुढे!” असा कृतिकार्यक्रमच तुम्ही ठरवून घेऊ शकता. ईश्वराचे आविष्करण करता यावे यासाठी त्याला जाणणे हेच तुमचे एकमेव ध्येय असले पाहिजे. चिकाटी बाळगा म्हणजे मग, तुम्ही आज जे करू शकत नाही ते तुम्हाला उद्या साध्य होऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 16 : 430)

कर्म आराधना – ०८

संकल्प दृढ ठेवा. तुमच्यातील अडेलतट्टू घटकांना, ज्याप्रमाणे आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना वागवतात त्याप्रमाणे वागणूक द्या. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने काम करा. त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगा.

तुमच्या जाणिवांच्या आत खोलवर चैत्य पुरुष (psychic being) असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे मंदिर असते. हे असे केंद्र असते की, ज्याच्या भोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व घटकांचे, तुमच्या अस्तित्वामधील सगळ्या परस्परविरोधी हालचालींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा आत्मसात झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित! एकदा जरी तुम्ही ‘ईश्वरोन्मुख’ झाला असाल आणि म्हणाला असाल की, ”मला तुझा होऊन राहायचे आहे.” आणि ईश्वर “हो” असे म्हणाला असेल, तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला त्यापासून रोखू शकत नाही. जेव्हा जीवात्मा (central being) स्वत:चे समर्पण करतो तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते. बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य माणसांमध्ये हे कवच इतके कठीण आणि जाड असते की, त्यामुळे ते त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’बाबत यत्किंचितही जागरूक नसतात. एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा (inner being) म्हणाला असेल की, ”मी इथे आहे आणि मी तुझाच आहे’’; तर एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते बाह्य कवच हळूहळू पातळ पातळ होत जाते. जोपर्यंत आंतरिक अस्तित्व आणि बाह्य अस्तित्व हे दोन्ही भाग पूर्णपणे जोडले जाऊन, एकच होऊन जात नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 07)