Tag Archive for: नैतिक शिक्षण

 

(विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण कसे द्यावे हे श्रीअरविंद यांनी सांगितले होते, ते आपण कालच्या भागात विचारात घेतले. त्या संदर्भात ते पुढे लिहीत आहेत…)

मुलांच्या अंतरंगात उठणाऱ्या नैतिक भावावेगांना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची संधी – भलेही मग ती संधी त्यांच्या मर्यादित क्षेत्रातील का असेना – जोपर्यंत त्यांना दिली जात नाही तोपर्यंत नैतिक शिक्षणाचा प्रभाव त्यांच्यावर पूर्ण क्षमतेने पडू शकत नाही. ब्राह्मणाकडे असणारी ज्ञानतृष्णा, आत्म्याप्रत असणारी भक्ती, शुचिर्भूतता, त्यागबुद्धी; क्षत्रियाकडे असणारे धैर्य, साहस, सन्मान, उदात्तता, दाक्षिण्य, देशभक्ती; वैश्याकडे असणारी परोपकारवृत्ती, कौशल्य, उद्योग, दानशूरतेचे उपक्रम आणि सढळपणा; आणि शूद्राने स्वत:ला विसरून अगदी नि:स्वार्थपणे व प्रेमळपणाने केलेली सेवा या सर्व गोष्टी म्हणजे आर्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत.

आम्ही आपल्या संपूर्ण राष्ट्रामध्ये आपल्या युवकांमध्ये अशाच प्रकारची नैतिक वृत्ती असावी अशी इच्छा बाळगत आहोत. पण आर्य परंपरेनुसार स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी जोपर्यंत आपण या युवकांना देत नाही तोपर्यंत आपल्याला ती तशी वृत्ती त्यांच्यामध्ये कशी काय आढळून येईल? मोठे झाल्यानंतर त्यांची जीवने ज्या द्रव्याने घडली जावीत असे आपण अपेक्षित करत आहोत तशी जीवने बालपणी व कुमारवयामध्ये त्यांना परिचित झालेल्या मूल्यांच्या आधारे घडविण्याची संधी आपण त्यांना दिली पाहिजे. म्हणूनच, प्रत्येक मुलाला, त्याच्या प्रकृतीमध्ये जे सर्वोत्तम आहे त्याचे विकसन करण्यासाठी बौद्धिक प्रोत्साहन दिले गेले पाहिजे आणि त्याला प्रत्यक्ष व्यवहारात देखील तशी संधी दिली गेली पाहिजे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 01 : 391)

विद्यार्थ्यांना सदाचरणासाठी प्रेरित केले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांच्यावर कोणतीही गोष्ट लादता कामा नये किंवा त्यांच्यावर जबरदस्तीसुद्धा करता कामा नये; हा नैतिक शिक्षणाचा पहिला नियम आहे.

स्वतःच्या नैतिक आचरणाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उदाहरण घालून देणे, रोजच्या रोज त्यांच्याशी संवाद साधणे आणि पुस्तकांच्या आधारे त्यांच्यासमोर काही आदर्श ठेवणे ही नैतिक शिक्षण देण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे.

या पुस्तकांमध्ये लहान मुलांसाठी भूतकाळातील भव्योदात्त उदाहरणे असली पाहिजेत आणि ती उदाहरणे नैतिक धडे म्हणून असता कामा नयेत तर, त्यामध्ये विद्यार्थ्यांना गोडी वाटली पाहिजे. आणि कुमार वयातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पुस्तकांमध्ये महान व्यक्तींचे महान विचार असले पाहिजेत; त्यांच्या उच्चतम भावनांना प्रज्वलित करतील असे, सर्वोच्च आदर्शांप्रत आणि आकांक्षाप्रत त्यांना प्रेरित करतील असे साहित्यामधील उतारे त्यामध्ये असले पाहिजेत. तसेच उच्चतर आदर्श, उदात्त भावभावना आणि महान विचार जिथे मूर्तरूपात आलेले आढळतील; अशी उदात्त उदाहरणे ज्यामधून दिसून येतील अशा प्रकारच्या इतिहासातील नोंदी आणि चरित्रं यांचा समावेश त्यामध्ये असला पाहिजे. हा एक उत्तम प्रकारचा सत्संग असतो आणि त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात त्याद्वारे तात्पर्य सांगणे, उपदेश देणे टाळले पाहिजे. शिक्षक विद्यार्थ्यांसमोर ज्या महान गोष्टींचे उदाहरण ठेवत असतील त्याच गोष्टींद्वारे खुद्द त्या शिक्षकाच्या वैयक्तिक जीवनाची जडणघडण झाली असेल तर त्या गोष्टींचा मुलांवर होणारा परिणाम शतगुणित होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 01 : 390-391)

(‘अतिमानस आविष्करण आणि पूर्णत्व-संपादन’ या विषयी श्रीअरविंद लिखित एका उताऱ्याचे वाचन श्रीमाताजींनी केले. त्या उताऱ्यामध्ये मन, प्राण तसेच शरीर या आधाराचे महत्त्व प्रतिपादन करण्यात आले होते. त्याच दृष्टीने ‘श्रीअरविंद आश्रमा’त व्यायाम, योग-आसने, प्राणायामादी शरीर-साधनेला महत्त्व दिलेले आढळते. या पार्श्वभूमीवर पुढील संवाद झालेला आहे.)

साधक : माताजी, प्रगतीसाठी क्रीडा-स्पर्धा आवश्यक आहेत का ?

श्रीमाताजी : नैतिक शिक्षणाच्या दृष्टीने विचार करता, खरंतर, त्या आवश्यक असतात कारण जर एखाद्याने त्या स्पर्धांमध्ये योग्य वृत्तीने सहभाग घेतला तर स्वत:च्या अहंकारावर ताबा मिळविण्याची ती एक उत्तम संधी असते. पण स्वत:च्या दुर्बलता व कनिष्ठ वृत्ती ह्यांच्यावर मात करण्याच्या भूमिकेतून त्याकडे न पाहता, जर का एखादा नुसताच खेळत राहिला तर साहजिकच आहे की, त्याला त्यांपासून कसा व काय फायदा करून घ्यायचा ते माहीत नसेल आणि त्यामुळे त्याला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. परंतु कोणत्याही हीन प्रकारच्या प्रवृत्तींशिवाय, म्हणजे द्वेषभाव वा महत्त्वाकांक्षा न बाळगता, जर एखादा योग्य वृत्तीने खेळायची इच्छा बाळगेल; एखादा जर, ज्याला ‘खिलाडू वृत्तीने खेळलेला नि:पक्षपाती खेळ’ (fair play) असे म्हटले जाते अशा अभिवृत्तीने (spirit) खेळ खेळेल, म्हणजेच सर्वोत्तम तेच करण्याचा प्रयत्न करणे आणि यशापयशाची चिंता न करणे, अशी अभिवृत्ती राखेल; समजा त्याला यश मिळाले नाही किंवा त्याला अनुकूल अशा गोष्टी घडल्या नाहीत तरी त्यामुळे अस्वस्थ न होता तो जर प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकेल, तर त्या गोष्टी उपयुक्त ठरतील. याचा परिणाम म्हणून, या अशा स्पर्धांमधून, स्व-नियंत्रण व कर्मफलापासून अलिप्तवृत्ती या गुणांनी व्यक्ती संपन्न होईल. या गोष्टी व्यक्तीचे असामान्य चारित्र्य घडविण्यामध्ये अतिशय साहाय्यकारी ठरतात.

अर्थातच, तुम्ही जर त्या स्पर्धा अगदी सामान्य पद्धतीने, सर्व प्रकारच्या सामान्य व हीन क्रियाप्रतिक्रिया राखत खेळलात, तर त्यांपासून तुम्हाला काहीच लाभ होणार नाही. पण हे तर कोणत्याही कृतीबाबत म्हणता येईल. मग ते खेळात असो किंवा बौद्धिक क्षेत्रात असो, जर कोणी कोणतीही कृती सामान्य पद्धतीने करेल, तर तसे करणे म्हणजे वेळ वाया घालावणेच आहे.

पण जर तुम्ही स्पर्धेमध्ये, वा सामूहिक क्रीडास्पर्धांमध्ये योग्य वृत्तीने खेळलात, योग्य वृत्तीने सहभागी झालात तर, ते एक चांगले शिक्षण आहे कारण ते तुम्हाला विशेष प्रयत्न करायला आणि तुमच्या स्वत:च्या अशा मर्यादा ओलांडण्यास भाग पाडते. ज्या एरवी बहुधा सुप्तच राहिल्या असत्या अशा तुमच्यातील बऱ्याच गोष्टींबाबत, हालचालींबाबत सजग करण्याकरता तुम्हाला मिळालेली ती एक नक्कीच उत्तम संधी असते. पण अर्थातच, तुम्हाला मिळालेली ही एक संधी आहे आणि प्रगतीचे साधन आहे हे तुम्ही कधीही विसरता कामा नये.

जर तुम्ही स्वत:ला नुसतेच मोकळे सोडलेत आणि सामान्य पद्धतीनेच, नुसतेच खेळत राहिलात तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालविता आहात. पण हे सर्वच बाबतीत खरे आहे; केवळ खेळाबाबत आहे असे नाही, अगदी अभ्यास आणि इतर सर्व बाबतीतसुद्धा तेच खरे आहे. एखादा काय करतो यापेक्षा तो त्या गोष्टी कशा करतो, तो कोणत्या वृत्तीने त्या गोष्टी करतो यावर सारे काही अवलंबून असते.

…कोणतीही महत्त्वाकांक्षा बाळगू नका, कोणतेही ढोंग करू नका, आव आणू नका, प्रत्येक क्षणी तुमच्यातील चरम स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. कोणतेही काम करीत असताना अशा स्थितीत राहणे, ही सर्वांगीण जीवनाच्या दृष्टीने आदर्श स्थिती आहे. आणि अशी स्थिती जर एखाद्याला साध्य झाली तर, तो पूर्णत्वाच्या मार्गावर फार पुढे निघून गेला आहे हे निश्चित…. पण अर्थातच हे सारे खरोखर प्रामाणिकपणे करायचे असेल तर, एक प्रकारची आंतरिक परिपक्वता आवश्यक आहे.

– श्रीमाताजी [CWM 09 : 97-98]