Tag Archive for: व्यापकता

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही आत्ता जशी व्यापकता आणि स्थिरता बाळगली आहे तशी ती नेहमी टिकवून ठेवलीत आणि हृदयामध्ये देखील जर श्रीमाताजींबद्दल सदोदित प्रेम असेल तर मग सारे काही निर्धोक असते. कारण येथे योगाचा दुहेरी पाया रचण्यात आलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे येथे उच्चतर चेतना ही तिची ऊर्ध्वस्थित शांती, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांसहित अवतरित होते आणि ज्या चैत्य अस्तित्वामुळे सर्व प्रयत्न आणि सर्व उत्स्फूर्त गतिविधी खऱ्या ध्येयाप्रत वळलेल्या राहतात, ते चैत्य अस्तित्व खुले होते. (हा असतो तो दुहेरी पाया.)

श्रीअरविंद (CWSA 30 : 466)

चेतना जेव्हा संकुचित असते, ती व्यक्तिगत असते किंवा शरीरामध्येच बंदिस्त झालेली असते तेव्हा ईश्वराकडून काही ग्रहण करणे अवघड जाते. ही चेतना जेवढी जास्त व्यापक होते, तेवढी ती अधिक ग्रहण करू शकते. एक वेळ अशी येते की, जेव्हा ती विश्वाएवढी व्यापक झाल्याचा अनुभव येतो. तेव्हा समग्र ईश्वरच स्वतःमध्ये सामावून घेता येऊ शकेल असे तिला जाणवते.

*

व्यापकता (wideness) आणि स्थिरता (calmness) या गोष्टी योग-चेतनेचे अधिष्ठान असतात. आणि अनुभूती येण्यासाठी व आंतरिक विकास होण्यासाठी ती सर्वोत्तम परिस्थिती असते. शारीरिक चेतनेमध्ये जर व्यापक स्थिरता प्रस्थापित करता आली आणि त्या स्थिरतेने जर संपूर्ण शरीर आणि त्याच्या सर्व पेशी भरून गेल्या, तर तो शरीराच्या रूपांतरणाचा (transformation) पाया बनू शकतो. खरे सांगायचे तर, ही व्यापकता किंवा स्थिरता असल्याशिवाय रूपांतरण शक्यच नाही.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 274) & (CWSA 29 : 125)

जेव्हा तुम्ही इतरांसोबत काही काम करत असता त्यावेळी जर तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर ती दिव्य कृपा आहे, प्रगती करण्यासाठी तुम्हाला देण्यात आलेली ती एक उत्तम संधी आहे असे समजा.

आणि हे सोपे आहे : तुम्ही ह्या बाजूने असण्याऐवजी त्या बाजूने असता. तुम्ही स्वत:कडे पाहण्याऐवजी, तुम्ही त्या दुसऱ्या माणसामध्ये प्रवेश करता आणि तेथून पाहता. त्यासाठी तुमच्यापाशी थोडीशी कल्पनाशक्ती हवी; तुमच्या विचारांवर, तुमच्या कृतीवर थोडेसे अधिक प्रभुत्व हवे. पण हे काही तितकेसे कठीण नाही. जर तुम्ही थोडासाही प्रयत्न करून पाहाल तर, कालांतराने तुम्हाला ते खूप सोपे वाटू लागेल.

तुम्ही केवळ पाहणे आणि “हे असे का आहे? ते तसे का आहे? त्याने तसे का केले? तो तसे का म्हणाला?” असले स्वतःशीच बोलत बसणे, केवळ मानसिक प्रयत्न करणे पुरेसे नाही. त्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. असेच करत राहिलात तर तुम्हाला काहीच समजणार नाही. तुम्ही सर्व प्रकारच्या स्पष्टीकरणाची कल्पना करत राहाल, जी अगदीच निरुपयोगी असतील आणि “तो माणूस मूर्ख आहे, दुष्ट आहे.” असे म्हणायला लागण्यापलीकडे त्याचा काहीच उपयोग होणार नाही.

उलट, जर तुम्ही थोडासा प्रयत्न केलात, तुमच्या पासून दूर एखादी दूरस्थ वस्तू असल्याप्रमाणे त्याकडे पाहण्याऐवजी, जर तुम्ही त्याच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही आत शिरलात, तुमच्या समोर जो माणूस आहे त्याच्या डोक्यात शिरकाव कारण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही एकाएकी, स्वत:ला दुसऱ्या बाजूला पाहाल; तुम्ही स्वत:कडेच पाहाल आणि आता तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल की, तो तसे का म्हणत आहे; सर्वकाही सुस्पष्ट असेल, का, कशामुळे, कारण काय, त्या गोष्टीमागची त्याची भावना…सारे सारे काही. तुम्हाला दिवसातून शंभर वेळा असे करण्याची संधी मिळेल असा हा प्रयोग आहे. सुरुवाती सुरुवातीला तुम्हाला त्यात काही फारसे यश येणार नाही पण जर तुम्ही चिकाटीने प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही लक्षणीयरित्या यशस्वी झालेले असाल; त्यामुळे जीवनात एका मोठेच स्वारस्य निर्माण होते.

ज्यामुळे तुमची खरोखरीच प्रगती होते असे हे कार्य आहे. कारण ज्या क्षुद्र अशा चिखलामध्ये तुम्ही स्वतःला छान रीतीने कोंडून घेतलेले असते आणि ज्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीवर अडखळत राहता, त्यामधून हे कार्य तुम्हाला बाहेर काढते.

प्रकाशावर आपटत राहणारे किडे तुम्ही पाहिले आहेत ना? व्यक्तीची जाणीव ही काहीशी तशीच असते, ती प्रत्येक वस्तुवर ठोकर खात राहते, कधी इकडे कधी तिकडे, कारण त्या गोष्टी तिच्यासाठी परक्या असतात. पण ठोकरा खात राहण्याऐवजी व्यक्ती जर अंतरंगात प्रवेश करेल तर ती त्या गोष्टीचा एक हिस्साच बनून जाते. अशा रीतीने व्यक्ती स्वत:ला व्यापक बनविते, मोकळेपणाने श्वास घेते, आतमध्ये वावरायला पुरेशी जागा असते, तेव्हा व्यक्ती कशावर तरी जाऊन धडपडत नाही, ती आत प्रवेश करते, खोलवर जाते आणि तिला सारे काही समजून येते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 220-221)