Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १९५

उत्तरार्ध

मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांनी मनुष्यत्वाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मनोमय जीव, अन्य शक्तीच्या साहाय्याविना, स्वत:च्या शक्तीद्वारे स्वतःचे अतिमानसिक चैतन्यामध्ये परिवर्तन करू शकत नाही. मानवी धारकपात्राचे (receptacle) दैवीकरण केवळ ‘दिव्य प्रकृती’च्या अवतरणामुळेच होऊ शकते.

कारण आपल्या मन, प्राण आणि शरीर या गोष्टी त्यांच्या स्वत:च्या मर्यादांनी बांधल्या गेलेल्या असतात आणि त्या कितीही उन्नत झाल्या किंवा कितीही विस्तृत झाल्या तरीही त्या त्यांच्या प्राकृतिक सीमा ओलांडून वर जाऊ शकत नाहीत किंवा त्या सीमांच्या पलीकडे त्या विस्तारित देखील होऊ शकत नाहीत. परंतु असे असूनसुद्धा, मनोमय मनुष्य स्वतःच्या पलीकडे असणाऱ्या अतिमानसिक ‘प्रकाश’, ‘सत्य’ आणि ‘शक्ती’ यांच्याप्रत उन्मुख होऊ शकतो. आणि त्यांनी आपल्यामध्ये कार्य करावे आणि मन जे करू शकणार नाही ते त्यांनी करावे यासाठी तो त्यांना आवाहन करू शकतो. मन जरी स्वप्रयत्नाने, मनाच्या अतीत जे आहे ते होऊ शकत नसले तरी, अतिमानस अवतरित होऊन, मनाचे स्वत:च्या द्रव्यामध्ये रूपांतरण घडवू शकते.

मनुष्याने आपल्या विवेकशील सहमतीने आणि जागरूक समर्पणाने, अतिमानसिक ‘शक्ती’ला जर तिच्या स्वतःच्या गहन व सूक्ष्म अंतदृष्टीनुसार आणि लवचीक अंतःशक्तीनुसार कार्य करण्यास मुभा दिली तर, ती अतिमानसिक ‘शक्ती’, संथपणाने किंवा वेगाने, आपल्या सद्यकालीन अर्ध-परिपूर्ण प्रकृतीचे दिव्य ‘रूपांतरण’ घडवून आणेल.

या अवतरणामध्ये, या कार्यामध्ये धोका होण्याची आणि आपत्तीजनक पतन होण्याची शक्यता असते. अवतरित होणाऱ्या शक्तीचा जर मानवी मनाने किंवा प्राणिक इच्छेने ताबा घेतला आणि स्वतःच्या संकुचित व चुकीच्या कल्पनांनी किंवा सदोष व अहंकारी आवेगांनी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, (आणि हे काही प्रमाणात अटळसुद्धा असते;) तर जोपर्यंत कनिष्ठ मर्त्य प्रकृती ही महत्तर अशा अमर्त्य प्रकृतीच्या मार्गापैकी थोडाफार भाग तरी आत्मसात करत नाही, तोपर्यंत धडपडणे, किंवा विचलित होणे, कठीण आणि वरकरणी पाहता, दुर्लंघ्य वाटणारे अडथळे येणे, आघात होणे, दुःखभोग सहन करावे लागणे यांपासून सुटका नसते; एवढेच नव्हे तर संपूर्ण पतन होणे किंवा मृत्युमुखी पडणे याचीदेखील शक्यता असते. जेव्हा मन, प्राण आणि शरीर ‘ईश्वरा’प्रत जाणीवपूर्वक समर्पित व्हायला शिकतात, तेव्हाच फक्त ‘योगमार्ग’ सोपा, सरळ, जलद आणि सुरक्षित बनू शकतो.

आणि हे समर्पण आणि उन्मुखता ही फक्त ‘ईश्वरा’प्रतच असली पाहिजे, ती अन्य कोणाप्रत असता कामा नये. कारण आपले अंधकारमय मन आणि आपल्यामधील अशुद्ध प्राणशक्ती या गोष्टी, अ-दैवी आणि विरोधी शक्तींना समर्पित होण्याची शक्यता असते. एवढेच काय, पण चुकून त्या विरोधी शक्तींनाच ते ‘दैवी शक्ती’ समजण्याचीदेखील शक्यता असते. अन्य कोणतीच चूक याच्या इतकी घातक असू शकणार नाही. त्यामुळे आपले समर्पण हे अंध असता कामा नये, तसेच ते कोणत्याही प्रभावाप्रत किंवा सर्वच प्रभावांप्रत जडसुस्त निष्क्रियतेने शरणागती पत्करत आहे असेही असता कामा नये; तर ते समर्पण प्रामाणिक, सचेत, दक्ष आणि त्या एकमेवाद्वितीय आणि सर्वोच्चाप्रति एकनिष्ठ असले पाहिजे.

कितीही कठीण असले तरीही, ईश्वराप्रत आणि ‘दिव्य माते’प्रत आत्म-समर्पण, हेच आपले एकमात्र प्रभावशाली साधन असले पाहिजे आणि तेच आपले एकमेव कायमसाठीचे आश्रयस्थान असले पाहिजे. दिव्य मातेप्रति आत्मसमर्पण याचा अर्थ असा की, आपली प्रकृती तिच्या हातामधील एक साधन झाले पाहिजे, आणि आपला आत्मा हा त्या दिव्य मातेच्या कुशीमधील बालक झाले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 170-171)

साधना, योग आणि रूपांतरण – १८३

(श्रीअरविंद येथे पारंपरिक योग व पूर्णयोग यातील फरक स्पष्ट करत आहेत.)

प्राचीन योगांच्या तुलनेत पूर्णयोग पुढील बाबतीत नावीन्यपूर्ण आहे.

१) जगापासून किंवा जीवनापासून निवृत्त होऊन स्वर्ग, निर्वाण यांच्याकडे प्रयाण करणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. उलट, हा योग जीवनामध्ये आणि अस्तित्वामध्ये परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. ते उद्दिष्ट गौण आणि अनुषंगिक आहे, असे पूर्णयोग मानत नाही तर तो त्यास वैशिष्ट्यपूर्ण आणि केंद्रवर्ती उद्दिष्ट मानतो.

अन्य योगांमध्ये ‘अवतरण’ (descent) असलेच तर, आरोहणाच्या (ascent) मार्गावरील एक घटना म्हणून किंवा आरोहणाचा परिणाम म्हणून ते घडून आलेले असते. अन्य योगांमध्ये ‘आरोहण’ हीच सत्य गोष्ट असते. पूर्णयोगात आरोहण हे अनिवार्य आहे परंतु त्याचा परिणाम म्हणून घडून येणारे ‘अवतरण’ हीच गोष्ट येथे निर्णायक असते आणि अवतरण हेच येथे आरोहणाचे अंतिम उद्दिष्ट मानण्यात आलेले आहे. आरोहणाद्वारे नवीन चेतनेचे अवतरण घडून येणे ही या साधनेनी उमटवलेली मोहोर आहे. ‘तंत्रयोग’ आणि ‘वैष्णव’ या संप्रदायांची परिसमाप्तीसुद्धा जीवनापासून सुटका करून घेण्यामध्ये होते; तर ‘जीवनाची दिव्य परिपूर्ती’ हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे.

(२) व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेऊन, व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी, हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ पारलौकिक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेदेखील येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक चेतनेची (supramental consciousness) शक्ती येथे आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

(३) चेतनेचे आणि प्रकृतीचे संपूर्ण व समग्र परिवर्तन हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे. ते जेवढे संपूर्ण व समग्र आहे तेवढीच त्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्वनिर्धारित करण्यात आलेली साधनापद्धतीदेखील तितकीच संपूर्ण व समग्र आहे. पूर्णयोगामध्ये जुन्या पद्धतींचा स्वीकार हा केवळ एक आंशिक क्रिया म्हणूनच केला जातो आणि त्या जुन्या साधनापद्धती त्याहूनही अधिक वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या साधनापद्धतींपर्यंत नेण्यात येतात.

अशी पद्धती पूर्णतः किंवा तिच्यासारखे काही, पूर्वीच्या योगांमध्ये समग्रतया प्रस्तावित केले आहे किंवा अशी काही पद्धती पूर्वीच्या योगांमध्ये अंमलात आणली गेली आहे असे, मला आढळले नाही. मला जर तशी पद्धती आढळली असती तर, मी हा (पूर्णयोगाचा) मार्ग निर्माण करण्यामध्ये माझा वेळ व्यर्थ दवडला नसता. जर हा मार्ग अगोदरच अस्तित्वात असता, निर्धारित करण्यात आलेला असता, अगोदरच त्याचा आराखडा पूर्णतः रेखाटलेला असता, तो चांगला उजळलेला असता, सुरक्षित आणि सर्वांसाठी खुला करण्यात आलेला असता तर मी सुखाने मार्गस्थ होऊन, माझ्या उद्दिष्ट-धामापर्यंत सुरक्षितपणे, त्वरेने पोहोचलो असतो. या शोधामध्ये आणि आंतरिक निर्मितीमध्ये मला तीस वर्षे खर्च करावी लागली नसती. जुन्याच मार्गांवरून पुन्हा एकवार वाटचाल हे आमच्या योगाचे स्वरूप नाही तर आमचा योग म्हणजे एक ‘आध्यात्मिक साहस’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 400 – 401)

साधना, योग आणि रूपांतरण – १८२

आपल्या समग्र अस्तित्वाने सर्वथा आणि त्याच्या सर्व घटकांसहित, ‘दिव्य ब्रह्मा’च्या (Divine Reality) समग्र चेतनेमध्ये प्रविष्ट होणे आणि आपल्या वर्तमान अज्ञानमय आणि मर्यादित प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविणे, हीच आपल्या अस्तित्वाची संपूर्ण परिपूर्ती आहे आणि हाच ‘पूर्णयोग’ आहे. तत्त्वत: आपण जे आहोत आणि आपल्या जीवात्म्यामध्ये जे ‘दिव्य ब्रह्म’ आहे त्याचे, आपण साधन व्हावे आणि त्याचे आविष्करण करावे म्हणून हे परिवर्तन आवश्यक असते.

विचारी मनाच्या मार्गाने किंवा हृदयाच्या मार्गाने किंवा कर्मामधील इच्छेच्या मार्गाने किंवा मानसिक प्रकृति-द्रव्याच्या परिवर्तनाद्वारे त्या दिव्यत्वामध्ये प्रविष्ट होणे किंवा देहांतर्गत असलेली प्राण-शक्ती मुक्त करणे, हे पुरेसे नाही; एवढेच पुरेसे नाही. या साऱ्या गोष्टी एकत्रितपणे करून ते परिवर्तन घडविले पाहिजे. आणि खुद्द आपल्या इंद्रियांमधील तसेच शारीर-चेतनेमधील, अगदी जडभौतिक अचेतनापर्यंतच्या परिवर्तनाद्वारे, सर्वकाही त्या ‘ईश्वरा’विषयी सजग आणि त्या ‘ईश्वरा’समवेत दीप्तिमान झालेच पाहिजे.

‘ईश्वरा’शी ऐक्य पावणे, ‘ईश्वरा’मध्ये आणि ‘ईश्वरा’सोबत जगणे, ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी एकत्व पावणे, हे आपल्या योगाचे उद्दिष्ट असले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 356-357)

साधना, योग आणि रूपांतरण – १८१

पूर्णयोगाची साधना दुहेरी असते. चेतनेने अधिक उच्च स्तरांवर आरोहण करणे ही या साधनेची एक बाजू आहे आणि अज्ञान व अंधकार यांच्या ‘शक्तीं’चा निरास करता यावा व प्रकृतीचे रूपांतरण करता यावे यासाठी, उच्चतर स्तरांवरील शक्तीचे पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडविणे ही या साधनेची दुसरी बाजू आहे.

*

पूर्णयोगाच्या साधनेचे सूत्र म्हणून एकमेव मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे एकतर ‘श्रीमाताजीं’चे नाम किंवा ‘श्रीअरविंदां’चे व ‘श्रीमाताजीं’चे नाम! हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तिष्कामध्ये एकाग्रता या दोन्ही पद्धती पूर्णयोगामध्ये उपयोगात आणल्या जाऊ शकतात; त्या प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे असे परिणाम असतात.

हृदयकेंद्रावर एकाग्रता केली असता, चैत्य पुरुष (psychic being) खुला होतो तसेच त्यामुळे भक्ती, प्रेम उदित होते. हृदयकेंद्रावरील एकाग्रतेमुळे हृदयामध्ये श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव होते आणि त्यांच्याशी एकत्व घडून येते; तसेच प्रकृतीमध्ये त्यांच्या ‘शक्ती’चे कार्य घडून येते.

मस्तिष्ककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मनाच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत आणि आत्म-साक्षात्काराप्रत मन खुले होते; तसेच ते देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 416) (CWSA 29 : 326)

साधना, योग आणि रूपांतरण – १८०

श्रीअरविंद-आश्रमामध्ये जो योगमार्ग आचरला जातो त्या पूर्णयोगाचे इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण सर्वसामान्य अज्ञानमय विश्व-चेतनेमधून बाहेर पडून, दिव्य चेतनेमध्ये उन्नत होणे हेच केवळ या योगाचे ध्येय नाही, तर मन, प्राण आणि शरीर यांच्या अज्ञानामध्ये दिव्य चेतनेची अतिमानसिक शक्ती उतरविणे; मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणे; या इहलोकामध्ये ‘ईश्वरा’चे आविष्करण घडविणे आणि ‘जडभौतिका’मध्ये दिव्य जीवन निर्माण करणे, हे पूर्णयोगाचे ध्येय आहे. हे ध्येय अत्यंत कठीण आहे आणि हा योगमार्गही अत्यंत कठीण आहे; बऱ्याच जणांना किंबहुना, बहुतेकांना तर तो अशक्यप्रायच वाटतो.

सर्वसाधारण अज्ञानमय विश्व-चेतनेच्या साऱ्या प्रस्थापित शक्ती या ध्येयाच्या विरोधात असतात आणि त्या शक्ती त्याला नाकारतात आणि त्या शक्ती त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. साधकाला असे आढळून येईल की, त्याच्या स्वतःच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शरीरामध्येच या साक्षात्कारासाठी प्रतिकूल असे सर्वाधिक हट्टी अडथळे ठासून भरलेले आहेत. तुम्ही जर हे ध्येय अगदी अंतःकरणपूर्वक स्वीकारलेत, साऱ्या अडीअडचणींना सामोरे गेलात, भूतकाळ आणि त्याचे सारे बंध तुम्ही मागे टाकून दिलेत, आणि सर्व गोष्टींचा त्याग करण्यास तयार झालात, त्या दिव्य शक्यतेसाठी प्रत्येक जोखीम घेण्यास तयार झालात, तरच तुम्हाला त्या पाठीमागील ‘सत्य’ हे अनुभूतीद्वारे सापडण्याची काही आशा करता येईल.

‘पूर्णयोगा’ची साधना, कोणत्याही ठरावीक साचेबंद मानसिक शिकवणुकीच्याद्वारे किंवा ध्यानधारणेच्या विहित प्रकारांद्वारे किंवा कोणत्याही मंत्रांद्वारे अथवा तत्सम गोष्टींद्वारे प्रगत होत नाही; तर अभीप्सेद्वारे आणि अंतर्मुख व ऊर्ध्वमुख अशा आत्म-एकाग्रतेद्वारे, ईश्वरी शक्तीच्या ‘दिव्य प्रभावा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे, आणि आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शक्ती’प्रत व तिच्या कार्याप्रत स्वतःला उन्मुख केल्यामुळे, तसेच हृदयामध्ये असणाऱ्या ‘दिव्य अस्तित्वा’प्रत स्वतःला खुले केल्यामुळे आणि उपरोक्त सर्व गोष्टींना ज्या ज्या गोष्टी परक्या असतात त्या सर्व गोष्टींना नकार दिल्यामुळे ही साधना प्रगत होत जाते. केवळ श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांद्वारेच ही आत्म-उन्मुखता (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 19-20)

साधना, योग आणि रूपांतरण – १२९

एक क्षण असा येईल की, जेव्हा तुम्ही कर्ते नसून फक्त एक साधन आहात, हे तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागेल. सुरुवातीला तुमच्या भक्तीच्या शक्तीने ‘दिव्य माते’बरोबर असलेला तुमचा संपर्क इतका प्रगाढ होईल की, तिचे मार्गदर्शन मिळावे, तिची थेट आज्ञा किंवा प्रेरणा मिळावी, नेमकी कोणती गोष्ट केली पाहिजे याबाबत खात्रीशीर संकेत मिळावा, ती गोष्ट करण्याचा मार्ग सापडावा आणि त्याचा परिणाम दिसून यावा, म्हणून तुम्ही सदा सर्वकाळ फक्त एकाग्रता करणे आणि सारे काही तिच्या हाती सोपविणे पुरेसे ठरेल. आणि मग कालांतराने तुमच्या हे लक्षात येईल की, दिव्य ‘शक्ती’ आपल्याला केवळ प्रेरणा देते किंवा मार्गदर्शनच करते असे नाही तर ती आपल्या कर्माचा आरंभही करते आणि तीच ते कर्म घडवते देखील! तेव्हा तुम्हाला तुमच्या साऱ्या गतिविधी, हालचाली, कृती या तिच्यापासूनच उगम पावत आहेत, तुमच्या साऱ्या शक्ती या तिच्याच आहेत; तुमचे मन, प्राण, शरीर यांना तिच्या कार्याचे सचेत आणि आनंदी साधन बनले असल्याची, तिच्या लीलेचे माध्यम बनले असल्याची जाणीव होईल; या जडभौतिक विश्वामध्ये आपण तिच्या आविष्करणाचे साचे बनलो आहोत अशी जाणीव तुम्हाला होईल. एकत्वाच्या आणि अवलंबित्वाच्या अवस्थेएवढी दुसरी कोणतीही आनंदी अवस्था असू शकत नाही; कारण ही पायरी तुम्हाला तुमच्या अज्ञानजन्य दुःखपूर्ण व तणावपूर्ण जीवनाच्या सीमारेषेच्या पलीकडे, तुमच्या आध्यात्मिक अस्तित्वाच्या सत्यामध्ये, सखोल शांतीमध्ये आणि त्याच्या उत्कट आनंदामध्ये घेऊन जाते.

हे रूपांतरण होत असताना, अहंकारात्मक विकृतीच्या सर्व कलंकापासून तुम्ही स्वतःला अ-बाधित ठेवण्याची नेहमीपेक्षाही अधिक आवश्यकता असते. तसेच आत्म-दानाच्या आणि त्यागाच्या शुद्धतेला कलंक लागेल अशी कोणतीही मागणी वा कोणताही आग्रहदेखील तुम्ही धरता कामा नये. कर्म किंवा त्याचे फळ यासंबंधी कोणतीही आसक्ती तुमच्यामध्ये असता कामा नये, तुम्ही कोणत्याही अटी त्या दिव्य शक्तीवर लादता कामा नयेत. मी त्या दिव्य शक्तीचे साधन बनलो आहे असा कोणताही ताठा, घमेंड किंवा अहंकार तुम्हाला असता कामा नये. त्या दिव्य शक्तींचा वापर तुमच्या मनाच्या, प्राणाच्या किंवा शरीराच्या वैयक्तिक समाधानासाठी किंवा वापरासाठी करून, तुमच्या माध्यमाद्वारे कार्यरत असणाऱ्या त्या शक्तींची महानता तुम्ही विकृत करता कामा नये. तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा, तुमच्या अभीप्सेची शुद्धता तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या स्तरांना, साऱ्या प्रतलांना व्यापणारी असली पाहिजे, ती निरपेक्ष असली पाहिजे; तेव्हा मग अस्वस्थ करणारा प्रत्येक घटक, विकृत करणारा प्रत्येक प्रभाव तुमच्या प्रकृतीमधून एकेक करून निघून जाईल. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 12-13)

साधना, योग आणि रूपांतरण – १०२

चेतना ‘ईश्वरा’प्रत खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट असते. ध्यान किंवा निदिध्यासन हा एक साधन आहे मात्र केवळ एक साधन, भक्ती हे दुसरे एक साधन आहे, तर कर्म हे आणखी एक साधन आहे. साक्षात्काराच्या दिशेने अवलंबण्यात आलेले पहिले साधन म्हणून योग्यांकडून ‘चित्तशुद्धीची साधना’ केली जात असे आणि त्यातून त्यांना संतांच्या संतत्वाची आणि ऋषीमुनींच्या निश्चलतेची, अचंचलतेची प्राप्ती होत असे. पण आम्ही प्रकृतीच्या ज्या रूपांतरणाविषयी सांगतो, ते यापेक्षाही काहीतरी अधिक आहे; आणि हे रूपांतरण केवळ निदिध्यासनाने (contemplation) साध्य होत नाही, त्यासाठी कर्म आवश्यक असते, कर्मामधील योग अनिवार्य असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 208)

साधना, योग आणि रूपांतरण – ९०

तुम्ही बाह्यवर्ती व्यक्तित्वाबद्दल जे म्हणत आहात ते योग्य आहे. तुमच्या आंतरिक प्रकृतीच्या अंतरंगामध्ये जे आहे तेच तुमच्या बाह्य व्यक्तित्वाद्वारे आविष्कृत झाले पाहिजे आणि (त्यानुसार) त्याच्यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. परंतु त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या आंतरिक प्रकृतीचे अनुभव आले पाहिजेत आणि मग, त्यांच्याद्वारे आंतरिक प्रकृतीची शक्ती वृद्धिंगत होते. आंतरिक प्रकृती बाह्यवर्ती व्यक्तित्वावर पूर्णतः प्रभाव टाकू शकेल आणि त्याचा ताबा घेऊ शकेल, अशी स्थिती येईपर्यंत ती वृद्धिंगत होत राहते. आंतरिक चेतना विकसित न होताच, बाह्यवर्ती चेतनेमध्ये पूर्णतः परिवर्तन घडविणे हे खूपच अवघड असते. आणि म्हणूनच हे आंतरिक अनुभव आंतरिक चेतनेच्या विकसनाची तयारी करत राहतात.

(आपल्यामध्ये) एक आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शारीर-चेतना असते; ती बाह्यवर्ती चेतनेपेक्षा अधिक सहजतेने ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर चेतनेचे ग्रहण करू शकते तसेच ती स्वतःला चैत्य पुरुषाशी सुसंवादी करू शकते. असे घडून येते तेव्हा बाह्यवर्ती प्रकृती म्हणजे आपण स्वतः नसून, ती पृष्ठभागावरील केवळ एक किनार आहे असे तुम्हाला जाणवू लागते आणि मग बाह्यवर्ती प्रकृतीचे संपूर्णपणे रूपांतरण करणे अधिक सोपे होते. बाह्यवर्ती प्रकृतीमध्ये कितीही अडचणी असल्या तरीही त्यामुळे ज्या तथ्याला बाधा येऊ शकत नाही, ते तथ्य असे की, तुम्ही आता अंतरंगामध्ये जागृत झाला आहात, श्रीमाताजींची शक्ती तुमच्यामध्ये कार्य करत आहे आणि तुम्ही त्यांचे खरे बालक असल्याने, तुम्ही सर्व प्रकारे त्यांचे परिपूर्ण बालक होऊन राहणार आहात हे निश्चित आहे. तुम्ही तुमचे विचार आणि तुमची श्रद्धा समग्रतया श्रीमाताजींवर एकाग्र करा म्हणजे मग तुम्ही साऱ्यातून सुरक्षितपणे पार होऊ शकाल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 211)

साधना, योग आणि रूपांतरण – ८६

(रूपांतरण करू इच्छिणाऱ्या साधकासाठी आपल्या आंतरिक प्रांतांविषयी सजग होणे कसे महत्त्वाचे असते हे आपण कालच्या भागात पाहिले.)

तुम्ही जर तुमच्या बाह्य ‘स्व’ शीच जखडून राहिलात, तुमच्या शारीर-मनाशी आणि त्याच्या क्षुल्लक हालचालींशी स्वतःला बांधून ठेवलेत, तर तुमची अभीप्सा कधीच प्रत्यक्षात उतरू शकणार नाही. बाह्य अस्तित्व हे आध्यात्मिक प्रेरणेचा स्रोत नसते, तर ते केवळ पडद्याआडून, अंतरंगामधून आलेल्या प्रेरणांचे अनुसरण करत असते. तुमच्यामधील आंतरिक चैत्य पुरुष हा भक्त आहे, तो आनंदाचा आणि (ईश्वराच्या) सायुज्याचा शोध घेत आहे. बाह्य प्रकृती जशी आहे तशीच तिला सोडून दिली तर ती जे कधीच करू शकली नसती ते परिपूर्णतेने करणे तिला, तो अडथळा मोडून पडल्यावर आणि अंतरात्मा अग्रस्थानी आल्यावर शक्य होते. कारण ज्या क्षणी अंतरात्मा प्रभावीपणे अग्रस्थानी येतो किंवा तो जेव्हा चेतना स्वतःमध्ये सबळपणे ओढून घेतो तेव्हापासून शांती, आनंद, मुक्तता, विशालता, प्रकाशाप्रति उन्मुखता, उच्चतर ज्ञान या गोष्टी स्वाभाविक, सहजस्फूर्त होण्यास सुरुवात होते; बऱ्याचदा त्यांचा उदय अगदी त्वरेने होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 218)

साधना, योग आणि रूपांतरण – ८५

(चेतना अंतराभिमुख झाल्यावर साधकाला कोणकोणते अनुभव येतात हे कालच्या भागात आपण समजावून घेतले.)

साधकाने हे समजून घेतले पाहिजे की, हे अनुभव म्हणजे नुसत्या कल्पना नसतात किंवा स्वप्नं नसतात, तर त्या वास्तव घटना असतात. आणि जसे बऱ्याचदा घडते त्याप्रमाणे जरी त्या गोष्टी म्हणजे अगदी, नुसत्या मनोरचना असल्या, जरी त्या अगदी चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या किंवा विरोधी प्रकृतीच्या असल्या तरीही त्यांच्यामध्ये रचनांची म्हणून त्यांची स्वतःची अशी एक शक्ती असते. आणि म्हणून त्या रचनांना नकार देण्यापूर्वी किंवा त्या नाहीशा करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे.

प्रत्येक अनुभवाच्या मूल्यामध्ये जरी पुष्कळ फरक असला तरीही प्रत्येक आंतरिक अनुभव हा त्याच्या स्वतःच्या पद्धतीने पूर्णपणे खरा असतो, अंतरात्मा आणि आंतरिक स्तरांच्या वास्तविकतेच्या साहाय्याने तो खरा ठरतो. आपण फक्त शरीरानेच जीवन जगत असतो किंवा केवळ बाह्य मन आणि प्राण यांच्या साहाय्यानेच जीवन जगत असतो असा विचार करणे चूक आहे. आपण सदासर्वकाळ चेतनेच्या इतर स्तरांमध्ये राहत असतो, तेथे कृती करत असतो, तेथे इतरांना भेटत असतो आणि त्यांच्यावर क्रिया करत असतो आणि आपण तेथे जे काही करतो, अनुभवतो आणि विचार करतो, तेथे ज्या शक्ती आपण गोळा करतो, तेथे ज्या परिणामांची आपण तयारी करतो त्या सगळ्याचे आपल्याला ज्ञात नसलेले, अगणित परिणाम आपल्या बाह्य जीवनावर होत असतात, त्यांचे मोल अमाप असते. त्यापैकी सर्वच अनुभव (ते सर्व प्रांत ओलांडून आपल्यापर्यंत) येत नाहीत आणि ते जरी येथवर आलेच तर ते जडभौतिकामध्ये येताना वेगळाच रूपाकार धारण करतात. कधीकधी त्यांच्यामध्ये अगदी तंतोतंत साम्य असते परंतु हे अल्पस्वल्प साम्य हा आपल्या बाह्यवर्ती अस्तित्वाचा पाया असतो. आपण या भौतिक, शारीरिक जीवनामध्ये जे काही करतो, जे काही धारण करतो, जे बनतो त्याची तयारी आपल्या अंतरंगामध्ये पडद्यामागे सुरू असते. आणि म्हणूनच जो योग जीवनाचे रूपांतरण हे आपले ध्येय म्हणून डोळ्यासमोर ठेवतो त्या योगामध्ये, या प्रांतांमध्ये काय सुरू असते याविषयी जागरूक होणे, आणि आपली नियती निर्धारित करणाऱ्या, तसेच आपली आंतरिक आणि बाह्य वृद्धी किंवा विनाश निर्धारित करणाऱ्या गुप्त शक्तींची जाणीव होण्यासाठी, त्यांचे ज्ञान होण्यासाठी आणि त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी सक्षम होणे, आणि तेथे प्रभुत्व संपादन करणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. जे ईश्वराशी सायुज्यता संपादन करू इच्छितात त्यांच्यासाठी देखील या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात, (कारण) त्यांच्याविना रूपांतरण अशक्य असते. (क्रमशः)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 217-218)