Tag Archive for: तत्त्वज्ञान

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २१

ज्ञानयोग

 

ज्ञानयोगाचे साध्य ईश्वरप्राप्ती हे आहे. आपण ईश्वराला प्राप्त करून घ्यावे आणि आपण आपल्या जाणिवेच्या द्वारे, आपल्या ऐक्याच्या द्वारे, आपल्या मधील दिव्य सत्याच्या प्रतिबिंबाद्वारे आपला ताबा ईश्वराला घेऊ द्यावा. अर्थात ही गोष्ट, आपल्या सद्य अस्तित्वापासून दूर कोठेतरी, केवळ अमूर्त पातळीवर साध्य करायची असे नाही तर ती अगदी इथेसुद्धा घडवून आणली पाहिजे. त्यासाठी, स्वत:मधील ईश्वर, विश्वातील ईश्वर; अंतरंगातील ईश्वर आणि सर्व वस्तू व सर्व जीवमात्रांतील ईश्वर हा आपण आत्मसात केला पाहिजे. म्हणजे, ईश्वराशी एकत्व प्राप्त करून घेऊन, त्याच्या माध्यमातून ह्या जगतातील एकत्वाची, विश्वात्मक एकत्वाची आणि सर्वांमधील एकत्वाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. त्या एकत्वामध्ये अनंत विविधतेचा लाभ घेतला पाहिजे. आणि हे करायचे ते एकत्वाच्याच आधारावर, विविधतेच्या वा विभक्ततेच्या आधारावर नव्हे. म्हणजे ईश्वर, त्याच्या व्यक्तित्वांत आणि त्याच्या निर्व्यक्तित्वांत, त्याच्या निर्गुण शुद्धतेत आणि त्याच्या अनंत गुणांमध्ये, सगुण रुपामध्ये, त्याच्या कालात्मक आणि कालातीत स्वरूपात, त्याच्या क्रियाशीलतेत आणि त्याच्या निःशब्दतेतही, त्याच्या सान्त स्वरूपात व त्याच्या अनंत स्वरूपात आपलासा करायचा. केवळ त्याच्या शुद्ध आत्मस्वरूपात नव्हे, तर सर्वांच्या आत्मरूपात तो आपलासा करायचा; केवळ आत्मरूपात नव्हे, तर प्रकृतीतही; केवळ आत्म्यात नव्हे, तर अतिमानसात, मनात, प्राणात व शरीरातही आपलासा करायचा; आत्म्याने, मनाने, प्राणाने व शारीर जाणिवेने तो आपलासा करायचा. आणि परत ईश्वरानेही (आत्मा, मन, प्राण, शरीर) वरील सर्व गोष्टी त्याच्या कराव्या, जेणेकरून, आपले अस्तित्व ईश्वराशी एकरूप होईल, त्याने भरून जाईल, त्याच्या नियंत्रणाखाली काम करील व त्याच्या प्रेरणेने काम करील. म्हणजे ईश्वर एकत्वस्वरूप असल्याने, आपल्या शारीर जाणिवेने भौतिक विश्वाच्या आत्म्याशी व प्रकृतीशी एकरूप व्हावे; आपल्या प्राणाने सर्वात्मक प्राणांशी एकरूप व्हावे; आपल्या मनाने विश्वमनाशी एकरूप व्हावे; आपल्या आत्म्याने विश्वात्म्याशी एकरूप व्हावे; आपण त्याच्या कैवल्यामध्ये विलीन होऊन जावे आणि सर्व संबंधांत त्याचाच शोध घ्यावा.

दुसरे असे की, दिव्य (ईश्वरी) अस्तित्व आणि दिव्य ईश्वरी प्रकृती आपण आपलीशी करायची. ईश्वर सच्चिदानंद आहे, म्हणून आपण आपले अस्तित्व उन्नत करून, ते दिव्य ईश्वरी अस्तित्व करायचे, आपली जाणीव उन्नत करून ती ईश्वरी जाणीव करायची, आपली शक्ती उन्नत करून ती ईश्वरी शक्ती करायची, आपला अस्तित्वमूलक आनंद उन्नत करून तो ईश्वरी अस्तित्वमूलक आनंद करायचा. आपले अस्तित्व केवळ उच्चतर जाणिवेमध्ये उन्नत करायचे असे नाही, तर ती उच्चतर जाणीव आपल्या समग्र अस्तित्वामध्ये व्यापक करायची; कारण आपण आपल्या अस्तित्वाच्या सर्व पातळ्यांवर, आपल्या सर्व घटकांमध्ये, ईश्वराचा शोध घ्यावयाचा आहे; जेणेकरून आपले मानसिक, प्राणिक, शारीरिक अस्तित्व हे दिव्य प्रकृतीने भरून जाईल. आपल्या बुद्धियुक्त मानसिकतेला ईश्वरी ज्ञानयुक्त इच्छेच्या क्रीडेचे रूप यावे, आपल्या मानसिक आत्मजीवनाला ईश्वरी प्रेमाच्या व आनंदाच्या क्रीडेचे रूप यावे, आपली प्राणक्रिया ही दिव्य जीवनाची क्रीडा व्हावी, आपले शारीरिक अस्तित्व हे ईश्वरी द्रव्याचा जणू साचा व्हावे. दिव्य ज्ञान (विज्ञान) आणि दिव्य आनंद यांच्याप्रत स्वत:ला खुले करूनच ही ईश्वरी क्रिया आपल्यामध्ये प्रत्यक्षात यावयास हवी; आणि ही ईश्वरी क्रिया पूर्ण होण्यासाठी, आपण विज्ञानभूमीवर व आनंदभूमीवर चढून गेले पाहिजे, तेथे कायमचे वास्तव्य केले पाहिजे.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 511-512)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २०

ज्ञानयोग

 

जीवात्म्याने शांत परमात्म्यात, परमशून्यात किंवा अनिर्वचनीय केवलात विलीन व्हावे म्हणून पारंपरिक ज्ञानमार्ग निरसनाचा, नकाराचा पाढा वाचीत जातो. (‘हे शरीर म्हणजे मी नव्हे’, ‘हा प्राण म्हणजे मी नव्हे’, ‘हे हृदय म्हणजे मी नव्हे’, आणि ‘हे विचार म्हणजे मी नव्हे’ असे म्हणत, तो क्रमाक्रमाने ह्या साऱ्यांना दूर सारतो.) तर पूर्णज्ञानाचा मार्ग असे मानतो की, आपण पूर्ण आत्मपरिपूर्ती गाठावी, अशी ईश्वरी योजना आहे. आणि म्हणून, आपण एकच गोष्ट दूर करायची आहे; ती म्हणजे, आपली स्वत:ची नेणीव (unconsciousness), आपले अज्ञान आणि आपल्या अज्ञानाचे परिणाम. आपल्या अस्तित्वाचे ‘मी’ म्हणून वावरणारे खोटे रूप आपण दूर करावे, म्हणजे मग आपल्यामध्ये आपल्या खऱ्या अस्तित्वाला अभिव्यक्त होता येईल. केवळ वासनेची धाव या रूपात व्यक्त होणारा प्राणाचा खोटेपणा आणि आपल्या भौतिक अस्तित्वाचे यंत्रवत त्याच त्या फेऱ्यात फिरत राहणे, हे आपण दूर करावे. हे खोटे रूप दूर केले म्हणजे, ईश्वरीय शक्तीत वसणारा आमचा खरा प्राण व्यक्त होईल, अनंताचा आनंद प्रकट होईल. भौतिक दिखाऊपणा आणि संवेदनांची द्वंद्वे यांच्या अधीन झाल्यामुळे, आलेला इंद्रियांचा खोटेपणा दूर केला तर, आपल्यातच दडलेली अधिक महान इंद्रियशक्ती, वस्तुमात्रांमध्ये असलेल्या दिव्यत्वाप्रत खुली होऊ शकते आणि त्यांना तसाच दिव्य प्रतिसाद देऊ शकते. वासना-विकारांनी व द्वंद्वात्मक भावभावनांनी कलुषित झालेल्या आपल्या हृदयाचा खोटेपणा दूर केला की, अधिक खोलवर असणारे हृदय अखिल जीवमात्रांविषयीच्या अपार दिव्य प्रेमानिशी खुले होते; अनंत ईश्वराने आपल्याला प्रतिसाद द्यावा, अशी अपरिमित तळमळ त्याला वाटू लागते. अपूर्ण सदोष मानसिक रचना, अरेरावीचे होकार नकार, संकुचित आणि एकांगी केंद्रीकरणे ही आपल्या विचाराची खोटी संपदा दूर केली म्हणजे तिच्या मागे असलेली महान ज्ञानशक्ती ईश्वराच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपास, जीवात्म्याच्या, प्रकृतीच्या, विश्वाच्या खऱ्याखुऱ्या रूपास उन्मुख होऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 291-292)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १९

ज्ञानयोग

 

ज्ञानमार्ग परमश्रेष्ठ एकमेवाद्वितीय आत्म्याचा साक्षात्कार हे आपले साध्य मानतो. साधक या मार्गात बुद्धीचा उपयोग करून ‘विचारा’च्या द्वारा ‘विवेका’ कडे, वाटचाल करतो. ज्ञानमार्ग हा आपल्या नामरूपात्मक प्रकट अस्तित्वाचे वेगवेगळे घटक बारकाईने पाहून अलग करतो. ज्ञानमार्गी साधक या प्रत्येक घटकाची स्वतःशी असलेली एकरूपता नाकारतो आणि त्यांच्या पृथगात्मकतेपाशी व व्यवच्छेदकत्वापाशी येऊन पोहोचतो. त्या सगळ्याची गणना तो प्रकृतीचे घटक, नामरूपात्मक प्रकृती, मायेची निर्मिती, नामरूपात्मक जाणीव अशा एका सर्वसाधारण संज्ञेमध्ये करतो. अशा रीतीने अविकारी, अविनाशी असलेल्या, कोणत्याही घटनेने किंवा इंद्रियगोचर घटनांच्या एकत्रीकरणानेही ज्याचे वर्णन करता येणार नाही अशा, शुद्ध एकमेवाद्वितीय आत्म्याशी हा साधक आपले एकत्व योग्य प्रकारे प्रस्थापित करू शकतो. ज्ञानमार्गी साधक येथपर्यंत आल्यावर, सामान्यत: नामरूपात्मक जगाला आपल्या जाणिवेतून भ्रम म्हणून काढून टाकतो आणि सर्वश्रेष्ठ आत्म्यांत आपला वैयक्तिक आत्मा विलीन करून टाकतो, तो परत नामरूपात्मक जगात येत नाही.

परंतु ज्ञानयोगाची ही निष्पत्ती, हा काही ज्ञानयोगाचा एकमेव किंवा अपरिहार्य परिणाम नाही. कारण ज्ञानयोगाची ही पद्धत कमी व्यक्तिगत ध्येय ठेवत, व्यापक स्तरावर अनुसरली तर, ईश्वराच्या विश्वातीत अस्तित्वाप्रमाणेच, त्याच्या विश्वात्मक अस्तित्वाचाही सक्रिय विजय होण्याप्रत घेऊन जाणारी ठरते. हा जो प्रस्थानबिंदू असतो, तो असा असतो की, जेथे व्यक्तीला केवळ स्वतःच्या सर्वोच्च आत्म्याचाच साक्षात्कार झालेला असतो असे नाही तर; सर्वात्मक अस्तित्वातील आत्म्याचा देखील साक्षात्कार झालेला असतो. तसेच अंतिमतः हे नामरूपात्मक जग त्याच्या सत्य प्रकृतीपेक्षा पूर्णतः अलग असे काहीतरी नसून, हे नामरूपात्मक जग म्हणजे दिव्य चेतनेची लीला आहे, याचाही साक्षात्कार व्यक्तीला झालेला असतो. आणि या साक्षात्काराच्या अधिष्ठानावरच अधिक विस्तार करणे शक्य असते. कितीही सांसारिक असेनात का, पण ज्ञानाच्या सर्व रूपांचे दिव्य चेतनेच्या कृतीमध्ये रूपांतर करता येणे शक्य असते आणि अशा या कृतींचा, ज्ञानाचे उद्दिष्ट असलेल्या त्या एकमेवाद्वितीयाच्या आकलनासाठी आणि त्याच्या विविध रूपांच्या आणि प्रतीकांच्या माध्यमातून त्याची जी लीला चालू असते, त्याच्या आकलनासाठी उपयोग करता येणे शक्य असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 38)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १८

आपण हे समजावून घेतले की हठयोग, प्राण आणि शरीराच्या साहाय्याने, शारीरिक जीवन आणि त्याच्या क्षमता यांच्या अलौकिक पूर्णत्वाचे लक्ष्य करतो. त्याचप्रमाणे राजयोग हा मनाच्या साहाय्याने, मानसिक जीवनाच्या क्षमतांच्या विस्ताराचे आणि त्याच्या असाधारण अशा पूर्णत्वाचे लक्ष्य बाळगतो. असे करत असताना तो आध्यात्मिक अस्तित्वाच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो. पण या प्रणालीचा दोष हा आहे की, त्यामध्ये समाधीच्या असामान्य स्थितीवर अतिरिक्त भर दिला जातो. हा दोष प्रथमतः भौतिक जीवनापासून एक प्रकारच्या दूरस्थपणाकडे घेऊन जाणारा ठरतो. वास्तविक हे भौतिक जीवन म्हणजे आपला आधार आहे आणि हे असे क्षेत्र आहे की, ज्यामध्ये आपल्याला आपले मानसिक आणि आध्यात्मिक लाभ उतरवायचे असतात. विशेषतः या प्रणालीमध्ये आध्यात्मिक जीवन हे समाधी-अवस्थेशी खूपच संबद्ध केले जाते. आध्यात्मिक जीवन आणि त्याचे अनुभव हे जागृत अवस्थेमध्ये आणि अगदी कार्याच्या सामान्य वापरामध्ये देखील पूर्णतः सक्रिय आणि पूर्णतः उपयोगात आणता येतील असे करावयाचे, हे आपले उद्दिष्ट आहे. आपल्या समग्र अस्तित्वाचा ताबा घेण्याऐवजी आणि त्यामध्ये अवतरित होण्याऐवजी, आपल्या सामान्य अनुभवाच्या मागे असणाऱ्या सुप्त प्रदेशामध्ये निवृत्त होण्याकडेच राजयोगाचा कल असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 37)

राजयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १७

 

आंतरात्मिक कारणांसाठी, हठयोगाप्रमाणेच राजयोगदेखील प्राणायामाचा अवलंब करतो; परंतु संपूर्णतः एक आंतरात्मिक प्रणाली म्हणून तिचा उपयोग न करता, अनेक साधन-मालिकांमधील एक साधनापद्धती म्हणून तो प्राणायामाचा अवलंब करतो आणि अगदी मर्यादित अर्थाने, तीन चार मोठ्या उपयोगांसाठी तो त्याचा वापर करतो. राजयोगाचा आरंभ आसन आणि प्राणायामापासून होत नाही, राजयोग मनाच्या नैतिक शुद्धीकरणावर प्रथम भर देतो. आणि ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. कारण त्याच्याशिवाय राजयोगाचा क्रम अनुसरू पाहाणे म्हणजे त्यामध्ये अडथळे उत्त्पन्न होण्याची, त्याचा मार्ग अवरूद्ध होण्याची, अनपेक्षित मानसिक, नैतिक आणि शारीरिक संकटांचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता असते. प्रस्थापित प्रणालीमध्ये या नैतिक शुद्धीकरणाची दोन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. पाच यम आणि पाच नियम असे हे दोन गट आहेत. यम या सदराखाली सत्य-बोलणे, अहिंसा, चोरी न करणे इ. गोष्टींसारख्या वर्तणुकीबाबतीतील नैतिक स्व-संयमनाच्या गोष्टींचा समावेश होतो. परंतु वस्तुतः या गोष्टी म्हणजे एकंदरच नैतिक स्वनियंत्रणाची आणि शुद्धतेची जी सर्वसाधारण आवश्यकता आहे त्याच्याकडे निर्देश करणाऱ्या गोष्टी आहेत, असे समजले पाहिजे. ज्या योगे, राजसिक अहंकार आणि त्याचे आवेग, मानवामध्ये असणाऱ्या इच्छाआकांक्षा यावर विजय प्राप्त करून, त्या शांत होत होत, त्यांचे परिपूर्ण शमन होईल, अशी कोणतीही स्वयंशिस्त ही अधिक व्यापक अर्थाने, ‘यम’ या सदरात मोडण्यासारखी आहे. राजसिक मानवामध्ये एक नैतिक स्थिरता, आवेगशून्यता निर्माण व्हावी, आणि त्यातून अहंकाराचा अंत घडून यावा, हे याचे उद्दिष्ट असते. नियमित सरावाची एक मानसिक शिस्त, ज्यामध्ये ईश्वरी अस्तित्वावर ध्यान ही सर्वोच्च साधना गणली जाते, अशा साधनापद्धतींचा समावेश ‘नियमा’मध्ये केला जातो. ज्याच्या आधारावर उर्वरित सर्व योगाची पायाभरणी होऊ शकेल अशी सात्विक स्थिरता, शुद्धता आणि एकाग्रतेची तयारी करणे, हे या नियमांचे उद्दिष्ट असते.

यमनियमांच्या आधारे जेव्हा पाया भक्कम झालेला असतो तेव्हाच आसन आणि प्राणायामाची साधना येते आणि तेव्हाच त्यांना परिपूर्ण फले लागू शकतात. मनाच्या नियंत्रणाद्वारे आणि नैतिक अस्तित्वाद्वारे, केवळ आपली सामान्य जाणीव ही अगदी योग्य अशा प्राथमिक स्थितीत येऊ शकते; परंतु योगाच्या अधिक महान उद्दिष्टांसाठी आवश्यक असणारे उच्चतम अशा चैत्य पुरुषाचे आविष्करण किंवा उत्क्रांती त्याद्वारे घडून येत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 538-539)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १५

राजयोग

 

मनुष्याने शरीरामध्ये स्वतःचे पूर्णत्व साध्य करणे हे हठयोगाने दिलेले साधन आहे. पण जेव्हा एखादा मनुष्य देहाच्या वर उठतो तेव्हा तो त्रासदायक आणि निम्नतर प्रक्रिया म्हणून हठयोगाचा त्याग करतो आणि राजयोगामध्ये उन्नत होतो. मानव आता ज्या युगामध्ये उत्क्रांत झाला आहे त्या युगाशी मिळताजुळता असा हा योगमार्ग आहे. देह म्हणजेच मी, अशी समजूत बाळगणारी जाणिवेची अवस्था म्हणजे ‘देहात्मक बोध’. या देहात्मक बोधाच्या वर, उच्चतर जाणिवेमध्ये उन्नत होणे, ही राजयोगाच्या यशाची पहिली आवश्यक अट आहे. राजयोग्याच्या बाबतीत अशी एक वेळ येते की जेव्हा, त्याचा देह हा त्याला त्याचा वाटत नाही किंवा तो त्याच्या देहाची कोणतीही चिंता करत नाही. त्याला त्याच्या शारीरिक दुःखाने काळजी वाटत नाही किंवा शरीरसुखाने त्याला आनंदही होत नाही; ते त्या शरीरापुरतेच संबंधित असतात आणि तो राजयोगी त्यांना कोणताच थारा देत नसल्याने, या गोष्टी कालांतराने निघूनही जातात. तामसिक जडतत्त्व न उरल्यामुळे आणि आता तो राजसिक आणि आंतरात्मिक मनुष्य असल्याने, त्याची सुख व दुःखं ही हृदय आणि मनाशी संबंधित असतात. स्वतःच्या हृदयामध्ये किंवा स्वतःच्या बुद्धिमध्ये किंवा दोन्ही ठिकाणी, त्याला ईश्वराचा साक्षात्कार व्हावा म्हणून, त्याला हृदयातील आणि मनातील सुखदुःखांवर विजय प्राप्त करून घ्यावा लागतो. हृदयामध्ये ईश्वराचे दर्शन घेण्याची राजयोग्याला आस लागलेली असते.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 507)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १३

हठयोग

 

हठयोगाचे परिणाम हे डोळे दिपविणारे असतात आणि लौकिक किंवा शारीरिक मनाला त्याची सहजी भुरळ पडते. आणि तरीही एवढ्या सगळ्या खटाटोपामधून सरतेशेवटी नक्की काय मिळविले, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. शारीरिक प्रकृतीचे उद्दिष्ट, केवळ शारीरिक जीवनाचे जतन, त्याचे उच्चतम पूर्णत्व, अगदी शारीरिक जीवनाचा महत्तर उपभोग घेण्याची क्षमता, या साऱ्याच गोष्टी एका विशिष्ट अर्थाने, अस्वाभाविक स्तरावर घडून येतात. हठयोगाची उणीव अशी की, या कष्टकर आणि अवघड प्रक्रियांसाठी प्रचंड वेळ खर्च करावा लागतो आणि खूप शक्तिवेच करावा लागतो. तसेच हठयोगामध्ये माणसांवर सामान्य जीवनापासून इतकी समग्र पराङ्मुखता (Severance) लादली जाते की, मग त्याच्या परिणामांचा या लौकिक जीवनासाठी उपयोग करणे, हे एकतर अव्यवहार्य ठरते किंवा मग ते उपयोजन आत्यंतिक मर्यादित ठरते. हा जो तोटा आहे त्याच्या मोबदल्यात, अन्य जगांमध्ये, अंतरंगामध्ये ज्या अन्य जीवनाची, मानसिक, गतिशील जीवनाची प्राप्ती आपल्याला होते; तीच प्राप्ती आपल्याला राजयोग, तंत्रमार्ग इ. अन्य मार्गांनी, कमी परिश्रमकारक पद्धतींनी आणि तुलनेने कमी कठोर नियमांच्या आधारे होऊ शकते. दुसरे असे की, याचे शारीरिक परिणाम म्हणून प्राप्त होणारी वाढीव प्राणशक्ती, दीर्घकाळ टिकून राहणारे तारुण्य, आरोग्य, दीर्घायुष्य या साऱ्या गोष्टींचा जर वैश्विक कृतींच्या एका सामायिक संचितामध्ये विनिमय केला नाही, त्यांचा सामान्यांच्या जीवनासाठी उपयोग केला नाही आणि जसा एखादा कंजुष मनुष्य सर्व काही स्वतःकडेच राखून ठेवतो त्याप्रमाणे, केवळ स्वतःसाठीच त्याचा वापर केला, तर मग ही प्राप्ती खूपच अल्प स्वरूपाची आहे. हठयोगामुळे मोठे परिणामही साध्य होतात पण त्याची किंमत अवाजवी असते आणि त्याने अतिशय अल्प हेतूच साध्य होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 35)

दिव्यत्वाचा शोध घेणे हेच आध्यात्मिक सत्याच्या आणि आध्यात्मिक जीवनाच्या धडपडीचे खरोखर पहिले कारण आहे; हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि त्याव्यतिरिक्त बाकी सारे शून्यवत् आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 05)

हठयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ११

प्राकाम्य – इंद्रिय आणि मनावर पूर्णतया पटुता म्हणजे प्राकाम्य. प्राकाम्यामध्ये टेलिपथी, अतिंद्रिय दृष्टी या व यासारख्या असामान्य समजल्या जाणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो.

व्याप्ती – इतर व्यक्तींचे विचार, त्यांची शक्ती, त्यांच्या भावना ग्रहण करण्याची शक्ती आणि स्वतःचे विचार, भावना, शक्ती आणि व्यक्तिमत्त्व यांचे इतरांवर प्रक्षेपण करण्याची शक्ती म्हणजे व्याप्ती.

ऐश्वर्य – घटनांवर नियंत्रण, ईशत्व, समृद्धी आणि इच्छित अशा सर्व वस्तुमात्रांवर नियंत्रण म्हणजे ऐश्वर्य.

वशिता – मौखिक किंवा लिखित शब्दांच्या त्वरित आज्ञापालनाची शक्ती म्हणजे वशिता.

इशिता – जड किंवा बुद्धिविहीन असणाऱ्या सर्व वस्तुमात्रांवर आणि प्रकृतीच्या सर्व शक्तींवर परिपूर्ण नियंत्रण म्हणजे इशिता.

यापैकी काही शक्तींचा संमोहनाची किंवा इच्छाशक्तीची लक्षणे या सदराखाली युरोपमध्ये नुकताच शोध लागला आहे; परंतु प्राचीन काळातील हठयोग्यांच्या किंवा अगदी आत्ताच्याही काही आधुनिक हठयोग्यांच्या सिद्धीच्या तुलनेत, युरोपियन अनुभव अगदीच तोकडे आणि अशास्त्रीय आहेत. प्राणायामातून विकसित झालेल्या इच्छाशक्तीची गणना आध्यात्मिक नव्हे तर, आंतरात्मिक शक्तीमध्ये केली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 505-506)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १०

हठयोग

ज्या गतिशील ऊर्जेमुळे हे ब्रह्मांड चालत राहाते त्या प्राणिक शक्तीवर प्रभुत्व म्हणजे ‘प्राणायाम’. प्राणाचे किंवा प्राणिक शक्तीचे, मानवी शरीरातील सर्वाधिक लक्षात येणारे कार्य म्हणजे श्वासोच्छ्वास, जो सामान्य माणसांना जीवनासाठी आणि हालचालींसाठी आवश्यक असतो. हठयोगी त्यावर विजय मिळवितो आणि स्वतःला त्यापासून वेगळे राखतो. परंतु या एवढ्या एकाच प्राणिक क्रियेवर त्याचे लक्ष केंद्रित झालेले नसते.

हठयोगी पाच मुख्य प्राणिक शक्तींमधील आणि इतर लहानमोठ्या पुष्कळ प्राणिक शक्तींमधील भेद जाणू शकतो. त्या प्रत्येक प्राणिक शक्तींना त्याने स्वतंत्र नामाभिधान दिलेले आहे आणि हे जे प्राणिक प्रवाह कार्यरत असतात, त्या सर्व असंख्य प्राणिक प्रवाहांवर नियंत्रण ठेवायला तो योगी शिकतो. जशी आसनं असंख्य आहेत, तशीच प्राणायामाच्या विविध प्रकारांची संख्याही पुष्कळ मोठी आहे. आणि जोपर्यंत मनुष्य त्या साऱ्या प्रकारांवर प्रभुत्व मिळवीत नाही, तोपर्यंत तो मनुष्य परिपूर्ण हठयोगी आहे, असे मानले जात नाही. आसनांमधून प्राप्त झालेली प्राणिक ऊर्जा, जोश, सुदृढ आरोग्य या गोष्टींवर प्राणजयामुळे शिक्कामोर्तब होते; प्राणजयामुळे व्यक्तीला, तिला हवे तितक्या काळ जीवन जगण्याची शक्ती प्रदान करण्यात येते. आणि प्राणजयामुळे चार शारीरिक सिद्धींमध्ये, पाच आंतरात्मिक सिद्धींचीही भर पडते…

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 505)