Tag Archive for: रूपांतरण

साधना, योग आणि रूपांतरण – २७६

शरीराचे रूपांतरण

शारीर-साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो.
१) जडभौतिकाच्या जडत्वापासून, आणि शारीर-मनाच्या (physical mind) शंकाकुशंकांपासून, मर्यादांपासून, त्याच्या बहिर्मुख प्रवृत्तीपासून सुटका करून घेणे.
२) प्राणिक-शारीर (vital physical) नसांच्या सदोष ऊर्जांपासून सुटका करून घेणे, आणि त्याच्या जागी खरी चेतना तेथे आणणे.
३) शारीर-चेतना (physical consciousness) ही ‘ईश्वरी संकल्पा’चे परिपूर्ण साधन व्हावे म्हणून, ऊर्ध्वस्थित असणारा उच्चतर प्रकाश, शक्ती, शांती आणि आनंद त्या चेतनेमध्ये उतरविणे.

*

शारीर-चेतना ही संतुलित व्हावी लागते, ती ऊर्ध्वस्थित असणाऱ्या प्रकाशाने आणि शक्तीने भरून जाणे आवश्यक असते आणि सचेत व प्रतिसादक्षम होणे आवश्यक असते. या साऱ्या गोष्टी एका दिवसात होणे शक्य नसते. त्यामुळे, नाउमेद व अधीर न होता, स्थिरपणाने वाटचाल करत राहा.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 367-368, 371)

साधना, योग आणि रूपांतरण – २७५

शरीराचे रूपांतरण

शारीर-चेतनेचे परिवर्तन करण्यासाठी काही जणांकडून अतिरेक केला जातो. परंतु त्याचा काही उपयोग होत असेल यावर माझा विश्वास नाही. शारीर-चेतना ही एक मोठी हटवादी अडचण असते यात काही शंका नाही, परंतु ती शारीर-चेतना प्रकाशित केली पाहिजे, तिचे मतपरिवर्तन केले पाहिजे, तिचे परिवर्तन व्हावे म्हणून (प्रसंगी) तिच्यावर दबाव टाकण्यासही हरकत नाही, पण तिचे दमन करता कामा नये किंवा तिचे परिवर्तन व्हावे यासाठी कोणताही अतिरेकी मार्गदेखील अवलंबता कामा नये. (परिवर्तनासाठी) मन, प्राण आणि शरीराबाबत लोकं अतिरेक करतात कारण ते उतावीळ झालेले असतात. परंतु याबाबतीत माझ्या नेहमीच असे निदर्शनास आले आहे की, त्यामधून अधिक विरोधी प्रतिक्रिया आणि अधिक अडथळे निर्माण होतात आणि त्यातून खऱ्या अर्थाने प्रगती होत नाही.

*

एकदा का तुम्हाला ‘ईश्वरी शक्ती’चा संपर्क प्राप्त झाला की, त्या शक्तीप्रत खुले होण्यावर लक्ष केंद्रित करा. तिच्या विरुद्ध असणाऱ्या शारीर-चेतनेच्या सूचनांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या बाह्यवर्ती, शारीर-चेतनेशी स्वतःला अभिन्न मानता, – खरंतर, तो तुमच्या आत्म्याचा केवळ एक छोटासा बहिर्वर्ती भाग असतो, – परंतु तुम्ही त्याच्याशी स्वतःला अभिन्न मानल्यामुळे सगळी अडचण येत आहे. तुम्ही तुमच्या उर्वरित अस्तित्वामध्ये, म्हणजे जे अधिक खरे, अधिक अंतर्मुख आहे, जे ‘सत्या’प्रत खुले आहे अशा अस्तित्वामध्ये राहण्यास शिकले पाहिजे. तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमची शारीर-चेतना ही एक बाह्य गोष्ट आहे, आणि तिच्यावर खऱ्या चेतनेच्या माध्यमाद्वारे कार्य करता येणे आणि तिच्यामध्ये ‘दिव्य शक्ती’द्वारे परिवर्तन घडविता येणे शक्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 371, 370)

साधना, योग आणि रूपांतरण – २७३

शरीराचे रूपांतरण

हट्टीपणा हा शारीर-मनाचा (physical mind) स्वभावधर्म असतो. एकाच गोष्टीची सातत्याने पुनरावृत्ती करत राहण्यामुळे ही शारीर-प्रकृती टिकून राहते. एवढेच की, त्या गोष्टीचे विविध रूपांद्वारे सातत्याने सादरीकरण, प्रस्तुती होत राहते. जेव्हा शारीर-प्रकृती कार्यरत असते तेव्हा, ही हटवादी पुनरावृत्ती हा तिच्या प्रकृतीचा एक भाग असतो, पण ती जेव्हा कार्यरत नसते तेव्हा ती सुस्त, जड असते. आणि म्हणून जेव्हा आपल्याला शारीर-प्रकृतीच्या जुन्या वृत्तीप्रवृत्तींपासून सुटका करून घ्यायची असते तेव्हा त्या प्रवृत्ती अशा प्रकारच्या हटवादी पुनरावृत्तीने प्रतिकार करतात. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी व्यक्तीने नकार देण्याच्या बाबतीत खूप चिकाटी बाळगली पाहिजे.

सर्व प्रकारच्या ‘प्रकृती’ प्रमाणे शारीर-‘प्रकृती’चेही व्यक्तिगत आणि वैश्विक असे दोन पैलू असतात. व्यक्तीमध्ये सर्व गोष्टी वैश्विक प्रकृतीकडून येतात. परंतु व्यक्तिगत शारीर-प्रकृती त्यांच्यापैकी काही गोष्टींचेच जतन करते व इतर गोष्टी नाकारते आणि ती ज्या गोष्टी जतन करून ठेवते त्यांना ती वैयक्तिक रूप देते… परंतु व्यक्तीला जेव्हा त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घ्यायची असते तेव्हा व्यक्ती अंतरंगामध्ये (साचलेले) जे काही असते ते आधी सभोवतालच्या ‘प्रकृती’ मध्ये फेकून देते. आणि तेथून मग वैश्विक ‘प्रकृती’ त्या गोष्टी परत आत आणण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांच्या जागी तिच्या स्वतःच्या अशा काही नवीन किंवा तत्सम गोष्टी आणते. व्यक्तीला या आक्रमणास सातत्याने थोपवून धरावे लागते, नकार द्यावा लागतो. सतत दिलेल्या नकारामुळे, सरतेशेवटी पुनरावृत्तीची शक्ती क्षीण होते आणि मग व्यक्ती मुक्त होते आणि उच्चतर चेतना व तिच्या गतिप्रवृत्ती शारीरिक अस्तित्वामध्ये उतरवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 361)

साधना, योग आणि रूपांतरण – २७२

शरीराचे रूपांतरण

व्यक्तीला जेव्हा भौतिक जीवनामध्ये काही परिवर्तन करण्याची इच्छा असते, म्हणजे तिला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल करायचा असो किंवा स्वतःच्या अवयवांच्या कार्यपद्धतीमध्ये किंवा सवयींमध्ये बदल करायचा असो, व्यक्तीकडे अविचल अशी चिकाटी असणे आवश्यक असते. अमुक एखादी गोष्ट तुम्ही पहिल्यांदा ज्या उत्कटतेने केली होती त्याच तीव्रतेने तीच गोष्ट शंभर वेळा पुन्हा पुन्हा सुरू करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आणि ती गोष्ट यापूर्वी तुम्ही जणू कधी केलेलीच नव्हती अशा प्रकारे ती पुन्हा पुन्हा करत राहण्याची तयारी ठेवली पाहिजे. जी माणसं लवकर अस्वस्थ, विचलित होतात त्यांना हे जमत नाही. परंतु तुम्हाला जर हे करता आले नाही तर तुम्ही योगसाधना करू शकणार नाही. किमान ‘पूर्णयोग’ तर नाहीच नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये परिवर्तन करता येणार नाही.

व्यक्तीला स्वतःच्या शरीरामध्ये परिवर्तन करायचे असेल तर तीच तीच गोष्ट लाखो वेळा करता आली पाहिजे, कारण शरीर हे सवयी आणि नित्यक्रमाच्या (routine) कृतींनी बनलेले असते आणि हा नित्यक्रम नाहीसा करायचा असेल तर त्यासाठी अनेक वर्षे चिकाटी बाळगावी लागते.

– श्रीमाताजी (CWM 07 : 104)

साधना, योग आणि रूपांतरण – २७१

शरीराचे रूपांतरण

शारीर-चेतना (physical consciousness) ही नेहमीच तिच्या अज्ञानासहित येत असते. आणि ही चेतना मूढ आणि अंधकारयुक्त असते. म्हणजे ज्यांचे विचारी मन सुबुद्ध असते किंवा किमान थोडेतरी बुद्धिमान असते अशा व्यक्तींमध्येदेखील ही चेतना अशीच असते. वरून येणाऱ्या ‘दिव्य प्रकाशा’द्वारेच ती चेतना प्रकाशित होऊ शकते. अधिकाधिक प्रमाणात हा प्रकाश घेऊन येणाऱ्या ‘दिव्य शांती’मध्ये आणि ‘दिव्य शक्ती’ मध्येच तुम्ही आश्रय घेतला पाहिजे.

*

शारीर-चेतनेमध्ये (अभीप्सेचा) अग्नी तेवत ठेवणे अवघड असते. या शारीर चेतनेला सातत्याने नित्यक्रमाचे (routine) पालन करणे सोपे असते पण तिला नित्य सक्रिय प्रयत्नांचे जतन करणे तितके सोपे नसते. असे असले तरीदेखील, कालांतराने तिची या गोष्टीसाठीसुद्धा तयारी करून घेता येते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 369, 369)

साधना, योग आणि रूपांतरण – २७०

शरीराचे रूपांतरण

अविचलतापूर्वक चिकाटी बाळगा आणि कशामुळेही नाउमेद होऊ नका. आत्ता जरी (तुमच्यामध्ये) अविचलता आणि उल्हसितपणा या गोष्टी सातत्याने टिकून राहत नसल्या तरी तशा त्या टिकून राहणे अपेक्षित आहे. जेव्हा शारीर-चेतना (physical consciousness) आणि तिच्यामधील अडथळ्यांवर कार्य चालू असते तेव्हा सुरुवातीला नेहमीच हे असे होत असते. तुम्ही जर चिकाटीने प्रयत्न करत राहिलात तर अविचलता आणि उल्हसितपणा या गोष्टी तुमच्यामध्ये – जोपर्यंत शांती आणि आनंदाचा पाया तयार होत नाही तोपर्यंत – वारंवार येऊ लागतील आणि त्या अधिक काळासाठी टिकून राहू शकतील. आणि पृष्ठभागावर ज्या कोणत्या अडचणी, अडथळे येतील ते आता आतपर्यंत जाऊ शकणार नाहीत किंवा तुमचा (शांती आणि आनंदाचा) हा पाया डळमळीत करू शकणार नाहीत किंवा त्यास त्या एखाद्या क्षणाचा अपवाद वगळता, झाकोळूनदेखील टाकू शकणार नाहीत.

मनोवस्थेमध्ये (mood) सातत्याने बदल होत राहणे हीसुद्धा सार्वत्रिक आढळणारी गोष्ट आहे. कारण शारीर-चेतनेप्रमाणेच सध्या शारीर-प्राणावरसुद्धा (physical-vital) कार्य चालू आहे आणि ही अस्थिरता हा शारीर-प्राणाच्या प्रकृतीचा एक गुणधर्म आहे. परंतु त्यामुळे तुम्ही निराश होऊ नका. जेव्हा हा पाया अधिक भरभक्कम होईल तेवढ्या प्रमाणात ती अस्थिरता क्षीण होत जाईल आणि प्राण अधिक स्थायी व समतोल होत जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 370-371)

साधना, योग आणि रूपांतरण – २६९

शरीराचे रूपांतरण

(श्रीअरविंद एका साधकाला लिहीत आहेत…)

तुम्ही स्वतःला पूर्णपणे बाह्यवर्ती शारीर-चेतनेमध्ये (physical consciousness) ठेवले आहे. आणि फक्त बाह्यवर्ती गोष्टी तेवढ्याच खऱ्या असतात आणि आध्यात्मिक व आंतरिक सर्व गोष्टी खऱ्या नसतात असे म्हणत, आणि आपण अपात्र आहोत या सबबीखाली स्वतःला खुले करण्यास ती शारीर-चेतना नकार देत आहे. तुम्ही जर तिचे म्हणणे मनावर घेऊ लागलात तर ती नेहमीच असे करत असते. परंतु अपात्रतेची ही सबब खरी नाही आणि दुसरी सबब देखील खरी नाही. जेव्हा तुम्ही आंतरिक, आध्यात्मिक चेतनेला खुले होता तेव्हा बाह्यवर्ती किंवा शारीरिक चेतनेसाररखीच आंतरिक, आध्यात्मिक चेतना हीदेखील तुमच्यासाठी संपूर्णपणे वास्तव आणि खरी असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 370)

साधना, योग आणि रूपांतरण – २६८

(कालपर्यंत आपण मनाचे आणि प्राणाचे रूपांतरण समजावून घेतले. आजपासून आता शरीराच्या रूपांतरणाबद्दलचे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे विचार जाणून घेऊ या.)

शरीराचे रूपांतरण

तुम्हाला प्राणिक इच्छावासनांपासून मुक्त होण्यामध्ये खूप अडचण जाणवत आहे कारण आता साधना थेटपणे जडभौतिक, शारीरिक स्तरावर (physical plane) सुरू झाली आहे. येथे एखादी सवय जडली असेल किंवा एखादी गोष्ट सवयीची झाली असेल तर तिची ताकद खूप जास्त असते.

जेव्हा साधना मानसिक किंवा प्राणिक स्तरावर चालू असते तेव्हा प्राणिक इच्छावासनांवर नियंत्रण मिळविणे किंवा त्यामध्ये परिवर्तन घडविणे अधिक सोपे असते कारण शरीराच्या तुलनेत मन आणि प्राण हे अधिक घडणसुलभ (plastic) असतात.

परंतु दुसऱ्या बाजूने असेही म्हणता येते की, जडभौतिकाच्या, शरीराच्या स्तरावर जर एखादी गोष्ट निश्चितपणे प्राप्त झाली असेल तर ती सिद्धी केवळ मानसिक किंवा केवळ प्राणिक स्तरावरील सिद्धीपेक्षा अधिक टिकाऊ आणि संपूर्ण असते.

*

शरीर आणि अवचेतनेमध्ये (subconscient) जेव्हा कार्य चालू असते तेव्हा ते कार्य मनामध्ये आणि प्राणामध्ये चालू असलेल्या कार्यापेक्षा नेहमीच अधिक संथ असते. कारण जडभौतिक द्रव्याकडून होणारा प्रतिकार हा नेहमीच अधिक जड, आणि निर्बुद्ध आणि कमी समायोजनक्षम (adaptable) असतो. परंतु जणूकाही त्याची भरपाई म्हणून, या संथ प्रक्रियेद्वारे व्यक्तीमध्ये जे कार्य केले जाते ते सरतेशेवटी अधिक संपूर्ण, अधिक सघन आणि अधिक टिकाऊ असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 365, 365-366)

साधना, योग आणि रूपांतरण – २६७

प्राणाचे रूपांतरण

कृती ‘ईश्वरा’र्पण करणे आणि ते करताना त्यामध्ये जी प्राणिक अडचण उद्भवते त्याविषयी सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, ही अडचण टाळणे शक्य नसते. तुम्हाला त्यामधून जावेच लागेल आणि त्यावर विजय मिळवावा लागेल. कारण ज्या क्षणी तुम्ही प्रयत्न करू लागता त्याक्षणी, या परिवर्तनाला विरोध करण्यासाठी, प्राण त्याच्या सर्व अस्वस्थ अपूर्णतांसह उभा ठाकतो. असे असले तरी, त्या अडचणीची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा ती अडचण कमी करण्यासाठी तीन उपाय तुम्ही करू शकता –

१) या प्राणिक-शारीरिक स्तरापासून तुम्ही स्वतःला अलिप्त करा. ‘तो स्तर म्हणजे तुम्ही नाही’ या भूमिकेतून तुम्ही त्याचे निरीक्षण करा, त्याला नकार द्या. त्याच्या मागण्यांना, त्याच्या भावावेगांना संमती देण्यास नकार द्या, परंतु जो नकार द्याल तो साक्षी ‘पुरुष’ या भूमिकेतून शांतपणे द्या की ज्याच्या नकाराचा अंतिमतः विजय होणेच आवश्यक आहे. तुम्ही जर आधीपासूनच निर्व्यक्तिक, निर्गुण ‘आत्म्या’मध्ये (impersonal Self) अधिकाधिक राहायला शिकला असाल तर, स्वत:ला अलिप्त करणे तुम्हाला कठीण जाण्याचे काहीच कारण नाही.

२) जेव्हा तुम्ही या निर्व्यक्तिकतेमध्ये नसाल, तेव्हाही तुमची मानसिक इच्छाशक्ती आणि तिची संमती किंवा नकार देण्याची शक्ती उपयोगात आणा. हे करताना कोणताही वेदनादायी संघर्ष नको तर अगदी त्याच पद्धतीने, शांतपणे, इच्छावासनांच्या मागण्यांना नकार द्या. जोपर्यंत अनुमती किंवा संमती न मिळाल्यामुळे या मागण्यांची पुन्हा पुन्हा डोकं वर काढण्याची शक्ती शमत नाही आणि ती शक्ती अधिकाधिक क्षीण होत नाही आणि बाहेर पडत नाही, तोपर्यंत मानसिक इच्छाशक्तीचा उपयोग करत राहा.

३) तुमच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या किंवा तुमच्या हृदयांतरी असणाऱ्या ‘ईश्वरा’विषयी तुम्ही जर सजग झालात तर तेथूनच, त्याच्या साहाय्यासाठी त्याला आवाहन करा, स्वयमेव त्या प्राणामध्येच परिवर्तन व्हावे म्हणून प्रकाशाला आणि शक्तीला आवाहन करा. आणि जोपर्यंत तो प्राण स्वतःहून या परिवर्तनासाठी प्रार्थना करायला शिकत नाही तोपर्यंत त्या प्राणाला आग्रहपूर्वक सांगत राहा.

शेवटी, ‘ईश्वरा’बद्दल असलेल्या तुमच्या अभीप्सेच्या प्रामाणिकतेद्वारे आणि तुमच्या समर्पणामुळे, तुमच्या हृदयामध्ये गुप्त असलेला ‘चैत्य पुरुष’ (psychic being) तुम्ही जागृत करू शकलात तर त्यामुळे तो अग्रभागी येईल आणि कायम तेथेच राहील. आणि, तो मन, प्राण आणि शारीरिक चेतनेच्या सर्व गतिविधींवर प्रभाव टाकेल आणि तत्क्षणी तुमच्या अडचणी अगदी कमी होऊन जातील. त्यानंतरसुद्धा रूपांतरणाचे कार्य करावेच लागणार आहे, परंतु त्या क्षणानंतर मात्र ते कार्य तितकेसे कठीण आणि कष्टदायक असणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 113-114)

साधना, योग आणि रूपांतरण – २६६

प्राणाचे रूपांतरण

संपूर्ण प्राणिक प्रकृतीचे शुद्धीकरण व्हावे आणि सर्व अहंभावात्मक इच्छावासना व आवेग नाहीसे होऊन, ‘ईश्वरी संकल्पा’शी सुसंगत असतील तेवढ्याच शुद्ध, सात्त्विक वृत्तीप्रवृत्ती शिल्लक राहाव्यात यासाठी, संपूर्ण प्राणिक प्रकृती आणि तिच्या वृत्तीप्रवृत्ती ‘ईश्वरा’ला अर्पण करणे म्हणजे प्राणाचे स्वाहाकरण (vital consecration) होय.
*
साधक : ‘प्राणाचे स्वाहाकरण’ म्हणजे काय ?
श्रीअरविंद : समग्र प्राणिक प्रकृती ही कनिष्ठ प्रकृतीशी नव्हे तर, श्रीमाताजींशी संबंधित व्हावी यासाठी, समग्र प्राणिक प्रकृती श्रीमाताजींना समर्पित करणे आणि ती शुद्ध बनविणे, म्हणजे ‘प्राणाचे स्वाहाकरण’.
*
तुम्हाला ज्या मुक्तीची आस लागली आहे ती साधकासाठी खरोखरच अत्यंत आवश्यक असते. आणि याचा अर्थ, प्रकृतीच्या समग्र प्राणिक भागाच्या मुक्तीची आस असा आहे. मात्र ही गोष्ट एकाएकी किंवा इतक्या सहजतेने करता येणे शक्य नसते. तुमची तळमळ ही सातत्यपूर्ण, धीरयुक्त आणि चिकाटीची असली पाहिजे, (ती तशी असेल तरच) अंतिमतः तिचा विजय होईल. वरून उच्चतर स्थिरता आणि शांती आपल्या प्रणालीमध्ये (system) खाली अवतरावी म्हणून तिला आवाहन करणे ही मुख्य गोष्ट असते; ती अवतरित होत आहे अशी जाणीव जर तुम्हाला होत असेल तर तो मुक्तीचा आरंभ असतो.
*
खरी चेतना तुमच्या प्राणामध्ये अवतरित होत होती, परंतु तुमच्या शरीरामध्ये पुन्हा एकदा जुनीच अडचण उफाळून आली आहे, पुन्हा एकदा प्राणिक हल्ला झालेला आहे. जेव्हा तुमचा प्राण अशांत, विचलित न होता, किंवा आक्रंदन न करता, सदोदित या हल्ल्याला सामोरा जाऊ शकेल आणि तुमच्या अंतरंगात स्थिरशांत असणारी प्रतिकार व अस्वीकार करणारी शक्ती जेव्हा दूर लोटून तिचा प्रतिबंध करेल, तेव्हा ती संपूर्ण मुक्तीची खूण असेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 113, 313), (CWSA 31 : 111, 111 )