Tag Archive for: बुद्धी

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

विचारी मनाच्या (thinking mind) माध्यमातून ईश्वरी शक्तीचे ग्रहण करणे शक्य होणार नाही असे तुम्हाला का वाटते? व्यक्ती ज्याप्रमाणे प्राणाद्वारे, भावनिक अस्तित्वाद्वारे, शरीराद्वारे ईश्वरी शक्तीचे ग्रहण करू शकते, तशीच ती विचारी मनाच्या माध्यमातूनसुद्धा शक्तीचे ग्रहण करू शकते. विचारी मनदेखील प्राण आणि शरीराइतकेच सक्षम असते. अस्तित्वाच्या इतर घटकांप्रमाणेच विचारी मनाचेसुद्धा रूपांतरण करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी त्याला ईश्वरी शक्ती कशी ग्रहण करायची याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असते. ते दिले गेले नाही तर विचारी मनाचे रूपांतरण शक्य होणार नाही.

शरीराची तामसिकतेने झाकोळलेली, मूढ, बाधक असणारी चेतना ही जशी आध्यात्मिक अनुभवामधील अडथळा ठरते किंवा प्राणाची सुसंस्कारित न झालेली सामान्य कृती ही जशी अडथळा ठरते; अगदी त्याचप्रमाणे बुद्धीची अज्ञानग्रस्त कृती ही देखील आध्यात्मिक अनुभवामधील अडथळा ठरते. त्यामुळे साधकाला पुढील गोष्टींची जाणीव असली पाहिजे.

• पहिली गोष्ट म्हणजे त्याने मानसिक संकल्पना किंवा संस्कार किंवा बौद्धिक निष्कर्ष या गोष्टींना साक्षात्कार समजण्याची चूक करता कामा नये.

• दुसरी गोष्ट म्हणजे मनाची चंचलता, अस्वस्थता. त्यामुळे आंतरात्मिक (psychic) आणि आध्यात्मिक (spiritual) अनुभवाच्या उत्स्फूर्त अचूकतेमध्ये बाधा निर्माण होते. आणि त्यामुळे प्रकाशित करणाऱ्या खऱ्या ज्ञानाच्या अवतरणाला वावच दिला जात नाही किंवा मग, या ज्ञानाचा मानवी मानसिक स्तराला स्पर्श झाल्याबरोबर किंवा पूर्णपणे तो स्पर्श होण्याआधीच, त्या ज्ञानामध्ये विकार निर्माण होतो. (म्हणून या गोष्टी घडू नयेत यासाठी साधकाने खबरदारी घेतली पाहिजे.)

…बुद्धी जर समर्पित झाली; ती जर खुली, अविचल, ग्रहणशील झाली तर, ती प्रकाश ग्रहण करण्याचे माध्यम किंवा आध्यात्मिक अवस्थेच्या अनुभवाला व आंतरिक परिवर्तनाच्या पूर्णतेला साहाय्यक का बरे होऊ शकणार नाही?

– श्रीअरविंद (CWSA 31 : 13-14)

साधना, योग आणि रूपांतरण – २४८

मानसिक रूपांतरण

आपल्याला आपल्या बुद्धीकडून योग्य विचार, योग्य निष्कर्ष, वस्तु व व्यक्ती यांच्याबद्दलचे योग्य दृष्टिकोन, त्यांच्या वर्तणुकीबद्दलचे किंवा घटनाक्रमाबद्दलचे योग्य संकेत मिळत आहेत किंवा नाहीत हे पाहण्याची तसदी लोक घेत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या अशा काही कल्पना असतात आणि त्या कल्पनाच सत्य आहेत असे मानून ते त्यांचा स्वीकार करतात. किंवा मग, त्या कल्पना त्यांच्या स्वतःच्या असल्यामुळे त्या कल्पनांचे अशा व्यक्ती अनुसरण करतात. आपल्या मनाची चूक झाली आहे हे लक्षात आले तरीही, ते त्या गोष्टीला फारसे महत्त्व देत नाहीत किंवा आधीपेक्षा मानसिकदृष्ट्या अधिक काळजीपूर्वक वागण्याचा प्रयत्नही ते करत नाहीत.

प्राणिक क्षेत्रामध्ये लोकांना हे माहीत असते की, नियंत्रणाविना स्वतःच्या इच्छावासना किंवा आवेग यांच्या मागे धावता कामा नये. ते काय करू शकतात आणि त्यांनी काय करावे किंवा त्यांना काय करता येणे शक्य नाही किंवा त्यांनी काय करू नये यामध्ये फरक करण्यासाठी आवश्यक असणारा विवेक किंवा नैतिक दृष्टिकोन त्यांच्यापाशी असला पाहिजे हे त्यांना माहीत असते. परंतु बुद्धीच्या प्रांतामध्ये मात्र अशा प्रकारची कोणतीही खबरदारी घेतली जात नाही.

माणसांनी आपल्या बुद्धिमत्तेचे अनुसरण करावे असे म्हटले जाते. त्यामुळे माणसं त्यांच्या कल्पना, मग त्या योग्य असू देत वा अयोग्य असू देत त्या बाळगत राहतात, त्या ठासून सांगत राहतात. असे म्हटले जाते की, बुद्धी ही मनुष्याचे सर्वोच्च साधन आहे आणि त्यामुळे त्याने विचार केलाच पाहिजे आणि त्यानुसार त्याने आचरण केले पाहिजे, (असे अपेक्षित असते.) परंतु हे तितकेसे खरे नाही. प्राणाला मार्गदर्शन करण्यासाठी, त्याला रोखण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जशी आंतरिक प्रकाशाची आवश्यकता असते तशीच आवश्यकता बुद्धीलादेखील असते.

बुद्धीच्याही वर असणारी अशी जी गोष्ट आहे तिचा व्यक्तीने शोध घेतला पाहिजे आणि खऱ्या ‘ज्ञाना’च्या त्या स्रोताच्या कार्यासाठी बुद्धी ही फक्त मध्यस्थ झाली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 13)

विचारशलाका २२

 

बुद्धी, तर्कबुद्धी (Reason) ही सामान्य जीवनाच्या तर्कसंगत क्षेत्राशी संबंधित असलेल्या गोष्टींचेच मूल्यमापन करू शकते. आणि श्रीअरविंदांनी म्हटल्याप्रमाणे, मानवी जीवनातील प्राणिक आणि मानसिक कृतींचे, गतिविधींचे संयोजन आणि नियंत्रण करणे, हेच बुद्धीचे खरे कार्य असते.

समजा, जर एखाद्या व्यक्तीमध्ये प्राणिक असमतोल (vital disorder) असेल, विकार असतील, आवेग, वासना आणि तत्सम इतर गोष्टी असतील आणि तेव्हा जर त्या व्यक्तीने बुद्धीचा आश्रय घेतला आणि त्या बुद्धीचा वापर करून त्या दृष्टीने या गोष्टींकडे पाहायचा प्रयत्न केला तर अशा प्रत्येक वेळी, ती व्यक्ती या सर्व गोष्टी पुन्हा सुव्यव्यस्थित करू शकते. प्राण आणि मन यांच्या सर्व गतिविधी संघटित करणे आणि त्यांचे नियमन करणे हे बुद्धीचे खरे कार्य आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर, दोन संकल्पना एकमेकींशी मिळत्याजुळत्या आहेत, की विरोधी आहेत; तुमच्या मानसिक संरचनेमध्ये दोन सिद्धान्त एकमेकांना पूरक आहेत की मारक आहेत, हे पाहण्यासाठी तुम्ही बुद्धीचा आश्रय घेऊ शकता. या व अशा सर्व गोष्टी पारखणे आणि त्यांची सुव्यवस्था लावणे हे बुद्धीचे कार्यक्षेत्र आहे आणि कदाचित त्यापेक्षा काकणभर अधिकच असे म्हणता येईल: अमुक एखादा आवेग हा उचित म्हणजे तर्कसंगत आहे की अनुचित आहे हे पाहणे; तसेच त्यातून काही अरिष्ट तर उद्भवणार नाही ना हे पाहणे किंवा ज्यामुळे आयुष्यामध्ये फारसे काही बिघडणार नाही, त्यामुळे तो आवेग चालवून देण्यायोग्य आहे किंवा नाही, हे पाहण्याचे काम बुद्धीचे आहे. हे बुद्धीचे संपूर्ण कार्यक्षेत्र आहे, हा श्रीअरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.

– श्रीमाताजी [CWM 07 : 166-167]