Tag Archive for: ध्यान

तासन् तास ध्यानाला बसल्यानंतर तुम्हाला अनुभव येतात की नाही, हे तितकेसे महत्त्वाचे नाही. मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात ठेवा, तुमच्यासाठी आत्ता अनुभव नव्हे तर चैत्याची वृद्धी हाच तुमचा मार्ग असावयास हवा.

याचा अर्थ म्हणजे, तीन गोष्टी पाहिजेत – पहिली गोष्ट म्हणजे, प्राणिक अहंकार आणि त्याचे गोंधळ, अस्वस्थता, अशांती यांपासून मागे होऊन, श्रद्धा व समर्पणाचा शांत दृष्टिकोन स्वीकारणे.

दुसरी गोष्ट म्हणजे, अंतरंगामध्ये अशा कोणत्यातरी गोष्टीचा उदय की जी गोष्ट, तुमच्या प्रकृतीमधील काय बदलायला हवे हे पाहते आणि तो बदल घडविण्याचा जोशही देते.

तिसरी गोष्ट म्हणजे, साधनेमधील चैत्य भावना की जी, भक्तीमध्ये वाढ करेल. अशी भावना की जी, ईश्वराचे स्मरण करण्यात, त्याच्या विषयीच्या बोलण्यामध्ये, त्याच्याविषयी लिहिण्यामध्ये, अनुभवण्यामध्ये, ईश्वराचा सतत विचार करण्यामध्ये सहजपणाने आनंद अनुभवेल; अशी भावना ही, बाह्यवर्ती गोष्टींमध्ये रमण्यापेक्षा अधिकाधिक अगदी शांतपणे ईश्वराभिमुख होऊन, आत्म-उन्नतीमध्ये परिपूर्णपणे वृद्धिंगत होत राहील.

जेव्हा जाणीव ही वरील गोष्टींनी ओतप्रोत भरून जाईल म्हणजे, जेव्हा अशा प्रकारे पूर्ण चैत्य स्थिती असेल, चैत्य खुले झालेले असेल, तेव्हा आपोआप अनुभव यायला लागतील. प्रथम चैत्य खुलेपण आणि त्यानंतर उच्चतर जाणीव व तिचे अनुभव !

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 347-348)

एकाग्र ध्यान :

इकडेतिकडे धावणाऱ्या मनाला एक विशिष्ट सवय लावणे ही एकाग्रता साधण्यासाठीची पहिली पायरी असली पाहिजे. ही विशिष्ट सवय म्हणजे, इकडेतिकडे न ढळता स्थिरपणे, एकच विषय घेऊन, त्यावर एकाच दिशेने क्रमबद्ध विचार करण्याची सवय होय. मनाने हा विचार करताना सर्व मोह, तसेच त्याला ढळवू पाहणारे सर्व हाकारे कटाक्षाने टाळले पाहिजेत. आपल्या सामान्य जीवनात अशी एकाग्रता वरचेवर पाहावयास मिळते, अनुभवावयास मिळते; मनाला सामान्य जीवनात बाह्य विषय, बाह्य क्रिया यांवर एकाग्र व्हावयाचे असते व ते तसे एकाग्र होतेही; परंतु असा बाह्य विषय नसताना आंतरिक विषयावर एकाग्र होणे हे मनाला फार अवघड जाते; तथापि, ज्ञानाच्या साधकाला अशी ही आंतरिक एकाग्रता प्रत्यक्षात आणणे आवश्यकच आहे.

एकाग्रता ही कल्पनेच्या फलदायी सारतत्त्वावर करावयाची असते. जीवाच्या इच्छेने एकाग्र होऊन तसा आग्रह धरला की, ही कल्पना तिच्यात अंतर्भूत असलेल्या सत्याची सर्व अंगे प्रकट करते. उदाहरणार्थ, जर ‘दिव्य प्रेम’ हे आपल्या एकाग्रतेचा विषय असेल तर, प्रेम म्हणजे ईश्वर ह्या संकल्पनेच्या सारभूत तत्त्वावर एकाग्रतेने चिंतन केले पाहिजे. त्या दिव्य प्रेमाचे बहुविध आविष्करण तेजोमय रीतीने उदित व्हावे अशा पद्धतीने मनाने त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

ही एकाग्रता फक्त विचारांमध्ये नाही तर हृदयात, अस्तित्वात आणि साधकाच्या दृष्टीमध्येही असली पाहिजे. येथे विचार आधी आणि अनुभव नंतर असे होऊ शकते, पण कधीकधी, अनुभव आधी आणि नंतर त्या अनुभवातून ज्ञानाचा उदय असेही होऊ शकते. त्यानंतर मग प्राप्त झालेल्या गोष्टीचे अधिकाधिक चिंतन, मनन केले पाहिजे आणि ती जोवर नित्याचा अनुभव बनत नाही आणि पुढे जाऊन, जीवाचा तो नियमच किंवा धर्मच बनत नाही तोवर ती गोष्ट धरून ठेवली पाहिजे.

निदिध्यास :

एकाग्र ध्यानाची प्रक्रिया वर सांगितली; परंतु ह्या प्रक्रियेहून जोरदार, अधिक कष्टाची प्रक्रिया म्हणजे, समग्र मन हे कल्पनेच्या केवळ सारभूत अंशावरच एकाग्र करणे, त्याचे एकाग्रतेने निदिध्यासन करणे ही आहे. ध्यानविषयाचा फक्त मानसिक अनुभव घेण्यासाठी किंवा फक्त विचारगत ज्ञान मिळविण्यासाठी हा निदिध्यास केला जाऊ नये, तर कल्पनेच्या मागे असणाऱ्या वस्तूचे सार गाठण्यासाठी हा निदिध्यास केला जावा. या प्रक्रियेमध्ये साधकाचा विचार थांबतो आणि साधक तन्मयतेने वस्तूचे आनंदभरे दर्शन घेत राहातो अथवा आंतरिक समाधीच्या द्वारा त्या वस्तूत विलीन होऊन जातो. ही दुसरी प्रक्रिया जर उपयोगात आणली असेल तर नंतर, या प्रक्रियेने ज्या अवस्थेप्रत आपण चढून जातो त्या अवस्थेला खाली बोलावून, आपल्या निम्नतर अस्तित्वाचा ती ताबा घेईल, आपल्या सामान्य जाणिवेला ती प्रकाश, सामर्थ्य, आनंद प्रदान करेल असे करावे लागते. असे न केल्यास, आंतरिक समाधीत किंवा उच्च पातळीवर ती अवस्था आपली असेल पण आपण जागृतीत येऊन जगाच्या संपर्कात उतरलो की, आपल्या पकडीतून ती निसटलेली असेल, असे बरेच जणांचे होते. तेव्हा, हे असे अर्धवट प्रभुत्व हे पूर्णयोगाचे साध्य नाही.

मन निर्विषय करणे :

एकाच विषयावर मन एकाग्र करणे ही एक प्रक्रिया; विचार दृष्टिविषय झालेल्या एकाच वस्तूचा जोरदार निदिध्यास घेणे ही दुसरी प्रक्रिया; ह्या प्रक्रिया वर वर्णिल्या. तिसरी प्रक्रिया मन एकदम शांत, निर्विषय करणे ही आहे. अनेक मार्गांचा वापर करून, मन शांत करता येते. एक मार्ग असा आहे – मन क्रिया करीत असताना त्या क्रियेत साधकाने भाग घेऊ नये तर अगदी तटस्थ राहावे. मनाकडे केवळ पाहत राहावे; असे सारखे तटस्थतेने मनाकडे पाहात राहिले, तर शेवटी मन कंटाळते. त्याच्या उड्या, त्याची धावपळ ही त्याच्या मालकाच्या संमतीशिवाय चालली आहे हे त्याच्या लक्षात येते आणि मग ते अधिकाधिक शांत होत जाते व शेवटी पूर्ण शांत होते. मन शांत करण्याचा दुसरा मार्ग असा – मन जे विचार सुचवील ते साधकाने असंमत करावे. ते मनातून बाहेर फेकून द्यावे. ते जसजसे त्याच्या समोर येत जातील तसतसे त्यांना फेकून देत राहण्याचे कार्य त्याने करीत राहावे; आणि आपल्या अस्तित्वात मनाच्या धांगडधिंग्यामागे जी शांती नेहमीच वसत असते, त्या शांतीला चिकटून राहावे. असे करीत राहिल्याने, अस्तित्वातील गुप्त शांती प्रकट होते; साधकाच्या मनात, सर्व अस्तित्वांत महान शांती प्रकटपणे स्थिर होते आणि या शांतीबरोबर सर्वव्यापी शांत ब्रह्माची अनुभूती साधकाला प्राप्त होते. या महान शांतीच्या पायावर दुसरी सर्व उभारणी करता येते. ही उभारणी, ज्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या आधारावर केली जाते ते ज्ञान वस्तूंविषयीच्या वरवरच्या लक्षणांचे ज्ञान नसते तर, ते ईश्वरी अभिव्यक्तीच्या अति-खोल असणाऱ्या सत्याचे ज्ञान असते.

– श्रीअरविंद

(CWSA 23 : 323-324)