Posts

आमच्या हृदयांत गुप्त असलेला आंतरिक मार्गदर्शक, जगद्गुरू हा पूर्णयोगाचा श्रेष्ठ मार्गदर्शक आणि गुरु आहे. हा आंतरिक जगद्गुरू आपल्या ज्ञानाच्या तेजस्वी प्रकाशाने आमचा अंधकार नाहीसा करतो; हा प्रकाश आमच्या ठिकाणी, या आंतरिक जगद्गुरूच्या वाढत्या वैभवाच्या आत्माविष्काराचे रूप घेतो. हा गुरु आमच्या ठिकाणी क्रमाक्रमाने त्याचे स्वाभाविक स्वातंत्र्य, आनंद, प्रेम, सामर्थ्य आणि अमृतत्व अधिकाधिक प्रमाणात व्यक्त करतो. तो आपले स्वतःचे दिव्य उदाहरण आमच्या मानवी पातळीच्या वरती आमचे साध्य म्हणून ठेवतो; त्याचे ध्यान आमची कनिष्ठ प्रकृती करते, आणि अंतिमत: ती ज्याचे ध्यान करते त्याची जणू प्रतिमूर्तीच बनून जाते. तो स्वत:चे अस्तित्व आणि त्याचा प्रभाव आमच्यामध्ये ओतून, विश्वात्मक ईश्वराशी आणि विश्वातीत ईश्वराशी एकरूपता प्राप्त करून देण्याची क्षमता आमच्या ठायीं निर्माण करतो.

या आंतरिक गुरुची कार्यरीती, कार्यपद्धती कोणती असते? तर त्याला कोणतीच एकच एक पद्धती नसते; व सर्व पद्धती ह्या त्याच्याच आहेत हे या प्रश्नाचे उत्तर आहे.

प्रकृतीत ज्या उच्चतम प्रक्रियांची व व्यापारांची पात्रता असेल, त्या प्रक्रियांचे व व्यापारांचे स्वाभाविक संघटन ही त्या गुरूची कार्यपद्धती आहे. क्षुद्रांत क्षुद्र तपशिलाच्या गोष्टी, अगदी महत्त्वशून्य दिसणाच्या क्रिया आणि सर्वात मोठ्या गोष्टी व क्रिया यांच्याकडे या पद्धतीत सारख्याच काळजीने, सारख्याच बारकाईने लक्ष दिले जाते आणि या सर्वांना शेवटी प्रकाशाच्या क्षेत्रात उचलून घेऊन त्यांचे परिवर्तन घडवून आणण्यात येते. कारण ह्या आंतरिक गुरुच्या योगामध्ये उपयोगात येऊ शकणार नाही इतकी कोणतीच गोष्ट क्षुल्लक नाही व मिळवण्यासाठी धडपडावे एवढी कोणतीच गोष्ट मोठीदेखील नाही. जो ईश्वराचा सेवक आणि शिष्य आहे, त्याला गर्व वाहण्याचे, मी मी म्हणण्याचे काहीच कारण नसते; कारण त्याच्यासाठी सर्व काही करण्याची व्यवस्था वरून होत असते. त्याचप्रमाणे या सेवक शिष्याला स्वतःच्या वैयक्तिक दोषांमुळे, स्वतःच्या प्रकृतीतील अडचणींमुळे निराश होण्याचा अधिकार नसतो, कारण त्याच्या ठिकाणी कार्य करणारी शक्ति ही अ-वैयक्तिक (Impersonal) किंवा अति-वैयक्तिक (Superpersonal) आणि अनंत (Infinite) अशी असते.

आमच्या अंतरंगातील गुरू ज्या पद्धतीचा वापर करतो त्याच पद्धतीचा वापर यथाशक्य पूर्णयोगाचा गुरू करत राहील. अर्थात शिष्याची प्रकृती पाहून त्या प्रकृतीला धरूनच पूर्णयोगाचा गुरु त्याला मार्गदर्शन करीत जाईल.

गुरूला तीन साधने उपलब्ध असतात. शिष्याला शिकवण देणे, आपले उदाहरण शिष्यासमोर ठेवणे, आपला मूक प्रभाव शिष्यावर पडेल असे करणे. गुरूने आपली अस्मिता, आपली मते शिष्यावर लादावी, शिष्याने आपले मन मोकळे ठेवून गुरु देईल ते, त्यांत विचार न करतां मान्य करून साठवावे, असा भलता मार्ग शहाणा गुरु सांगणार नाही; तो शिष्याच्या मनात केवळ बीज टाकील, विचाराचे उत्पादनक्षम असे खात्रीचे बीज टाकील आणि शिष्याच्या मनातील ईश्वर त्या बीजाची जोपासना करील अशी श्रद्धा ठेवील. शहाणा गुरु पाठ देण्यापेक्षा, शिष्याच्या आंतरिक शक्ति जागृत करण्याकडे अधिक लक्ष देईल. शिष्याच्या आंतरिक शक्ति, आंतरिक अनुभव स्वाभाविक प्रक्रियेने, मोकळ्या वातावरणात वाढावे असा प्रयत्न करील. तो शिष्याला एखादी कार्यपद्धति शिकवताना हे स्पष्ट करील की, ही पद्धति त्याला एक उपयुक्त उपाय म्हणून, उपयुक्त साधन म्हणून शिकवलेली आहे; तीच उपयोगांत आणली पाहिजे, ती उपयोगात आणलीच पाहिजे असे कोणतेहि बंधन त्याजवर नाहीं; तिला त्याने शिरोधार्य आचारसूत्राचे, ठाम दिनचर्येचे स्वरूप देऊ नये.

शहाणा गुरु या गोष्टीची काळजी घेईल की, शिष्याने त्याला शिकवलेल्या साधनाला मर्यादा घालणाऱ्या भिंतीचे स्वरूप देऊ नये. त्याला शिकवलेली प्रक्रिया त्याने यांत्रिक बनवून ठेवू नये. शहाण्या गुरूचे काम इतकेच राहील की, त्याने शिष्याच्या अंत:करणात दिव्य प्रकाश जागवावा, दिव्य शक्ति तेथे क्रियाशील होईल असे करावे; तो स्वत: या दिव्य प्रकाशाचा व दिव्य शक्तीचा केवळ वाहक असतो, त्यांना वाहून नेणारे केवळ शरीर असतो, त्यांच्या हातातले एक साहाय्यक साधन असतो.

गुरूने दिलेल्या पाठापेक्षा गुरूचे उदाहरण अधिक सामर्थ्यशाली असते; पण, बाह्य कृतीच्या उदाहरणाला किंवा वैयक्तिक शीलाच्या उदाहरणाला फार महत्त्व नसते. या उदाहरणांनाहि त्यांचे स्थान असते, उपयोग असतो; परंतु दुसऱ्याच्या ठिकाणी सर्वात जास्त अभीप्सा उत्तेजित करणारी मध्यवर्ति गोष्ट म्हणजे गुरूच्या ठिकाणी असलेला दिव्य साक्षात्कार, जो त्याचे सर्व जीवन, त्याची आंतरिक अवस्था व त्याच्या सर्व क्रिया नियंत्रित करतो. हा सार्वत्रिक सारभूत घटकाच्या स्वरूपाचा असतो; त्याहून दुसरे सर्व, गुरूच्या वैयक्तिक अस्मितेचा व उपाधीचा (Circumstance) भाग असतो. गुरूच्या अंतरीचा हा क्रियाशील साक्षात्कार साधक-शिष्याच्या अंतरंगाला प्रतीत व्हावयास हवा; साधक-शिष्याने आपल्या प्रकृतीनुसार हा साक्षात्कार स्वत:च्या ठिकाणी निर्माण करून अनुभवावयास हवा; गुरूच्या बाह्य वर्तनाचे अनुकरण करण्याच्या भानगडींत शिष्याने पडू नये; हे अनुकरण शिष्याच्या ठिकाणी सुयोग्य स्वाभाविक फलनिष्पत्ति करण्याऐवजी त्याच्या ठिकाणची निर्माणशक्ति शून्यवत् करील, असाच संभव अधिक आहे.

गुरूच्या उदाहरणाहून त्याच्या अस्मितेचा मूक प्रभाव हा अधिक महत्त्वाचा, सामर्थ्यवान् असतो. गुरूचा शिष्यावर बाह्यवर्ती अधिकार जो असतो त्याला आम्ही प्रभाव म्हणत नाही; गुरूच्या संपर्कात जे सामर्थ्य असते, त्याच्या केवळ उपस्थितीचे जे सामर्थ्य असते, त्याचा आत्मा दुसऱ्याच्या आत्म्याच्या निकट असल्याने त्या दुसऱ्या आत्म्यात, शब्दाचा उपयोग न करता, गुरु आपली अस्मिता व आपली आध्यात्मिक संपत्ति ज्या आपल्या मूक सामर्थ्याच्या बळावर ओततो त्या बळाला ‘प्रभाव’ असे नाव आम्ही देतो. गुरूचे हे सर्वश्रेष्ठ लक्षण आहे. श्रेष्ठ गुरु हा तितकासा पाठ देणारा गुरु नसतो; तो आपल्या भोवतालच्या सर्व ग्रहणशील साधकांमध्ये आपल्या केवळ उपस्थितीने दिव्य जाणीव ओतणारा आणि या दिव्य जाणिवेचीं घटकभूत तत्त्वे, प्रकाश, सामर्थ्य, शुद्धता आणि आनंद ओतणारा असतो.

पूर्णयोगाच्या गुरूचे आणखी एक लक्षण हे असेल की, तो आपल्या गुरुपणाची बढाई मारणार नाहीं; कारण त्याच्या ठिकाणीं सामान्य मानवाचा पोकळ डौल आणि वृथा आत्मगौरव करण्याची भावना असणार नाही. जर त्याला काही काम असेल तर, त्याची भावना अशी असेल की, ते काम ईश्वराने त्याजकडे सोपविलेले काम आहे; तो केवळ ईश्वराच्या इच्छेचा वाहक आहे, पात्र आहे, प्रतिनिधि आहे. आपल्या मानव बंधूंना मदत करणारा मानव, बालांचा नायक (नेता) असलेला एक बाल, अनेक दीप उजळणारा एक दीप, आत्म्यांना जागे करणारा एक जागृत आत्मा आहे असे तो मानील, आणि तो उच्चतम अवस्थेतील असेल तर तो ईश्वराची एक विशिष्ट शक्ति वा रूप असेल आणि तो स्वत:कडे ईश्वराच्या इतर शक्तींना येण्यासाठी हाक देणारा असेल.

– श्रीअरविन्द
(CWSA 23 : 61-62)

भक्तिमार्ग हा परम प्रेम व परम आनंद यांच्या भोगाला आपले साध्य मानतो. ईश्वर हा व्यक्तिरूपात विश्वाचा दिव्य प्रेमी व भोक्ता आहे, या कल्पनेचा उपयोग सामान्यतः भक्तियोगात करण्यात येतो. भक्तियोगामध्ये जग म्हणजे ईश्वराची लीला आहे या भूमिकेतून पाहिले जाते; आत्मविलोपन व आत्मप्रकटीकरण यांच्या निरनिराळ्या अवस्थांमधून जात जात, त्या लीलेच्या शेवटच्या अंकामध्ये, जीवाचा मानवी जीवनात प्रवेश होतो.

मानवी जीवनाच्या सर्व भावनामय स्वाभाविक संबंधांचा उपयोग करून, सर्वप्रेमी, सर्वसुंदर, सर्वानंदी ईश्वराच्या संपर्काचा आनंद भोगावयाचा; सांसारिक नश्वर नात्यांतील भावनासुख टाकून द्यावयाचे हे भक्तियोगाचे तत्त्व आहे. या योगात पूजा व ध्यान हे केवळ साधन आहे; ईश्वराशी नाते जोडता यावे व ईश्वराशी जोडलेल्या नात्याची उत्कटता वाढावी यासाठीच केवळ या योगात पूजा व ध्यान यांचा उपयोग करण्यात येत असतो. हा योग भावनात्मक संबंधांचा उपयोग करण्यात अत्यंत उदार आहे. इतका की, ईश्वराशी शत्रुत्व किंवा विरोध ही भावना ही तीव्र उतावळ्या प्रेमाची भ्रष्टरूपातील भावना आहे असे हा योग मानतो आणि ही विरोधी भावना देखील साक्षात्काराला व मोक्षाला साधन म्हणून उपयोगी पडू शकते असे या योगाचे म्हणणे आहे. सर्वसाधारणत: ह्या भक्तिमार्गाकडे पाहता असे दिसते कि, तो या मार्गातील साधकांना ज्ञानमार्गातील साधाकांप्रमाणेच जगाच्या संसारापासून दूर नेणारा ठरतो; भक्तियोगानुसार, भक्त सर्वातीत, विश्वातीत अशा ईश्वरांत विलीन होतो.

परंतु भक्तिमार्गातहि संसारत्याग करून ईश्वरात विलीन होणे हा परिणाम टाळता येणे शक्य असते. या मार्गात हा परिणाम टाळणारी एक व्यवस्थाही आहे, ती अशी की, दिव्य प्रेम हे ईश्वर आणि साधकाचा आत्मा या नात्यातच प्रकट व्हावे, असा निर्बध नसून; त्याचा व्याप याहूनहि अधिक असतो –

परमात्म्याचे प्रेम व आनंद यांचा समान साक्षात्कार झालेले ईश्वराचे जे भक्त असतात त्यांचा एक मेळा बनतो व या मेळ्यातील भक्तांनी एकमेकांवर दिव्य प्रेम करावें, एकमेकांनी एकमेकांची पूजा करावी असा भक्तिमार्गाचा कटाक्ष असतो.

भक्तिमार्गात आणखीहि एक याहूनहि अधिक व्यापक अशी संसार-त्याग-विरोधी व्यवस्था आहे. भक्ताचा साक्षात्कार असा असतो की, केवळ सर्व प्राण्यात, मानवात व पशूतच नव्हे, तर सर्व रूपधारी वस्तूंत व निर्जिवांतहि भक्ताच्या प्रेमाचा दिव्य विषय असणारा ईश्वर उपस्थित आहे.
भक्तियोगाचे हे व्यापक दर्शन मानवी भावना, संवेदना, सौंदर्यप्रतीति यांचे एकंदर क्षेत्र उन्नत करून त्याला दिव्य पातळीवर नेऊ शकते, या क्षेत्रात सर्वत्र आध्यात्मिकता भरू शकते, हे आपण समजू शकतो आणि मानवता सर्व विश्वभर प्रेम आणि आनंद यांजकडे वाटचाल करण्याचा जो जागतिक परिश्रम करीत आहे तो योग्यच आहे असे भक्तियोगाच्या वरील फळावरून आपण म्हणू शकतो.

– श्रीअरविन्द
(CWSA 23 : 39)

ज्ञानमार्ग हा, परमश्रेष्ठ एकमेवाद्वितीय असणाऱ्या आत्म्याचा साक्षात्कार हे आपले साध्य मानतो. साधक या मार्गात बुद्धीचा उपयोग करून ‘विचारा’च्या द्वारा ‘विवेका’कडे, वाटचाल करतो, सारासारविवेकाकडे वाटचाल करतो. ज्ञानमार्ग आमच्या नामरूपात्मक प्रकट अस्तित्वाचे वेगवेगळे घटक बारकाईने पाहून अलग करतो. ज्ञानमार्गी साधक या घटकांपैकी प्रत्येक घटक घेऊन, अमुक एक घटक म्हणजे आत्मा नव्हे, तमुक एक घटक म्हणजे आत्मा नव्हे, (नेति, नेति) याप्रमाणे प्रत्येक घटकाची आत्म्याशी एकरूपता नाकारतो व त्या सर्वांना आत्म्यापासून दूर करून, हे घटक प्रकृतीचे घटक आहेत, नामरूपात्मक प्रकृतीचे घटक आहेत, मायेची – नामरूपात्मक जाणिवेची निर्मिती आहे असे म्हणतो; त्यांना आत्म्यापासून निराळे करून एका सर्वसामान्य वर्गात घालतो; प्रकृति, माया असे सर्वसामान्य नाव देतो.

याप्रमाणे ज्ञानमार्गी साधक शुद्ध एकमेव परमश्रेष्ठ आत्म्याशी आपले एकत्व योग्य प्रकारे प्रस्थापित करू शकतो. हा आत्मा अविकारी, अविनाशी असून त्याच्या लक्षणांत कसलेही रूप, कसलीही घटना येत नाही. ज्ञानमार्गी साधक येथपर्यंत आल्यावर, सामान्यतः नामरूपात्मक जगाला आपल्या जाणिवेतून भ्रम समजून काढून टाकतो आणि सर्वश्रेष्ठ आत्म्यांत आपला वैयक्तिक आत्मा विलीन करून टाकतो, तो परत जगाच्या संसारात येत नाही.

तथापि, हें कैवल्य, केवल पूर्णत्व हा ज्ञानमार्गाचा एकमेव अथवा अटळ परिणाम नाही. साधक वैयक्तिक ध्येयाकडे कमी लक्ष देऊन मानवतेच्या हिताकडे, सर्वभूतांच्या हिताकडे अधिक लक्ष देत असेल, तर ज्ञानमार्गानें तो विश्वातीत तत्त्वात विलीन होऊ शकत असला तरी, आपल्या पराक्रमानें तो विश्वाचा संसार ईश्वराकरतां जिंकून घेईल. परमात्मा केवळ आपल्या स्वत:च्या अस्तित्वातच नव्हे, तर सर्व जीवाजीवांत आहे, तसेच जगाच्या नामरूपात्मक घटना ईश्वरी जाणिवेच्याच लीला आहेत, त्या या जाणिवेच्या खऱ्या स्वरूपाला सर्वस्वी परकीय नाहीत ही अनुभूति मात्र साधकाला मिळाली असली पाहिजे.

या अनुभूतीच्या बळावर ज्ञानाचे सर्व प्रकार, मग ते कितीहि लौकिक असोत, ते हातांत घेऊन त्यांना ईश्वरी जाणिवेच्या व्यापारांचे रूप देता येईल; आणि ज्ञानाचा एकमेव अद्वितीय विषय स्व-रूपाने कसा आहे व त्याच्या आकारांच्या व प्रतीकांच्या लीलेत कसा दिसतो हीहि अनुभूती येईल. ज्ञानमार्गाची या प्रकारची वाटचाल मानवी बुद्धीचे व प्रतीतीचे सर्व क्षेत्र उंचावून दिव्य करू शकेल, आध्यात्मिकता-संपन्न करू शकेल; आणि मानवता ज्ञानासाठी विश्वभर जो अतीव परिश्रम घेत आहे तो योग्यच आहे असे त्यायोगे ठरेल.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 38)

राजयोगात सर्वप्रथम जी क्रिया हाती घेण्यात येते ती अवधानपूर्वक, काळजीपूर्वक आत्मशासन करण्याची क्रिया होय. या आत्मशासनामध्ये, निम्न पातळीवरील नाडी-पुरुषाच्या बेबंद क्रियांची जागा मनाच्या चांगल्या सवयींनी घेतली जाते. सत्याचा अभ्यास, अहंकारी धडपडीचे सर्व प्रकार टाकून देणे, दुसऱ्यांना इजा करण्याचे टाळणे, पावित्र्य, मानसिक राज्याचा खरा स्वामी जो दिव्य पुरुष त्याचे नित्य चिंतन, त्याचा नित्य ध्यास या गोष्टींनी मन व हृदय पवित्र, आनंदमय व विचक्षण बनते.

हे जे आतापर्यंत वर्णन केले ते राजयोगातील केवळ पहिले पाऊल होय. यानंतर साधकाने मनाचे आणि इंद्रियांचे सामान्य व्यापार अगदी शांत करावयाचे असतात; असे केले म्हणजेच साधकाचा आत्मा जाणिवेच्या उच्चतर स्तरांवर चढून जाण्यास मोकळा होतो आणि पूर्ण-स्वातंत्र्य व पूर्ण आत्म-प्रभुत्व यासाठी लागणारा पाया त्याला लाभतो. सामान्य मनाला नाडीसंघाच्या व शरीराच्या प्रतिक्रियांच्या आधीन राहावे लागते आणि त्यामुळे या मनाचे अनेक दोष व उणिवा उत्पन्न होतात, ही गोष्ट राजयोग विसरत नाही. हे दोष व उणिवा घालविण्यासाठी हठयोगातील आसन व प्राणायाम यांचा उपयोग राजयोग करतो; मात्र आसनांचे अनेक गुंतागुंतीचे प्रकार हठयोगात असतात, ते राजयोग बाजूला ठेवतो आणि त्याच्या स्वत:च्या साध्याला पुरेसा उपयोगी असा एकच सर्वात सोपा व परिणामकारक असा आसनाचा प्रकार तो घेतो. प्राणायामाचाही असाच एक सर्वात सोपा व परिणामकारक प्रकार तो घेतो. याप्रमाणे हठयोगाची गुंतागुंत व अवजडपणा राजयोग टाळतो; आणि त्याच्या प्रभावी, शीघ्र परिणामकारी प्रक्रियांचा उपयोग करून शरीर व प्राणक्रिया यांजवर ताबा मिळवतो आणि कुंडलिनी जागृत करतो – कुंडलिनी म्हणजे मूलाधार चक्रामध्ये वेटोळे घालून झोप घेत पडलेली शक्तिसर्पिणी; या सर्पिणीत सुप्त अशी सामान्यातीत शक्ति असते. कुंडलिनीची जागृती केल्यानंतर राजयोग हा चळवळ्या, चंचल मनाला पूर्ण शांत करून उच्चतर पातळीवर नेण्याचे कार्य करतो; याकरता तो क्रमाक्रमाने मानसिक शक्ती अधिकाधिक एकाग्र करीत जातो; या क्रमवार एकाग्रतेचा शेवट समाधीत होतो.

समाधी ही, मनाला त्याच्या मर्यादित जागृत व्यापारांपासून परावृत्त होऊन, अधिक मोकळ्या व अधिक उन्नत अशा जाणिवेच्या अवस्थांमध्ये जाण्याची शक्ति देते; या समाधि-शक्तीमुळे राजयोग एकाच वेळी दोन कार्यं साधतो. बाह्य जाणिवेच्या गोंधळापासून मुक्त अशी शुद्ध मानसिक क्रिया करून, मनाच्या पातळीवरून तो राजयोगी उच्चतर अतिमानसिक पातळीवर जातो; या पातळीवर व्यक्तीचा आत्मा आपल्या खऱ्या आध्यात्मिक अस्तित्वात प्रविष्ट होतो: हें एक कार्य; दुसरें कार्य : जाणिवेचा जो कोणता विषय असेल, त्या विषयावर जाणिवेची अनिर्बध एकाग्रता करण्याची शक्ति समाधीमुळे राजयोग्याला प्राप्त होते. आमच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आद्य विश्वशक्तीचे कार्य वरीलप्रमाणे चालते; जगावर दिव्य क्रिया घडते ती वरील पद्धतीने घडते.

राजयोगी हा समाधिस्थितीत उच्चतम विश्वातीत ज्ञान व अनुभव यांचा भोक्ता असतोच; त्याला वरील अनिर्बध एकाग्रतेने कोणत्याहि विषयावर आपली जाणीव वापरण्याची शक्ति मिळाली म्हणजे तो या शक्तीचा वापर करून, जागृत अवस्थेत त्याला हवे ते वस्तुविषयक ज्ञान मिळवू शकतो; तसेच वास्तव जगांत हवे ते प्रभुत्व, अर्थात् जगाला उपयुक्त व आवश्यक असे प्रभुत्व गाजवू शकतो.

राजयोगाची प्राचीन पद्धति ही, केवळ स्व-राज्य हे राजयोगाचे साध्य मानीत नव्हती, तर साम्राज्य हे पण त्याचे साध्य मानीत होती. स्व-राज्य म्हणजे आत्म्याचे स्वत:वरचे राज्य, स्वत:च्या क्षेत्रांतील सर्व अवस्था व व्यापार याजवर आत्म्याच्या, ज्ञात्याच्या जाणिवेचा पूर्ण ताबा असणे. साम्राज्य म्हणजे आत्म्याच्या, ज्ञात्याच्या जाणिवेने, तिच्या बाह्य व्यापारांवर आणि परिसरावर सुद्धां हुकमत चालविणे.

प्राणशक्ति व शरीर यांजवर हठयोग आपलें कार्य करतो, शारीरिक जीवन आणि या जीवनाच्या शक्ति पूर्णत्वास नेणे, त्यांना अतिनैसर्गिक सामर्थ्य येईल असे करणे हे आपले साध्य मानतो; तसेच हे साध्य साधून तो मानसिक जीवनाच्या क्षेत्रात पाऊल टाकतो; त्याप्रमाणे राजयोग मनाशी आपला व्यवहार करतो व मानसिक जीवनाच्या शक्तींत, अतिनैसर्गिक पूर्णत्व व व्यापकत्व आणण्याचे साध्य स्वत:समोर ठेवतो; आणि त्यापुढे पाऊल टाकून, आध्यात्मिक अस्तित्वाच्या क्षेत्रांत तो प्रवेश करतो.

हे सर्व ठीक – परंतु राजयोगांत हा दोष आहे कीं, समाधीच्या अनैसर्गिक अवस्थांवर तो प्रमाणाबाहेर भर देतो. राजयोगाच्या या दोषामुळे, मर्यादेमुळे, राजयोगी भौतिक जीवनापासून काहीसा दूर राहतो; हे भौतिक जीवन आमच्या सर्व जीवनाचा पाया असते, आणि आम्ही मानसिक व आध्यात्मिक गोष्टी ज्या मिळवतो, त्या शेवटी आम्हाला भौतिक जीवनाच्या क्षेत्रांत आणावयाच्या असतात. राजयोगांत आध्यात्मिक जीवन समाधिस्थितीशी फारच निगडित असते, हा त्याचा विशेष दोष आहे.

आध्यात्मिक जीवन आणि या जीवनाचे अनुभव जागृतीच्या अवस्थेत आणि आमच्या सामान्य व्यवहारात पूर्णतया उपयोगात आणावे, पूर्णतया कार्यकारी करावे, हा आमचा उद्देश आहे. परंतु राजयोगांत आध्यात्मिक जीवन आमचे सर्व अस्तित्व व्यापण्यासाठी खाली उतरत नाही, ते आमच्या सामान्य अनुभवांच्या पाठीमागे राहते, दुय्यम भूमिका घेते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 36)

हठयोगाच्या मुख्य प्रक्रिया आसन व प्राणायाम या आहेत. हठयोगात अनेक आसने किंवा शरीराच्या निश्चल बैठका आहेत; या आसनांच्या द्वारा हठयोग प्रथम शरीराची चंचलता दूर करतो : शरीरात विश्वव्यापी प्राणशक्ती-सागरातून ज्या प्राणशक्ती ओतल्या जात असतात, त्या प्राणशक्ती, काहीतरी क्रिया व हालचाली करून निकालात न काढता, शरीरात राखून ठेवण्याची शरीराची असमर्थता या चंचलतेने व्यक्त होत असते; ही चंचलता प्रथम हठयोग अनेक आसनांचा उपयोग करून दूर करीत असतो; परिणामतः हठयोग शरीराला असामान्य आरोग्य देतो, जोर देतो, लवचिकपणा देतो; तसेच, ज्या सवयींमुळे शरीराला, सामान्य भौतिक प्रकृतीच्या ताब्यात व तिच्या स्वाभाविक व्यापारांच्या मर्यादित परिघामध्ये राहावे लागते, त्या सवयींपासून शरीराला मुक्त करण्यासाठी हठयोग प्रयत्नशील असतो. गुरुत्वाकर्षण-शक्तीवरसुद्धा विजय मिळविण्यापर्यंत, ह्या शरीरजयाची मजल जाऊ शकते अशी समजूत हठयोगाच्या प्राचीन परंपरेत कायमच प्रचलित असलेली दिसते.

विविध दुय्यम व सूक्ष्म प्रक्रियांद्वारा हठयोगी शरीरशुद्धी, नाडीशुद्धी करतो. शरीरातील नाना प्रकारचा मल, नाड्यांतील नाना प्रकारची घाण ही प्राणाच्या प्रवाहाला अवरूद्ध करते, म्हणून ती दूर करणे इष्ट असते; श्वास आणि उच्छवास या श्वसनक्रिया काही नियमांनुसार करणे म्हणजेच प्राणायामाच्या क्रिया होत; या क्रिया हठयोगाची फार महत्त्वाची साधने आहेत.

प्राणायाम म्हणजे श्वसनावर किंवा प्राणशक्तीवर नियंत्रण मिळविणे; प्राणशक्तीचे शरीरातील प्रमुख कार्य म्हणजे श्वसन होय. हठयोगाला प्राणायाम दोन तऱ्हांनी उपयोगी पडणारा आहे. त्याचा पहिला उपयोग : शरीराचे पूर्णत्व तो पूर्ण करतो. भौतिक प्रकृतीच्या पुष्कळशा सामान्य गरजा पुरविण्याच्या कामातून प्राणशक्ती मोकळी केली जाते; परिणामतः भक्कम आरोग्य, चिर तारुण्य आणि पुष्कळदा असामान्य दीर्घ आयुष्य हठयोग्याला प्राप्त होते.

त्याचा दुसरा उपयोग : प्राणायाम प्राणकोशातील ‘कुंडलिनी’ (वेटोळे घालून पडलेली प्रसुप्त प्राणक्रियासर्पिणी) जागी करतो आणि या कुंडलिनीच्या द्वारा हठयोग्याला, सामान्य मानवी जीवनात अशक्य असणाऱ्या अशा असामान्य शक्ती, असामान्य अनुभूतिक्षेत्रे व असामान्य जाणीव-क्षेत्रे खुली करून देतो; तसेच त्याला उपजतपणेच प्राप्त असणाऱ्या सामान्य शक्तीही अधिक तीव्र, जोरकस करतो…….

……हठयोगाचे परिणाम याप्रमाणे नजरेत भरणारे असतात; आणि सामान्य व भौतिक मनाला ते सहजच फार ओढ लावतात. तथापि हठयोगाचा प्रचंड खटाटोप करून शेवटीं आम्हाला जें प्राप्त होते ते एव्हढे मोलाचे आहे काय ? असा प्रश्न आमच्या पुढे येतो.

हठयोग भौतिक प्रकृतीचे साध्य साधून देतो. केवळ भौतिक जीवन तो दीर्घ काळ टिकवतो, तो या जीवनाचे पूर्णत्व पराकोटीला पोहोचवितो, भौतिक जीवन भोगावयाची शक्ति तो एक प्रकारे असामान्य दर्जाची करतो; हे सर्व खरें – पण या योगाचा एक दोष हा आहे की, त्याच्या कष्टमय अवघड प्रक्रिया योग्याचा इतका वेळ व इतकी शक्ति खातात, आणि सामान्य मानवी संसारापासून योग्याला इतकें पूर्णपणे तोडून टाकतात की, या योगाचीं फळे जगाच्या संसाराला उपयोगी पडतील असे करणे हठयोग्याला अगदीं अव्यवहार्य होते किंवा फारच थोड्या प्रमाणांत व्यवहार्य होते.

हठयोगाने मिळणाच्या सिद्धि राजयोगाने व तंत्रामार्गानेहि मिळू शकतात व या दुसऱ्या पद्धतीत कष्ट कमी पडतात, सिद्धि राखण्याच्या अटीहि हठयोगांतील अटींहून सौम्य असतात. हठयोगाने प्राप्त होणाच्या भौतिक सिद्धि म्हणजे खूप वाढलेली प्राणशक्ति, दीर्घ तारुण्य, सुदृढ प्रकृति व दीर्घ आयुर्मान या होत – परंतु या सिद्धि, सामान्य मानवी जीवनापासून अलग राहून, जगाच्या सामान्य व्यवहारांत यांची भर न टाकतां हठयोग्याने कृपणाप्रमाणे एकट्याने भोगावयाच्या असल्याने, एका दृष्टीने कुचकामी ठरतात. एकंदरीत, हठयोगाला मोठी मोठी फळे येतात, परंतु या फळांसाठी किंमत फारच मोजावी लागते आणि शेवटी, या फळांचा उपयोग मानवी समाजाला जवळजवळ काहीच होत नाहीं.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 34)

*

(एका साधकाला दिलेल्या उत्तरातील हा अंशभाग)
हठ्योगाच्या पद्धतीचा आम्ही आमच्या साधनेमध्ये समावेश करत नाही. या पद्धतीचा उपयोग जर तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने करणार असाल तर, ती पद्धत साधनेपेक्षा स्वतंत्र म्हणूनच, तुमच्या स्वत:च्या निवडीने, उपयोगात आणली गेली पाहिजे.

मुक्त व पूर्ण मानवी जीवनात, ईश्वर व प्रकृती यांचे पुन:एकत्व हे ज्याचे ध्येय असते; आणि आंतरिक व बाह्य कृती यांच्यात सुमेळ ही ज्याची पद्धत असते; तसेच त्या दोन्हींची परिपूर्ती दिव्यत्वात होते ही ज्याची अनुभूती असते; तोच योगसमन्वय उचित होय.

कारण, भौतिक जगतात उतरलेल्या उच्चतर सत्तेचे, सद्वस्तूचे मानव हेच असे प्रतीक व निवासस्थान आहे की, तेथे निम्नतर वस्तूला स्वतःमध्ये रुपांतर घडवून, उच्चतर वस्तूचा धर्म आत्मसात करता येतो आणि उच्चतर वस्तूला निम्नतर वस्तूच्या नाना रूपांतून आपले स्वतःचे स्वत्व प्रकट करता येते. ही जी द्विविध शक्ती व शक्यता असते, ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जे जीवन मानवाला दिले आहे, ते जीवन टाळणे ही केव्हाही योगाची अनिवार्य अट होऊ शकत नाही; किंवा त्याच्या परमोच्च प्रयत्नांचे वा त्याच्या सर्वात शक्तिशाली अशा आत्मपरिपूर्तीच्या साधनांचे म्हणजे योगाचे, अंतिम व पूर्ण साध्यही असू शकत नाही.

जीवन टाळणे, हे विशिष्ट परिस्थितीत तात्पुरत्या निकडीचे असू शकेल इतकेच; किंवा मानव जातीच्या सर्वसाधारण उद्धाराची तयारी करण्याकरिता म्हणून जीवन सर्वस्वी टाळण्याचा अत्यंतिक खास प्रयत्न कोणा व्यक्तीकडून करवून घेतला जात असेल, तर तेही समर्थनीय म्हणावे लागेल.

पण, योगाचा खरा व पूर्ण उद्देश, आणि उपयोग तेव्हाच सिद्ध झाला असे म्हणता येईल की, जेव्हा मानवाचा जाणीवयुक्त योग, निसर्गाच्या (प्रकृतीच्या) अर्धजागृत (Subconscious) योगाप्रमाणे बाह्यतः जीवनाशी समव्याप्त होईल; आणि अर्धजागृत व जाणीवयुक्त योगांचा मार्ग व सिद्धी यांजकडे पाहून आम्हाला सुस्पष्टपणे, खऱ्या अर्थाने व सर्वार्थाने असे म्हणता येईल की, “सर्व जीवन हे योगच आहे.”

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 08)

योगपद्धती आणि मानवाच्या सवयीच्या मनोवैज्ञानिक क्रिया यांचा संबंध थोड्याबहुत प्रमाणात विज्ञान आणि निसर्ग यांच्या संबंधासारखा आहे : वाफ किंवा वीज या निसर्ग शक्तीचे स्वाभाविक सामान्य व्यापार आणि याच शक्तीचे विज्ञानघटित व्यापार याचा जो संबध तोच संबध थोड्याफार प्रमाणात मानवाच्या सवयीच्या सामान्य मनोवैज्ञानिक क्रिया आणि योगप्रक्रिया यांचा आहे. विज्ञानाच्या प्रक्रिया ज्याप्रमाणे नियमितपणे केलेले प्रयोग, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि सातत्याने दिसून येणारे परिणाम यांद्वारे विकसित व निश्चित झालेल्या ज्ञानावर आधारित असतात, त्याचप्रमाणे योगाच्या प्रक्रिया पण अशाच ज्ञानावर आधारित असतात.

उदाहरणार्थ राजयोग घ्या. हा योग पुढील आकलनावर व अनुभवावर आधारलेला आहे : आमचे आंतरिक मूळ घटक, आमचे आंतरिक संयोग, आंतरिक नियत कार्ये आणि शक्ती, या सर्वांना एकमेकांपासून अलग करता येते, त्यांचा विलय पण करता येतो, त्यांच्यातून नवे संयोग घडविता येतात; आणि या नव्या संयोगांच्या द्वारा पूर्वी अशक्य असणाऱ्या नव्या कार्यांना त्यांना जुंपता येते. तसेच त्यांचे रूपांतर घडवून आणता येते. आणि निश्चित अशा आंतरिक प्रक्रियांच्या द्वारा त्यांचा नवा सर्वसाधारण समन्वय घडवून आणता येतो. ही राजयोगाची गोष्ट झाली.

हठयोगाची गोष्ट अशीच आहे. हा योग पुढील आकलनावर व या अनुभवावर आधारलेला आहे : आमचे जीवन सामान्यतः ज्या प्राणशक्तीवर आणि प्राणव्यापारांवर आधारलेले आहे, ज्यांचे सामान्य व्यापार निश्चित स्वरूपाचे व अपरिहार्य वाटतात, त्या शक्ती व त्या व्यापारांवर मानवाला प्रभुत्व संपादित करता येते, ते व्यापार बदलता येतात, स्थगितही करता येतात. अशक्यप्राय वाटावे असे परिणाम त्यामुळे घडून येतात आणि ज्यांना या प्रक्रियांमागील तर्कसंगती उमगत नाही त्यांना ते चमत्कारच वाटतात. ही हठयोगाची गोष्ट झाली.

राजयोग आणि हठयोग यांखेरीज जे योगाचे इतर प्रकार आहेत, त्या प्रकारात योगाचे हे वैशिष्ट्य तितकेसे दिसून येत नाही; याचे कारण, दिव्य समाधीचा आनंद प्राप्त करून देणारा भक्तियोग आणि दिव्य अनंत अस्तित्व व जाणीव प्राप्त करून देणारा ज्ञानयोग हे दोन्ही योग राजयोग वा हठयोग या दोन योगांइतके यांत्रिक नाहीत, ते अधिक अंतर्ज्ञानप्रधान आहेत. मात्र त्यांचाही आरंभ हा आम्हातील एखादी महत्त्वाची शक्ती वापरण्यापासूनच होत असतो.

एकंदरीत, योग या सामान्य नावाखाली ज्या पद्धती एकत्र करण्यात येतात, त्या सर्व पद्धती म्हणजे विशिष्ट मानसिक प्रक्रिया आहेत, निसर्गाच्या एखाद्या निश्चित सत्यावर त्या आधारलेल्या आहेत. योगामध्ये, या विशिष्ट मानसिक प्रक्रियाच्या आधारे, सामान्यतः न आढळून येणारे परिणाम व शक्ती विकसित होतात. अर्थात या शक्ती, हे परिणाम, सामान्य व्यापारांत नेहमीच अप्रकट अवस्थेत अंतर्भूत असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 07)

आमचा योगसमन्वय, मानव हा शरीरधारी आत्मा आहे यापेक्षा, तो मनोमय देहाचा आत्मा आहे असे मानतो; त्यामुळे मानव मनाच्या पातळीवरही आपल्या साधनेला आरंभ करू शकतो, असे मानतो; मनोमय कोशातील मानसिक शक्तियुक्त आत्मा हा उच्च आध्यात्मिक शक्ती, उच्च आध्यात्मिक अस्तित्व प्रत्यक्ष आत्मसात करू शकतो आणि अशा रीतीने, आपले अस्तित्व अध्यात्मसंपन्न करू शकतो आणि या उच्च आध्यात्मिक शक्तीचा उपयोग करून आपली सर्व प्रकृती पूर्ण, पूर्णतासंपन्न करू शकतो, असे आमचा योगसमन्वय मानतो.

असा आमचा दृष्टिकोन असल्याने, आत्म्याला उपलब्ध असणाऱ्या मनाच्या शक्तींचा उपयोग करण्यावर आरंभी आमचा भर आहे. आत्म्याच्या कुलूपांना ज्ञान, कर्म, भक्तीची त्रिविध किल्ली लावून ती उघडण्यावर आमचा भर आहे; आमच्या ‘समन्वययोगा’त हठयोगपद्धती उपयोगात आणावी लागत नाही, मात्र तिचा थोडासा उपयोग करण्यास हरकत नाही; राजयोग पद्धती आमच्या समन्वययोगात अनौपचारिक अंग म्हणून येऊ शकते.

आमचा समन्वययोग आम्ही हाती घेण्याची स्फूर्ती आम्हाला झाली ह्याला कारण आहे ते असे कि – मानवी आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक अस्तित्व जास्तीत जास्त विकसित व्हावे आणि या विकसित अस्तित्वाने व शक्तीने आमच्या मानवी जीवनाच्या सर्व प्रांतांत आम्हाला आमची प्रकृती मुक्त व दिव्य करता यावी, आणि हे सर्व कार्य पूर्णत्वास नेण्याचा मार्ग दीर्घ नसावा, अल्पांत अल्प अगदी जवळचा असावा अशी आमची इच्छा होती आणि असा मार्ग म्हणजे ‘समन्वययोग’ हे आमच्या लक्षात आले.

आमच्या समन्वययोगात ‘आत्मसमर्पण’ (surrender) हे तत्त्व आम्ही साधकांपुढे ठेवले आहे. साधकाने या योगात आपले अस्तित्व सर्वथा ईश्वराच्या हाती द्यावयाचे असते. साधकाने आपले सर्व अस्तित्व ईश्वराच्या अस्तित्वाच्या, जाणिवेच्या, शक्तिच्या, आनंदाच्या हाती द्यावयाचे असते. साधकाच्या अंतरात्म्यात, त्याच्या मनोमय अस्तित्वात, ईश्वराला भेटण्याची जेवढी म्हणून स्थाने आहेत, त्या त्या सर्व स्थानी साधकाने ईश्वराची भेट घ्यावयाची असते; त्याच्याशी साहचर्य, ऐक्य प्रस्थापित करावयाचे असते. हे ऐक्य प्रस्थापित झाल्यावर ईश्वर साधकाच्या साधनभूत अस्तित्वाचा प्रत्यक्ष मालक होतो, आपला पडदा दूर करून, उघडपणे मालक होतो आणि आपल्या उपस्थितीने व मार्गदर्शनाने साधकाचे मानवी अस्तित्व पूर्ण करतो, त्याच्या प्रकृतीच्या सर्व शक्ती पूर्णतासंपन्न करून त्याची दिव्य जीवन जगण्याची पूर्ण तयारी करून देतो.

– श्रीअरविंद

शिक्षक : एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे लहान मूलदेखील त्याच्या आंतरिक सत्याविषयी सजग होऊ शकते का?

श्रीमाताजी : लहान मुलांमध्ये ही जाणीव अगदी सुस्पष्ट असते, कारण ते सत्य त्यांना कोणत्याही विचारांच्या वा शब्दांच्या गुंतागुंतीविना थेट संवेद्य होते – हे तेच असते ज्यामुळे त्याला अगदी स्वस्थ वाटते किंवा ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटते. ….आणि हे सगळे प्रौढ माणसांपेक्षा लहान मुलामध्ये अधिक सुस्पष्ट असते कारण प्रौढ व्यक्तीमध्ये ह्या आंतरिक सत्याविषयीची संवेदना मनाच्या कार्यामुळे झाकोळली जाते.

लहान मुलाला वेगवेगळे सिद्धान्त सांगणे अगदीच निरूपयोगी आहे कारण जेव्हा त्याचे मन जागृत होईल तेव्हा त्या सिद्धान्ताच्या विरोधी हजारो कारणे त्याला सापडतील.

मुलांमध्ये एक छोटेसे सत्य दडलेले असते ते म्हणजे त्यांच्या अंतरात्म्यामध्ये असणारी दिव्यत्वाची उपस्थिती. वनस्पती व प्राण्यांमध्येदेखील हे अस्तित्व असते. वनस्पतींमध्ये हे अस्तित्व जागृत नसते, प्राण्यांमध्ये ते जागृत व्हायला सुरुवात झालेली असते आणि लहान मुलांमध्ये ते खूपच जागृत असते. मला अशी मुले माहीत आहेत की, जी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षीपेक्षा आणि चौदाव्या वर्षी पंचविसाव्या वर्षापेक्षा या आंतरात्मिक अस्तित्वाविषयी, चैत्यपुरुषाविषयी (Psychic being) अधिक जागृत होती.

आणि आश्चर्य म्हणजे, ज्या क्षणापासून ती शाळेत जायला सुरुवात करतात, जेथे अस्तित्वाच्या बौद्धिक भागाकडे त्यांचे लक्ष वेधून घेईल असे गहन मानसिक शिक्षण ती घेतात, तेव्हापासून या चैत्यपुरुषाबरोबरचा असलेला त्यांचा संपर्क बहुधा ती नेहमीच व जवळजवळ पूर्णपणे हरवून बसतात.

जर तुम्ही अनुभवी निरीक्षक असाल, तर तुम्ही व्यक्तीच्या डोळ्यांत पाहूनच त्या व्यक्तीच्या आंतमध्ये काय चालू आहे ह्याविषयी सांगू शकाल. …डोळे हा आत्म्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. पण जर डोळ्यांमधून अंतरात्मा अभिव्यक्त होत नसेल, तर त्याचे कारण असे असते की, तो खूप मागे गेलेला असतो, बऱ्याच गोष्टींनी झाकला गेलेला असतो. काळजीपूर्वकपणे लहान मुलांच्या डोळ्यांत पाहा, तुम्हाला त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काही जण त्याला निरागसता असे म्हणतात – ते इतके खरे असतात, ते जगाकडे कुतूहलाने टुकूटुकू पाहत असतात. हा कुतूहलाचा भाव चैत्यपुरुषाचा असतो, तो सत्य पाहत असतो पण त्याला या जगाविषयी फारशी काही माहिती नसते; कारण तो त्याच्यापासून फार दूर असतो. लहान मुलांमध्ये हे सारे असते पण जसजशी ती अधिकाधिक शिकत जातात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिक शिक्षित होतात, तसतसे हे सारे पुसले जाते; आणि मग तुम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये विचार, इच्छा, आवेग, दुष्टपणा – सारे काही दिसू लागते पण ती छोटीशी ज्योत, अत्यंत पवित्र, शुद्ध अशी ज्योत मात्र हरवलेली असते. तेव्हा तुम्ही खात्रीने सांगू शकता की, तेथे मनाचा प्रवेश झाला आहे आणि अंतरात्मा दूर खूप दूर गेलेला आहे.

ज्याचा मेंदू अजून पुरेसा विकसित झालेला नाही अशा मुलाकडे तुम्ही संरक्षणाचे किंवा प्रेमाचे, किंवा तळमळीचे किंवा सांत्वनाचे स्पंदन संक्रमित केलेत तर ते त्याला प्रतिसाद देते असे तुम्हाला आढळेल. पण जर तुम्ही एखाद्या शाळेत जाणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाचे उदाहरण घेतलेत की, ज्याचे आईवडील सामान्य आहेत आणि ज्यांनी त्याला सामान्य पद्धतीने वाढविले आहे, अशा मुलाबाबत त्याचे मन हे खूपच वर, पृष्ठस्तरावर आलेले आढळते; काहीतरी कठीण असे त्याच्या ठिकाणी असते, अंतरात्मा खूप दूर निघून गेलेला असतो. अशी मुले त्या कोणत्याच स्पंदनांना प्रतिसाद देत नाहीत. जणू काही ती प्लास्टर वा लाकडी ओंडक्याची बनलेली असावीत.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 26-27)

यानंतर आपण अगदी स्वाभाविकपणे चार मुक्तींकडे वळतो की ज्या ह्या सिद्धीची सघन अशी रूपे असतात. अतिमानसिक एकत्वाचा पूर्ण साक्षात्कार झाल्याने, भावनांची मुक्ती म्हणजे त्याच वेळी दुःखभोगापासूनही मुक्ती असेल.

मानसिक मुक्ती किंवा अज्ञानापासून मुक्तता झाली म्हणजे ज्योतिर्मन (Mind of light) किंवा विज्ञानमय चेतनेची (Gnostic consciousness) आपल्या अस्तित्वामध्ये प्रस्थापना होईल, जिच्या अभिव्यक्तीमध्ये शब्दाचे सृजनशील सामर्थ्य असेल.

प्राणिक मुक्ती किंवा वासनामुक्ती प्राप्त झाल्याने, व्यक्तीला स्वत:ची इच्छा दिव्य इच्छेमध्ये संपूर्णत: आणि जाणीवपूर्वक एकरूप करण्याची क्षमता येईल आणि त्यामुळे नित्य शांती, प्रसन्नता आणि त्यांच्यापासून निर्माण होणारी शक्ती यांची प्राप्ती होईल.

अखेरचे शिखर म्हणजे शारीरिक मुक्ती; म्हणजेच भौतिक जगामध्ये असणाऱ्या कार्यकारणभावाच्या नियमापासूनही मुक्ती. संपूर्ण आत्मप्रभुत्वाचा परिणाम म्हणून, व्यक्ती आता प्राकृतिक नियमांची दास बनून राहत नाही. माणसांना अवचेतन वा अर्धचेतन भावावेगांच्या द्वारा कृती करावयास भाग पाडणा-या आणि सामान्य जीवनाच्या चाकोरीत बांधून ठेवणाच्या प्राकृतिक नियमांच्या आधीन आता अशी व्यक्ती राहत नाही. या मुक्तीच्या साहाय्याने मग, व्यक्ती कोणता मार्ग निवडावयाचा, कोणते कार्य पूर्ण करावयाचे हे पूर्ण जाणीवेने ठरवू शकते. आणि अंध नियतीच्या सर्व पाशांमधून ती व्यक्ती स्वत:ला मोकळे करते; की ज्यायोगे, व्यक्तीच्या जीवनक्रमामध्ये उच्चतम संकल्पशक्ती, सर्वोच्च सत्यमय ज्ञान, अतिमानसिक जाणीव यांखेरीज दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप करू दिला जात नाही.

 

– श्री माताजी
(CWM 12 : 71)