Tag Archive for: रूपांतरण

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०९

प्रकाश, शांती, आनंद इ. गोष्टी सोबत घेऊन येणाऱ्या ‘दिव्य शक्ती’ला व्यक्तीने स्वत:मध्ये प्रवाहित होऊ देणे आणि तिला रूपांतरणाचे कार्य करू देणे, हे आत्म-उन्मुखतेचे (self-opening) उद्दिष्ट असते. अशा रितीने, व्यक्ती जेव्हा दिव्य शक्तीचे ग्रहण करते आणि ती शक्ती त्या व्यक्तीमध्ये कार्य करते आणि जेव्हा त्या कार्याचे परिणाम दिसू लागतात (भलेही मग, त्या व्यक्तीला त्या प्रक्रियेची जाणीव असो किंवा नसो) तेव्हा ती व्यक्ती खुली (open) आहे, असे म्हटले जाते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

नैराश्यापासून सुटका – ३८

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

आपल्याला काही किंमतच नाही अशी आत्म-अवमूल्यनाची (self-depreciation) अतिरंजित भावना, हताशपणा, असहाय्यता या भावना म्हणजे विरोधी शक्तींच्या सूचना असतात आणि त्या सूचनांचा व्यक्तीने कधीही स्वतःमध्ये शिरकाव होऊ देता कामा नये. तुम्ही ज्या दोषांबद्दल सांगत आहात ते दोष सर्व मानवी प्रकृतीमध्ये असतातच आणि प्रत्येकच साधकाचे बाह्यवर्ती अस्तित्व हे असे दोषयुक्त असते. त्या दोषांची जाणीव होणे ही गोष्ट रूपांतरणासाठी (transformation) आवश्यक असते, परंतु ते रूपांतरणाचे कार्य चैत्य पुरुषाला (psychic being) स्वाभाविक असे म्हणजे अविचल मनाने, ईश्वरा‌विषयीच्या श्रद्धेने व समर्पणाने आणि उच्चतर चेतनेबद्दलच्या प्रगाढ अभीप्सेने केले गेले पाहिजे.

बाह्यवर्ती अस्तित्वाचे (external being) रूपांतरण ही पूर्णयोगा‌मधील सर्वात कठीण गोष्ट आहे आणि त्यासाठी श्रद्धा, धीर, अविचलता आणि दृढ निश्चयाची आवश्यकता असते. नैराश्य वगैरे सर्व गोष्टी तुम्ही भिरकावून दिल्या पाहिजेत आणि योगमार्गावर स्थिरपणाने वाटचाल केली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 207)

आत्मसाक्षात्कार – २८

(मागील भागावरून पुढे…)

(आत्मसाक्षात्कार २४ ते २८ हे भाग एकत्रित वाचल्यास श्रीअरविंद प्रणीत ‘दिव्य अतिमानव’ ही संकल्पना अधिक चांगल्या रितीने समजेल, असा विश्वास वाटतो.)

अतिमानस (Supermind) म्हणजे अतिमानव; त्यासाठी मनाच्या अतीत होणे ही अनिवार्य अट आहे.

अतिमानव होणे म्हणजे दिव्य जीवन जगणे, देव बनणे. कारण देव-देवता या ईश्वराच्या शक्ती असतात. तुम्ही मानववंशामधील ईश्वराची शक्ती बनून राहा.

दिव्य अस्तित्वामध्ये वसती करून जीवन जगणे आणि आत्म्याच्या चेतनेला व परमानंदाला, आत्म्याच्या संकल्पशक्तीला व ज्ञानाला तुमचा ताबा घेऊ देणे आणि त्यांना तुमच्या समवेत व तुमच्या माध्यमातून लीला करू देणे, हा त्याचा अर्थ आहे.

हे तुमच्या अस्तित्वाचे सर्वोच्च रूपांतरण असते. स्वत:मध्ये ईश्वराचा शोध घेणे आणि स्वत:च्या सर्व गोष्टींमध्ये त्याला प्रकट करणे हे सर्वोच्च रूपांतरण असते. त्याच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, त्याच्या प्रकाशाने उजळून निघा, त्याच्या शक्तीसहित कृती करा, त्याच्या परमानंदामध्ये न्हाऊन निघा. तुम्ही तो अग्नी व्हा, तो सूर्य व्हा, आणि तो महासागर व्हा. तुम्ही तो आनंद, ती महत्ता आणि ते सौंदर्य बना.

यांपैकी अंशभाग जरी तुम्ही प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरवू शकलात तर, तुम्ही अतिमानवतेच्या (supermanhood) पहिल्या काही पायऱ्या गाठल्याप्रमाणे होईल.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 152)

‘आत्मसाक्षात्कार’ ही मालिका येथे समाप्त होत आहे. धन्यवाद!!

आत्मसाक्षात्कार – २७

(मागील भागावरून पुढे…)

उठा, (जागे व्हा आणि) स्वतःच्या अतीत जा, तुमचे स्वत:चे मूळ स्वरूप प्राप्त करून घ्या. तुम्ही माणूस आहात आणि माणसाची समग्र प्रकृतीच अशी असते की, त्याने स्वत:पेक्षा अधिकतर व्हावे. एकेकाळी जो मानवामधील पशु-मानव (animal man) होता, तो आता त्याहूनही वरच्या श्रेणीत प्रविष्ट झाला आहे. तो विचारवंत आहे, कारागीर आहे, तो सौंदर्योपासक आहे. पण त्याने आता विचारवंतापेक्षाही अधिक असे काही बनले पाहिजे; तो आता ज्ञानद्रष्टा झाला पाहिजे. त्याने आता कारागीरापेक्षा अधिक काही बनले पाहिजे; तो निर्माणकर्ता आणि त्याच्या निर्मितीचा स्वामी झाला पाहिजे. त्याने आता केवळ सौंदर्योपासक न राहता, अधिक काही बनले पाहिजे; कारण तो सर्व सौंदर्य आणि सर्व आनंद यांचा आस्वाद घेऊ शकतो.

मनुष्य हा शरीरधारी असल्यामुळे, तो त्याचे अमर्त्य सत्त्व (substance) मिळविण्यासाठी धडपडतो; तो प्राणमय जीव असल्यामुळे, तो अमर्त्य जीवनासाठी आणि त्याच्या अस्तित्वाच्या अनंत सामर्थ्यासाठी धडपडतो; तो मनोमय जीव असल्यामुळे आणि त्याच्याकडील ज्ञान आंशिक असल्यामुळे, तो संपूर्ण प्रकाश आणि शुद्ध दृष्टी यांच्या प्राप्तीसाठी धडपडतो.

हे सर्व प्राप्त करून घेणे म्हणजे अतिमानव बनणे; कारण तसे बनणे म्हणजे मनामधून अतिमानसाकडे उन्नत होणे. त्याला ‘दिव्य मन’ किंवा ‘दिव्य ज्ञान’ किंवा ‘अतिमानस’ काहीही नाव द्या; ते दिव्य संकल्पाची आणि दिव्य चेतनेची शक्ती व प्रकाश असतात. चैतन्याने (Spirit) अतिमानसाच्या माध्यमातून पाहिले आणि त्याने या जगतांमध्ये (worlds) स्वत:ची निर्मिती केली, अतिमानसाच्याद्वारे ते चैतन्य त्या जगतांमध्ये निवास करते आणि त्यांचे शासन करते. त्याच्यामुळेच ते स्वराट आणि सम्राट, म्हणजे अनुक्रमे स्व-सत्ताधीश आणि सर्व-सत्ताधीश आहे. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 151-152)

आत्मसाक्षात्कार – २०

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

ज्या विशालतेमध्ये, नितांत अशा स्थिर-प्रशांततेमध्ये आणि निश्चल-नीरवतेमध्ये विलीन झाल्याची जाणीव तुम्हाला होत आहे त्यालाच ‘आत्मा’ किंवा ‘शांत-ब्रह्म’ असे संबोधले जाते. या आत्म्याचा किंवा शांत-ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणे आणि त्यामध्ये निवास करणे हेच अनेक योगमार्गांचे संपूर्ण ध्येय असते. परंतु आपल्या योगामधील (पूर्णयोगामधील) ईश्वराच्या साक्षात्काराची आणि रूपांतरणाची ही केवळ पहिली पायरी आहे. जीव उच्चतर किंवा दिव्य चेतनेमध्ये वृद्धिंगत होत जाणे यालाच आम्ही ‘रूपांतरण’ असे संबोधतो.

*

एखादा साधक, ‘अवैयक्तिक, निर्गुण ब्रह्मा’पाशीच थांबला आणि त्याने पुढे वाटचालच केली नाही तर मग, तो ‘पूर्णयोगाचा साधक’ आहे, असे म्हणता येणार नाही. ‘निर्गुण साक्षात्कार’ हा स्वयमेव शांत-‘आत्म्याचा’, विशुद्ध ‘सत्‌-चित्‌-आनंदा’चा साक्षात्कार असतो, पण त्यामध्ये ‘सत्यमया’ची, ‘चैतन्यमया’ची, ‘आनंदमया’ची कोणतीही जाणीव नसते. (म्हणजे हे सगुण-साकार विश्व सत्यमय, चैतन्यमय आणि आनंदमय असल्याची जाणीव नसते.) त्यामुळे हा साक्षात्कार ‘निर्वाणा’कडे घेऊन जातो.

आत्मसाक्षात्कार आणि निर्गुण सच्चिदानंदाचा साक्षात्कार ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी असली किंवा समग्र ज्ञानाचा तो एक महत्त्वाचा भाग असला तरी, समग्र ज्ञानामधील ती केवळ एक पायरी असते. सर्वोच्च साक्षात्काराचे ते अंतिम साध्य नसते, तर तो केवळ प्रारंभ असतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 393)

श्रीमाताजी आणि समीपता – ०६

(एका साधकाला मार्गदर्शन करणारे श्रीअरविंद लिखित पत्र…)

“श्रीमाताजींपासून लपवावीशी वाटेल अशी कोणतीही गोष्ट करू नका, अशी कोणतीही गोष्ट बोलू नका अथवा अशा कोणत्या गोष्टीचा विचारही करू नका.” आणि येथेच, तुमच्याकडून म्हणजे तुमच्या प्राणाकडून जी शंका उपस्थित करण्यात आली आहे त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. अशा ‘किरकोळ गोष्टी’ श्रीमाताजींच्या नजरेस कशा आणून द्यायच्या ही तुमची शंका आहे. श्रीमाताजींना या गोष्टींचा त्रास होईल किंवा त्या या गोष्टींना क्षुल्लक मानतील असे तुम्हाला का वाटते? सर्व जीवन योगमय करायचे असेल तर, येथे क्षुल्लक किंवा बिनमहत्त्वाचे असे काही कसे काय असू शकेल?

तुमच्या कृतीची आणि स्वयं-विकासाची कोणतीही गोष्ट सुयोग्य वृत्तीने त्यांच्यासमोर मांडणे म्हणजे ती गोष्ट श्रीमाताजींच्या संरक्षणछत्राखाली नेण्यासारखी आहे; रूपांतरणासाठी कार्यरत असणाऱ्या त्यांच्या शक्तीकिरणांमध्ये, ‘सत्या’च्या प्रकाशात नेण्यासारखी आहे. कारण श्रीमाताजींच्या नजरेला जे आणून देण्यात आलेले असते त्या गोष्टीवर त्यांचे शक्तीकिरण लगेचच कार्य करू लागतात. तुमचा अंतरात्मा तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरित करत असेल आणि तेव्हा तुमच्यामधीलच कोणीतरी, तुम्हाला ती गोष्ट तुम्ही करू नये असे सुचवत असेल तर ते म्हणजे, तो ‘प्रकाश’किरण आणि त्या ‘शक्ती’चे कार्य टाळण्यासाठी तुमच्या प्राणाने वापरलेले ते एक हत्यार असण्याची खूपच शक्यता असते.

आणखी एक गोष्टसुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि ती अशी की, तुम्ही जर तुमच्या कोणत्याही भागाच्या वृत्ती-प्रवृत्ती श्रीमाताजींनी पाहाव्यात म्हणून त्यांच्या नजरेसमोर ठेवून, श्रीमाताजींप्रति स्वतःला खुले केलेत तर, त्यातूनच स्वयमेव त्यांच्याबरोबरचे तुमचे एक नाते तयार होते आणि त्यातून एक वैयक्तिक जवळीक निर्माण होते. त्यांचे सर्व साधकांबरोबर जे एक सर्वसाधारण, मूक नाते असते किंवा श्रीमाताजींनी आपल्यामध्ये कार्य करावे अशी कोणतीही विनवणी व्यक्तीने केलेली नसतानाचे त्या व्यक्तीचे श्रीमाताजींशी जे नाते असते (not directly invited action) त्यापेक्षा हे जवळीकीचे नाते काहीसे निराळे असते.

अर्थातच, हे सारे केव्हा घडून येऊ शकते? अशा प्रकारच्या खुलेपणासाठी तुम्ही तयार झाले आहात, असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्या अंतरंगामध्ये जे काही आहे ते जसेच्या तसे अगदी उघडपणे श्रीमाताजींसमोर ठेवण्यासाठी तुमचा अंतरात्मा तुम्हाला प्रेरित करत असेल तेव्हाच हे घडून येऊ शकते. जेव्हा ही गोष्ट अंतरंगातून उमलून येते आणि जेव्हा ती उत्स्फूर्त, खरीखुरी असते तेव्हाच ती फलदायी ठरते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 449)

साधना, योग आणि रूपांतरण – ३११

रूपांतरण

(रूपांतरण प्रक्रिया कशी स्वारस्यपूर्ण असते व त्यादरम्यान व्यक्तीला स्वत:विषयी कसे नवनवे शोध लागतात, हे आपण कालच्या भागात समजावून घेतले.)

उदाहरणादाखल, एका अगदी साध्याशा निश्चयाचा विचार करू या. (तो वरवर पाहता साधासा आहे.) “मी पुन्हा कधीही खोटं बोलणार नाही,” असे तुम्ही ठरविता. आणि अचानकपणे, तुम्हाला माहीतही नसते की तुम्ही खोटं का आणि कसे बोललात; पण तुम्ही अनाहूतपणे खोटं बोलता आणि बोलणं झाल्यानंतर मग ते तुमच्या लक्षात येते. तुम्ही म्हणता, “पण हे काही बरोबर नाही. मी जे आत्ता काही बोललो ते बरोबर नाही. मला काही तरी वेगळेच म्हणायचे होते.” मग तुम्ही शोध घेता. “हे असे कसे काय घडले? मी असा कसा विचार केला आणि मी असे कसे काय बोललो? माझ्या तोंडातून हे उद्गार कोणी काढले? मला असे बोलण्यास कोणी भाग पाडलं?…” असा खूप शोध तुम्ही घेता. अशा वेळी तुम्ही स्वतःच्या वागण्याचे समर्थन करता आणि म्हणता की, “ते उद्गार माझे नव्हते, ते बाहेरून आले होते” किंवा “ती गोष्ट अनाहूतपणे झाली होती, तो एक निसटता क्षण होता.” आणि नंतर मग तुम्ही त्याचा विचारही करत नाही. आणि मग पुन्हा पुढच्या वेळी तीच गोष्ट घडते.

त्या ऐवजी तुम्ही जर शोध घेतलात, “तुमच्यामधील जो कोणी खोटं बोलत आहे त्याचा हेतू काय असेल?” आणि मग तुम्ही शोध घेतच राहता, आणि मग तुम्हाला तुमच्यामध्येच एका कोपऱ्यात असे काहीतरी दडलेले आढळते की जे स्वतःला पुढे दामटू पाहात असते, किंवा ते त्याचा दृष्टिकोन ठामपणे रेटू इच्छित असते. (अनेकानेक कारणं सांगता येऊ शकतात.) लोकांचे तुमच्याविषयी मत चांगले झाले पाहिजे आणि तुम्ही कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती आहात असे त्यांना वाटले पाहिजे, म्हणून तुम्ही वस्तुतः जसे आहात त्याच्यापेक्षा तुम्ही काहीसे वेगळे असल्याचे ते भासवत असते. आणि तो तुमच्यामधील खोटं बोलण्यास प्रवृत्त झालेला घटक असतो. तुमच्या सक्रिय चेतनेमधून नाही, तर तुमच्या चेतनेच्या पाठीमागे जे दडून बसले होते त्याने तुम्हाला खोटं बोलण्यास भाग पाडलेले असते. तुम्ही जेव्हा सजग नसता तेव्हा मग तो घटक तुमचे तोंड, तुमची जीभ वापरतो आणि तुमच्या तोंडातून ते वदवून घेतो. आणि अशा रीतीने तुमच्या तोंडातून खोटं बाहेर पडते.

मी तुम्हाला हे एक उदाहरण दिले. अशी लाखो उदाहरणं आहेत आणि हे सारे मोठे रोचक असते. आणि व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगामध्ये या सगळ्याचा शोध लागतो, आणि ती प्रामाणिकपणे म्हणते, “मला यामध्ये बदल केलाच पाहिजे,” तेव्हा तिला असे आढळते की, आता तिला एक प्रकारची आंतरिक स्वच्छ दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि मग इतरांमध्येसुद्धा कसे, काय चाललेले असते याविषयी ती हळूहळू सजग होऊ लागते आणि त्यांनी जसे वागावे असे या व्यक्तीला वाटत असते तसे जरी समोरची व्यक्ती वागली नाही तरीही आता त्याचा व्यक्तीला राग येत नाही. उलट गोष्टी कशा घडतात ते व्यक्तीला कळायला लागते; अमुक एक व्यक्ती ‘अशी का आहे’, ‘प्रतिक्रिया कशा तयार होतात’ हे आता व्यक्तीला उमगू लागते. आणि या ज्ञानामुळे व्यक्ती आता (रागराग करत नाही) तर नुसतेच स्मित करते. आता ती व्यक्ती कठोरपणे निष्कर्ष काढत नाही, तर आता व्यक्ती स्वतःमधील आणि इतरांमधील अडचणी दिव्य चेतनेला अर्पण करते. त्या अडचणींच्या अभिव्यक्तीचे केंद्र कोणते का असेना, त्यामध्ये रूपांतरण घडून यावे यासाठी व्यक्ती त्या गोष्टी दिव्य चेतनेला अर्पण करते.

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – ३१०

रूपांतरण

(आपले व्यक्तित्व एकसंध, एकजिनसी नसल्यामुळे रूपांतरणाच्या प्रक्रियेमध्ये एकच गोष्ट पुन्हापुन्हा करावी लागते, त्यासाठी चिकाटी कशी आवश्यक असते हे आपण कालच्या भागात पाहिले.)

आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते आणि ती अशी की, तुम्ही जर खरोखरच प्रामाणिकपणे, काळजीपूर्वक ही गोष्ट अंमलात आणण्याचा प्रयत्न कराल तर ती अतिशय स्वारस्यपूर्ण गोष्ट आहे.

जे लोक अगदी एकसुरी, कंटाळवाणे जीवन जगत राहतात त्यांच्यासाठीसुद्धा ही गोष्ट स्वारस्यपूर्ण ठरते. अशी लोकं असतात की, ज्यांना अगदी नीरस असे काम करावे लागते. नेहमी एकच गोष्ट आणि तीही त्याच त्याच वातावरणात करावी लागते. आणि त्या गोष्टीमध्ये किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमध्ये रुची कशी घ्यायची हे कळण्यासाठी आवश्यक असणारी जागरुकता त्यांच्या मनामध्ये नसते. अशा व्यक्तीसुद्धा जर स्वतःवर हे नियंत्रण ठेवण्याचे, आणि स्वतःमधील (अनावश्यक असणाऱ्या अशा) गोष्टी वगळायचे काम करू लागतील तर ती गोष्ट स्वारस्यपूर्ण ठरते. म्हणजे असे की, जी जी गोष्ट आपल्यासोबत अज्ञान, अचेतना आणि अहंकार घेऊन येते ती गोष्ट व्यक्तीने परिवर्तनाच्या इच्छेपुढे ठेवली आणि व्यक्ती जर जागरूक राहिली आणि तिने निरीक्षण केले, अभ्यास केला आणि हळूहळू त्याप्रमाणे आचरण करण्यास सुरुवात केली तर हे सारे खूपच रोचक बनते. आणि हे करता-करता व्यक्तीला अनेक अद्भुत आणि अनपेक्षित असे शोध लागतात.

स्वतःमध्ये दडलेेले अनेक छोटे पदर व्यक्तीसमोर उलगडायला लागतात, सुरुवातीला न दिसलेल्या अनेक गोष्टी आता तिला दिसायला लागतात. व्यक्ती एक प्रकारचा आंतरिक मागोवा घ्यायला लागते, स्वतःमधील छोट्याछोट्या काळोख्या कोपऱ्यांचा शोध घ्यायला लागते आणि मग स्वतःशीच म्हणते, “अरेच्चा! मी अशी होते? अमुक एक गोष्ट माझ्यात आहे, ही अमुक एक गोष्ट माझ्यात दबा धरून बसली होती!” कधीकधी अत्यंत घृणास्पद, अगदी नीच, आणि ओंगळ अशा गोष्टीसुद्धा आपल्या आतमध्ये दडून बसलेल्या असतात. आणि एकदा का तिचा शोध लागला की मग अगदी अद्भुत असते ते! मग व्यक्ती त्यावर प्रकाश टाकते आणि ती गोष्ट तिच्यामधून नाहीशी होते. “मी कधीच तिथवर जाऊन पोहोचू शकणार नाही,” असे जे तुम्हाला एकेकाळी वाटले होते आणि ज्यामुळे तुम्ही कष्टी झालेला होतात, तशी स्थिती राहिलेली नसते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०९

रूपांतरण

(व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही. हे मानसिक स्तरावर कसे व का अवघड असते ते कालच्या भागात पाहिले.)

तुम्ही केलेले काम शंभर वेळा बिघडेल, तुम्ही एकशे एक वेळा ते पुन्हा कराल. ते काम हजार वेळा होत्याचे नव्हते होईल, तरीसुद्धा तुम्ही ते पुन्हा एकदा कराल आणि मग एक वेळ अशी येईल की जेव्हा ते ’होत्याचे नव्हते’ होणार नाही.

व्यक्ती जर एकाच घटकाने बनलेली असती तर मग हे सोपे झाले असते. पण व्यक्ती अनेक घटकांनी मिळून बनलेली असते. आणि त्यामुळे असे होते की, अग्रभागी असणारा असा एखादा घटक असतो, त्याने (अमुक एका गोष्टीमध्ये सुधारणा होण्यासाठी) खूप परिश्रम केलेले असतात, तो खूप सचेत असतो आणि नेहमी जागरूक असतो आणि तो जेव्हा सक्रिय असतो तेव्हा सारे काही सुरळीत चाललेले असते; म्हणजे तेव्हा व्यक्ती स्वतःमध्ये कोणत्याही विरोधी गोष्टींना प्रवेश करू देत नाही, तेव्हा ती अगदी सजग असते आणि मग… व्यक्ती झोपी जाते, आणि दुसऱ्या दिवशी जागी होते तेव्हा आता दुसराच एखादा घटक सक्रिय झालेला असतो आणि मग व्यक्ती स्वतःच्या मनाशी म्हणते, “पण मी कालपर्यंत केलेल्या कामाचे काय झाले, ते सगळे काम कुठे गेले?”… आणि मग व्यक्तीला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागते.

सर्व घटकांना चेतनेच्या क्षेत्रामध्ये नेऊन, त्या सर्व घटकांमध्ये एक एक करून, जोवर परिवर्तन होत नाही तोपर्यंत व्यक्तीला पुन्हा पुन्हा अशी नव्याने सुरुवात करावी लागते. आणि मग जेव्हा तुमच्या परिश्रमांची परिसीमा होते तेव्हा मग परिवर्तन घडून येते, आता तुम्ही प्रगतीचा एक टप्पा पार केलेला असतो. नंतर पुन्हा, प्रगतीचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार करावे लागते. पण तरीही तोवर निदान एक टप्पा तरी पार पडलेला असतो. अशा रीतीने व्यक्तित्वाचे सर्व घटक जेव्हा एका पाठोपाठ एक या पद्धतीने पृष्ठभागावर आणले जातात आणि तुम्ही जोपर्यंत त्या सर्व घटकांवर अगदी निरपवादपणे, चेतना, इच्छा आणि तुमचे ध्येय यांचा प्रकाश टाकत नाही तोपर्यंत हे असे करत राहावे लागते. सर्व गोष्टींमध्ये परिवर्तन होईल अशा पद्धतीने तुम्हाला हे करत राहावे लागते. आणि मग तेव्हा कुठे व्यक्तित्वाचे संपूर्ण रूपांतरण झालेले असते.

तुमचा उत्साहभंग करण्यासाठी मी हे सांगत नाहीये, पण मी तुम्हाला जाणीव करून देऊ इच्छिते. नंतर मग तुम्ही असे म्हणता कामा नये की, “मला हे इतके अवघड आहे हे आधी माहीत असते तर मी या गोष्टीची सुरुवातच केली नसती.” हे सारे अतिशय अवघड आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. दृढ निश्चयाने प्रारंभ करा आणि जरी यामध्ये यश येण्यासाठी कितीही दूरवरची वाटचाल करावी लागली तरी ते पूर्णत्वास जाईपर्यंत कार्यरत राहा. त्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०८

रूपांतरण

(व्यक्ती स्वतःला हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बंदिस्त करून घेऊ शकत नाही. हे शारीरिकदृष्ट्या व प्राणिकदृष्ट्या कसे व का अवघड असते ते कालच्या भागात आपण पाहिले.)

मानसिकदृष्ट्या तर ही गोष्ट अधिकच वाईट असते. मानवी मन हे सर्व बाजूंनी उघड्या असणाऱ्या एखाद्या सार्वजनिक ठिकाणासारखे असते. तेथे सर्व बाजूंनी गोष्टी आत येत असतात, जात असतात, एकमेकींवर आदळत असतात आणि त्यातील काही गोष्टी तेथेच स्थिरस्थावर होतात आणि त्या काही नेहमीचांगल्या असतातच असे नाही. आणि अशा या अनेकविध गोष्टींवर नियंत्रण प्रस्थापित करणे हे सर्वात कठीण असते.

तुमच्या मनामध्ये प्रवेश करणाऱ्या विचारांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मी काय म्हणत आहे ते तुमच्या लक्षात येईल. किती काळजीपूर्वक राहावे लागते हे तेव्हा तुमच्या लक्षात येईल. एखाद्या पहारेकऱ्याप्रमाणे, डोळे टक्क उघडे ठेवून, तुम्हाला सतर्क राहावे लागते आणि तुमच्या अभीप्सेशी सुसंगत असणाऱ्या संकल्पना कोणत्या आणि विसंगत असणाऱ्या संकल्पना कोणत्या याविषयी तुम्हाला पूर्णपणे सुस्पष्टपणे जाण असावी लागते. कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या व्यक्तींचा त्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश होऊ नये यासाठी, तुम्हाला एखाद्या पोलिसाप्रमाणे प्रत्येक क्षणी लक्ष ठेवून राहावे लागते.

आणि हे विसरू नका की, तुम्ही अगदी कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तरीही या सर्व अडचणींचा शेवट एका दिवसात, एका महिन्यात किंवा एका वर्षात होणार नाहीये. व्यक्ती जेव्हा हे प्रयत्न करायला सुरुवात करते तेव्हा तिच्यामध्ये अविचल अशी सहनशीलता, चिकाटी (patience) असणे आवश्यक असते. व्यक्तीने असे म्हटले पाहिजे की, “हे करण्यासाठी मला पन्नास वर्षे लागली, शंभर वर्ष लागली किंवा कितीही वर्षे लागली तरी चालेल, पण मला जे साध्य करायचे आहे ते मी साध्य करेनच.”

एकदा का तुम्ही असा निर्धार केलात आणि तुम्ही निर्धारित केलेले उद्दिष्ट हे सतत व अथक परिश्रम घेण्यायोग्य आहे याची तुम्हाला जाणीव झाली असेल तर मग तुम्ही (रूपांतरणाच्या या प्रक्रियेस) आरंभ करू शकता.

अन्यथा, कालांतराने तुम्ही निराश होऊन जाल, तुमचा उत्साहभंग होईल. मग तुम्ही स्वतःच्या मनाशी म्हणाल, “बापरे! हे खूपच अवघड आहे. मी (अमुक एक गोष्ट करण्याचा) प्रयत्न करतो आणि ती पुन्हा ‘होत्याची नव्हती’ होते, मग मी पुन्हा प्रयत्न करतो, परत तसेच होते. मी पुन्हा एकवार (मनाचा हिय्या करून) प्रयत्न करतो आणि परत तसेच होत्याचे नव्हते होते. काय करावे? मी माझ्या उद्दिष्टापर्यंत कधी जाऊन पोहोचणार?” (आणि म्हणूनच) व्यक्तीकडे प्रचंड सहनशीलता, चिकाटी असली पाहिजे. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)