Tag Archive for: धर्म

ज्या धर्मामध्ये तुमचा जन्म झाला आहे वा तुमची घडण झाली आहे त्याचे खरे मूल्य तुम्हाला जाणून घ्यावयाचे असेल, किंवा ज्या समाजात वा ज्या देशात तुमचा जन्म झाला आहे त्याविषयी, यथार्थदर्शी चित्र तुम्हाला हवे असेल, किंवा ज्या विशिष्ट वातावरणात तुम्ही फेकले गेला आहात आणि जेथे तुम्ही स्वत:ला जखडून घेतले आहे, ती गोष्ट किती सापेक्ष आहे, हे तुम्हाला जाणून घ्यावयाचे असेल तर, तुम्ही देशाटन करा. तेव्हा तुम्हाला आढळेल की, ज्याला तुम्ही चांगले समजता ते इतरत्र वाईट मानले जाते आणि ज्याला एका प्रांतात वाईट मानले जाते त्याचेच दुसऱ्या प्रांतात स्वागत केले जाते.

सर्व देश आणि धर्म यांची निर्मिती ही अनेक परंपरांच्या समूहांपासून झालेली आहे. सर्वच ठिकाणी तुम्हाला संतमहात्मे, शूरवीर, महान व्यक्तिमत्त्वे पाहायला मिळतात आणि त्याबरोबरच अगदी क्षुद्र, दुष्ट माणसंदेखील आढळतात. ”माझी अमुक एका धर्मामध्ये घडण झाली आहे त्यामुळे तोच खरा धर्म होय; मी अमुक एका देशामध्ये जन्माला आलो आहे त्यामुळे, माझाच देश सर्व देशांमध्ये चांगला आहे’ असे म्हणणे ही केवढी मोठी थट्टा आहे हे तुम्हाला जाणवेल. व्यक्ती आपल्या कुटुंबाविषयी देखील असाच दावा करू शकते : “अमुक एका देशामध्ये, अमुक एका ठिकाणी, शतकानुशतके राहत असलेल्या एका कुटुंबातून मी आलो आहे म्हणून त्याच्या परंपरा मला बंधनकारक आहेत, त्याच केवळ आदर्शवत आहेत.”

गोष्टी जेव्हा तुमच्यावर लादलेल्या नसतात, जेव्हा तुम्ही त्या स्वेच्छेने प्राप्त करून घेता, तेव्हाच त्या गोष्टींना तुमच्यासाठी आंतरिक मूल्य प्राप्त होते आणि तुमच्यासाठी त्या यथार्थ ठरतात. जर तुम्हाला तुमच्या खऱ्या धर्माविषयी खात्री करून घ्यावयाची असेल तर, तुम्ही त्याची निवड केली पाहिजे; जर तुम्हाला तुमच्या खऱ्या देशाविषयी खात्री करून घ्यावयाची असेल तर, तुम्ही त्याची निवड केली पाहिजे; जर तुम्हाला तुमच्या खऱ्या कुटुंबाविषयी खात्री करून घ्यावयाची असेल तर, त्याचीसुद्धा तुम्ही निवड केली पाहिजे.

केवळ दैवयोगाने तुम्हाला जे देण्यात आले आहे, ते कोणताही प्रश्न न विचारता, जसेच्या तसे तुम्ही स्वीकारलेत तर, तुमच्यासाठी ते चांगले आहे का वाईट, तुमच्या जीवनासाठी ते योग्य आहे का नाही, ह्याची तुम्ही कधीच खात्री देऊ शकणार नाही.

ज्या कोणत्या गोष्टींमुळे तुमचे स्वाभाविक वातावरण घडते किंवा तुमची तथाकथित वंशपरंपरा निर्माण होते आणि निसर्गाच्या आंधळ्या यांत्रिक प्रक्रियेद्वारे हे वातावरण व ही वंशपरंपरा तुमच्यावर लादण्यात येते, त्या साऱ्या गोष्टींपासून दोन पावले मागे सरा; स्वत:च्या अंतरंगामध्ये शिरा आणि तेथून सर्व गोष्टींकडे शांतपणे आणि निरासक्तपणे पाहा. त्यांचे मूल्यमापन करा, मग स्वेच्छेने त्यांची निवड करा. मग तेव्हा तुम्ही आंतरिक सत्यानिशी म्हणू शकाल, ”हे माझे कुटुंब आहे, हा माझा देश आहे, हा माझा धर्म आहे.”

– श्रीमाताजी
(CWM 03 : 80-81)

धार्मिक मते आणि धार्मिक सिद्धान्त ह्या मनोनिर्मित गोष्टी असतात आणि जर तुम्ही त्यालाच चिकटून राहिलात आणि तुमच्यासाठी बनविलेल्या जीवनविषयक कायद्यांच्या चौकटीत स्वत:ला बंदिस्त करून घेतलेत तर या नियमांच्या, धर्मसिद्धान्तांच्या पलीकडे असलेल्या, व्यापक, महान, मुक्त अशा चैत्यनाचे सत्य तुम्हाला गवसू शकणार नाही. विश्वातील एकमेव सत्य असे गृहीत धरून, जेव्हा तुम्ही एखाद्या धार्मिक संप्रदायापाशीच थांबता, त्याच्याशी स्वत:ला जखडून घेता, तेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात्म्याच्या विस्ताराची आणि विकासाची प्रक्रिया गमावून बसता.

पण जर तुम्ही धर्माकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेत तर, धर्म नेहमीच सगळ्या माणसांना अडथळा ठरतो असे नाही. मानवाचे उच्चतर कार्य, ह्या दृष्टीने जर तुम्ही त्याकडे पाहिलेत आणि मानवनिर्मित गोष्टींच्या अपूर्णतांकडे दुर्लक्ष न करता, त्याकडे मानवाची आकांक्षा म्हणून पाहिलेत तर आध्यात्मिक जीवनाकडे वळण्यासाठी धर्माचे तुम्हाला एकप्रकारे साहाय्यदेखील होऊ शकते.

धर्माकडे गंभीरतेने आणि उत्कट भावनेने पाहिले तर, त्यामधील सत्य काय आहे हे तुम्ही शोधून काढू शकता; त्यामध्ये कोणती आकांक्षा, अभीप्सा सुप्तपणे वसलेली आहे; कोणत्या दैवी प्रेरणेमध्ये, मानवी मन आणि मानवप्रणालीमुळे बदल होत आहेत, आणि कशाचे विरूपीकरण होत आहे हे तुम्हाला कळू शकते. योग्य अशा मानसिक भूमिकेतून बघितल्यास, धर्म त्याच्या आहे त्या स्थितीतदेखील तुमच्या मार्गावर काही प्रकाश टाकू शकतो आणि तुमच्या आध्यात्मिक प्रयासांना साहाय्य पुरवू शकतो.

प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला असे लोक आढळतात की, ज्यांची भावनिक क्षमता खूप मोठी असते आणि ते खरीखुरी, तळमळीची अभीप्सा बाळगत असतात, पण त्यांचे मन अगदी साधेसुधे असते आणि त्यांना ईश्वराकडे ज्ञानाच्या माध्यमातून जाण्याची गरज भासत नाही; अशा लोकांसाठी धर्माचा उपयोग होतो आणि त्यांच्यासाठी त्याची गरजदेखील असते. कारण बाह्य रूपांच्याद्वारा, उदाहरणार्थ चर्चमधील समारंभ इ. द्वारे त्यांच्या आंतरिक आध्यात्मिक आकांक्षेला एक प्रकारचे साहाय्य मिळते.

प्रत्येक धर्मामध्ये उच्च आध्यात्मिक जीवन ज्यांच्यामध्ये उदित झाले आहे अशा काही व्यक्ती असतात परंतु ह्याचा अर्थ असा नव्हे की, त्यांच्या धर्माने ही आध्यात्मिकता त्यांना प्रदान केलेली असते, उलट त्यांनीच त्यांच्या आध्यात्मिकतेद्वारे धर्मामध्ये भर घातलेली असते. अशा व्यक्तींना कोठेही ठेवले असते, त्यांचा जन्म कोणत्याही संप्रदायामध्ये झाला असता, तरी त्यांनी तेथेही अशाच आध्यात्मिक जीवनाचा शोध घेतला असता आणि असेच आध्यात्मिक जीवन व्यतीत केले असते. ती त्यांची स्वत:ची क्षमता असते, त्यांच्या अंतरात्म्याची ती एक प्रकारची शक्ती असते; मात्र त्यांची अशी जडणघडण धर्मामुळेच झाली आहे असा दावा धर्म करत असतो; पण वस्तुस्थिती मात्र तशी नसते. त्यांच्या प्रकृतीमधील या शक्तीमुळेच धर्म हा त्यांच्यासाठी गुलामी वा बंधन बनत नाही. एवढेच की, त्यांच्याकडे शक्तिशाली, सुस्पष्ट आणि सक्रिय मन नसल्यामुळे, त्यांना ह्या वा त्या संप्रदायाला निरपवाद सत्य म्हणून मानण्याची आणि कोणतेही विरोधी प्रश्न वा शंका मनात उठू न देता, स्वत:ला एखाद्या संप्रदायाला नि:शेषतया समर्पित करण्याची आवश्यकता भासते. मला प्रत्येक धर्मामध्ये अशा प्रकारची माणसे भेटलेली आहेत. आणि अशा लोकांच्या श्रद्धेला धक्का लावणे हा गुन्हा आहे. त्यांच्यासाठी धर्म हा अडथळा नसतो.

परंतु जे याहूनही पुढे जाऊ शकतात, चैतन्याच्या मार्गावर जे एका विशिष्ट अंतरापर्यंत वाटचाल करू शकतात, त्यांच्यासाठी धर्म हा अडथळा ठरतो, पण जे असे पुढे जाऊ शकत नाहीत त्याच्यांसाठी धर्म हा साहाय्यकारी ठरतो.

उत्तमोत्तम तसेच अगदी निम्न बाबींबाबत देखील धर्माचा आवेग आढळून येतो. एका बाजूला धर्माच्या नावाने तुंबळ युद्ध झाली आहेत आणि अगदी हिडीसपणे जाचदेखील झालेला आहे, पण त्याचबरोबर स्वार्थत्याग आणि सर्वोच्च धैर्यालाही तो पोषक, प्रेरक ठरलेला आहे. कोणत्या उच्चतर कृतींपर्यंत मानवी मन जाऊन पोहोचू शकते ह्याची मर्यादा तत्त्वज्ञानाप्रमाणेच धर्मानेही दाखवून दिली आहे. तुम्ही जर धर्माच्या बाह्य देहाचे गुलाम झालात तर, तुमच्यासाठी तो खोडा वा बेडी बनेल, पण जर तुम्हाला त्यांतील आंतरतत्त्व कसे उपयोगात आणावयाचे हे माहीत असेल तर चैतन्याच्या अधिराज्यामध्ये झेपावण्यासाठी धर्म ही उपयुक्त अशी उड्डाणफळी (jumping-board) बनेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 78-79)

समाजजीवनात धर्माची आवश्यकता असते, कारण सामूहिक अहंकारावर उपाय म्हणून धर्माचा उपयोग होतो, या नियंत्रणाविना हा सामूहिक अहंकार प्रमाणाबाहेर वाढू शकतो.

व्यक्तीच्या चेतनेच्या पातळीपेक्षा सामूहिक चेतनेची पातळी नेहमीच निम्न असते, हे लक्षात येण्याजोगे आहे. उदा. जेव्हा माणसं मोठ्या संख्येने एखाद्या गटात एकत्रित येतात तेव्हा त्यांच्या चेतनेची पातळी खूप घसरते. जमावाची चेतना ही व्यक्ती-चेतनेपेक्षा खालच्या स्तरावरची असते आणि समाजाची सामूहिक चेतना ही, ज्या व्यक्तींनी तो समाज बनलेला आहे त्या व्यक्तींच्या चेतनेपेक्षा खचितच खालच्या पातळीवरची असते. त्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. सामान्य जीवनात, व्यक्तीला त्याची जाणीव असो वा नसो, तिला नेहमीच एक धर्म असतो, कधीकधी ह्या धर्माचे उद्दिष्ट अगदी कनिष्ठ प्रकारचे देखील असू शकते….

ती व्यक्ती ज्या देवाची पूजा करते ती यशाची देवता असेल, पैशाची देवता असेल, सत्तेची देवता असेल, किंवा अगदी कुलदेवता असेल, मुलाबाळांची देवता, कुटुंबाची किंवा कुळाची देवता, पूर्वजांची देवता असू शकेल.

धर्म हा नेहमीच अस्तित्वात असतो. प्रत्येक व्यक्तीगणिक त्या धर्माचा दर्जा वेगवेगळा असेल, पण अस्तित्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या कोणत्याही मूलभूत आदर्शाविना नुसतेच जीवन जगत राहणे हे माणसाला कठीण असते. बऱ्याचदा त्याला त्याच्या आदर्शाची जाणही नसते आणि जर त्याला विचारले की, तुझा आदर्श काय तर तो शब्दांतदेखील सांगू शकणार नाही, पण त्याचा काही एक धर्म असतो, भले तो अस्पष्ट, धूसर असेल, पण त्याच्या जीवनाच्या दृष्टीने ती खूप मोलाची गोष्ट असते.

बहुतांशी लोकांसाठी ते एक प्रकारचे संरक्षण असते. व्यक्तीला त्यामुळे जगण्यासाठी सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती प्राप्त होते. त्याच्या दृष्टीने ते फार मोठे ध्येय असते. मानवी प्रयत्नांमागची ती एक मोठी प्रेरणा असते असेही म्हणता येईल. काही लोकांसाठी समाधान ही मोठी गोष्ट असते, तर काही जणांसाठी मौजमजा, चैन ही गोष्ट मोठी असते.

ह्या गोष्टी खरंतर खूप निम्न स्तरावरच्या आहेत आणि त्याला एका ध्येयाचे नाव देण्याची इच्छाही होत नाही, पण त्या गोष्टी धर्माची रूपे आहेत; त्या गोष्टी म्हणजे असे काहीतरी होय की ज्यासाठी व्यक्तीला आपले संपूर्ण जीवन खर्ची घालावे असे वाटू शकते…. आधार म्हणून अशा गोष्टींचा वापर करून, अनेक गोष्टी मानवावर आपला प्रभाव टाकण्याची धडपड करीत असतात. माणसांमधील असुरक्षिततेची भावना, अनिश्चिततेची भावना ह्याच गोष्टींचा वापर करून, राजकीय किंवा धार्मिक समूह त्यांच्यावर प्रभाव टाकू पाहतात. ते या भावनांशी खेळू पाहतात. प्रत्येक राजकीय वा सामाजिक संकल्पना ही एखाद्या धर्माच्या मूलभूत आदर्शाची भ्रष्ट अशी अभिव्यक्ती असते. व्यक्तीमध्ये एकदा का विचाराची शक्ती आली की, तेथे ताबडतोब क्षणोक्षणीच्या ह्या अगदी पशुवत अशा दैनंदिन जीवनापेक्षा, काहीतरी उच्चतर अशी आकांक्षा अपरिहार्यपणे त्याच्यामध्ये उदय पावते; आणि त्यातूनच त्याला जगण्याची उमेद आणि ऊर्जा प्राप्त होते. पण फारच थोडी माणसं स्वतंत्रपणे विचार करू शकतात, अशा वेळी त्यांनी स्वत:साठी स्वत:चाच एखादा वेगळा पंथ काढण्यापेक्षा, कोणत्यातरी धर्माचा स्वीकार करणे, त्यामध्ये सहभागी होणे, आणि त्या धार्मिक सामूहिकतेचा एक भाग बनणे हे अधिक सुकर असते. त्यामुळे वरवर पाहता, एखादी व्यक्ती ह्या धर्माची वा त्या धर्माची असते, पण हे फक्त वरवरचे भेद असतात.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 354-356)

दिव्य पावित्र्य, विशालता, प्रकाश, स्वातंत्र्य, सत्ता, सामर्थ्य, आनंद, प्रेम, मांगल्य, ऐक्य, सौंदर्य या गुणांची आम्हांमध्ये वाढ होण्यास साह्यभूत होणारे जे काही, ते म्हणजे धर्म होय.

या धर्माच्या विरुद्ध त्याची छाया म्हणजे धर्मनिषेध हा सतत उभा असतो. वरील दिव्य गुणांच्या वाढीला विरोध करणारे, या वाढीचा नियम न मानणारे सर्व काही धर्माच्या विरुद्ध उभे असते.

आपल्यातील दिव्य मूल्यांचे रहस्य जी वस्तु स्वत:च्या ठिकाणी दाबून ठेवीत आहे, प्रकट करू इच्छित नाही, जी उलट, विकृतीचे आणि विरोधाचे रूप घेत आहे, अशुद्धता, संकुचितता, दास्य, अंधकार, दुबळेपणा, दुष्टपणा, विसंवाद, दुःख, भेद आणि दुही यांचे रूप घेऊन जी पुढे होत आहे, जी वस्तु किळसवाण्या रानटी स्वरूपाची आहे, थोडक्यात जे काही, प्रगतिशील मानव प्रगती करताना, मागे टाकून देणेच भाग आहे ते सर्व, वर सांगितलेल्या धर्माच्या विरुद्ध उभे असते. धर्माच्या विरुद्ध उभे असणारे जे काही, त्याला अधर्म असे नाव आहे.

अधर्म हा धर्मावर मात करण्याचा प्रयत्न करीत असतो, धर्माला मागे ओढण्याचा, खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. अधर्म म्हणजे प्रतिगामी शक्ती होय. पाप, अज्ञान, अंधार यांचा उठाव अधर्मांतून होतो. धर्म आणि अधर्म यांजमध्ये सतत झगडा चालू असतो. कधी अधर्म विजयी होतो, कधी धर्म विजयी होतो. कधी उन्नतीच्या शक्ती सत्ता गाजवतात, कधी अवनतीच्या शक्ती सत्ता गाजवतात.

वेदांमध्ये वरील गोष्टी देव आणि दानव ह्या प्रतिकांद्वारे व्यक्त झाल्या आहेत. प्रकाशाचे व अनंताचे पुत्र आणि अंधाराची व भेदात्मकतेची मुले ह्यांच्यातील हा झगडा आहे.

ह्याच त्या गोष्टी आहेत ज्यामधून, अवतारासाठी आवश्यक अशी परिस्थिती आणि अवताराचे कार्य निर्धारित होते.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 171-172)

धर्म ह्या शब्दाला नैतिक व व्यावहारिक, नैसर्गिक व तत्त्वज्ञानात्मक आणि धार्मिक व आध्यात्मिक असे अर्थ आहेत; तसेच, हा शब्द वरील अर्थांपैकी केवळ एकाच अर्थाने, जसे की केवळ नैतिक अर्थाने, केवळ तात्विक अर्थाने किंवा केवळ धार्मिक अर्थानेदेखील वापरला जाऊ शकतो.

उदा. नैतिक दृष्टीने पाहिले असता, ‘सद्वर्तनाचा, नीतिमान वर्तनाचा नियम’ असा धर्म या शब्दाचा अर्थ होतो; किंवा अधिक बाह्य व व्यावहारिक दृष्टीने पाहिले असता, ‘सामाजिक आणि राजकीय न्याय’ किंवा ‘फक्त सामाजिक नियमांचे पालन’ असा धर्म या शब्दाचा अर्थ होतो.

धर्माच्या भारतीय संकल्पनेत केवळ चांगले, योग्य, नैतिक, न्याय्य या बाबींचाच समावेश होतो असे नाही. दिव्य तत्त्वाच्या अंगाने विचार करता, माणसाचे इतर जीवांशी, निसर्गाशी, ईश्वराशी जे सर्व नातेसंबंध असतात, त्या साऱ्यांचे नियमन करणारा धर्म असतो. दिव्य तत्त्वाची अभिव्यक्ती विविध रूपांद्वारे, आंतरिक व बाह्य जीवनाच्या रूपांद्वारे, कृतीच्या कायद्यांच्या माध्यमातून होत असते. जगातील या सर्व प्रकारच्या नातेसंबंधांची सुव्यवस्था लावण्याचे कामदेखील धर्म करीत असतो.

धर्म हा शब्द दोन्ही अर्थाने घेता येतो – एक म्हणजे आपण ज्याला धरून राहतो तो धर्म आणि दुसरा अर्थ आपल्या आंतरिक व बाह्य कृतींची जो धारणा करतो तो धर्म !

धर्म शब्दाचा मूळ अर्थ, आमच्या प्रकृतीचा मूलभूत, पायाभूत नियम; आमच्या सर्व क्रियांचा गुप्त आधार व आलंबन असणारा आमच्या प्रकृतीचा पायाभूत नियम असा आहे. या अर्थाने प्रत्येक भूतमात्राला, प्रत्येक जीवप्रकाराला, जीवजातीला, व्यक्तीला, समूहाला त्याचा त्याचा धर्म असतो.

धर्माचा दुसरा अर्थ, आमच्यात जी दिव्य प्रकृती विकसित व व्यक्त व्हावयाची असते ती, ज्या आंतरिक व्यापारांनी आम्हामध्ये विकसित होते, त्या व्यापारांचा नियम असा आहे.

धर्म म्हणजे असा कायदा होय की, ज्यायोगे आमचे बाह्य विचार, कृती व आमचे परस्परांशी असलेले सर्व संबंध यांचे नियमन केले जाते. ह्या नियमनामुळे दिव्य आदर्शाच्या दिशेने आमचा स्वत:चा विकास आणि आमच्या मानववंशाचा विकास होण्यास साहाय्य होते.

धर्म न बदलणारा असतो, शाश्वत असतो असे सामान्यत: म्हणण्यात येते. धर्माचे मूलतत्त्व, धर्माचा आदर्श ही शाश्वत आणि अपरिवर्तनीय वस्तु आहे हे खरे आहे; पण धर्माचे विशिष्ट विचार व आचार नित्य बदलणारे, नित्य विकास पावणारे असतात. कारण, अद्यापि मानवाला आदर्श धर्म सापडलेला नाही किंवा मानव अद्यापि आदर्श धर्माला धरून वागत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा आदर्श धर्माच्या प्राप्तीसाठी मानव कमीअधिक पूर्णतेने तळमळत आहे, धडपडत आहे. अशा आदर्श धर्माचे त्याला अधिकाधिक ज्ञान होत आहे व तो अशा धर्माचे आचरण अधिकाधिक प्रमाणात पसंत करू लागला आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 171-172)

उच्च आणि सत्यतर हिंदुधर्मामध्ये ही दोन प्रकार आहेत – सांप्रदायिक आणि असांप्रदायिक, विध्वंसक आणि समन्वयात्मक. एक स्वत:ला कोणत्यातरी एकाच पैलूला जखडून ठेवतो आणि दुसरा ‘सर्वात्मका’ला मिळविण्याची खटपट करतो.

धर्मविषयक सांप्रदायिक संकल्पना
एखादी संकल्पना, एखादा अनुभव, एखादे मत वा मतप्रणाली, एखादी प्रवृत्ती, कल, एक विशिष्ट गुरु, एखादा निवडक अवतार यांच्याबद्दलच्या राजसिक किंवा तामसिक आसक्तीमधून सांप्रदायिक संकल्पनांचा उदय होतो. त्यांविषयी असलेली ही बांधिलकी असहिष्णु, गर्विष्ठ असते. ती आपल्या तोकड्या ज्ञानाविषयी अभिमान बाळगणारी आणि आपल्याकडे नसलेल्या ज्ञानाविषयी कुत्सित भूमिका घेणारी असते. ती दुसऱ्यांचे कुसंस्कार, अंधश्रद्धा याविषयी बडबड करत राहते आणि स्वत:चे कुसंस्कार आणि अंधश्रद्धा यांविषयी अंध असते. किंवा ती संकल्पना म्हणते, ”माझे गुरु हेच तेवढे खरे एकमेव गुरु आहेत आणि इतर एकतर भोंदू आहेत किंवा कनिष्ठ प्रतीचे आहेत,” किंवा “माझी मानसिकताच फक्त योग्य आहे आणि जे माझा मार्ग अनुसरत नाहीत ते मूर्ख आहेत किंवा पढिक वा अप्रामाणिक आहेत,” किंवा ”माझा अवतार हाच खराखुरा ईश्वर आहे आणि इतर सर्व कनिष्ठ आविष्कार आहेत.” किंवा ”माझी इष्ट देवता हीच ईश्वर आहे आणि इतर देवता ह्या केवळ तिची आविष्करणं आहेत.”

धर्मविषयक समन्वयी संकल्पना
जेव्हा जीव अधिकाधिक उन्नत होत जातो, तेव्हाही तो त्याच्या संकल्पना, अनुभव, मते, प्रकृती, गुरु, इष्ट देवता यांचे अग्रक्रमाने अनुसरण करतो, पण आता तो इतरांकडे अज्ञानी आणि वर्जक दृष्टीने पाहत नाही. तो म्हणतो, “ईश्वराकडे जाणारे अनेक मार्ग आहेत आणि सर्वच मार्ग समानतेनेच ईश्वराकडे जाऊन पोहोचतात. सर्व माणसं, मग ती गुन्हेगार असू देत वा नास्तिक असू देत, सर्वच माझे साधनेतील बंधू आहेत आणि तो ईश्वर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मार्गाने त्या ‘एकमेवाद्वितीया’कडे घेऊन जात आहे.”

मात्र जेव्हा पूर्ण ज्ञान उदित होते तेव्हा तो स्वत:मध्ये सर्वच अनुभव कवळून घेतो. त्याला उमगते की, सर्वच संकल्पना सत्य आहेत, सर्व मतमतांतरं उपयुक्त आहेत; सर्व अनुभव आणि वृत्तीप्रवृत्ती ह्या वैश्विक अनुभव आणि पूर्णता मिळविण्याची साधने आणि स्तर आहेत; सर्व गुरु हे त्या एका आणि एकमेव गुरुची अपूर्ण माध्यमं वा अवतार आहेत; सर्व इष्टदेवता आणि अवतार हे ईश्वरच आहेत…..

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 551)