Tag Archive for: निरीक्षण

 

(उत्तरार्ध…)

बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची सामान्य संवेदना असते. ही अशी संवेदना सहसा नेहमीच आढळून येते. शरीराची वास्तविकता हीच व्यक्तीला तिची स्वतःची वास्तविकता वाटत असते.

व्यक्ती जेव्हा आंतरिक प्रगतीसाठी प्रयत्न करते आणि शरीराहूनही अधिक स्थायी असणाऱ्या अशा कोणत्यातरी गोष्टीचा शोध घेण्याचा ती प्रयत्न करते, तेव्हा मग व्यक्तीला युगायुगांपासून चालत आलेल्या आणि अनेक परिवर्तने घडूनदेखील नित्य सचेत असणाऱ्या एका गोष्टीची जाणीव होऊ लागते आणि मग तिला वाटू लागते की, ही गोष्ट म्हणजेच ‘मी’ असणार. परंतु अशी जाणीव होण्यासाठीसुद्धा खूप गहन अभ्यासाची आवश्यकता असते.

अन्यथा “मी अमुक गोष्ट करणार आहे, मला ही गोष्ट गरजेची आहे,” असा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा, नेहमीच तो शारीरिक स्तरावरील विचार असतो. त्यावेळी तेथे विविध संवेदना, कमीअधिक गोंधळलेल्या संवेदनांच्या प्रतिक्रिया व त्यांचे मिश्रण असणारी अशी एक प्रकारची इच्छा आणि त्याहूनही अधिक गोंधळलेले विचार या सगळ्याचे मिळून एक कडबोळं तयार झालेले असते. या सर्व गोष्टी आवेग, आकर्षण, इच्छावासना आणि एक प्रकारची इच्छाशक्ती यांनी संचालित व्हायला लागतात आणि काही क्षणांसाठी अप्रत्यक्ष्यरित्या या सर्व गोष्टी म्हणजेच तुमचा ‘मी’ झालेला असतो. कारण डोकं, धड, हातपाय आणि चलनवलन करणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून स्वतंत्र असणाऱ्या ‘मी’चा विचारच तुम्ही कधी करू शकत नाही. कारण या सगळ्या गोष्टींशी तुम्ही खूप घट्टपणे जोडलेले असतात.

मात्र पुष्कळ विचार केल्यानंतर, खूप गोष्टी पाहिल्यानंतर, खूप अभ्यास केल्यानंतर, खूप निरीक्षण केल्यानंतर मग तुम्हाला जाणीव व्हायला लागते की, त्यापैकी एक गोष्ट ही अन्य गोष्टीपेक्षा कमीअधिक प्रमाणात स्वतंत्र आहे आणि त्या गोष्टीच्या पाठीमागे असणारी इच्छाशक्ती, अमुक एखादी कृती करायची की करायची नाही हे ठरवू शकते. आणि तेव्हा मग तुम्ही त्या (अस्थायी) प्रेरणेशी, हालचालीशी, त्या कृतीशी पूर्णपणे समरस होऊ शकत नाही. कारण त्या साऱ्या गोष्टी काहीशा अस्थायी आहेत, याची आता तुम्हाला जाणीव झालेली असते. परंतु हे लक्षात येण्यासाठी, तुम्ही खूप निरीक्षण केले पाहिजे.

आणि त्यानंतरही तुम्ही आणखी निरीक्षण करत राहिले पाहिजे. तेव्हा तुम्हाला असे आढळेल की, तिथे असणारी ही जी दुसरी (अधिक स्थायी) गोष्ट आहे, एक प्रकारची सक्रिय सचेत इच्छाशक्ती म्हणून जी आहे, ती आणखीन एका तिसऱ्याच कोणत्यातरी गोष्टीमुळे संचालित होत आहे. ती या सक्रिय सचेत इच्छाशक्तीचे निरीक्षण करत असते, मूल्यमापन करत असते, निर्णय घेत असते आणि तिचे निर्णय हे ज्ञानाच्या अधिष्ठानावर घेण्याचा ती प्रयत्न करत असते. परंतु हे खूप नंतर घडून येते.

जेव्हा तुम्हाला ही ‘तिसरी गोष्ट’ दिसू लागते, तेव्हा तुमच्या लक्षात येते की, तिच्यामध्ये त्या दुसऱ्या (अधिक स्थायी) गोष्टीला म्हणजे सक्रिय इच्छाशक्तीला चालना देण्याची शक्ती आहे आणि एवढेच नाही तर, क्रियाप्रतिक्रियांवर, भावभावना, संवेदना यांच्यावर तिचे अगदी थेटपणे आणि अतिशय महत्त्वाचे कार्य चालते. तुम्हाला हेदेखील आढळते की, (लक्ष ठेवून असणारी, निरीक्षण करणारी, मूल्यमापन करणारी आणि निर्णय घेणारी ही जी तिसरी गोष्ट आहे) ती सरतेशेवटी अस्तित्वाच्या सर्वच गतिविधींवर नियंत्रण ठेवू शकते.

ही नियंत्रणाची सुरुवात असते. व्यक्ती जेव्हा याबाबत सचेत होते तेव्हा तिला या सर्वाचे मूळ गवसलेले असते. आणि आता जेव्हा व्यक्ती नियंत्रणाबाबत बोलत असते तेव्हा तिला समजू शकते की, “हां, या (तिसऱ्या) गोष्टीकडे नियंत्रणशक्ती आहे.” अशा पद्धतीने व्यक्ती स्वत:चे निरीक्षण करायला शिकते.

• श्रीमाताजी (CWM 09 : 310-311)

 

(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट करत आहेत. हा भाग काहीसा विस्तृत असल्याने तो क्रमश: देत आहोत.)

मनुष्याकडे जीवन जगत असतानाच स्वतःचे निरीक्षण करण्याची मानसिक क्षमता असल्यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो, हे अगदी उघड आहे. प्राणी सहजस्वाभाविकपणे, आपोआप जीवन जगत असतात. एखाद्या प्राण्याला अपघातामुळे किंवा आजारपणामुळे जरी वेदना सहन कराव्या लागल्या तरी, त्या वेदना तुलनेने कमी असतात. कारण तो प्राणी त्या दुःखाचे निरीक्षण करू शकत नाही किंवा तो स्वतःच्या चेतनेमध्ये त्या वेदनांचे प्रक्षेपण करू शकत नाही किंवा त्यामुळे पुढे काय होईल याची चिंता तो करत बसत नाही. झालेल्या अपघाताविषयी किंवा आलेल्या आजारपणाविषयी तो कोणतेही तर्कवितर्क करत नाही. क्वचित एखाद्या प्राण्याने जीवन जगत असताना समजा स्वतःचे निरीक्षण केलेच तरी, ते नक्कीच अगदी एखाद-दुसरा क्षण इतके किंवा अगदी नगण्य प्रमाणात असणार. म्हणूनच प्राण्यांना कोणतीही चिंता भेडसावत नाही आणि ते शांतपणे जीवन जगू शकतात.

पण मनुष्याच्या जन्माबरोबरच ‘उद्या काय होणार आहे,’ याची एक अखंड चिंता उदयास आली आहे. ही चिंता हे त्याच्या दुःखकष्टाचे एकमेव कारण नसले तरी ते एक मुख्य कारण आहे. स्वतःकडे वेगळे होऊन पाहता येण्याच्या या चेतनेमुळे मनुष्यामध्ये हुरहुर, दुःखदायक कल्पना, चिंता, त्रास, भविष्यातील संकटांची चाहूल या गोष्टी सुरू झाल्या आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणून बहुतांशी माणसं, – म्हणजे कमी सचेत, सजग (conscious) असणारी माणसंच नव्हेत तर अतिशय सचेत, सजग असणारी माणसंदेखील – कायमच चिंताग्रस्त होऊन जीवन जगत असतात.

मनुष्य एकीकडे इतका सचेत आहे की, तो या सगळ्यापासून अलिप्त राहू शकत नाही आणि दुसरीकडे, उद्या काय घडून येणार आहे हे त्याला निश्चितपणे ज्ञात होईल, एवढाही तो सचेत नाही. खरोखर, पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांमध्ये मनुष्य हा सर्वात दुःखीकष्टी प्राणी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मनुष्याला त्याच्या अशा असण्याची सवय झाली आहे; कारण त्याची ही जी अवस्था आहे ती त्याला त्याच्या पूर्वजांकडूनच वारसारूपाने मिळालेली आहे. खरोखरच ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. (परंतु मनुष्याला आणखी एक क्षमता प्रदान करण्यात आलेली आहे, त्याचा विचार आपण उद्याच्या भागात करू.) (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 303)

साधक : आध्यात्मिक जीवनासाठी स्वत:ला सज्ज करायचे तर त्यासाठी कोणत्या मूलभूत सद्गुणाची जोपासना केली पाहिजे?

श्रीमाताजी : वास्तविक मी ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे, पण त्याबद्दल पुनश्च एकदा सांगण्याची ही संधी आहे. तो गुण आहे प्रामाणिकपणा (sincerity). हा प्रामाणिकपणा निरपेक्ष आणि परिपूर्ण असला पाहिजे, कारण प्रामाणिकपणा हेच अध्यात्म-मार्गावरील तुमचे एकमेव संरक्षण असते.

तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर अगदी पुढच्याच पावलावर तुम्ही पडणार व तुमचा कपाळमोक्ष होणार हे निश्चित. आपल्या सभोवार सर्व प्रकारच्या शक्ती, इच्छा, प्रभाव, जीव वावरत असतात आणि तुमच्या प्रामाणिकपणामध्ये एखादी तरी लहानशी फट आढळते का, याच्या ते शोधातच असतात आणि तशी फट दिसताच तिच्यामधून ते झपाट्याने तुमच्यामध्ये शिरकाव करतात आणि तुम्हाला गोंधळात टाकतात.

म्हणून, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी, कोणत्याही गोष्टीला प्रारंभ करण्यापूर्वी, कोणतीही गोष्ट करून पाहताना सर्वप्रथम याची खात्री करून घ्या की, तुम्ही प्रामाणिक आहात ना? आणि एवढेच नव्हे तर, अधिकाधिक प्रामाणिक बनण्याचा तुम्ही प्रयत्न कराल ना? (तुम्हाला स्वत:बद्दल ही खात्री पटणे आवश्यक आहे.) कारण प्रामाणिकपणा हेच तुमचे एकमेव संरक्षण असते.

– श्रीमाताजी (CWM 08 : 247-248)

आत्मसाक्षात्कार – १५

साधक : आम्ही जेव्हा कोणताही एखादा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्यामध्ये असे काहीतरी असते की, ते लगेचच स्वत:वर खूष होऊन जाते, बढाया मारू लागते आणि एवढ्या-तेवढ्या प्रयत्नांनीच संतुष्ट होऊन जाते आणि परिणामी सारे काही बिघडून जाते. तेव्हा यापासून सुटका कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : आपण जेव्हा काहीतरी करत असतो तेव्हा आपल्यातीलच कोणीतरी त्यावर सदोदित लक्ष ठेवत असतो, निरीक्षण करत असतो. आणि मग कधीकधी तो गर्वाने फुलून जातो. तेव्हा साहजिकच, आपल्या प्रयत्नांमधील सामर्थ्य पुष्कळ प्रमाणात कमी होते.

काम करत असताना, जीवन जगत असताना व्यक्तीला स्वत:चे निरीक्षण करण्याची सवय असते. स्वत:चे निरीक्षण केलेच पाहिजे; परंतु त्याहूनही अधिक आवश्यक असते ते संपूर्णपणे प्रामाणिक राहण्याचा व सहजस्वाभाविक असण्याचा प्रयत्न करणे. व्यक्ती जे काही करत असते त्याबाबत ती अगदी सहजस्वाभाविक असली पाहिजे; म्हणजे व्यक्तीने सतत स्वत:चे निरीक्षण करत राहणे, स्वत:ला जोखत राहणे, स्वत:चे मूल्यमापन करत राहणे, कधीकधी तर खूपच कठोरपणे मूल्यमापन करणे, असे करू नये. खरेतर, स्वत:वरच खुश होऊन स्वत:चीच पाठ थोपटून घेणे जितके वाईट, तितकीच ही गोष्टदेखील वाईट असते; या दोन्हीही गोष्टी सारख्याच घातक असतात.

व्यक्ती अभीप्सेबाबत (aspiration) इतकी प्रामाणिक असली पाहिजे की, तिला आपण अभीप्सा बाळगत आहोत हेदेखील कळता कामा नये; जणू काही ती स्वत:च अभीप्सा बनून राहिली पाहिजे. जेव्हा हे खरोखर प्रत्यक्षात उतरेल तेव्हा व्यक्तीने खऱ्या अर्थाने काही असामान्य शक्ती प्राप्त केलेली असेल.

…व्यक्ती जेव्हा स्व-केंद्रित राहात नाही, ती म्हणजे काम करत असताना स्वत:कडे पाहणारा अहंकार असत नाही, तर व्यक्ती स्वत: ती कृतीच बनून जाते, त्याही पलीकडे जात, ती स्वत:च एक अभीप्सा बनून जाते तेव्हा, ते खरोखर चांगले असते. म्हणजे जेव्हा अभीप्सा बाळगणारी व्यक्ती म्हणूनसुद्धा ती शिल्लक राहत नाही, तर ती व्यक्ती म्हणजे स्वयमेव अभीप्साच बनून जाते आणि जेव्हा अशी व्यक्ती संपूर्ण एकाग्र अशा आवेगाने (ईश्वराप्रत) झेपावते तेव्हा ती खरोखरच खूप प्रगत होते. अन्यथा, नेहमीच एक प्रकारची क्षुद्र स्व-संतुष्टता, क्षुद्र आत्मप्रौढी आणि स्वत:बद्दलची कीव अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचा व्यक्तीमध्ये शिरकाव होतो आणि सारे काही बिघडून जाते. अवघड असते हे सारे!

– श्रीमाताजी (CWM 06 : 402)