Tag Archive for: प्रयत्नसातत्य

व्यक्ती जे जे काही करते त्या सर्व गोष्टी ईश्वरार्पण करणे आणि असे करत असताना त्या मोबदल्यात कोणत्याही वैयक्तिक फलाची अपेक्षा न बाळगणे; हे असे जीवन जगणे म्हणजे ईश्वरासाठी जीवन जगणे. प्रारंभी, म्हणजे जेव्हा ईश्वर हा व्यक्तीच्या दृष्टीने केवळ एक शब्द असतो किंवा ईश्वर म्हणजे नुसती एक कल्पना असते, ईश्वराचा तिला प्रत्यक्ष अनुभव आलेला नसतो तेव्हा ईश्वरासाठी जीवन जगणे वगैरे गोष्टी या फक्त मानसिक असतात. पण व्यक्ती जर पुन्हापुन्हा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिली तर एके दिवशी तिला अनुभव येतो आणि तिला असे जाणवते की, ती जे अर्पण करत आहे ते कोणत्यातरी एखाद्या खऱ्याखुऱ्या, स्पर्शनीय, सघन आणि सर्वोपकारी अशा गोष्टीला अर्पण होत आहे.

व्यक्ती याबाबतीत जितकी जास्त प्रामाणिक आणि परिश्रमी असेल तितके अनुभव लवकर येतील आणि ते अधिक काळ टिकून राहतील. प्रत्येक व्यक्तिगणिक मार्गाच्या तपशिलांमध्ये फरक असतो पण प्रामाणिकपणा आणि प्रयत्नसातत्य, चिकाटी या गोष्टी सर्व मार्गांसाठी सारख्याच अपरिहार्य असतात.

• श्रीमाताजी (CWM 16 : 294)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १२

योगसाधनेचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असतो ज्ञानाचा व व्यक्तीच्या स्वत:च्या प्रयत्नांचा आणि दुसरा मार्ग असतो श्रीमाताजींवर भिस्त ठेवण्याचा. या दुसऱ्या मार्गामध्ये, श्रीमाताजींच्या शक्तीने आपल्यावर कार्य करावे म्हणून, व्यक्तीने आपले मन व हृदय आणि सर्वकाही श्रीमाताजींना अर्पण करणे अभिप्रेत असते तसेच सर्व अडीअडचणींच्या वेळी त्यांना आवाहन करणे आणि त्यांच्यावर श्रद्धा व भक्ती ठेवणे अभिप्रेत असते.

चेतनेची ही अशी तयारी होण्यासाठी सुरुवातीला वेळ लागतो, बरेचदा खूप काळ लागतो आणि त्या दरम्यान पुष्कळ अडचणी येऊ शकतात. परंतु व्यक्तीने प्रयत्नसातत्य ठेवले तर एक वेळ अशी येते की, जेव्हा सर्व तयारी झालेली असते, अशा वेळी ‘श्रीमाताजींची शक्ती‌’ व्यक्तीच्या चेतनेला पूर्णत: ईश्वराभिमुख करते. अशा वेळी, जे जे काही विकसित होणे आवश्यक असते ते ते सारे व्यक्तीच्या अंतरंगामध्ये विकसित होते, आध्यात्मिक अनुभूती येतात आणि त्यासोबतच ज्ञान येते आणि ईश्वराशी ऐक्य घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 200)

मानसिक परिपूर्णत्व – ०९

 

दोन शक्यता असतात. एक म्हणजे वैयक्तिक प्रयत्नांच्या दवारे शुद्धीकरण, पण याला बराच कालावधी लागतो. दुसरी शक्यता म्हणजे ईश्वरी कृपेने त्यामध्ये थेट हात घालणे, ही कृती सहसा अधिक जलद असते. या दुसऱ्या गोष्टीसाठी संपूर्ण समर्पण, आत्मदान यांची आवश्यकता असते. आणि त्यासाठी पुन्हा कशाची आवश्यकता असते तर ती म्हणजे, ईश्वरी शक्तीस कार्य करू देईल इतपत, बऱ्यापैकी शांत राहू शकेल अशा मनाची ! प्रत्येक पावलागणिक संपूर्ण एकनिष्ठ राहून, ईश्वरी शक्तीकार्यास साहाय्यकारी ठरेल असे मन असले पाहिजे, अन्यथा त्याने किमान स्थिर व शांत तरी राहिले पाहिजे. रामकृष्णांनी ज्या मांजरीच्या पिल्लासारख्या दृष्टिकोनाचा उल्लेख केला होता, त्या दृष्टिकोनाशी मिळतीजुळती अशी ही दुसरी अवस्था असते. ज्या व्यक्तींना, त्या जे काही करत असतात त्यामध्ये विचार आणि इच्छेच्या द्वारे खूप गतिशील हालचालींची सवय झालेली असते अशा व्यक्तींना या गतिविधी स्थिर करणे आणि मानसिक आत्मदानाची शांतता आत्मसात करणे अवघड जाते. त्यांना योगसाधना करता येणार नाही किंवा ते आत्मदानापर्यंत पोहोचू शकणार नाहीत असा याचा अर्थ नाही; मात्र शुद्धीकरण आणि आत्मदान पूर्णत्वास जाण्यासाठी त्यांना अधिक कालावधी लागतो; तेव्हा अशा व्यक्तींकडे धीर, स्थिर प्रयत्नसातत्य आणि सर्व गोष्टींच्या पार जाण्याचा निश्चय हवा, असा याचा अर्थ होय.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 83)