Posts

अमर्त्यत्व समजून घेताना

अमर्त्यत्व या शब्दाबद्दल काही गैरसमज आहेत आणि हे समज काही नवीन नाहीत; हे गैरसमज वारंवार होताना आढळतात. अमर्त्यत्वाविषयी जेव्हा कोणी बोलतो तेव्हा बहुतेक सगळ्यांना शरीराचे अस्तित्व अनंत काळ टिकून राहणार असे वाटते.

पहिली गोष्ट म्हणजे, शरीर अनंत काळपर्यंत तेव्हाच टिकून राहू शकते जेव्हा, त्याला त्याच्या अमर्त्य आत्म्याविषयी पूर्ण जाणीव होते आणि ते त्या आत्म्याशी एकत्व पावते, शरीर त्याच्याशी इतके तादात्म्य पावते की, शरीरालासुद्धा आत्म्यासमान क्षमता प्राप्त होते, सातत्यपूर्ण रूपांतरणाचे तसेच गुण प्राप्त होतात ज्यामुळे शरीरसुद्धा वैश्विक गतिविधीचे अनुसरण करण्याइतपत सक्षम होते. शरीर जर टिकून राहायचे असेल तर त्यासाठी ही अगदी पूर्णपणे अनिवार्य अशी गोष्ट आहे. कारण शरीर हे कठीण (rigid) असते, कारण ते गतिविधींचे अनुसरण करत नाही, वैश्विक उत्क्रांतीशी सातत्याने तादात्म्य पावण्यासाठी स्वतःमध्ये जे त्वरेने रूपांतरण घडवून आणले पाहिजे तसे ते करू शकत नाही, त्याचे विघटन होते आणि ते नष्ट होते. त्याचा अडेलतट्टूपणा, त्याचे काठिण्य, त्याची स्वतःचे रूपांतरण करण्याची अक्षमता या गोष्टींमुळेच त्याचा विनाश आवश्यक होऊन बसतो, त्यामुळे त्याचे मूलद्रव्य (substance) हे भौतिक मूलद्रव्यांच्या सर्वसाधारण प्रांतामध्ये परत जाऊन मिसळू शकते; ज्यामुळे त्या शरीराची पुन्हा नव्या रूपांमध्ये पुनर्घडण होऊ शकते आणि अशा प्रकारे ते पुढील प्रगती करायला सक्षम होते. पण सहसा, जेव्हा कोणी अमर्त्यत्वाविषयी बोलतो, तेव्हा माणसं शारीरिक अमर्त्यत्वाचाच विचार करतात – ते अजूनपर्यंत साध्य झालेले नाही, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

शारीरिक अमर्त्यत्व शक्य आहे असे श्रीअरविंद सांगतात आणि ते असेही सांगतात की, असे अमर्त्यत्व घडून येईल; परंतु ते त्यासाठी एक अट घालतात, ती अशी की, त्यासाठी शरीराचे अतिमानसिकीकरण (supramentalised) झाले पाहिजे, त्याच्यामध्ये अतिमानसिक जिवाचे काही गुण तरी असले पाहिजेत, विकासानुगामित्व (plasticity) आणि सातत्यपूर्ण रूपांतर हे ते गुण आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 28-29)

आसक्ती आणि अमर्त्यत्व

देहाविषयी आसक्ती असेल तर, अमर्त्यत्व येऊ शकणार नाही, म्हणून आपल्या अस्तित्वातील जो भाग देहाबरोबर तादात्म्य पावलेला नाही केवळ अशा अमर्त्य भागामध्ये जीवन जगण्यामुळेच आणि पेशींमध्ये त्याची चेतना आणि शक्ती उतरविल्यामुळेच हे अमर्त्यत्व प्राप्त होऊ शकेल. अर्थातच मी योगिक साधनांविषयी बोलतो आहे. आता शास्त्रज्ञ असे मानतात की, (किमान सैद्धांतिकरित्या तरी) मृत्युवर मात करता येईल अशी भौतिक साधने शोधणे शक्य आहे, पण त्यामुळे केवळ वर्तमान शरीराच्या सद्यकालीन चेतनेची कालमर्यादा वाढविण्यात आली (prolongation), असा त्याचा अर्थ होईल. जोपर्यंत चेतनेचे आणि कार्याचे परिवर्तन होत नाही तोपर्यंत, होणारा हा लाभ अत्यंत अल्पसा असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 314)

शारीरिक अमर्त्यत्वाचे सार

चेतनेमधील परिवर्तन ही आवश्यक गोष्ट आहे आणि त्याशिवाय कोणतीही शारीरिक सिद्धी मिळणे शक्य नाही. शरीर जर आहे तसेच राहिले, ते जर मृत्युचे, रोगाचे, क्षय, वेदना, अचेतनता आणि अज्ञानाच्या साऱ्या परिणामांचे गुलाम बनून राहिले, तर अतिमानसिक परिवर्तनाचे पूर्णत्व शक्य नाही. ह्या गोष्टी जर राहणारच असतील तर अतिमानसाच्या अवतरणाची (Descent of the Supramental) काहीच आवश्यकता नाही कारण ईश्वराबरोबर मानसिक व आध्यात्मिकरित्या एकत्व साध्य करण्यासाठी आवश्यक असे चेतनेमधील परिवर्तन घडण्यासाठी, केवळ अधिमानस (The Overmind) पुरेसे आहे, इतकेच काय उच्च मन (The Higher Mind) देखील पुरेसे आहे. मन, प्राण आणि शरीर यांच्यामध्ये ‘सत्या’चे गतिशील कार्य घडून येण्यासाठी अतिमानसिक अवतरण आवश्यक आहे. याचा अंतिम परिणाम म्हणून देहामधून अचेतनता नाहीशी होणे अंतर्भूत असेल; असे शरीर मग ऱ्हास आणि आजाराच्या अधीन राहणार नाही. ज्या सर्वसामान्य प्रक्रियांमुळे मृत्यु ओढवतो त्या प्रक्रियांच्याही अधीन शरीर राहणार नाही, असा याचा अर्थ होतो. शरीरामध्ये परिवर्तन घडवून आणायचे झाले तर, त्या शरीरामध्ये निवास करणाऱ्या रहिवाशाची तशी इच्छा असली पाहिजे. हे शारीरिक अमर्त्यत्वाचे सार असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 310)

आपल्यामधील अमर्त्य तत्त्व

बहुसंख्य लोकं जेव्हा ‘मी’ असे म्हणत असतात तेव्हा तो त्यांचा एक अंश असतो, त्यांच्या भावनांचा, त्यांच्या शरीराचा, त्यांच्या विचारांचा एक अंश असतो, तो त्रयस्थपणे बोलत असतो; आणि हा बोलणारा सतत बदलत असतो. त्यामुळे त्यांचे ‘मी’ अगणित असतात किंवा त्यांचा ‘मी’ नेहमीच बदलत असतो. असे असेल तर मग, नित्य असणारे असे त्यांच्यामध्ये काय असते ?… अर्थातच, चैत्य पुरुष. कारण एखादी गोष्ट स्थायी असण्यासाठी ती गोष्ट प्रथम अमर्त्य असावी लागते. अन्यथा ती स्थायी होऊ शकत नाही. तसेच ज्या अनुभवांमधून ती गोष्ट जाते, त्या अनुभवांपासून ती गोष्ट स्वतंत्र अशी असावी लागते : ते अनुभव म्हणजेच ती गोष्ट असे असून चालत नाही. म्हणजेच, नदीच्या पात्रामुळे नदी निर्माण होत नाही, तर ती म्हणजे केवळ एक परिस्थिती असते. हीच तुलना जर आपण किंचितशी पुढे नेली तर (खरे तर, तुलना व्यर्थ असतात, तुलनेमध्ये लोक त्यांना पाहिजे त्या गोष्टी शोधत असतात.) असे म्हणता येईल की, नदी हे जीवनाचे एक चांगले प्रतीक आहे, म्हणजे असे की या नदीमध्ये स्थायी असे काय असते, तर ते असते ‘पाणी’. तो एकच पाण्याचा थेंब नित्य नसतो, पण पाणी मात्र नित्य असते – पाण्याशिवाय नदी असूच शकणार नाही. आणि त्याचप्रमाणे मनुष्यामध्ये जर काही स्थायी असेल तर ती असते ‘चेतना’. मनुष्यामध्ये चेतना असते आणि त्यामुळे तो टिकून राहतो. रूपं टिकून राहत नाहीत, तर या साऱ्या रूपांना बांधून ठेवणारी शक्ती म्हणजे चेतना, तीच टिकून राहते. तीच या सर्व रूपांमधून जात असताना, त्या रूपांची स्मृती कायम ठेवते (स्मृती ही अगदीच बाह्यवर्ती अशी गोष्ट असते.), इतकेच नव्हे तर त्या चेतनेचे तेच स्पंदनही ती कायम ठेवते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 173)

पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे आविष्करण

मानव प्रथमतः जेव्हा निर्माण करण्यात आला तेव्हा अहम् हा एकीकरण करणारा घटक होता. या अहंभोवतीच अस्तित्वाच्या विविध अवस्थांचे वर्गीकरण करण्यात आले होते; परंतु आता जेव्हा अतिमानवतेच्या (superhumanity) जन्माची तयारी चालू आहे, तेव्हा अहंला नाहीसे व्हावेच लागेल, त्याने चैत्य पुरुषाला (Psychic Being) वाट करून देणे आवश्यक आहे ; मानवामध्ये दिव्यत्वाचे आविष्करण व्हावे म्हणून हळूहळू ईश्वराच्या मध्यस्थीने त्याची घडण व्हायला सुरुवात झाली आहे.

ईश्वराचे मनुष्यामध्ये आविष्करण होते ते चैत्य प्रभावाखालीच होते आणि त्याद्वारे अतिमानवतेच्या आगमनाची तयारी होते.

चैत्य पुरुष हा अमर्त्य असतो आणि त्याच्याद्वारेच पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे आविष्करण होऊ शकते.

तेव्हा महत्त्वाची गोष्ट अशी की, व्यक्तीने स्वतःच्या चैत्य पुरुषाचा शोध घेतला पाहिजे, त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे. आणि अहंची जागा त्या चैत्य पुरुषाला दिली पाहिजे; ज्यामुळे अहंला एकतर रूपांतरित व्हावे लागेल नाहीतर नाहीसे होणे भाग पडेल.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 434)

अमर्त्यत्व म्हणजे काय ?

 

अमर्त्यत्व म्हणजे मृत्युनंतर मानसिक व्यक्तिमत्त्व टिकून राहणे नव्हे, (अर्थात तेही खरंच आहे) तर अमर्त्यत्व म्हणजे, शरीर हे ज्याचे केवळ एक साधन असते, एक छाया असते त्या अजन्मा आणि मृत्युहीन असलेल्या आत्म्याचे जागृत आधिपत्य असते. (श्रीअरविंदलिखित या वचनावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणतात) …अमर्त्यत्व म्हणजे अनादी आणि अनंत असे जन्मरहित किंवा मृत्युरहित जीवन होय, जे शरीरापासून पूर्णतः स्वतंत्र असते. हे आत्म्याचे जीवन असते, प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत अस्तित्वाचे ते जीवन असते आणि ते विश्वात्मक आत्म्यापासून विभक्त नसते. आणि हे जे मूलभूत अस्तित्व असते त्याला आपल्या विश्वात्मक आत्म्याशी असलेल्या एकत्वाची जाण असते; वास्तविक हे अस्तित्व म्हणजे साक्षात या विश्वात्मक आत्म्याचे व्यक्तिरूपाने अभिव्यक्त झालेले व्यक्तिमत्त्व असते आणि त्याला आदी नसतो किंवा अंतही नसतो, त्याला जन्म नसतो, मृत्युही नसतो, ते शाश्वतपणे अस्तित्वात असते आणि ते अमर्त्य असते. आपण जेव्हा या आत्म्याविषयी पूर्णपणे जागृत होतो तेव्हा आपण त्याच्या शाश्वत जीवनामध्ये सहभागी होतो आणि त्यामुळे आपणही अमर्त्य होतो.

– श्रीमाताजी

(CWM 10 : 27-28)

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

मृत्यु अशी कोणती गोष्टच अस्तित्वात नाही, कारण, शरीर नष्ट होते पण शरीर म्हणजे काही मनुष्य नव्हे. जे अस्तित्वविहीन (nonexistent) आहे ते कधीही अस्तित्वात येऊ शकत नाही, तद्वतच जे वस्तुतः अस्तित्वात आहे, त्याचे अस्तित्व कधीही लोप पावू शकत नाही; ते ज्या माध्यमांतून प्रकट होते त्या माध्यमांची रूपे बदलू शकतात परंतु त्याचे अस्तित्व मात्र लोप पावू शकत नाही. आत्मा असतोच आणि तो कधीही नष्ट होऊ शकत नाही. अस्तित्वात असणे आणि नसणे यामधील विरोध, अस्तित्व (Being) आणि अस्तित्वात येणे (Becoming) यांच्यामधील समतोल हा मनाचा अस्तित्वविषयक दृष्टिकोन असतो; आणि या दृष्टिकोनाचा निरास तेव्हाच होतो जेव्हा आत्मा हाच एकमेव अविनाशी असून, त्याच्याद्वारेच या विश्वाचा विस्तार झाला आहे; हा साक्षात्कार मनाला होतो. समर्याद शरीरांना अंत असतो, परंतु त्याच्यावर ज्याची सत्ता असते, जो या शरीराचा वापर करतो तो (आत्मा) मात्र अनंत, अमर्याद, शाश्वत आणि अविनाशी असतो. मनुष्य ज्याप्रमाणे जीर्ण झालेली वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो त्याप्रमाणेच तोसुद्धा जुने शरीर त्यजून नवीन देह धारण करतो. आणि यामध्ये दुःख करण्यासारखे, खचून जाण्यासारखे किंवा कोमेजून जाण्यासारखे काय आहे ? हा (आत्मा) जन्माला येत नाही किंवा तो मरतही नाही; जी एकदाच अस्तित्वात येते आणि ती निघून गेली तर पुन्हा अस्तित्वातच येणार नाही, अशी काही ही गोष्ट नाही. ती गोष्ट अजन्मा, पुरातन आणि शाश्वत आहे; शरीराच्या हत्येने तिची हत्या होत नाही. अमर्त्य आत्म्याची हत्या कोण करू शकेल ? शस्त्रांनी त्याचा छेद करता येत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही किंवा पाणी त्याला बुडवू शकत नाही किंवा वारा त्याला सुकवू शकत नाही. शाश्वतपणे स्थिर, अविचल, सर्वव्यापी असणारा तो आत्मा सदैव, अगदी नेहमीच अस्तित्वात असतो. शरीराप्रमाणे तो व्यक्त होत नाही पण सर्व व्यक्ताहून तो अव्यक्त आत्मा श्रेष्ठ आहे. विचारांनी त्याचे विश्लेषण करता येत नाही तरीही समग्र मनापेक्षा तो महान असतो; जीवन, त्याची अंगे आणि जीवनाच्या विषयांप्रमाणे आत्म्यामध्ये परिवर्तन आणि फेरबदल होणे शक्य नसते; परंतु, तो मन, प्राण आणि शरीराच्या परिवर्तनापलीकडचा असूनही, हे सर्व जण जिचे आकलन करून घेण्यासाठी धडपड करत असतात अशी ती एक सद्वस्तु असते.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 62-63)

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

आपण सारे एकच आत्मा आहोत, आपण तो ईश्वर आहोत, आपल्या आकलनापलीकडे असणारे अद्भुत असे म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, त्याच्याविषयी बोलतो, त्याच्याविषयी ऐकतो. आपण कितीही धडपड केली, शोध घेतला, ज्ञानी माणसांकडून ज्ञान ग्रहण केले आणि ज्ञान प्राप्त झाले असे घोषित केले तरीही कोणत्याच मानवी मनाला त्या परमतत्त्वाचे (Absolute) कधीच आकलन झालेले नाही. शरीराचा स्वामी असणारे ते परमतत्त्व, या विश्वाद्वारे झाकलेले आहे; सर्व जीवन ही केवळ त्याची पडछाया आहे; आत्म्याचे शारीरिक आविष्कारामध्ये येणे आणि मृत्युद्वारे निघून जाणे ही आत्म्याच्या अनेक गतिविधींपैकी केवळ एक किरकोळ गतिविधी आहे…

एकच गोष्ट सत्य आहे आणि त्यामध्येच आपल्याला जगायचे आहे, ते ‘शाश्वत तत्त्व’ स्वत:च्या तीर्थयात्रेच्या महान चक्रामध्ये मनुष्याचा आत्मा म्हणून स्वतःला आविष्कृत करत असते, त्या आत्म्याच्या या तीर्थयात्रेमध्ये जन्म आणि मृत्यू हे मैलाचे दगड असतात, पलीकडील विश्वं ही त्याची विश्रांतीची ठिकाणे असतात, त्यांच्या सहित तो प्रवास करत असतो. जीवनातील सर्व सुखदुःखाची परिस्थिती ही आपल्या प्रगतीची, युद्धाची, विजयाची साधने असतात, या साधनांसहित तो प्रवास करत असतो. आणि ‘अमर्त्यत्वा’सहित तो आत्मा आपल्या स्व-गृहाकडे प्रवास करत असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 63-64)

अमर्त्यत्वासंबंधी वैदिक शिकवण

मनुष्य भौतिक विश्वात राहतो, तो मरणाधीन असतो आणि मर्त्य अस्तित्वाच्या ‘पुष्कळशा असत्या’च्या तो अधीन असतो. या मरणाच्या अतीत होण्यासाठी, अमर्त्यांपैकी एक होण्यासाठी, त्याने असत्याकडून सत्याकडे वळले पाहिजे; त्याने प्रकाशाकडे वळले पाहिजे आणि अंधकाराच्या शक्तींशी लढून त्यावर विजय मिळविला पाहिजे. ईश्वरी शक्तींच्या सख्यत्वाने आणि त्यांचे साहाय्य घेऊन मनुष्य या गोष्टी करतो; ईश्वरी शक्तींच्या साहाय्यासाठी आवाहन करण्याचा हा मार्ग म्हणजे वैदिक गूढवाद्यांचे गुप्त रहस्य होते. या हेतूसाठी जगभरात, बाह्य यज्ञाच्या प्रतीकांना, गुह्य पद्धतीने आंतरिक अर्थ प्रदान करण्यात आला आहे; ती प्रतीके मानवामध्ये देवदेवतांना आवाहन करण्याचे प्रतिनिधित्व करत असतात; ती यज्ञाची प्रतीके मानव व देव यांना जोडणारी असतात, ती त्या दोहोंमध्ये घनिष्ठ विनिमय घडवत असतात, ती अन्योन्य साहाय्यक ठरतात आणि त्यांच्यामध्ये सख्य घडवून आणतात. त्यांद्वारे माणसामध्ये देवदेवतांच्या शक्ती निवास करू लागतात; तसेच त्याच्यामध्ये दिव्य प्रकृतीची विश्वव्यापकतादेखील आकाराला येते. कारण देव हे सत्याचे रक्षक आणि संवर्धक आहेत, ते अमर्त्यत्वाच्या शक्ती आहेत, ते अनंत मातेचे पुत्र आहेत; अमर्त्यत्वाकडे जाणारा मार्ग हा देवांचा ऊर्ध्वगामी मार्ग आहे, तो सत्याचा मार्ग आहे, तो एक प्रवास आहे, “ऋतस्य पंथः” असे ज्याला म्हटले जाते त्या सत्याच्या धर्मामध्ये मनुष्याचे उन्नत होणे आहे, विकसित होणे आहे. मनुष्य स्वतःच्या केवळ शारीरिक ‘स्व’ च्या मर्यादा तोडून अमर्त्यत्वाकडे जाऊन पोहोचतो असे नाही, तर तो जेव्हा त्याच्या मानसिक आणि सामान्य आत्मिक प्रकृतीच्या मर्यादा तोडून, उच्चतर स्तरावर आणि सत्याच्या सर्वश्रेष्ठ अवकाशात जातो, तेव्हाच तो अमर्त्यत्वाप्रत पोहोचतो. कारण तेथेच अमर्त्यत्वाचा पाया असतो आणि तेथे त्रिविध अनंताचे स्वाभाविक निवासस्थान आहे. या संकल्पनांवरच वैदिक ऋषींनी मनोवैज्ञानिक आणि आत्मिक साधनेची उभारणी केली; नंतर हीच साधना स्वतःच्या पलीकडे जात सर्वोच्च आध्यात्मिकतेकडे गेली आणि त्यातच उत्तरकालीन भारतीय योगाचा गाभा सामावला गेला.

*

आपल्यामध्ये असणाऱ्या ईश्वराप्रत उन्नत झाल्याने, आपण स्वतंत्र होतो, या विश्वाच्या बंधनामधून आणि मृत्युपाशापासून मुक्त होतो. कारण ईश्वर म्हणजे स्वातंत्र्य, ईश्वर म्हणजे अमर्त्यत्व. “मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्र्नुते” अर्थात मृत्युच्या अतीत होऊन आपण अमर्त्यत्व अनुभवतो.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 202-203), (CWSA 17 : 304)

मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – १०

आता आपण सर्वात भयंकर अशा लढाईकडे वळतो; देहामध्ये लढले जाणारे हे शारीरिक युद्ध, कोणत्याही विश्रांतीविना किंवा कोणत्याही तहाविना सुरु असते. हे युद्ध जन्माबरोबरच सुरू होते आणि दोन प्रतिस्पर्ध्यांपैकी एकाच्या पराभवानेच ते संपुष्टात येणे शक्य असते. एकतर रूपांतरण-शक्तीचा (force of transformation) पराभव होतो किंवा विघटन-शक्तीचा (force of disintegration) पराभव होतो. जन्माबरोबरच या संघर्षाला सुरुवात होते असे मी म्हटले याचे कारण असे की, बऱ्याच काळानंतर जरी या दोन प्रक्रियांमधील संघर्षामध्ये जाणीवपूर्वकता आणि हेतुपूर्वकता येत असली तरी, खरे तर व्यक्ती जेव्हा या विश्वात प्रविष्ट होते अगदी त्या क्षणीच या दोन्ही प्रक्रियांमधील संघर्षाला सुरुवात झालेली असते. कारण ज्याप्रमाणे वाढ, सुसंवादी विकास, आक्रमणाचा प्रतिकार, आजारपणापासून सुटका होऊन परत सामान्य जीवन सुरळीत होणे, प्रत्येक प्रगमनशील सुधारणा, या गोष्टी रूपांतरकारी शक्तीच्या कार्याचे परिणाम असतात; अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक अस्वास्थ्य, प्रत्येक आजार, प्रत्येक विकृती, प्रत्येक अपघात हे विघटनकारी-शक्तीच्या कार्याचे परिणाम असतात. नंतर जेव्हा, चेतनेच्या विकासाबरोबर, ही लढाई हेतुपुरस्सर होते, तेव्हा त्याची परिणती या दोन विरोधी आणि प्रतिस्पर्धी प्रक्रियांमधील उन्मत्त स्पर्धेमध्ये होते; रूपांतरण की मृत्यू, या दोहोंपैकी आधी कोण आपले ध्येय गाठणार हे पाहण्याची एक शर्यतच सुरू होते. ही शर्यत म्हणजे निरंतर प्रयत्न, पुनरुज्जीवनकारी शक्तीला तिने खाली अवतरावे म्हणून तिच्यावर सातत्याने केलेले ध्यान आणि या शक्तीप्रत पेशींची ग्रहणशीलता वाढावी म्हणून केलेले प्रयत्न असतात. ही शर्यत म्हणजे, विध्वंस व अवनती यांच्या विनाशकारी शक्तीकार्याच्या विरोधात क्रमाक्रमाने दिलेली झुंज असते. ज्या ज्या कोणत्या गोष्टी आरोहणकारी उर्मीला प्रतिसाद देण्यास सक्षम असतील; ज्या प्रबोधनाला, शुद्धीकरणाला आणि स्थिरतेला प्रतिसाद देण्यासाठी सक्षम असतील अशा प्रत्येक गोष्टीभोवती असलेली या विनाशकारी शक्तींची पकड ढिली करण्यासाठी केलेले अथक प्रयत्न म्हणजे ही शर्यत असते. हा संघर्ष अंधकारमय आणि दुराग्रही असतो, बहुधा यामध्ये कोणतेही दृश्य परिणाम दिसून येत नाहीत किंवा जे आंशिक विजय प्राप्त केले गेले त्यांच्या कोणत्याही बाह्य खाणाखुणाही दिसून येत नाहीत आणि हे विजयदेखील नेहमीच अनिश्चित स्वरूपाचे असतात. – कारण जे कार्य झाले आहे ते पुन्हा करण्याची आवश्यकता आहे, असे नेहमीच वाटत राहते; पुढे टाकलेले प्रत्येक पाऊल हे, इतरत्र कोठेतरी माघार घ्यावी लागल्याची किंमत चुकती करूनच पुढे पडत असते. आणि आदल्या दिवशी जे काम केलेले असते ते दुसऱ्याच दिवशी पुन्हा पूर्वपदास आलेले असते. वस्तुतः, विजय तेव्हाच निश्चित आणि चिरस्थायी होऊ शकेल जेव्हा तो संपूर्ण विजय असेल. या साऱ्याला वेळ लागतो, खूप काळ लागतो, वर्षेच्या वर्षे निष्कारणपणे लोटतात, आणि त्यामुळे प्रतिकूल शक्तींची ताकद मात्र वाढते.

एखाद्या खंदकाजवळ जसा पहारेकरी उभा असावा तशी चेतना सदासर्वकाळ उभी असते; भीतीचा लवलेश नको किंवा दक्षतेमध्येही कसर नको अशा पद्धतीने, तुम्ही मात्र दृढ राहिलेच पाहिजे, कोणतीही किंमत द्यावी लागली तरीही तुम्ही दृढ राहिले पाहिजे, जे जीवितकार्य पूर्ण करायचे आहे त्यावर अविचल श्रद्धा ठेवत आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या, तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या आणि तुम्हाला टिकवून ठेवणाऱ्या शक्तीच्या साहाय्यावर तुम्ही अविचल श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण जो अतीव तितिक्षा (endurance) बाळगतो, त्याचाच शेवटी विजय होतो.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 86-87)