Tag Archive for: तत्वज्ञान

साधना, योग आणि रूपांतरण – १९४

‘अतिमानस योग’ (supramental Yoga) म्हणजे एकाच वेळी, ‘ईश्वरा’प्रत आरोहण (ascent) असते आणि ‘ईश्वरा’चे मूर्त प्रकृतीमध्ये अवतरण (descent) देखील असते. आत्मा, मन, प्राण आणि शरीर यांच्या एककेंद्री समुच्चयाच्या ऊर्ध्वमुख अभीप्सेद्वारेच (aspiration) आरोहण साध्य होऊ शकते. आणि समग्र अस्तित्वाने त्या अनंत आणि शाश्वत ‘ईश्वरा’प्रत आवाहन केले तर त्याद्वारेच अवतरण घडून येऊ शकते. जर हे आवाहन व ही अभीप्सा असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गाने या गोष्टी उदयाला आल्या, त्या सातत्याने वृद्धिंगत होत राहिल्या आणि त्यांनी जर सर्व प्रकृतीचा ताबा घेतला, तर आणि तरच अतिमानसिक उन्नयन आणि रूपांतरण शक्य होते.

आवाहन आणि अभीप्सा या फक्त प्राथमिक अटी आहेत, त्या बरोबरीने आणि त्यांच्या प्रभावशाली तीव्रतेमुळे सर्व अस्तित्वामध्येच ‘ईश्वरा’प्रत उन्मुखता (opening) आणि संपूर्ण समर्पण उदित होणे आवश्यक असते. मर्त्य अस्तित्वाच्या आधीपासूनच वर असणारी व पाठीमागे असणारी आणि मर्त्य अर्धजागृत अस्तित्वाला कवेत घेणारी एक महान दिव्य ‘चेतना’ असते. ती महान दिव्य चेतना, प्रकृतीला तिच्या सर्व भागांनिशी आणि सर्व स्तरांवर, कोणत्याही मर्यादेविना ग्रहण करता येणे शक्य व्हावे म्हणून, प्रकृतीने स्वत:ला व्यापकतेने खुले करणे म्हणजे ‘उन्मुखता’! या ग्रहणशीलतेमध्ये धारण करण्याची अक्षमता असता कामा नये, किंवा मूलद्रव्यांतरणाच्या तणावामुळे (transmuting stress) शरीर किंवा मज्जातंतू, प्राण किंवा मन, किंवा संपूर्ण व्यवस्थेतील कोणती एखादी गोष्ट कोलमडूनही पडता कामा नये. (म्हणून त्यासाठी) ईश्वरी ‘शक्ती’चे सदोदित बलशाली असणारे आणि अधिकाधिक आग्रही होत जाणारे कार्य धारण करण्यासाठी सतत चढतीवाढती असणारी क्षमता, आणि अपार ग्रहणशीलता असणे आवश्यक असते. अशी ग्रहणशीलता नसेल तर कोणतेच महान आणि चिरस्थायी असे कोणतेही कार्य घडणे शक्य होणार नाही; आणि अशा वेळी ती ‘योगसाधना’ कोलमडून बंद पडेल किंवा जडतायुक्त अडथळा निर्माण झाल्यामुळे बंद होईल किंवा त्या प्रक्रियेमध्येच काहीतरी विनाशक अटकाव किंवा सुस्ती येऊन ती बंद पडेल अशी शक्यता असते; या प्रक्रियेमध्ये अपयश येऊ नये असे जर वाटत असेल तर योगसाधना निरपवाद आणि समग्र असणेच आवश्यक असते.

परंतु कोणत्याही मानवी प्रणालीमध्ये ही अनंत ग्रहणशीलता आणि अमोघ क्षमता नसते, म्हणून ‘ईश्वरी शक्ती’ जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये अवतरित होते तेव्हा, ती त्या व्यक्तीची (ग्रहण)क्षमता वृद्धिंगत करत नेते. ईश्वरी ‘शक्ती’ वरून त्या व्यक्तीमध्ये प्रविष्ट होताना, व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये कार्य करण्यासाठी ‘सामर्थ्य’ निर्माण करते. ते सामर्थ्य आणि ती ग्रहणक्षमता जेव्हा त्या ईश्वरी शक्तीद्वारे समतुल्य केली जाते तेव्हाच, अतिमानसिक ‘योग’ यशस्वी होण्याची शक्यता असते. आपण ‘जेव्हा आपले अस्तित्व हळूहळू चढत्यावाढत्या समर्पणाद्वारे ईश्वरा’च्या हाती सोपवीत जातो तेव्हाच ही गोष्ट शक्य होते. तेथे एक समग्र आणि अखंडित अशी सहमती आणि कार्यासाठी जी गोष्ट करणेच आवश्यक आहे ती गोष्ट ‘ईश्वरी शक्ती’ला करू देण्याची धैर्ययुक्त इच्छाशक्ती असणेच आवश्यक असते. (उत्तरार्ध उद्याच्या भागात…)

– श्रीअरविंद (CWSA 12 : 169-170)

साधना, योग आणि रूपांतरण – १९३

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०९

वरून होणाऱ्या अवतरणाच्या प्रक्रियेमध्ये आणि त्याच्या कार्याबाबत, स्वतःवर संपूर्णपणे विसंबून राहता कामा नये, ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे. येथे ‘सद्गुरू’च्या मार्गदर्शनावर अवलंबून राहिले पाहिजे. जे जे काही घडते ते ते सारे त्यांच्या विवेकावर, मध्यस्थीवर आणि त्यांच्या निर्णयावर सोपविले पाहिजे.

कारण बरेचदा असे घडते की, या अवतरणामुळे, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्ती उत्तेजित होतात, उद्दीपित होतात आणि उच्चतर शक्तींमध्ये मिसळू पाहतात आणि त्यांना स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:कडे वळवू पाहतात. बरेचदा तर असेही घडते की, परमेश्वर किंवा दिव्य मातेचे (मायावी) रूप घेऊन, एक किंवा अनेक अ-दैवी शक्ती प्रकट होतात आणि साधकाकडून सेवेची आणि शरणागतीची मागणी करतात. साधकाने जर त्यास संमती दिली तर मग अत्यंत विघातक परिणाम घडून येतात.

खरोखरच, साधक केवळ ‘ईश्वरी’ कार्यालाच सहमती देत असेल आणि त्याच्या मार्गदर्शनाला शरण जात असेल किंवा समर्पित होत असेल तर मग सारेकाही सुरळीत चालत राहते. ही सहमती देणे आणि सर्व अहंकारी शक्तींना किंवा अहंकाराला चुचकारणाऱ्या शक्तींना नकार देणे या गोष्टी साधनामार्गावरील संपूर्ण वाटचालीमध्ये संरक्षक कवचाप्रमाणे कार्य करतात. पण ‘प्रकृती’चे मार्ग हे मायाजालांनी भरलेले असतात, अहंकाराचे अगणित कपटवेश असतात; ‘राक्षसी माया’, ‘काळोखाच्या शक्तीं’ची भ्रांती, असाधारणरित्या कुशल असते. येथे तर्कबुद्धीचे मार्गदर्शन पुरे पडत नाही, बरेचदा त्यातून विश्वासघात होतो. आणि कोणत्याही आकर्षक, प्रलोभनकारी हाकेनुसार वागायला प्राणिक इच्छा तर आपल्यासोबत सदैव तयारच असते. आणि म्हणूनच आम्ही ज्याला ‘समर्पण’ असे संबोधतो, त्यावर ‘पूर्णयोगा’मध्ये आम्ही इतका अधिक भर देत असतो.

हृदयचक्र पूर्णपणे खुले झाले असेल आणि जर अंतरात्मा नेहमीच नियंत्रण ठेवत असेल तर, मग काही प्रश्नच उद्भवत नाही, मग सारेकाही सुरक्षित असते. परंतु कोणत्याही क्षणी, एखाद्या कनिष्ठ आवेगामुळे अंतरात्मा झाकोळला जाऊ शकतो. काही अगदी थोडेच जण या धोक्यांपासून दूर राहू शकतात आणि ही तीच माणसं असतात की, ज्यांना ‘समर्पण’ अगदी सहजतेने साध्य होते. या अतिशय कठीण प्रयासांमध्ये, जो ‘ईश्वरा’शी तादात्म्य पावलेला आहे किंवा जो ‘ईश्वरा’चे प्रतिनिधित्व करतो अशा व्यक्तीचे मार्गदर्शन आवश्यक आणि अनिवार्य ठरते.

‘योगाची केंद्रवर्ती प्रक्रिया’ याविषयी मला नेमके काय म्हणायचे आहे याची पुरेशी स्पष्ट कल्पना येण्यासाठी तुम्हाला या लिखाणाची मदत होईल. येथे मी काहीसे विस्ताराने लिहिले आहे पण, अर्थातच, मी येथे फक्त मूलभूत गोष्टीच समाविष्ट करू शकलो आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 329-330)

अमृतवर्षा ०३

 

जिथे कोणी येणार जाणार नाही अशा एका अगदी शांत कोपऱ्यामध्ये बसले पाहिजे, जिथे तुम्ही अगदी सुयोग्य अशा स्थितीत असाल आणि अगदी नि:श्चल बसलेले असाल आणि मग अशा स्थितीत तुम्ही ध्यान करू शकाल – असे समजण्याची सार्वत्रिक चूक करू नका. यात काही तथ्य नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या ध्यान करता येणे ही खरी आवश्यक गोष्ट आहे. आणि ‘डोकं रिकामं करणे’ याला मी ‘ध्यान’ म्हणत नाही तर ‘ईश्वराच्या निदिध्यासनामध्ये स्वत:चे लक्ष एकाग्र करणे’ याला मी ‘ध्यान’ म्हणते. आणि असे निदिध्यासन तुम्ही करू शकलात तर, तुम्ही जे काही कराल त्याची गुणवत्ता बदलून जाईल – त्याचे रंगरूप बदलणार नाही, कारण बाह्यत: ती गोष्ट तशीच दिसेल पण त्याची गुणवत्ता बदललेली असेल.

 

जीवनाची गुणवत्ताच बदलून जाईल आणि तुम्ही जे काही होतात त्यापेक्षा तुम्ही काहीसे निराळेच झाले आहात असे तुम्हाला जाणवेल; एक प्रकारची शांती, एक प्रकारचा दृढ विश्वास, आंतरिक स्थिरता, कधीच हार न मानणारी, अढळ अशी अपरिवर्तनीय शक्ती तुम्हाला जाणवेल.

 

अशा स्थितीमध्ये तुम्हाला कोणी बाधा पोहोचविणे अवघड असते. विविध शक्ती त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. हे जगत अनेक विरोधी शक्तींनी भरलेले आहे; त्या शक्ती सर्व काही बिघडवून टाकू पाहत असतात… पण त्यामध्ये त्या काही अंशीच यशस्वी होतात; फक्त त्या शक्ती तुम्हाला नवीन प्रगती करण्यास भाग पाडण्यासाठी आवश्यक असते तेवढ्याच प्रमाणात यशस्वी होतात.

 

जीवनाकडून तुमच्यावर जेव्हा कधी आघात होतो तेव्हा तुम्ही लगेचच स्वत:ला सांगितले पाहिजे, “अरेच्चा, याचा अर्थ आता मला सुधारणा केली पाहिजे.” आणि मग तेव्हा तोच आघात हा आशीर्वाद ठरतो. अशावेळी तोंड पाडून बसण्यापेक्षा, तुम्ही मान वर करून आनंदाने म्हणता, ”मी काय शिकले पाहिजे? ते मला जाणून घ्यायचे आहे. मी माझ्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे? ते मला जाणून घ्यायचे आहे.” तर, तुम्ही असे केले पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 121-122]

विचार शलाका – ०७

आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे, असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये ‘प्रकृती’ने मनुष्यजात घडवली. मनुष्यसुद्धा तशीच एक प्रयोगशाळा असू शकतो. त्या प्रयोगशाळेत दिव्य जीव म्हणून आत्म्याला प्रकट करण्याची, तसेच एक दिव्य प्रकृती विकसित करण्याची आणि अतिमानव घडविण्याचे कार्य करण्याची प्रकृतीची इच्छा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 502)

ईश्वरी कृपा – ३३

ज्यांनी ईश्वराप्रत आत्मदान केले आहे, अशा व्यक्तींना जी जी अडचण सामोरी येते, ती प्रत्येक अडचण म्हणजे त्यांच्यासाठी एका नव्या प्रगतीचे आश्वासन असते आणि त्यामुळे ती ‘ईश्वरी कृपे’ने दिलेली भेटवस्तू आहे, अशा रितीने त्यांनी तिचा स्वीकार केला पाहिजे.

*

केवळ ईश्वराची ‘कृपा’च शांती, सुख, शक्ती, प्रकाश, ज्ञान, आनंद आणि प्रेम या गोष्टी त्यांच्या साररूपात आणि त्यांच्या सत्यरूपात प्रदान करू शकते.

*

आपण ईश्वरी ‘कृपे’साठी प्रार्थना केली पाहिजे – कारण ईश्वरी ‘न्याय’ जर इथे आविष्कृत व्हायचा झाला तर, त्याच्या समोर टिकून राहू शकतील असे फारच थोडेजण असतील.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 96, 85, 83)

देह सोडल्यानंतर चैत्य पुरुष, दुसऱ्या जगातील काही विशिष्ट अनुभव घेतल्यानंतर, मानसिक आणि प्राणिक व्यक्तिमत्त्व टाकून देतो आणि गतकाळातील अर्क आत्मसात करण्यासाठी आणि पुढील जन्माची तयारी करण्यासाठी विश्रांत अशा स्थितीत निघून जातो.

नवीन जन्माची परिस्थिती कशी असेल हे, ह्या तयारीवरच अवलंबून असते. या तयारीमधूनच, नवीन व्यक्तिमत्त्वाची पुनर्रचना आणि त्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची निवड यासाठी मार्गदर्शन मिळते.

निघून गेलेला चैत्य पुरुष भूतकाळातील अनुभव अर्करूपाने स्मरणात साठवून ठेवतो, तो त्यांचे रूप वा तपशील लक्षात ठेवत नाही. आत्ताच्या आविष्करणाचा एक भाग म्हणून आत्म्याने जर गत जीवनातील एक वा अधिक व्यक्तिमत्त्वं आपल्यासोबत आणली असतील तर, त्याला गत जन्मातील काही तपशील आठवण्याची शक्यता असते. अन्यथा, केवळ योगदृष्टीनेच अशी स्मृती येते.

चैत्य पुरुषाच्या उत्क्रांतीमध्ये प्रतिगामी वाटतील अशाही काही हालचाली असतात, पण त्या केवळ आडव्यातिडव्या हालचाली असतात, ते खरोखरीचे मागे जाऊन पडणे नसते, तर ते ज्याच्यावर अद्यापि काम झालेले नाही पण परत त्यावर अधिक चांगले काम करावे म्हणून, अशा कोणत्यातरी गोष्टीकडे परत फिरून जाणे असते.

आत्मा प्राणिमात्रांच्या अवस्थेत परत मागे जात नाही; पण प्राणिक व्यक्तिमत्त्वातील काही भाग स्वत:ला विलग करून घेत, स्वत:मधील पशुप्रवृत्तीवर काम करण्यासाठी, परत पशुजन्माला जाऊन मिळू शकतो. लोभी मनुष्य साप बनून पुन्हा जन्माला येतो, या लोकरूढ कल्पनेमध्ये काही तथ्य नाही. ह्या प्रचलित काल्पनिक अंधश्रद्धा आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 534)

(श्रीमाताजींनी त्याच्या घडणीच्या काळामध्ये, तीव्र योगसाधना केली होती, त्या काळामध्ये त्यांच्या योगसाधनेचा एक मार्ग होता तो म्हणजे ‘प्रार्थना व ध्यान’. त्या काळामध्ये त्या रोज पहाटे ध्यानाला बसत असत आणि त्यातून प्रस्फुटीत झालेले विचार नंतर लिहून काढत असत, ते विचार पुढे Prayers and Meditations या ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आले. मुळात फ्रेंच भाषेमध्ये लिहिलेल्या यातील काही प्रार्थनांचे श्रीअरविंदांनी इंग्रजीत भाषांतर केले. या प्रार्थना योगसाधकांना मार्गदर्शक आहेत.)

१५.०६.१९१३ रोजी श्रीमाताजींनी केलेली प्रार्थना. Read more