Tag Archive for: राष्ट्रउभारणी

 

(दि. १९.०६.१९०९)

जगाच्या डोळ्यांसमोर अगदी वेगाने, अगदी स्पष्टपणे, भारतामध्ये राष्ट्रउभारणीचे कार्य घडू लागले आहे त्यामुळे सर्वजणच ही प्रक्रिया पाहू शकतात आणि ज्यांच्यापाशी थोडीफार सहानुभूती आहे, अंतर्दृष्टी आहे ते या दैवी रचनेची दिशा, त्यामध्ये कार्यकारी असणाऱ्या शक्ती, आणि त्यामध्ये उपयोगात आणली गेलेली साधनसामग्री यामधील वेगळेपण पाहू शकत आहेत. हे राष्ट्र म्हणजे प्रकृतीच्या कार्यशाळेमध्ये कच्च्या मालातून तयार झालेला नवीन वंश नव्हे किंवा हे राष्ट्र आधुनिक परिस्थितीमुळे निर्माण झाले आहे, असेही नव्हे. तर येथील संस्कृती ही, या पृथ्वीवरील महान संस्कृतींपैकी, प्राचीन वंशांपैकी एक आहे; दुर्दम्य प्राणशक्ती, महानतेची, सखोलतेची जणू खाणच! अद्भुत क्षमता असणारी, अशी ही संस्कृती, मानवी संस्कृतीच्या इतर प्रकारांपासून तसेच परकीय वंशप्रकारांपासून सामर्थ्याचे अगणित उगमस्रोत स्वत:मध्ये सामावून घेत असून, आता ती कायमसाठी एका सुसंघटित अशा राष्ट्रीय एकात्मतेमध्ये स्वत:चे उन्नयन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

…आमच्या पुरातन कालापासून जो प्रयत्न आजवर आमचा वंश करत होता, तो प्रयत्न आता संपूर्णत: नवीन परिस्थितीमध्ये तो करेल. एखादा जाणकार निरीक्षक त्याच्या यशस्वितेचे भाकीत करू शकेल कारण जे काही महत्त्वाचे अडथळे होते ते दूर करण्यात आले आहेत किंवा ते दूर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु याही पुढे जाऊन आम्हाला असा विश्वास आहे की, यश मिळणारच; कारण भारताची महानता, भारताची एकात्मता, आणि भारताचे स्वातंत्र्य ही आता संपूर्ण जगाचीच आवश्यकता बनली आहे.

…ईश्वर आमच्या सोबत आहे हा आमचा विश्वास आहे आणि या श्रद्धेमुळेच आम्ही विजयी होऊ. आम्हाला अशी खात्री आहे की, मानवतेला आमची गरज आहे आणि मानवतेविषयीचे, आपल्या देशाविषयीचे, वंशाविषयीचे, आमच्या धर्माविषयी असलेले आमचे प्रेम आणि तिची सेवा या गोष्टी आमची अंत:करणे शुद्ध करतील आणि या लढ्यातील कृतीसाठी त्या आम्हाला प्रेरित करतील. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 08 : 23-24)