Tag Archive for: परिवर्तन

नैराश्यापासून सुटका – १९

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुमच्यामध्ये शक्ती व शांती अवतरित होत आहेत आणि तुमच्यामध्ये स्थिरावण्यासाठी त्या अधिकाधिक कार्य करत आहेत, असे स्पष्ट दिसत आहे. उदास राहावेसे वाटणे, आनंदी असण्याची भीती वाटणे यांसारख्या भावना, तसेच आपण अक्षम आहोत किंवा अपात्र आहोत अशा सूचना ही प्राणिक रचनेची (vital formation) नेहमीचीच आंदोलने असतात, पण ती आंदोलने म्हणजे तुम्ही नाही (हे ओळखा.) ती तुम्हाला अजमावण्यासाठी किंवा तुमच्यामधील परिवर्तन रोखण्यासाठी निर्माण होत आहेत. या ज्या सूचना येत आहेत त्यांचा स्वीकार करण्यास नकार द्यायचा आणि तुम्हाला मुक्त व आनंदी करणाऱ्या तुमच्यामधील ‘सत्या’च्या बाजूने तुम्ही चिकाटीने उभे राहायचे, एवढेच तुम्हाला करायचे आहे. तसे केलेत तर सारे काही ठीक होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 180)

नैराश्यापासून सुटका – १७

 

प्राण सहसा परिवर्तनाच्या हाकेला प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करतो, हाच बंडखोरी किंवा प्रतिकार याचा अर्थ आहे. आंतरिक इच्छेने आग्रह धरला आणि बंडखोरीला किंवा प्रतिकाराला प्रतिबंध केला तर, प्राणिक अनिच्छा बरेचदा नैराश्याचे आणि खिन्नतेचे रूप धारण करते. आणि जे शारीर-मन (physical mind) जुन्या कल्पना, सवयी, गतीविधी किंवा कृती यांच्या पुनरावृत्तीला आधार पुरवत असते त्याच शारीर-मनामधील प्रतिरोधाची साथ त्या अनिच्छेला मिळते. परिवर्तनाच्या हाकेला प्रतिसाद देण्याच्या भीतीमुळे किंवा आशंकेमुळे जेव्हा शारीर-चेतना (body consciousness) त्रस्त झालेली असते, तेव्हा ती त्या परिवर्तनाच्या हाकेपासून मागे सरकते किंवा मग तिच्यामध्ये एक प्रकारचा मंदपणा येतो, आणि ती त्या परिवर्तनाच्या हाकेचा स्वीकार करत नाही.

या गोष्टींपासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेतलीच पाहिजे. पण त्यासाठी, दुःखी किंवा खिन्न मनोदशा ही योग्य परिस्थिती नव्हे. दुःख, वेदना आणि आशंका, काळजी या सर्व भावनांपासून तुम्ही अलिप्त झाला पाहिजे, त्यांना नकार दिला पाहिजे आणि होणाऱ्या प्रतिरोधाकडे शांतपणे पाहिले पाहिजे. त्याचवेळी, तुमच्यामध्ये असलेल्या परिवर्तनाच्या संकल्पाला नेहमी बळकटी देत राहिले पाहिजे. ईश्वरी साहाय्य लाभल्यामुळे, त्या ईश्वरी साहाय्याद्वारे आज ना उद्या परिवर्तन घडून येईलच आणि त्यामध्ये अपयश येणारच नाही यावर भर दिला पाहिजे. तेव्हा मग, साऱ्या अडचणींवर मात करू शकेल असे सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 141)

नैराश्यापासून सुटका – ११

 

(एका साधकाला प्राणाच्या असहकार्यामुळे साधनेमध्ये ज्या अडचणी येत आहेत, त्याबाबत श्रीअरविंद यांनी केलेले मार्गदर्शन…)

तुमच्या शारीर-व्यवस्थेमध्ये काहीशी तामसिकता किंवा सुस्ती येताना दिसते आहे. प्राण (vital) त्याच्या परिस्थितीवर किंवा त्याला जे काही प्राप्त झाले आहे त्याबाबत असमाधानी असेल तर, काहीवेळा असे घडून येते. “मी संतुष्ट नाही, त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीत रस घेणार नाही आणि काहीही करण्यासाठी तुला मदत करणार नाही,” असे म्हणत, तो एक प्रकारे असहकार किंवा निष्क्रिय प्रतिकार करायला सुरूवात करतो.

*

परिवर्तनाची जी हाक तुम्हाला आली आहे, त्याबद्दल तुमच्यामधीलच एखादा प्रतिरोध करणारा भाग (पूर्ण नव्हे तर एखादा भागच) अजूनही असमाधानी आहे; त्यामुळे तुमच्यामध्ये ही चलबिचल, (अस्वस्थतेची) आंदोलने निर्माण होत आहेत. जेव्हा एखाद्या प्राणिक घटकाला परिवर्तनाची हाक दिली जाते किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी त्याला भाग पाडले जाते, मात्र तसा बदल करण्यास अद्यापि तो इच्छुक नसतो; आणि जेव्हा तो नाराज व असमाधानी असतो तेव्हा, प्रतिसाद न देण्याची किंवा सहकार्य न करण्याची प्राणाची प्रवृत्ती असते. तसेच प्राणिक जोम नसल्यामुळे शारीरिक घटक हा देखील निरस आणि संवेदनाहीन ठरतो. (परंतु) आंतरात्मिक दबावामुळे प्रतिरोधाचे हे उरलेसुरले अवशेषदेखील निघून जातील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 139, 138)

जीवन जगण्याचे शास्त्र – २०

(मानसिक आणि प्राणिक अविचलता म्हणजे काय ते कालच्या भागात आपण समजावून घेतले. आता हा त्याचा पुढील भाग…)

तुम्ही जडता अथवा सुस्त निष्क्रियता या गोष्टींना स्थिरशांती (calm) समजण्याची गल्लत कधीही करू नका. अविचलता (Quietude) ही अत्यंत सकारात्मक स्थिती असते. संघर्ष नाही म्हणजे आता शांती आहे असा येथे अर्थ नसून, ती खऱ्या अर्थाने सकारात्मक शांती असते. ती शांती सक्रिय, संक्रमणशील, शक्तिशाली असते; ती प्रत्येक गोष्ट सुव्यवस्थित करते, संघटित करते, त्यावर नियंत्रण ठेवते आणि स्थिरता आणते. मी नेहमी त्या स्थिरशांतीबद्दल सांगत असते.

मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला सांगते की, “शांत व्हा,” तेव्हा “जा आणि झोप काढा, सुस्त व निष्क्रिय व्हा आणि काहीही न करता नुसते बसून राहा;” असे काही मला सांगायचे नसते. खरंतर, मला याच्या अगदी विरूद्ध सांगायचे असते. खरी स्थिरता, अविचलता ही एक फार मोठी शक्ती असते, ते एक फार मोठे सामर्थ्य असते.

खरंतर या समस्येकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिले तर असे म्हणता येते की, जे खरोखरच खूप बलवान, सशक्त, शक्तिशाली असतात ते नेहमीच स्थिरशांत असतात. जे दुर्बल असतात तेच प्रक्षुब्ध असतात. तुम्ही जेव्हा खरोखरच सुदृढ, सशक्त बनता तेव्हा शांतियुक्त, शांत, स्थिर होता आणि तेव्हा, तुम्हाला अस्वस्थ करण्याच्या इराद्याने बाहेरून तुमच्यावर धावून येणाऱ्या विरोधी लाटांचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारी तग धरून राहण्याची क्षमता तुमच्यापाशी असते.

खरी अविचलता ही नेहमी शक्तीची खूण असते. बलवान व्यक्तींकडेच स्थिरशांती असते. आणि हे अगदी प्राकृतिक क्षेत्रामध्येसुद्धा (physical field) तितकेच खरे असते. सिंह, वाघ, हत्ती यांसारख्या प्राण्यांचे तुम्ही निरीक्षण केले आहे की नाही मला माहीत नाही, पण जेव्हा ते सक्रिय नसतात, तेव्हा ते नेहमीच पूर्णतया शांत असतात, स्तब्ध असतात. एखादा सिंह जेव्हा स्वस्थ बसून तुमच्याकडे पाहत असतो तेव्हा जणूकाही तो तुम्हाला म्हणत असतो, “किती अस्वस्थ आहात तुम्ही!” तो तुमच्याकडे अशा शहाणीवेच्या प्रशांत वातावरणात पाहत राहतो. आणि तेथे त्याची सारी ताकद, ऊर्जा, शारीरिक सामर्थ्य या गोष्टी एकवटलेल्या, गोळा झालेल्या आणि केंद्रित झालेल्या असतात आणि जेव्हा त्याला आज्ञा दिली जाते तेव्हा कोणत्याही क्षोभाशिवाय कृती करण्यासाठी तो सज्ज असतो.

मी अशी अनेक माणसं पाहिली आहेत की, जी अर्धा तास सुद्धा चुळबूळ न करता शांत बसू शकत नाहीत. ते पाय तरी हलवतील, हात किंवा डोकंतरी हलवतील; त्यांना सातत्याने सर्वकाळ अस्वस्थपणे हालचाली करत राहावे लागते, कारण त्यांच्यापाशी स्थिरशांत बसण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती किंवा सामर्थ्य नसते. आवश्यक असेल तेव्हा स्तब्ध राहायचे, स्वतःच्या सर्व ऊर्जा एकत्रित करायच्या आणि तुमच्या इच्छेनुसार त्या खर्च करायच्या. तुम्हाला जर आवश्यक असेल तर पूर्णपणे; अन्यथा, तुम्हाला अमुक एक कृती करण्यासाठी आवश्यकता असेल त्या प्रमाणात त्या खर्च करायच्या; आणि प्रत्येक कृतीमध्येसुद्धा परिपूर्ण स्थिरशांती बाळगायची, ही नेहमीच सामर्थ्याची खूण असते. ते सामर्थ्य शारीरिक किंवा प्राणिक किंवा मानसिक असू शकते. परंतु तुम्ही थोडेजरी क्षुब्ध, अस्वस्थ असाल तर तुम्ही कोणत्यातरी एखाद्या बाबतीत दुर्बल आहात हे खात्रीने धरून चाला. आणि तुमची अस्वस्थता जर सर्वांगीण असेल तर तुम्ही पूर्णतः दुर्बल आहात असे समजा.

– श्रीमाताजी (CWM 08 : 329-330)

जीवन जगण्याचे शास्त्र – १८

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

जे मन अस्वस्थतेपासून, त्रासापासून मुक्त आहे; जे स्थिर, प्रकाशमान, आनंदी आणि उत्साही आहे; परिणामत: जे तुमच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या शक्तीप्रत खुले आहे, असे (अविचल) मन मला येथे अभिप्रेत आहे.

त्रस्त करणारे विचार, चुकीच्या भावभावना, कल्पनांचा गोंधळ, दुख:कारक गतिप्रवृत्ती यांच्या नेहमी होणाऱ्या आक्रमणापासून सुटका करून घेणे ही गोष्ट महत्त्वाची असते. या गोष्टींमुळे तुमची प्रकृती प्रक्षुब्ध होते, त्यावर एक प्रकारचे सावट येते आणि त्यामुळे ईश्वरी शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करणे अधिक कठीण जाते. पण तेच मन जर का अविचल असेल, शांतिपूर्ण असेल तर, ईश्वरी शक्ती अधिक सहजतेने, सुकरतेने कार्य करू शकते.

तुमच्यामधील ज्या गोष्टींमध्ये परिवर्तन घडविणे आवश्यकच आहे, त्या गोष्टींकडे अस्वस्थ न होता किंवा निराश न होता पाहणे तुम्हाला जमले पाहिजे; म्हणजे मग ते परिवर्तन अधिक सहजतेने होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 160-161)

जीवन जगण्याचे शास्त्र – १७

तुमच्या साधनेच्या दृष्टीने कोणती गोष्ट करणे योग्य आहे हे तुमच्या मनाला कसे काय कळू शकेल किंवा मन ते कसे ठरवू शकेल बरे? अशा प्रकारच्या विचारांमध्येच जर तुमचे मन गुंतून राहिले तर आणखीनच गोंधळ उडेल. साधनेमध्ये मन हे स्थिरशांत असले पाहिजे आणि ते ईश्वराविषयीच्या अभीप्सेवर दृढ असले पाहिजे. मन स्थिरशांत असताना, खरी अनुभूती आणि खरे परिवर्तन या गोष्टी अंतरंगातून आणि वरून घडून येतील.
*
व्यक्ती आत्म्यामध्ये धीर-स्थिर असावी यासाठी, मनाची अविचलता आणि बाह्यवर्ती प्रकृतीपासून आंतरिक पुरुषाची विलगता या गोष्टी अतिशय साहाय्यकारी, किंबहुना अत्यावश्यक असतात. जोपर्यंत व्यक्ती ही विचार-वावटळीच्या अधीन असते किंवा प्राणिक गतिविधींच्या गोंधळाच्या अधीन असते तोपर्यंत ती आत्म्यामध्ये धीर-स्थिर राहू शकत नाही. स्वतःला त्यापासून निर्लिप्त करणे, त्यापासून मागे होणे आणि आपण या वैचारिक किंवा प्राणिक वादळांपासून स्वतंत्र, निराळे आहोत असे व्यक्तीला जाणवणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 28), (CWSA 29 : 160)

जीवन जगण्याचे शास्त्र – १५

सदोदित शांत, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण असणे; अस्वस्थ नसणे, तक्रार न करणे, निराश न होणे; श्रीमाताजींच्या शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करू देणे; तुम्हाला मार्गदर्शन करू देणे; तुम्हाला ज्ञान, शांती आणि आनंद प्रदान करू देणे म्हणजे श्रीमाताजींप्रति उन्मुख, खुले असणे. तुम्ही जर स्वतःला उन्मुख, खुले (open) राखू शकत नसाल तर, त्यासाठी सातत्याने पण शांतपणे अभीप्सा बाळगा.
*
चेतना ईश्वराप्रति खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 151), (CWSA 29 : 208)

साधना, योग आणि रूपांतरण – २५९

प्राणाचे रूपांतरण

पृथ्वी-चेतनेला परिवर्तन नको असते आणि त्यामुळे वरून जे काही अवतरित होते त्यास ती नकार देते. आत्तापर्यंत ती नेहमीच हे असे करत आली आहे. ज्यांनी योगाचे आचरण करण्यास सुरुवात केली आहे ते जर स्वतःस उन्मुख करतील आणि त्यांच्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये परिवर्तन करण्यास राजी होतील तरच पृथ्वी-चेतनेमधील ही अनिच्छा नाहीशा होऊ शकेल.

या परिवर्तनामध्ये कोणती गोष्ट आड येते? तर, प्राणिक अहंकार आणि त्याचे अज्ञान आणि त्याच्या अज्ञानाचा त्याला असणारा अभिमान ही गोष्ट आड येते. परिवर्तनाच्या कोणत्याही आवाहनास विरोध व प्रतिकार करणारी शारीरिक चेतना आणि तिचे जडत्व, आणि तिचा आळशीपणा, की ज्याची कोणतेही कष्ट घेण्याची तयारी नसते या गोष्टीसुद्धा परिवर्तनाच्या आड येतात. शारीर-चेतनेला त्याच त्याच जुन्या गतिविधी पुन्हा पुन्हा करत राहणे सोयीस्कर वाटते. ती जास्तीत जास्त काय करते तर, तिच्यासाठी कधीतरी कोणीतरी, कोणत्यातरी प्रकारे सर्वकाही करेल अशी ती अपेक्षा करत असते.

आणि म्हणूनच पहिली आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे तुमच्यापाशी योग्य असा आंतरिक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि नंतर, स्वतःचे रूपांतरण करण्याची इच्छा असणे, आणि कनिष्ठ प्रकृतीचा तामसिक चिवटपणा व अहंकार यांच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींचे आकलन आणि त्याला नकार देण्यामधील सतर्कता या गोष्टी आवश्यक असतात. अंतिमतः, तुमचे व्यक्तित्व, त्याचा प्रत्येक भाग हा सदोदित श्रीमाताजींप्रत खुला असला पाहिजे; जेणेकरून रूपांतरणाच्या प्रकियेमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 222)

साधना, योग आणि रूपांतरण – २३६

फक्त उच्चतर चेतनेचे अनुभव आल्यामुळे, प्रकृतीमध्ये परिवर्तन होणार नाही. ज्यांद्वारे हे परिवर्तन घडून येऊ शकते असे पुढील चार मार्ग असतात :
१) एकतर, उच्चतर चेतनेने समग्र अस्तित्वामध्ये गतिशील अवतरण करून, त्या अस्तित्वाचे परिवर्तन केले पाहिजे.
२) किंवा मग, उच्चतर चेतनेने आंतरिक शरीरापर्यंत खाली उतरून, स्वतःला आंतरिक अस्तित्वामध्ये प्रस्थापित केले पाहिजे त्यामुळे आपण बाह्य (स्थूल) शरीरापासून विलग आहोत असा अनुभव आंतरिक शरीराला येऊ शकेल आणि ते बाह्य शरीरावर मुक्तपणे कार्य करू शकेल.
३) किंवा अंतरात्मा अग्रस्थानी आला पाहिजे आणि त्याने प्रकृतीचे परिवर्तन घडविले पाहिजे;
४) किंवा मग, आंतरिक इच्छा जागृत होऊन तिने प्रकृतीस परिवर्तन करण्यास भाग पाडले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 23)

साधना, योग आणि रूपांतरण – २३३

फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते घातकच ठरले आहे.

काही विशिष्ट प्रमाणात ध्यान-एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टी आवश्यक असतात. परंतु कर्माविना, कोणतेही कार्य न करता प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तन झाले आणि त्यानंतर जर व्यक्ती लोकांच्या संपर्कामध्ये आली तरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.

व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असली तर, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. सर्व कर्मं जी श्रीमाताजींना अर्पण केली जातात आणि जी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या शक्तिनिशी केली जातात ती सर्व कर्मं एकसमान असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)