Tag Archive for: योगमार्ग

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०७

पूर्णयोगामध्ये आत्म-निवेदनाचे (self-consecration) आणि आत्म-दानाचे (self-giving) सर्वसाधारण तत्त्व सर्वांसाठी समानच आहे पण प्रत्येकाचा आत्म-निवेदनाचा आणि आत्म-दानाचा स्वतःचा असा एक मार्ग असतो. ‘क्ष‌’ या साधकाचा मार्ग हा ‘क्ष‌’साठी चांगला आहे, तसाच तुम्ही निवडलेला मार्ग हा तुमच्यासाठी चांगला आहे, कारण तो तुमच्या प्रकृतीशी मिळताजुळता आहे. अशा प्रकारची लवचीकता आणि विविधता योगामध्ये नसती आणि सर्वांना एकाच साच्यामध्ये बसवावे लागले असते तर योग म्हणजे चैतन्यमय शक्ती न राहता, तो एक अलवचिक अशी मानसिक यंत्रणा ठरला असता.
*

योगमार्ग ही एक जिवंत, चैतन्यमय गोष्ट असली पाहिजे. व्यक्तीपरत्वे विभिन्नता असते आणि (एक प्रकारे) ती आवश्यकदेखील असते. पण त्या विभिन्नतेला न मानता, ज्याला चिकटून राहावे असे कोणते एकच एक मानसिक तत्त्व किंवा पद्धती म्हणजे योगमार्ग, असे असता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 103), (SABCL 24 : 1463)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३२

माझे प्रेम सततच तुमच्या सोबत आहे. पण तुम्हाला जर ते जाणवत नसेल तर त्याचे कारण हेच आहे की, तुम्ही ते स्वीकारण्यास सक्षम नाही. तुमची ग्रहणशीलता (receptivity) कमी पडत आहे, ती तुम्ही वाढविली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही स्वत:ला खुले (open) केले पाहिजे. व्यक्ती जेव्हा आत्मदान करते तेव्हाच ती स्वत:ला खुली करू शकते. तुम्ही नक्कीच कळत वा नकळतपणे, ईश्वरी प्रेम आणि शक्ती तुमच्याकडे खेचू पाहत आहात. ही पद्धत चुकीची आहे. कोणतेही हिशोब न मांडता, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता, स्वत:स अर्पण करा म्हणजे मग तुम्ही ग्रहणक्षम होऊ शकाल.
*
अगदी या आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा अशी पुष्कळ माणसं आहेत की जी, वैयक्तिक कारणांसाठी, अगदी सर्व तऱ्हेच्या वैयक्तिक कारणांसाठी (योगसाधनादी) सर्व गोष्टी करत असतात. काही जण जीवनामुळे उद्विग्न झालेले असतात, काही जण दुःखी असतात, काही जणांना अधिक काही जाणून घेण्याची इच्छा असते, काही जणांना आध्यात्मिक दृष्ट्या कोणीतरी महान व्यक्ती बनायचे असते, इतरांना शिकविता यावे म्हणून काही जणांना काही गोष्टी शिकायच्या असतात, योगमार्ग स्वीकारण्याची खरोखरच हजारो वैयक्तिक कारणं असतात. पण एक साधीशी गोष्ट अशी की, ईश्वराप्रति आत्मदान करावे, जेणेकरून ईश्वरच तुम्हाला हाती घेईल आणि ‘त्याची’ जशी इच्छा असेल त्याप्रमाणे तो तुम्हाला घडवेल आणि ते सारे त्याच्या शुद्धतेनिशी व सातत्यानिशी घडवेल. आणि हे खरोखरच सत्य असते, पण असे करणारे फार जण आढळत नाहीत. खरेतर या आत्मदानामुळेच व्यक्ती ध्येयाप्रत थेट जाऊन पोहोचते आणि मग तिच्याकडून कोणत्या चुका होण्याचे धोकेही नसतात. पण इतर प्रेरणा मात्र नेहमीच संमिश्र असतात; अहंकाराने कलंकित झालेल्या असतात आणि स्वाभाविकपणेच त्या तुम्हाला कधी इकडे तर कधी तिकडे भरकटवत राहतात. कधीकधी तर त्या तुम्हाला ध्येयापासून खूप दूरही नेतात.

– श्रीमाताजी (CWM 14 : 148), (CWM 07 : 190)

साधना, योग आणि रूपांतरण – १९५

उत्तरार्ध

मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांनी मनुष्यत्वाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मनोमय जीव, अन्य शक्तीच्या साहाय्याविना, स्वत:च्या शक्तीद्वारे स्वतःचे अतिमानसिक चैतन्यामध्ये परिवर्तन करू शकत नाही. मानवी धारकपात्राचे (receptacle) दैवीकरण केवळ ‘दिव्य प्रकृती’च्या अवतरणामुळेच होऊ शकते.

कारण आपल्या मन, प्राण आणि शरीर या गोष्टी त्यांच्या स्वत:च्या मर्यादांनी बांधल्या गेलेल्या असतात आणि त्या कितीही उन्नत झाल्या किंवा कितीही विस्तृत झाल्या तरीही त्या त्यांच्या प्राकृतिक सीमा ओलांडून वर जाऊ शकत नाहीत किंवा त्या सीमांच्या पलीकडे त्या विस्तारित देखील होऊ शकत नाहीत. परंतु असे असूनसुद्धा, मनोमय मनुष्य स्वतःच्या पलीकडे असणाऱ्या अतिमानसिक ‘प्रकाश’, ‘सत्य’ आणि ‘शक्ती’ यांच्याप्रत उन्मुख होऊ शकतो. आणि त्यांनी आपल्यामध्ये कार्य करावे आणि मन जे करू शकणार नाही ते त्यांनी करावे यासाठी तो त्यांना आवाहन करू शकतो. मन जरी स्वप्रयत्नाने, मनाच्या अतीत जे आहे ते होऊ शकत नसले तरी, अतिमानस अवतरित होऊन, मनाचे स्वत:च्या द्रव्यामध्ये रूपांतरण घडवू शकते.

मनुष्याने आपल्या विवेकशील सहमतीने आणि जागरूक समर्पणाने, अतिमानसिक ‘शक्ती’ला जर तिच्या स्वतःच्या गहन व सूक्ष्म अंतदृष्टीनुसार आणि लवचीक अंतःशक्तीनुसार कार्य करण्यास मुभा दिली तर, ती अतिमानसिक ‘शक्ती’, संथपणाने किंवा वेगाने, आपल्या सद्यकालीन अर्ध-परिपूर्ण प्रकृतीचे दिव्य ‘रूपांतरण’ घडवून आणेल.

या अवतरणामध्ये, या कार्यामध्ये धोका होण्याची आणि आपत्तीजनक पतन होण्याची शक्यता असते. अवतरित होणाऱ्या शक्तीचा जर मानवी मनाने किंवा प्राणिक इच्छेने ताबा घेतला आणि स्वतःच्या संकुचित व चुकीच्या कल्पनांनी किंवा सदोष व अहंकारी आवेगांनी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, (आणि हे काही प्रमाणात अटळसुद्धा असते;) तर जोपर्यंत कनिष्ठ मर्त्य प्रकृती ही महत्तर अशा अमर्त्य प्रकृतीच्या मार्गापैकी थोडाफार भाग तरी आत्मसात करत नाही, तोपर्यंत धडपडणे, किंवा विचलित होणे, कठीण आणि वरकरणी पाहता, दुर्लंघ्य वाटणारे अडथळे येणे, आघात होणे, दुःखभोग सहन करावे लागणे यांपासून सुटका नसते; एवढेच नव्हे तर संपूर्ण पतन होणे किंवा मृत्युमुखी पडणे याचीदेखील शक्यता असते. जेव्हा मन, प्राण आणि शरीर ‘ईश्वरा’प्रत जाणीवपूर्वक समर्पित व्हायला शिकतात, तेव्हाच फक्त ‘योगमार्ग’ सोपा, सरळ, जलद आणि सुरक्षित बनू शकतो.

आणि हे समर्पण आणि उन्मुखता ही फक्त ‘ईश्वरा’प्रतच असली पाहिजे, ती अन्य कोणाप्रत असता कामा नये. कारण आपले अंधकारमय मन आणि आपल्यामधील अशुद्ध प्राणशक्ती या गोष्टी, अ-दैवी आणि विरोधी शक्तींना समर्पित होण्याची शक्यता असते. एवढेच काय, पण चुकून त्या विरोधी शक्तींनाच ते ‘दैवी शक्ती’ समजण्याचीदेखील शक्यता असते. अन्य कोणतीच चूक याच्या इतकी घातक असू शकणार नाही. त्यामुळे आपले समर्पण हे अंध असता कामा नये, तसेच ते कोणत्याही प्रभावाप्रत किंवा सर्वच प्रभावांप्रत जडसुस्त निष्क्रियतेने शरणागती पत्करत आहे असेही असता कामा नये; तर ते समर्पण प्रामाणिक, सचेत, दक्ष आणि त्या एकमेवाद्वितीय आणि सर्वोच्चाप्रति एकनिष्ठ असले पाहिजे.

कितीही कठीण असले तरीही, ईश्वराप्रत आणि ‘दिव्य माते’प्रत आत्म-समर्पण, हेच आपले एकमात्र प्रभावशाली साधन असले पाहिजे आणि तेच आपले एकमेव कायमसाठीचे आश्रयस्थान असले पाहिजे. दिव्य मातेप्रति आत्मसमर्पण याचा अर्थ असा की, आपली प्रकृती तिच्या हातामधील एक साधन झाले पाहिजे, आणि आपला आत्मा हा त्या दिव्य मातेच्या कुशीमधील बालक झाले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 170-171)

विचारशलाका १७

साधक : ज्याला स्वत:ची शारीरिक अवस्था सुधारण्याची इच्छा आहे, ज्याला उपचाराचा परिणाम दिसून यावा असे वाटते किंवा जो स्वत:च्या शारीरिक कमतरतेवर उपाय करू पाहतो त्याने काय केले पाहिजे? जो बदल घडून येणे अपेक्षित आहे त्याच्या अंतिम टप्प्यावर लक्ष केंद्रित करून, त्याने स्वत:ची इच्छाशक्ती उपयोगात आणावी की, केवळ ते घडून येईलच अशा खात्रीने जगत राहावे की, ‘ईश्वरी शक्ती’ योग्य वेळ आली की, योग्य मार्गाने अपेक्षित तो परिणाम घडवून आणेलच असा विश्वास बाळगावा?

श्रीमाताजी : एकच गोष्ट करण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग आहेत आणि त्यातील प्रत्येक मार्ग हे भिन्नभिन्न परिस्थितीमध्ये परिणामकारक ठरतात. यापैकी कोणती पद्धत तुम्हाला लागू पडेल, हे तुमच्यामध्ये विकसित झालेल्या चेतनेवर आणि कोणत्या स्वरूपाच्या शक्ती तुम्ही कार्यरत करू शकता यावर अवलंबून आहे.

तुम्ही पूर्णपणे बरे झाला आहात किंवा तुमच्यामध्ये अपेक्षित बदल घडून आला आहे अशा चेतनेमध्ये तुम्ही राहू शकता आणि तुमच्या आंतरिक रचनाशक्तीद्वारे बाह्य अवस्थेमध्ये देखील हळूहळू तो बदल घडवून आणू शकता. किंवा त्या गोष्टींवर परिणाम करू शकतील अशा शक्ती कोणत्या याची दृष्टी जर तुम्हाला असेल, तुम्ही जर ते जाणून घेऊ शकलात आणि त्या हाताळण्याचे कौशल्य जर तुमच्यापाशी असेल तर तुम्ही त्यांना खाली बोलावू शकता आणि ज्या भागांमध्ये कार्य होणे आवश्यक आहे तेथे त्या शक्ती उपयोगात आणू शकता; असे केलेत तर त्या शक्तीद्वारे तो बदल घडवून आणला जाईल. किंवा तुम्ही तुमची समस्या ‘ईश्वरा’समोर मांडलीत आणि त्यावर उपाय करावा म्हणून ‘ईश्वरी शक्ती’वर पूर्णपणे भरवसा ठेवून विनवणी केलीत तर, तेव्हाही तो बदल घडवून आणला जाईल.

पण जरी तुम्ही यांपैकी काहीही केलेत, कोणतीही प्रक्रिया अवलंबलीत आणि त्याबाबतचे आत्यंतिक कौशल्य व शक्तीदेखील तुम्हाला प्राप्त झालेली असली तरीदेखील, त्याचे फळ मात्र तुम्ही त्या ‘ईश्वरा’च्या हाती सोपविले पाहिजे. तुम्ही नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत परंतु तुमचे ते प्रयत्न सफल होणार का निष्फळ होणार हे ‘ईश्वरा’च्या हाती असते. तेथे तुमची वैयक्तिक शक्ती खुंटलेली असते; जर परिणाम दिसून आला तर तो परिणाम तुमच्यामुळे नसून, ‘ईश्वरी शक्ती’मुळे घडून आलेला असतो.

तुम्ही असे विचारले आहे की, ‘ईश्वरा’कडे अशा प्रकारच्या गोष्टींची मागणी करणे योग्य आहे का? नैतिक दोषांचे निराकरण करण्यासाठी ‘ईश्वरा’ची विनवणी करण्याच्या तुलनेत, शारीरिक अपूर्णतेचे निराकरण करण्यासाठी ‘ईश्वरा’कडे वळणे अधिक बरे. अर्थात, तुम्ही कशाचीही मागणी करत असाल, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी, अगदी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करत असतानादेखील, किंवा तुमचे ज्ञान उपयोगात आणतानादेखील किंवा शक्तीचा वापर करत असतानादेखील तुम्हाला ही जाणीव असली पाहिजे की, त्याचा परिणाम दिसून येणे ही गोष्ट ‘ईश्वरी कृपे’वर अवलंबून असते.

एकदा तुम्ही ‘योगमार्ग’ स्वीकारलात की, मग तुम्ही जे काही कराल ते पूर्णपणे समर्पण वृत्तीने केले पाहिजे. “मी माझ्यामधील अपूर्णता घालविण्याचे यथाशक्य सर्व प्रयत्न करत आहे, मी माझ्यापरीने सर्वाधिक प्रयत्न करत आहे, मी माझ्यामध्ये सुधारणा व्हावी अशी आस बाळगत आहे पण त्याच्या फलनिष्पत्तीसाठी मी स्वत:ला पूर्णत: त्या ईश्वराच्या हाती सोपवत आहे;” असा तुमचा भाव असला पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 03 : 96-97]

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०२

प्रश्न : आम्हाला योगासंबंधी काही सांगाल काय?

श्रीमाताजी : योग तुम्हाला कशासाठी हवा आहे? सामर्थ्य लाभावे म्हणून ? मन:शांती, शांतचित्तता प्राप्त व्हावी म्हणून ? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून?

परंतु, योगमार्ग स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात का हे लक्षात येण्यासाठी यांपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत : तुम्हाला ईश्वराकरता योगसाधना करायची आहे का? ईश्वर हेच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का ? ईश्वरावाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची स्थिती आहे का? ईश्वर हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ईश्वराविना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही, असे तुम्हाला वाटते का? असे असेल तरच तुम्हाला योगमार्ग स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

ईश्वराविषयीची तळमळ, अभीप्सा (Aspiration) हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे.

पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करावयाचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत राखायची. आणि त्यासाठी आवश्यकता असते एकाग्रतेची, ईश्वरावरील एकाग्रतेची ! ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांसाठी समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ईश्वराच्या ठिकाणी एकाग्रता करणे आवश्यक असते.

हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या जाणिवेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, अगदी तळाशी जाऊन बसा.

तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यात एक अग्नी तेवत आहे. तोच तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व, तोच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची अन्य केंद्रदेखील आहेत, उदाहरणार्थ, एक असते मस्तकाच्या वर, दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये)! प्रत्येक केंद्राचा स्वतंत्र असा प्रभाव असतो आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (पुरुष) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामधूनच उत्पन्न होतात – रूपांतरासाठी आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या गोष्टीसुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01)