Tag Archive for: दुःख

नैराश्यापासून सुटका – १२

 

दुःख किंवा आनंद किंवा इतर कोणतीही भावना असण्या-नसण्याचा हा प्रश्न नाही. ज्याने कोणी सामान्य ‘प्रकृती‌’वर मात केलेली नाही अशा प्रत्येकामध्ये या भावना असतातच. या गोष्टी असणे म्हणजे ‘भावविवशता‌’ नाही, तर या गोष्टी असणे म्हणजे ‘भावनिक‌’ असणे होय.

जेव्हा तुम्हाला या भावभावनांमध्ये रममाण होण्यात किंवा भावनांचे प्रदर्शन करण्यात मजा वाटते तेव्हा त्यातून किंवा कोणतेही कारण नसताना किंवा पुरेसे कारण नसतानासुद्धा जेव्हा तुम्ही भावनांमध्ये गुंतून पडता तेव्हा त्यातून ‘भावविवशता’ (sentimentalism) येते.

*

प्राणिक प्रकृतीमधील (vital nature) भावुकतेच्या अधीन असलेल्या घटकामुळे व्यक्ती इतर लोकांबरोबर भांडणे करण्यास प्रवृत्त होते आणि त्यांच्याशी अबोला धरते. व्यक्तीच्या ज्या भावस्थितीला (mood), इतरांशी गप्पागोष्टी करण्याचे सुख आणि नातेसंबंधांमधून मिळणारे सुख हवेहवेसे वाटत असते त्या भावस्थितीद्वारेच दिलेली ही प्रतिक्रिया असते. यांपैकी कोणतीही एक प्रवृत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत दुसरी प्रवृत्तीही तेथे असण्याची शक्यता असते. या भावुकतेपासून जेव्हा तुम्ही स्वतःची सुटका करून घेता आणि तुमच्या सर्व शुद्ध झालेल्या भावना ईश्वराकडे वळविता, तेव्हा हे भावनांचे चढउतार नाहीसे होतात आणि त्यांची जागा सर्वांविषयीची एक स्थिर सद्भावना घेते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 210)

विचार शलाका – १५

…सर्व दुःखं ही समर्पण परिपूर्ण न झाल्याचे लक्षण असते. मग जेव्हा तुम्हाला तुमच्या आत असा एक ‘आघात’ जाणवतो तेव्हा ‘अरे, हे वाईट झाले किंवा परिस्थिती कठीण आहे’ असे म्हणण्याऐवजी तुम्ही म्हणता, “माझे समर्पण परिपूर्ण नाहीये.” तेव्हा ते म्हणणे योग्य ठरेल. आणि मग तुम्हाला ती ‘कृपा’ जाणवते, जी तुम्हाला मदत करते, मार्गदर्शन करते आणि तुम्ही पुढे मार्गक्रमण करता. आणि एक दिवस तुम्ही अशा शांतीमध्ये प्रवेश करता की जी कशानेही क्षुब्ध होऊ शकत नाही. सर्व विरोधी शक्तींना, विरोधी गतिविधींना, आक्रमणांना, गैरसमजुतींना, दुर्वासनांना अशा स्मितहास्याने उत्तर देता की, जे ईश्वरी कृपेवरील पूर्ण विश्वासामुळे येत असते आणि हाच दु:खांमधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग असतो, दुसरा कोणताही मार्ग नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 398-399)