Tag Archive for: दु:खभोग

 

ईश्वराची जी इच्छा आहे तीच अगदी पूर्ण प्रामाणिकपणे आपली इच्छा होणे, ही जीवनात शांती आणि आनंद मिळण्यासाठी आवश्यक असणारी अट आहे. आपल्याला काय हवे आहे आणि जीवनाने आपल्याला काय प्रदान करायला हवे, हे ईश्वरापेक्षा आपल्याला जास्त चांगले समजते, अशी माणसांची जवळजवळ नेहमीच खात्री असते आणि यातूनच बहुतांशी सारी मानवी दुःखे उद्भवतात.

इतर व्यक्तींनी आपल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि परिस्थितीने देखील आपल्याच इच्छावासनांची पूर्ती करावी अशी बहुतेक सर्व माणसांची अपेक्षा असते आणि त्यामुळेच त्यांना त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळेच ते दुःखीकष्टी होतात.

– श्रीमाताजी (CWM 16 : 433)

विचार शलाका – ०५

कण्हणेविव्हळणे, रुदन करणे अशा गोष्टींमध्ये पृष्ठस्तरावरील प्रकृतीला आनंद मिळत नाही – पण तिच्या आत असे काहीतरी असते की जे, हसू आणि आसू, आनंद व दुःख, मौजमजा व वेदना यांच्या लीलेमध्ये – वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर, या अज्ञानाच्या लीलेमध्ये रस घेते. काही माणसांमध्ये ते काही प्रमाणात पृष्ठभागावरच दिसून येते. जीवनातील दु:खभोगापासून संपूर्ण सुटकेचा प्रस्ताव जर तुम्ही त्यांच्यासमोर ठेवलात, तर त्यांच्यातील बहुतेक जण तुमच्याकडे साशंकपणे बघू लागतील. कारण ‘आनंद’, शांती, समाधान यांव्यतिरिक्त जीवनात काहीच नसेल, तर तसे जीवन त्यांना भयंकर कंटाळवाणे वाटेल – अनेकांनी तर तसे बोलूनही दाखविले आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 178-179)

विचार शलाका – ०४

दुःखभोगामध्ये रमणारी आणि त्याची इच्छा बाळगणारी अशी तुमच्यामध्ये जी गोष्ट असते ती मानवी प्राणाचाच (vital) एक भाग असते. या गोष्टींचेच वर्णन आम्ही प्राणाचा अप्रामाणिकपणा व त्याचा विकृत पीळ असे करतो; प्राणाचा तो भाग दुःख व संकटे यांच्याविरुद्ध गळा काढतो आणि ‘ईश्वर’, जीवन व इतर सारे त्याला छळत असल्याचा त्यांच्यावर आरोप करतो. पण बव्हंशी दुःख-संकटे येतात आणि स्थिरावतात याचे कारण, प्राणातील त्या विकृत भागालाच ती हवी असतात! प्राणातील त्या घटकापासून पूर्णपणे सुटका करून घ्यायलाच हवी.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 178)