Tag Archive for: प्रयोजन

 

साधक : पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य काय आहे?

श्रीमाताजी : ईश्वरा‌चा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्ती या पृथ्वीवर आलेली असते, हेच पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य आहे. हे प्रयोजन नसेल तर भौतिक अस्तित्व म्हणजे एक अप-रूप, विकारित रूप (monstrosity) ठरेल.

जर हे परमोच्च प्रयोजन नसते, म्हणजे ईश्वरा‌चा पुनर्शोध घेणे, ईश्वर‌च होणे, ईश्वरा‌ला आविष्कृत करणे आणि या भौतिक जीवनात देखील ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे, हे जर पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन नसते तर, आत्ता हे जीवन जसे आहे तसे ते विकारित रूप ठरेल.

साहजिकच आहे की, माणसं जितकी जास्त अजाण असतात तितके आत्ता मी जे सांगितले ते त्यांना समजणे कठीण जाते. कारण अशी माणसं (जीवनाकडे, स्वत:कडे) वस्तुनिष्ठपणे पाहू शकत नाहीत. ती यांत्रिकपणे, सवयीनुसार जीवन जगत असतात; म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या पद्धतीबद्दल माणसं जागरूक नसतात किंवा त्याकडे ती अलग होऊन वस्तुनिष्ठपणे पाहू शकत नाहीत. पण जसजशी त्यांची चेतना वृद्धिंगत होत जाते तसतसे, सद्यस्थितीतील जीवन हे किती भयावह नरक आहे, हे त्यांना जाणवू लागते.

आणि जेव्हा हे जीवन कोणत्या दिशेने चालले आहे याची त्यांना जाणीव होते तेव्हाच मग ते त्याचा स्वीकार करतात, त्यांना जीवनाचे प्रयोजन समजते. मगाशी मी जीवनाचे जे प्रयोजन सांगितले आहे तेच जीवनाला स्वीकारार्ह बनवते. ते जर जीवनाचे प्रयोजन नसेल तर, जीवन हे खरोखरच एक भयंकर आपत्ती ठरेल.

– श्रीमाताजी (CWM 08 : 119-120)

श्रीमाताजी : मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात असू दे. ‘मी’चा शोध घेण्यासाठी कष्ट घ्या. तुमच्यासमोर जो मार्ग मी आखून दिला आहे त्यावर मार्गक्रमण करा. या कार्याइतके अन्य कोणतेच कार्य महत्त्वाचे नाही. याच्याशी तुलना करता इतर कोणतेच कार्य इतके महत्त्वाचे नाही. ‘ईश्वरा’चा शोध घ्यायचा. हेच जीवन आहे, हेच ध्येय आहे, हाच आनंदठेवा आहे. ‘ईश्वरा’वर निस्सीम ‘प्रेम’ करा जेणेकरून ‘तो’ नेहमीच तुमच्यासोबत राहील. सर्व कार्याचा कर्ता-करविता ‘तो’च असू द्यावा. ‘तो’ तुमच्यासोबत कर्म करतो. ‘तो’ तुमच्याबरोबर धडपड करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. ‘तो’ प्रत्येक पावलागणिक तुम्हाला मार्गदर्शन करतो. फक्त ‘ईश्वर’च.

– [The Supreme by Mona Sarkar : 97]

ज्या ‘ईश्वरा’च्या प्राप्तीची आपण इच्छा बाळगतो तो कोणी दूरस्थ आणि अप्राप्य नाही. ‘तो’ त्याच्या स्वनिर्मित सृष्टीच्या अंतस्थ गाभ्यात विद्यमान आहे आणि आपल्याकडून ज्या कृतीची त्याला अपेक्षा असते ती कृती म्हणजे ‘त्या’चा शोध. तसेच आपल्या व्यक्तिगत रूपांतरणाच्या साहाय्याने ‘त्या’ला जाणण्यास, ‘त्या’च्याशी एकत्व पावण्यास, आणि अखेरीस जाणीवपूर्वक ‘त्या’ला अभिव्यक्त करण्यास आपण समर्थ बनणे ही होय. याच गोष्टीसाठी आपण स्वतःला समर्पित केले पाहिजे, हेच आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन आहे. आणि या श्रेष्ठ साक्षात्काराच्या दिशेने पडणारे आपले पहिले पाऊल म्हणजे अतिमानसिक ‘चैतन्या’चे आविष्करण.

– श्रीमाताजी [CWM 13 : 347]

श्रीअरविंदांच्या लिखाणातील आणि श्रीमाताजींच्या संभाषणांमधील निवडक उताऱ्यांच्या आधारे येथे साधनेची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामधून श्रीअरविंद व श्रीमाताजींचे समग्र साहित्य वाचण्याची इच्छा वाचकांना होईल, अशी आशा आहे. किंवा त्यातील एखाद्या मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे ‘एकतरी ओवी अनुभवावी’ आणि त्या तत्त्वाला आपल्या चेतनेचा एक भाग बनवावे, असा प्रयत्न साधक करू शकतील.

साधनेची मुळाक्षरे – ०१

तत्त्वतः आपल्या जीवनाचे केवळ एकच खरे कारण आहे आणि ते म्हणजे – स्वतःला जाणणे. आपण कोण आहोत, आपण येथे का आहोत आणि आपल्याला काय केले पाहिजे, हे शिकण्यासाठीच आपण येथे आहोत. आणि जर आपल्याला हे उमगले नाही, तर आपले जीवन अगदीच पोकळ ठरते – आपल्यासाठी आणि इतरांसाठीदेखील!

*

जीवनाचे एक प्रयोजन आहे. ईश्वराचा शोध घेणे आणि त्याची सेवा करणे हेच ते प्रयोजन आहे.

ईश्वर दूर कोठे नाही, तर तो आपल्यामध्येच, खोल अंतरंगात आणि भावना व विचार यांच्या वरती आहे. ईश्वरासोबत शांती आणि आश्वासकता आहे आणि सर्व अडचणींवरील तोडगादेखील आहे.

तुमच्या सगळ्या समस्या ईश्वरावर सोपवा म्हणजे तो तुम्हाला सर्व अडचणींमधून बाहेर काढेल.

*

ईश्वराचा शोध घेण्याचा आणि त्याच्याशी ऐक्य पावण्याचा आनंद हे व्यक्तिगत जीवनाचे प्रयोजन असते. व्यक्तीला जेव्हा हे उमगते तेव्हा ती व्यक्ती सर्व अडचणींवर मात करण्याच्या सामर्थ्यप्राप्तीसाठी सज्ज होते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 15-16), (CWM 14 : 05), (CWM 16 : 423)