Tag Archive for: व्यावहारिक जीवन

कृतज्ञता – १६

प्राण्यांचे मन अगदी अर्धविकसित असते. अविरत चालणाऱ्या विचारमालिकांमुळे माणसांची जशी छळवणूक होते तशी, प्राण्यांची होत नाही. उदाहरणार्थ, त्यांच्याशी कोणी प्रेमाने वागले तर, त्यांच्यामध्ये अगदी सहजपणे कृतज्ञतेची भावना निर्माण होते.

पण हेच जर माणसांबाबतीत घडले तर, १०० पैकी ९९ वेळा माणसे विचार करायला लागतात. मनाशीच म्हणतात, ”अमुक एक व्यक्ती माझ्याशी चांगली वागली, त्यामध्ये तिचा नक्की काय हेतू असेल बरे?” मानसिक क्रियांपैकी ही एक मोठी दुःखद बाब आहे. मात्र प्राणी यापासून मुक्त असतात आणि म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याशी ममत्वाने वागता तेव्हा, ते अगदी सहजपणे तुमच्याविषयी कृतज्ञ राहतात. त्यांचा विश्वास असतो. त्यांचे प्रेम तशा प्रकारचे असते आणि मग त्याचे रूपांतर अगदी घट्ट अशा जवळिकीमध्ये होते. तुमच्या भोवती भोवती घुटमळत राहण्याची एक अदम्य अशी निकड त्यांना भासू लागते.

त्यात आणखीही काही असते. म्हणजे जर मालक खरोखरच चांगला असेल आणि प्राणी विश्वासू असेल तर, त्यांच्यामध्ये एक प्रकारे प्राणिक आणि आंतरात्मिक शक्तींचे आदानप्रदान होते; हे आदानप्रदान प्राण्यांच्या दृष्टीने खूपच सुंदर, अद्भुत असते; ते त्यांना उत्कट आनंद मिळवून देते. अशा प्रकारे, जेव्हा त्यांना तुमच्या जवळ राहायचे असते आणि जेव्हा तुम्ही त्यांना हृदयाशी कवळून घेता तेव्हा, त्यांना आतूनच ते स्पंदन जाणवते. व्यक्ती त्यांना ती शक्ती देते – प्रेमाचे सामर्थ्य, हळुवारतेचे, सौहार्दाचे, संरक्षणाचे, सारे सारे काही – त्यांना जाणवते आणि त्यांच्यामध्ये त्या व्यक्तीविषयीचा एक खूप गाढ असा अनुबंध निर्माण होतो. इतकेच काय पण त्यामधून, कुत्री, हत्ती आणि घोड्यांसारख्या वरच्या श्रेणीतील प्राण्यांमध्ये तर, अगदी उत्स्फूर्तपणे एक प्रकारची भक्तीची गरज निर्माण होते. (मनाच्या सर्व तार्किकतेनेही किंवा युक्तिवादांनीही ती नाकारता येत नाही.) ती मुळातच अगदी विशुद्ध आणि उत्स्फूर्त अशी भावना असते.

मनुष्यामध्ये मनाचे कार्य सुरू झाले तेव्हा, त्याच्या अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये, त्याच्या पहिल्यावहिल्या आविष्करणामध्ये, त्याने अनेक गोष्टी बिघडवून टाकल्या, ज्या वास्तविक पूर्वी खूप सुंदर होत्या.

तेव्हा हे उघड आहे की, माणूस जर उच्चतर पातळीवर जाईल आणि त्याच्या बुद्धीचा सुयोग्य उपयोग करेल तर, त्यामुळे गोष्टींना अधिक मूल्य प्राप्त होईल. पण या दोहोंच्या दरम्यान, एक असा प्रांत आहे की, जेथे माणूस त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर अगदी असभ्य आणि खालच्या पातळीवरून करतो. तो मनाला हिशोबाचे, वर्चस्वाचे, फसवणुकीचे साधन बनवितो आणि त्यामुळे ते मन कुरूप होऊन जाते. मला जीवनात असे काही प्राणी माहीत आहेत की, ज्यांना मी माणसांपेक्षाही अधिक श्रेष्ठ समजत असे. कारण तो घृणास्पद हिशोबीपणा, दुसऱ्यांना फसवायचे आणि स्वतःचा लाभ करून घेण्याची इच्छा त्या प्राण्यांच्या ठिकाणी नसायची. असेही काही प्राणी असतात की, जे माणसाच्या सहवासात आल्यानंतर या साऱ्या गोष्टी शिकतात, पण काही प्राणी असे असतात की, ज्यांच्या ठायी याचा लवलेशही नसतो.

या जगातील चैत्य जाणिवेच्या (psychic consciousness) अनेकविध सुंदर रूपांपैकी, ‘निरपेक्ष, निर्व्याज कृती’ हे एक सर्वोत्तम रूप आहे. (उत्क्रांतीच्या श्रेणीमध्ये प्राणिजगताकडून मनुष्यजगताकडे) तुम्ही मानसिक गतिविधींच्या दिशेने जसजसे वरवर चढू लागता तसतशी ही निरपेक्ष, निर्व्याज कृती दुर्मिळ होऊ लागल्याचे आढळते. कारण बुद्धी आली की त्या बुद्धीच्या बरोबरीने सर्व चलाखी, अक्कलहुशारी, भ्रष्टपणा, देवाणघेवाण यांची सुरुवात होते.

उदाहरणार्थ असे पाहा की, जेव्हा एखादे गुलाबाचे फूल उमलते तेव्हा ते अगदी सहज-स्वाभाविकपणे उमलते. सुंदर असण्याच्या आनंदाने, मधुर सुगंध देण्यासाठी, जीवनाचा आनंद अभिव्यक्त करण्यासाठी ते उमलते; कोणत्याही लाभहानीचा ते विचार करत बसत नाही, त्याला त्यामधून काही मिळवायचे नसते, ते अगदी सहजस्फूर्तपणे, अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या आनंदाने बहरून येते. आणि आता याच्या जागी, उदाहरण म्हणून मनुष्याचा विचार करू. काही सन्माननीय अपवाद वगळता, ज्या क्षणी मनुष्याचे मन सक्रिय होते त्याच क्षणी मन त्या सौंदर्यापासून आणि हुशारीपासून काही लाभ मिळवू पाहते; त्यापासून काहीतरी मिळावे अशी त्याची अपेक्षा असते, लोकांकडून स्तुती किंवा कौतुक किंवा त्याहीपेक्षा जास्त असा काहीतरी लाभ व्हावा अशी त्याची अपेक्षा असते. परिणामत: चैत्य दृष्टिकोनातून पाहिले असता, गुलाबाचे फूल हे माणसापेक्षा अधिक चांगले असते.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 239-240)

कृतज्ञता – १५

शारीरिक चेतनेने प्रथम एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे; ती अशी की, आपल्याला जीवनात ज्या अडचणींना सामोरे जावे लागते त्या साऱ्या अडीअडचणी – आपण आपल्याला आवश्यक असणाऱ्या साहाय्यासाठी फक्त आणि फक्त ‘ईश्वरा’वरच विसंबून राहत नाही – या एकाच वास्तवातून उद्भवतात.

वैश्विक ‘प्रकृती’च्या यंत्रणेपासून केवळ ‘ईश्वर’च आपल्याला मुक्त करू शकतो. नव्या वंशाच्या जन्मासाठी आणि विकसनासाठी ही मुक्ती अपरिहार्य आहे. ‘ईश्वरा’ प्रत पूर्ण विश्वासाने आणि कृतज्ञतेने स्वतःचे समग्रतया अर्पण केल्यानेच सर्व अडीअडचणींवर मात केली जाईल.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 433)

कृतज्ञता – ११

कृतघ्नता ही एक अशी गोष्ट आहे की, जी मला नेहमीच अतिशय वेदनादायक वाटत आली आहे. कृतघ्नता अस्तित्वातच कशी राहू शकते हे मला वेदनादायक वाटते. माझ्या जीवनात बघितलेल्या सर्व गोष्टींपैकी ही एक अशी गोष्ट आहे की जी सर्वाधिक असह्य अशी आहे. ‘ईश्वरा’बद्दलची ही एक प्रकारची विखारी कटुता आहे.

…कृतघ्नता ही ‘मना’च्या बरोबरीने उदयाला आली. प्राण्यांमध्ये ती आढळत नाही. आणि म्हणूनच मला प्राण्यांमध्ये एक प्रकारचा गोडवा जाणवतो, अगदी जे अतिशय क्रूर समजले जातात त्यांच्यामध्येसुद्धा तो गोडवा असतो, जो मनुष्यामध्ये नसतो.

आणि तरीही सर्व गतिविधींमध्ये, कदाचित सर्वाधिक आनंद देणारी – अहंकाराने न डागाळलेला असा निष्कलंक, निर्भेळ आनंद देणारी एक गोष्ट म्हणजे ‘उत्स्फूर्त कृतज्ञता’.

ती काहीतरी एक खास अशी गोष्ट असते. ते प्रेम नसते, ते आत्मार्पणही नसते… तो एक अतीव ‘परिपूर्ण’ असा आनंद असतो, अगदी परिपूर्ण आनंद. त्याच्यासारखे तेच असे ज्याला म्हणता येईल असे ते एक खास स्पंदन असते. ती एक अशी गोष्ट असते की जी तुम्हाला व्यापक बनवते, ती तुम्हाला भारून टाकते, ती अतिशय उत्कट असते.

मानवी चेतनेच्या आवाक्यात असणाऱ्या सर्व गतिविधींपैकी, ही खरोखरच एक अशी गोष्ट आहे की, जी तुम्हाला तुमच्या अहंकारापासून सर्वांत जास्त बाहेर खेचून काढते.

आणि जेव्हा ही कृतज्ञता निर्हेतुक असते तेव्हा, कृतज्ञतेच्या त्या स्पंदनामुळे अनेक मोठे अडथळे क्षणार्धात नाहीसे होऊ शकतात.

– श्रीमाताजी
(Conversations with a disciple: December 21, 1963)

कृतज्ञता – ०७

प्रश्न : माझ्या मनात नेहमीच असा विचार येतो की, माताजी मी तुमच्यापाशी माझी कृतज्ञता कशी व्यक्त करू?

श्रीमाताजी : माझ्याप्रति तशी (कृतज्ञता व्यक्त करण्याची) तसदी कोणीच घेत नाही. जेव्हा कधी एखादी अडचण येते, एखादा अडथळा येतो, किंवा एखादा आघात होतो तेव्हा लगेच माझ्यापाशी प्रार्थना केली जाते, मदतीची अशी याचना केली जाते की, “कृपा करून मला वाचवा. कृपा करून मला संरक्षण द्या.” किंवा अडचणींवर मात करण्याच्या हेतुनेसुद्धा अशी विनवणी केली जाते की, “माताजी, आम्हाला साहाय्य करा, आमचे संरक्षण करण्यासाठी तुमच्या हातांचा आधार द्या. तुमचा करुणावर्षाव आमच्यावर होऊ द्या. आमच्यावर दया करा.”

आणि मग जेव्हा ईश्वरी ‘कृपे’ने तिचे कार्य पूर्ण केलेले असते… मी त्यांच्यासाठी ज्या हजारो गोष्टी सातत्याने करत असते त्याबद्दल ते कधीच कृतज्ञतेचा एक शब्दही उच्चारात नाहीत. मी जेव्हा त्यांचे रक्षण करते, किंवा त्यांच्यासाठी एखाद्या अडचणीवर मात करते, त्यानंतर मात्र एकही शब्द नसतो… ईश्वरी ‘कृपे’ ने जेव्हा त्यांच्यासाठी सारे काही केलेले असते म्हणजे त्यांना वाचविलेले असते, त्यांचे संरक्षण केलेले असते आणि सर्व अडचणींवर मात केलेली असते तेव्हा खालून कृतज्ञतेचा एक शब्दही ईश्वरी ‘कृपे’ बाबत उच्चारला जात नाही. त्यांना लगेचच विसर पडलेला असतो. ज्या प्रचंड ईश्वरी शक्तीने त्यांना संकटातून बाहेर खेचून काढले, त्या शक्तीविना ते कसे काय वाचू शकले असते किंवा ते कसे काय सुरक्षित राहू शकले असते, शांत कसे राहू शकले असते? पण याने त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना पूर्ण विसर पडलेला असतो आणि त्यांच्यावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नसतो, ज्या महान अद्भुत अपूर्व गोष्टीने त्यांना वाचविलेले असते, त्याची त्यांना साधी आठवणदेखील नसते. कृतज्ञतेचा दृष्टिकोन खरोखर अगदी दुर्लक्षित आहे, कृतज्ञतेची कृती या जगात शोधण्यात अर्थ नाही. किमान हे मात्र नक्की की, कृतज्ञता ही अगदी दुर्मिळ गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(The Supreme : 59-60)

कृतज्ञता – ०६

‘कृतज्ञता’ ही एक आंतरात्मिक भावना आहे आणि जे जे काही आंतरात्मिक असते ते आत्म्याला विकसित होण्यासाठी साहाय्य करते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता भावनांमध्ये गैर असे काही नाही. फक्त एवढेच की त्या भावना (अध्यात्म) मार्गावरील बंधन ठरता कामा नयेत.

– श्रीअरविंद
(SABCL 24 : 1768)

कृतज्ञता – ०५

कृतज्ञतेचे प्रकार :

‘ईश्वरी कृपे’च्या तपशीलांविषयी आपल्यामध्ये जागरूकता निर्माण करणारी जी कृतज्ञता असते ती म्हणजे ‘तपशीलवार कृतज्ञता’.

जिच्याद्वारे आपले संपूर्ण अस्तित्व, स्वतःला पूर्ण विश्वासानिशी, त्या ‘प्रभू’पाशी समर्पित करते, ती असते ‘परिपूर्ण कृतज्ञता’.

मनाची अशी कृतज्ञता की जिच्यामुळे मन प्रगती करू शकते ती म्हणजे ‘मानसिक कृतज्ञता’

– श्रीमाताजी
(CWM 14 : 154)

कृतज्ञता – ०४

करुणा आणि कृतज्ञता हे मूलत: चैत्य गुण आहेत. चैत्य पुरुष जेव्हा सक्रिय जीवनामध्ये भाग घेऊ लागतो तेव्हाच चेतनेमध्ये हे गुण प्रकट होऊ लागतात. वास्तविक हे गुण सामर्थ्यशक्तीवर आधारित असतात परंतु, मन व प्राणाला हे गुण म्हणजे दुबळेपणा आहे असे वाटते. कारण ते मनाच्या आणि प्राणाच्या आवेगांना स्वैरपणे प्रकट होण्यापासून रोखतात.

पुरेसे शिक्षित नसलेले मन, हे बहुधा नेहमीच प्राणाचे साथीदार असते आणि शारीर प्रकृतीचे गुलाम असते आणि अशा मनाचे कायदे प्राणाच्या व शरीराच्या अर्धजागृत यंत्रणेमध्ये इतके काही बळकट असतात की, त्यांना करुणा आणि कृतज्ञता या गुणांचा अर्थच नेमकेपणाने समजत नाही. जेव्हा मन प्रथमत: चैत्य हालचालींविषयी जागृत होऊ लागते तेव्हा स्वत:च्या अज्ञानामुळे त्या हालचालींचा ते पार विपर्यास करून टाकते आणि करुणेचे रूपांतर दया किंवा कणव यांमध्ये करून टाकते किंवा फार फार तर त्याचे रूपांतर भूतदयेमध्ये करते. कृतज्ञतेचे रूपांतर परतफेडीच्या इच्छेमध्ये करते…

जेव्हा व्यक्तीमध्ये चैत्य जाणीव ही पूर्णपणे प्रभावी झालेली असते तेव्हाच फक्त ज्या ज्या कोणाला मदतीची गरज भासते, त्या व्यक्तींविषयी तिला करुणा वाटते; मग ती मदत कोणत्याही क्षेत्रातली का असेना. तसेच ज्या कोणत्या गोष्टीमधून ईश्वरी अस्तित्वाची आणि कृपेची अभिव्यक्ती होते अशा सर्व गोष्टींविषयी, मग त्या गोष्टी कोणत्याही रूपामध्ये असू देत, त्या जर त्यांच्या अगदी मूळरूपात आणि तेजोमय शुद्धतेने अभिव्यक्त होत असतील तर, कोणत्याही मेहेरबानीचा लवलेशही नसलेली अमिश्रित अशी करुणा किंवा न्यूनगंडाची कोणतीही भावना नसलेली अशी कृतज्ञता, (चैत्य जाणीव प्रभावी झालेल्या व्यक्तीमध्ये) आढळून येते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 277)

कृतज्ञता – ०३

(‘ईश्वरी साक्षात्कारा’साठी जीवन समर्पित करण्याचा निश्चय) या निश्चयाशी निष्ठा राखायची असेल तर व्यक्तीने प्रामाणिक, एकनिष्ठ, विनम्र आणि आत्मनिवेदनाप्रत (consecration) कृतज्ञ असले पाहिजे, कारण हे गुण सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहेत आणि एक स्थिर आणि वेगवान प्रगती ही प्रकृतीच्या उत्क्रांतिमय प्रगतीच्या वेगाचे अनुसरण करण्यासाठी अनिवार्य असते. हे गुण नसतील तर कधीकधी व्यक्तीमध्ये प्रगतीचा आभास निर्माण होऊ शकेल पण तो केवळ बाह्य दिखावाच असेल, ते एक ढोंग असेल आणि पहिल्या वेळीच तो डोलारा कोलमडून पडेल.

‘प्रामाणिक’ असण्यासाठी, अस्तित्वाचे सारे भाग हे ईश्वराविषयीच्या अभीप्सेमध्ये (Aspiration) संघटित झाले पाहिजेत – एक भाग आस बाळगत आहे आणि इतर भाग नकार देत आहेत किंवा अभीप्सेशी प्रामाणिक राहण्याबाबत बंडखोरी करत आहेत, असे असता कामा नये – ईश्वर हा प्रसिद्धीसाठी किंवा नावलौकिकासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी किंवा सत्तेसाठी, शक्तीसाठी किंवा बढाईच्या समाधानासाठी नव्हे तर, ईश्वर हा ‘ईश्वरा’साठीच हवा असला पाहिजे, आत्मनिवेदनाबाबत अस्तित्वाच्या साऱ्या घटकांनी एकनिष्ठ आणि स्थिर असले पाहिजे म्हणजे एक दिवस श्रद्धा बाळगली आणि दुसऱ्या दिवशी, आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत त्यामुळे श्रद्धा गमावली आणि सर्व प्रकारच्या शंकाकुशंकांनी मनात घर केले, असे होता कामा नये. शंका म्हणजे व्यक्तीने ज्यामध्ये रममाण व्हावे असा एखादा खेळ नाही; तर ते एक असे विष आहे की, जे आत्म्याला कणाकणाने क्षीण करत नेते.

आपण कोण आहोत याचे व्यक्तीला अचूक भान असणे आणि आपल्याला कितीही गोष्टी साध्य झालेल्या असल्या तरीही ‘आपण काय असले पाहिजे’ अशी ईश्वराची आपल्याकडून अपेक्षा आहे, तिच्या परिपूर्तीच्या तुलनेत, आपल्याला साध्य झालेल्या गोष्टी व्यवहारतः अगदी नगण्य आहेत, हे कधीही न विसरणे तसेच, ईश्वराचे व त्याच्या मार्गांचे मूल्यमापन करण्यासाठी आपण अक्षम असतो, याची पुरेपूर खात्री असणे म्हणजे ‘विनम्र’ असणे होय.

एखादी व्यक्ती जशी आहे तशी, म्हणजे तिचे अज्ञान, तिचे समज-गैरसमज, तिचा अहंकार, त्या व्यक्तीचा विरोध, त्या व्यक्तीची बंडखोरी अशा गोष्टी असूनदेखील, परमेश्वराची अद्भुत कृपा त्या व्यक्तीला तिच्या ईश्वरी उद्दिष्टाप्रत अगदी जवळच्या मार्गाने घेऊन जात असते. या अद्भुत कृपेचे कधीही विस्मरण होऊ न देणे म्हणजे ‘कृतज्ञ’ असणे होय.

– श्रीमाताजी
(The Aims And Ideals of The Sri Aurobindo Ashram : 16-17)

कृतज्ञता – ०२

कोणे एके काळी एक भव्य राजवाडा होता, त्याच्या गाभ्यामध्ये एक गुप्त असे देवालय होते. त्याचा उंबरठा आजवर कोणीच ओलांडलेला नव्हता. एवढेच नव्हे तर, त्या देवालयाचा अगदी बाह्य भागसुद्धा मर्त्य जिवांसाठी जवळजवळ अप्राप्य असाच होता, कारण तो राजवाडा एका अतिशय उंच ढगावर उभारलेला होता आणि कोणत्याही युगातील अगदी मोजकीच मंडळी त्याच्याप्रत पोहोचण्याचा मार्ग शोधू शकत असत.

हा ‘सत्या’चा राजवाडा होता.

एके दिवशी तेथे एक उत्सव आयोजित करण्यात आला होता, तो माणसांसाठी नव्हता, तर तो अत्यंत वेगळ्या जीवयोनींसाठी होता. ज्या देवदेवतांना पृथ्वीवर त्यांच्या ‘गुणवैशिष्ट्यां’नुसार पूजले जाते, अशा लहानमोठ्या देवदेवतांसाठी तो उत्सव होता.

त्या राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळच एक भलेमोठे सभागृह होते. त्याच्या भिंती, त्याची जमीन, त्याचे छत, सारे काही प्रकाशमान होते. ते असंख्य लखलखणाऱ्या अग्नींनी उजळून निघालेले होते. ते ‘बुद्धिमत्ते’चे सभागृह होते. जमिनीजवळ अतिशय सौम्य प्रकाश होता आणि त्याला एक सुंदरशी नीलवर्णी छटा होती, पण छताकडे मात्र ती क्रमाक्रमाने अधिकाधिक सुस्पष्ट होत गेली होती, तेथे हिऱ्यांचे झुबके छताला झुंबरासारखे लटकलेले होते आणि त्यातून असंख्य किरण झगमगत होते.

तेथे प्रत्येक ‘सद्गुणा’ने स्वतंत्रपणे प्रवेश केला होता, पण लवकरच त्यांचे समविचारी असे छोटेछोटे समूह तयार झाले. एकदा का होईना, पण सारे एकत्र जमल्यामुळे ते आनंदात होते, कारण अन्यवेळी ते सारे या विश्वामध्ये आणि अन्य लोकांमध्येही दूरदूर पसरलेले असतात, भिन्न भिन्न जिवांमध्ये विखुरलेले असतात.

त्या उत्सवावर ‘प्रामाणिकते’ची (Sincerity) सत्ता होती. तिने नितळ पाण्यासारखा, पारदर्शक असा एक पोषाख परिधान केलेला होता, तिच्या हातामध्ये एक अतिशय शुद्ध असे घनाकार स्फटिक होते आणि त्यामधून साऱ्या गोष्टी एरवी जशा दिसतात त्यापेक्षा भिन्न अशा म्हणजे वास्तविक त्या जशा आहेत तशा दिसत होत्या, कारण तेथे त्यांची प्रतिमा कोणत्याही विकृतीविना प्रतिबिंबित होत होती.

तिच्या जवळच, जणू तिच्या विश्वासू रक्षकांप्रमाणे वाटावेत असे ‘विनम्रता’ आणि ‘धैर्य’ हे दोन गुण उभे होते. विनम्रता ही आदरणीय होती आणि त्याच वेळी ती स्वाभिमानी होती. तर धैर्य हा उन्नत-माथा असलेला, स्वच्छ डोळ्यांचा होता, त्याचे ओठ दृढ आणि हसणारे होते, त्याच्या अवतीभोवतीचे वातावरण शांत आणि निर्णायक होते.

‘धैर्या’च्या जवळच, त्याच्या हातात हात घालून एक स्त्री उभी होती, तिने स्वतःला पूर्णपणे झाकून घेतलेले होते, तिने परिधान केलेल्या त्या अंगरख्यामधून तिच्या शोधक नजरेव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते; अंगरख्याआडून फक्त तिचे डोळे चमकताना दिसत होते, ती ‘विवेकबुद्धी’ होती.

त्या सगळ्यांमध्ये वावरणारी, इकडून तिकडे ये-जा करणारी आणि तरीही सतत प्रत्येकाजवळच आहे असे वाटावी अशी एक व्यक्ती होती, तिचे नाव ‘उदारता’ असे होते. ती एकाच वेळी सतर्क आणि शांत होती, ती सक्रिय होती आणि तरीदेखील सर्वांपासून स्वतंत्र होती.

ती त्या समूहामधून बाहेर पडताना, तिच्या मागे एक सौम्य पांढऱ्या रंगाची प्रकाशरेषा सोडून जात होती. ‘उदारता’ जो प्रकाश प्रस्फुरित करत असते, जो ती सौम्यपणे पसरवित जात असते, त्या प्रकाशाची प्रभा इतकी सूक्ष्म असते की, बहुसंख्य डोळ्यांना ती अदृश्यच असते. ती प्रभा उदारतेला तिच्या अगदी घनिष्ठ मैत्रिणीपासून, कधीही विलग होऊ न शकणाऱ्या अशा सहचारिणीपासून, तिच्या जुळ्या बहिणीपासून म्हणजे ‘न्यायबुद्धी’कडून प्राप्त होत असते.

‘उदारते’च्या आजूबाजूला ‘दयाळूपणा’, ‘सहनशीलता’, ‘मृदुता’, ‘उत्कंठा’ आणि तत्सम इतरांनी दिमाखदार घोळका केला होता. सारे जण तेथे उपस्थित होते. पण एकाएकी, त्या सुवर्णमय उंबरठ्यावर एका नवागत स्त्रीचे आगमन झाले.

दरवाज्यापाशी राखण करणाऱ्या द्वारपालांनी मोठ्या नाखुषीने तिला आत प्रवेश करण्यास संमती दिली. त्यांनी तिला यापूर्वी कधी पाहिले नव्हते किंवा त्यांच्यावर प्रभाव पडावा असे तिचे रंगरूपही नव्हते. ती खरोखरच अगदी लहानशा चणीची आणि सडपातळ होती आणि तिने जो पोशाख परिधान केलेला होता तोही अगदी साधासा, गरिबासारखा होता. ती काहीशी संकोचून, अवघडल्यासारखी काही पावले टाकत पुढे आली. त्या एवढ्या मोठ्या ऐश्वर्यसंपन्न आणि तेजःपुंज लोकांमध्ये, नक्की कोणाकडे जावे हे न कळल्याने, गोंधळून गेलेली ती तिथेच थबकली.

सख्यासोबत्यांबरोबर झालेल्या काही जुजबी संभाषणानंतर, त्यांच्याच विनंतीवरून ‘विवेकबुद्धी’ पुढे झाली आणि त्या नवख्या व्यक्तीच्या दिशेने गेली. त्या नवख्या स्त्रीला विचार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विवेकबुद्धीने दोन क्षण जाऊ दिले आणि मग त्या स्त्रीकडे बघून ती म्हणाली, ”आत्ता इथे जमलेल्यांपैकी आम्ही सर्व जण नावानिशी आणि प्रत्येकाच्या गुणांनुसार एकमेकांना ओळखतो. आम्ही सारे तुझ्या येण्याने आश्चर्यचकित झालो आहोत कारण तू आमच्यासाठी नवखी आहेस, किंवा किमान आम्ही तुला याआधी कधी पाहिले असल्याचे स्मरत नाही. तू कोण आहेस, ते कृपा करून आम्हाला सांगशील का?”

एक निःश्वास टाकत ती नवखी व्यक्ती उद्गारली, ”या राजवाड्यामध्ये सर्वांना मी अनोळखी असल्याचे वाटत आहे, यामध्ये मला काहीच आश्चर्य वाटत नाहीये, कारण मला क्वचितच कोठे आमंत्रित केले जाते. माझे नाव ‘कृतज्ञता’!”

(तात्पर्य : कृतज्ञता हा एक अत्यंत दुर्मिळ गुण आहे.)

– श्रीमाताजी
(CWM 02 : 05-07)

साधनेची मुळाक्षरे – १५

प्रश्न : मनामध्ये चालणाऱ्या चर्चा कशा थांबवाव्यात?

श्रीमाताजी : पहिली अट म्हणजे शक्य तितके कमी बोला.

दुसरी अट अशी की, तुम्ही आधी काय केले आहे किंवा काय करायचे आहे याचा विचार न करता, तुम्ही ज्या क्षणाला जे करत आहात केवळ त्याच गोष्टीचा विचार करा. भूतकाळाबद्दल खेद करत बसू नका किंवा भविष्य काय असेल याची कल्पना करत बसू नका.

तुम्ही तुमच्या विचारांमधील निराशावादाला आळा घालण्याचा शक्य होईल तेवढा प्रयत्न करा आणि स्वेच्छापूर्वक आशावादी बना.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 141)