Tag Archive for: तामसिकता

नैराश्यापासून सुटका – ११

 

(एका साधकाला प्राणाच्या असहकार्यामुळे साधनेमध्ये ज्या अडचणी येत आहेत, त्याबाबत श्रीअरविंद यांनी केलेले मार्गदर्शन…)

तुमच्या शारीर-व्यवस्थेमध्ये काहीशी तामसिकता किंवा सुस्ती येताना दिसते आहे. प्राण (vital) त्याच्या परिस्थितीवर किंवा त्याला जे काही प्राप्त झाले आहे त्याबाबत असमाधानी असेल तर, काहीवेळा असे घडून येते. “मी संतुष्ट नाही, त्यामुळे मी कोणत्याही गोष्टीत रस घेणार नाही आणि काहीही करण्यासाठी तुला मदत करणार नाही,” असे म्हणत, तो एक प्रकारे असहकार किंवा निष्क्रिय प्रतिकार करायला सुरूवात करतो.

*

परिवर्तनाची जी हाक तुम्हाला आली आहे, त्याबद्दल तुमच्यामधीलच एखादा प्रतिरोध करणारा भाग (पूर्ण नव्हे तर एखादा भागच) अजूनही असमाधानी आहे; त्यामुळे तुमच्यामध्ये ही चलबिचल, (अस्वस्थतेची) आंदोलने निर्माण होत आहेत. जेव्हा एखाद्या प्राणिक घटकाला परिवर्तनाची हाक दिली जाते किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी त्याला भाग पाडले जाते, मात्र तसा बदल करण्यास अद्यापि तो इच्छुक नसतो; आणि जेव्हा तो नाराज व असमाधानी असतो तेव्हा, प्रतिसाद न देण्याची किंवा सहकार्य न करण्याची प्राणाची प्रवृत्ती असते. तसेच प्राणिक जोम नसल्यामुळे शारीरिक घटक हा देखील निरस आणि संवेदनाहीन ठरतो. (परंतु) आंतरात्मिक दबावामुळे प्रतिरोधाचे हे उरलेसुरले अवशेषदेखील निघून जातील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 139, 138)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०५

अचेतनाचे रूपांतरण

(साधना अचेतनापर्यंत [Inconscient] जाऊन पोहोचल्यामुळे साधकांमध्ये सर्वसाधारणपणे एक निरुत्साहाचे वातावरण दिसून येत आहे, असे निरीक्षण एकाने नोंदविले आहे, त्यावर श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

या साधकांच्या आंतरिक जीवनामध्ये अचेतनातून आलेल्या तामसिकतेमुळे एक प्रकारचा अडसर निर्माण झाला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडत नाहीये, हेच तर दुखणे आहे. व्यक्तीने जर योग्य परिस्थिती व योग्य दृष्टिकोन बाळगला, आपल्याला नेमून दिलेल्या कामामध्ये आणि साधनेमध्ये जर रस घेतला तर ही अचडण निवळेल.

योग्य वृत्ती ठेवणे आणि हळूहळू किंवा शक्य असेल तर वेगाने, उच्चतर अभीप्सेचा प्रकाश व्यक्तित्वाच्या अचेतन भागामध्येसुद्धा उतरविणे हा यावरील उपाय आहे; म्हणजे परिस्थिती कशीही असली तरी, त्या भागालासुद्धा, योग्य संतुलन कायम ठेवता येईल. आणि मग अशा व्यक्तीला सूर्यप्रकाशित मार्ग (sunlit path) अशक्य वाटणार नाही.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 618)

साधना, योग आणि रूपांतरण – २६०

प्राणाचे रूपांतरण

साधनेसाठी लागणारा अविचल आणि समतोल पाया म्हणजे अशी एक अवस्था असते की जिच्यामध्ये अनुभवाच्या अपेक्षेने उंचबळून येणेही नसते किंवा निष्क्रिय किंवा अर्ध-निष्क्रिय अशी निराश स्थिती देखील नसते. या दोन्हीमध्ये साधक हेलकावे खात नसतो. तर तो प्रगती करत असला किंवा तो अडचणीमध्ये असला तरीही, या कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या पाठीशी नेहमीच एक अविचल चेतना असते आणि ती विश्वासाने व श्रद्धेने ‘ईश्वरा’कडे वळलेली असते.
*
अविचलता म्हणजे तामसिकता नव्हे. अविचलतेमध्ये (इच्छावासना, शोक, आसक्ती आणि तत्सम इतर प्रतिक्रिया) या प्रकृतीच्या सामान्य राजसिक वृत्तीप्रवृत्ती निश्चल झालेल्या असतात. शांती अवतरित होण्यासाठी ही गोष्ट अत्यावश्यक असते. यालाच आपण ‘अविचल प्राण’ (quiet vital) असे म्हणू शकतो. अविचल मन आणि अविचल प्राणामध्ये खरी आध्यात्मिक चेतना अगदी सहजतेने येऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 114-115), (CWSA 31 : 115)

विचारशलाका ३४

आळस आणि निष्क्रियता यांचा परिणाम म्हणजे तमस, तामसिकता. त्यातून व्यक्ती अचेतनतेमध्ये जाऊन पडते आणि ती गोष्ट प्रगती व प्रकाशाच्या पूर्णपणे विरोधी असते. अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वरा’च्या सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे, हा खरी ‘चेतना’प्राप्त करून घेण्याचा निकटतम व आदर्श मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 13 : 212]