Tag Archive for: देहत्याग

श्रीमाताजी आणि समीपता – ३१

‘ईश्वरी प्रेम’ हे मानवी प्रेमासारखे नसते, तर ते सखोल, विशाल व शांत असते; त्याची जाणीव होण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी व्यक्तीने शांत व विशाल होण्याची आवश्यकता असते.

समर्पित व्हायचे हे ‘साधकाने त्याच्या जीवनाचे संपूर्ण उद्दिष्ट बनविले पाहिजे, त्यामुळे तो ईश्वरी शक्तीचे एक सुपात्र आणि एक साधन बनू शकेल. (मात्र) त्याचे ते पात्र कशाने भरणे आवश्यक आहे याचा निर्णय त्याने दिव्य प्रज्ञेवर आणि दिव्य प्रेमावर सोपविला पाहिजे. अमुक इतक्या कालावधीतच स्वतःची प्रगती झाली पाहिजे, स्वतःचा विकास झाला पाहिजे, विशिष्ट अनुभव अमुक इतक्या कालावधीतच आले पाहिजेत, ठरावीक कालावधीतच साक्षात्कार झाले पाहिजेत असे त्याने मनाने ठरविता कामा नये. त्यासाठी कितीही कालावधी का लागेना, त्याने वाट पाहण्याची, चिकाटी बाळगण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि त्याचे संपूर्ण जीवन म्हणजे एक प्रकारची अभीप्साच बनविली पाहिजे. आणि केवळ एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे ‘ईश्वराप्रति उन्मुखता’!

मागणी करणे, एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे हे साधनेचे रहस्य नाही, तर आत्मदान करणे हे साधनेचे रहस्य आहे. एखादी व्यक्ती जेवढे जास्त आत्मदान करते, तेवढी तिची ग्रहण करण्याची क्षमता वाढत जाते. परंतु त्यासाठी अधीरता आणि बंडखोरी या गोष्टी समूळ नष्ट झाल्या पाहिजेत. आपल्याला काही साध्यच होत नाहीये, कोणाचे साहाय्यच लाभत नाहीये; आपल्याला कोणाचे प्रेमच लाभत नाहीये, आपण श्रीमाताजींपासून दूर चाललो आहोत, जीवनात काही रामच राहिला नाहीये त्यामुळे आता मी देहत्याग करतो किंवा आध्यात्मिक प्रयत्न करणेच सोडून देतो यांसारख्या सर्व सूचनांना त्याने नकार दिला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 481-482)

विचार शलाका – ०३

माणूस त्याच्यावरच विजय प्राप्त करून घेऊ शकतो, ज्याला तो घाबरत नाही. आणि जो मरणाला घाबरतो त्याला मृत्युने आधीच पराभूत केलेले असते.

*

मृत्युवर मात करण्यासाठी आणि अमरत्व जिंकून घेण्यासाठी, व्यक्तीने मृत्युला घाबरता कामा नये तसेच त्याची आसही बाळगता कामा नये.

*

आपण प्राप्त करून घेऊ इच्छितो ते आपले साध्य आहे ‘अमरत्व’ ! आणि सर्व सवयींपैकी मृत्यू ही निश्चितपणे सर्वाधिक हटवादी सवय आहे.

*

तू संपूर्ण परित्यागाविषयी बोलत आहेस, पण देहाचा त्याग हा काही संपूर्ण परित्याग नव्हे. ‘अहं’चा त्याग हाच खरा आणि संपूर्ण परित्याग असतो की जो देहत्यागापेक्षा देखील अधिक दुःसाध्य असा प्रयत्न असतो. जर तुम्ही अहंचा परित्याग केला नसेल तर नुसत्या देहत्यागामुळे तुम्हाला मुक्तता मिळणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 120), (CWM 15 : 120), (CWM 15 : 120), (CWM 15 : 119)