Tag Archive for: तत्त्वज्ञान

पृथ्वीवर जडद्रव्याची जी विशिष्ट परिस्थिती होती त्यामुळे ‘मृत्यू’ अपरिहार्य झाला. अचेतनतेच्या (unconsciousness) प्राथमिक पायरीपासून उत्तरोत्तर चेतनेकडे विकसित होत जाणे हाच जडतत्त्वाच्या उत्क्रांतीचा अर्थ आहे. आणि जेव्हा ही विकासाची प्रक्रिया प्रत्यक्ष घडू लागली तेव्हा या प्रक्रियेत, आकारबंधांचा विलय, विघटन ही एक अटळ अशी आवश्यकता ठरली. सुसंघटित व्यक्ति-चेतनेला एक स्थिर असा आधार मिळावा म्हणून एका निश्चित बांधीव आकाराची गरज होती. आणि असे असूनसुद्धा या आकारबंधाच्या स्थिरतेमुळेच मृत्यू अटळ बनला. जडद्रव्य आकारबद्ध होणेच भाग होते; अन्यथा वैयक्तिकीकरण (पृथकीकरण) (individualisation) होणे आणि प्राणशक्तीला वा चेतनाशक्तीला सघन असे मूर्तरूप येणे अशक्य होते. आणि त्यांच्याविना पार्थिव, जडतत्त्वाच्या पातळीवर पुढे सुसंघटित अस्तित्व निर्माण होण्यास आवश्यक अशा पायाभूत परिस्थितीची उणीव भासली असती. पण निश्चित, घनीभूत अशी घडण होताच एकाएकी त्याच्या ठिकाणी अलवचिकता, कठीणता आणि पाषाणवतता येण्याची प्रवृत्ती आढळून आली. हा पृथक आकारबंध अतिशय बंधनकारक असा साचा बनला; तो शक्तींच्या गतीचे अनुसरण करू शकत नाही; या वैश्विक गतिमानतेशी सुमेळ राखत तो स्वत:मध्ये क्रमश: बदल घडवू शकत नाही; तो प्रकृतीच्या अपेक्षा अखंडपणे भागवू शकत नाही किंवा तिची गती देखील पकडू शकत नाही; तो प्रवाहाबाहेर फेकला जातो. मात्र एका विशिष्ट क्षणी, आकारबंध आणि त्याला चालना देणारी शक्ति या दोहोंमधील वरील प्रकारच्या वाढत्या असमानतेमुळे व विसंवादामुळे त्या आकारबंधाचे संपूर्णत: विलयन, विघटन अटळ होऊन बसते. एक नवीन आकारबंध निर्माण करावयास हवा ज्यामुळे एक नवीन (आकारबंध व त्याला चालना देणारी शक्ती यांमध्ये) सुमेळ आणि समानता शक्य होईल.

हा आहे मृत्युचा खरा अर्थ आणि ही आहे मृत्यूची प्रकृतीमधील उपयुक्तता! पण हा आकारबंध जर का अधिक वेगवान व अधिक लवचिक झाला आणि बदलत्या चेतनेनुरुप स्वत:मध्ये बदल घडविण्याविषयी शरीरातील पेशींना जागृत करता आले तर मूलगामी विघटनाची गरजच उरणार नाही, आणि मृत्यू ही अटळ गोष्ट राहणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 37)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

मानवी अस्तित्वाचे वास्तविक सत्य कोणते? सर्वोच्च ध्येय कोणते ? विश्वाच्या या महान चक्रांमध्ये युगानुयुगे माणसाचा जन्म आणि मृत्यू पुन्हापुन्हा होत राहतो ती म्हणजे एक प्रदीर्घ प्रगती असते; या प्रगतीद्वारे तो स्वतःची तयारी करत असतो आणि अमर्त्यत्वासाठी स्वतःला सुयोग्य बनवत असतो. आणि तो स्वतःला कशा प्रकारे तयार करेल? त्यासाठी योग्य माणूस कोण? मी म्हणजे प्राण आहे आणि मी म्हणजे शरीर आहे या संकल्पनेच्या जो अतीत झाला आहे; जो या जगाचे भौतिक आणि संवेदनात्मक स्पर्श त्यांच्या त्यांच्या मूल्यानुसार स्वीकारत नाही किंवा भौतिक मनुष्याला (Physical man) ते स्पर्श ज्या मोलाचे वाटतात त्या मोलाने जो हे स्पर्श स्वीकारत नाही; जो मी स्वतः आत्मा आहे आणि सर्वजण देखील आत्मे आहेत हे जाणतो, जो स्वतः स्वतःच्या शरीरामध्ये नाही तर, आत्म्यामध्ये राहायला शिकलेला आहे आणि इतरांशी व्यवहार करत असतानादेखील जो त्यांच्याशी भौतिक अस्तित्व म्हणून केवळ व्यवहार करत नाही तर, इतरांबरोबर देखील जो आत्मवत व्यवहार करतो, तो मनुष्य अमर्त्यत्वासाठी योग्य असतो. मृत्युचे अस्तित्व नसणे म्हणजे अमर्त्यत्व असा त्याचा अर्थ नाही. — ज्याला जन्मतः मन मिळालेले आहे अशा प्रत्येक प्राणिमात्राला ही गोष्ट आधीच मिळालेली असते, — परंतु अमर्त्यत्व म्हणजे जन्म आणि मृत्युच्या अतीत असणे. अमर्त्यत्व हे असे एक आरोहण असते की, ज्या आरोहणामुळे मनुष्य, मनो-मार्गदर्शित शरीर (mind-informed body) म्हणून जगणे सोडून देतो आणि अंततः आत्मा म्हणून, परम आत्म्याच्या ठिकाणी जीवन जगतो.

जो कोणी दुःख आणि शोकाच्या अधीन असतो, संवेदना आणि भावना यांचा गुलाम असतो, क्षणभंगुर गोष्टींच्या स्पर्शाने व्याप्त असतो असा कोणीही अमर्त्यत्वासाठी सुयोग्य बनू शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 61-62)

प्रामाणिकपणा – ४७

प्रामाणिक असण्यामध्ये एक अद्भुत आनंद असतो. प्रामाणिकपणाच्या प्रत्येक कृतीमध्येच प्रामाणिकपणाचे स्वतःचे असे बक्षिस अनुस्यूत असते. शुद्धीकरणाची भावना, ऊर्ध्वमुख होत झेपावत जाणे, व्यक्तीने मिथ्यत्वाचा अगदी एखादा छोटासा कण दूर केला तरी त्यामुळे मिळालेली मुक्ती, या गोष्टी हे प्रामाणिकपणाचे बक्षिस असते. प्रामाणिकपणा हे सुरक्षाकवच असते, तेच संरक्षण असते, प्रामाणिकपणा हाच मार्गदर्शक असतो आणि अंतिमतः प्रामाणिकता ही एक रूपांतरकारी शक्ती असते.
– श्रीमाताजी [CWM 08 : 400]

प्रामाणिकपणा – ४६

एखाद्या व्यक्तीने भूतकाळात कितीही ठोकरा खाल्लेल्या असल्या किंवा कितीही चुका केलेल्या असल्या तरीसुद्धा, जर ती व्यक्ती ‘ईश्वरा’च्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावेल तर, तिच्यासाठी ते दरवाजे कधीच बंद नसतात. मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतर्यामी असणाऱ्या ‘ईश्वरी’ तत्त्वावरील तेजस्वी व काळोखी आवरणे असतात. हे ईश्वरी तत्त्व जेव्हाकधी त्या आवरणाचा भेद करते तेव्हा, आत्म्याच्या उत्तुंगतेकडे जाताना ते तत्त्व, त्या दोन्ही आवरणांचे दहन करू शकते.

श्रीअरविंद [CWSA 29 : 42]

प्रामाणिकपणा – ३५

प्रश्न : माताजी, तुम्ही एकदा मला संपूर्ण प्रामाणिकपणाविषयी काही सांगितले होते. पारदर्शक प्रामाणिकपणा म्हणजे काय ?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाची तुलना वातावरणाशी किंवा एखाद्या काचेच्या तावदानाशी करता येते. यांपैकी कोणतीही गोष्ट पूर्णपणे पारदर्शक असेल तर, त्यामधून कोणताही विपर्यास न होता, प्रकाश पलीकडे जाऊ शकतो. चेतना प्रामाणिक असेल तर, दिव्य स्पंदनांमध्ये कोणतीही विकृती न येऊ देता, तिचे संक्रमण होऊ शकते.

– श्रीमाताजी [CWM 16 : 382]

प्रामाणिकपणा – २८

‘ईश्वरा’ला जे अपेक्षित असेल तेच आपल्याला पूर्ण प्रामाणिकपणे हवेसे वाटणे, ही जीवनातील शांती आणि आनंद मिळण्यासाठी आवश्यक अट आहे. माणसांची जवळजवळ नेहमीच अशी खात्री असते की, त्यांना काय हवे आहे आणि जीवनाने त्यांना काय प्रदान करायला हवे, हे त्यांना ‘ईश्वरा’पेक्षादेखील अधिक चांगले समजते, आणि यातूनच बहुतांशी सारी मानवी दुःखे उद्भवतात. इतरांनीसुद्धा आपल्या अपेक्षांची पूर्तता करावी आणि परिस्थितीने देखील आपल्या इच्छावासनांची पूर्ती करावी अशी बहुतेक सगळ्या माणसांची अपेक्षा असते आणि त्यामुळेच त्यांना त्रास सहन करावा लागतो आणि ते दुःखी होतात.

– श्रीमाताजी [CWM 16 : 433]

प्रामाणिकपणा – २५

प्रश्न : प्रामाणिकपणा म्हणजे खरोखर नक्की काय?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणाच्या असंख्य श्रेणी आहेत. बोलायचे एक आणि विचार मात्र वेगळाच करायचा, दावा करायचा एका गोष्टीचा आणि हवी असते भलतीच गोष्ट, हे असे नसणे म्हणजे प्रामाणिकपणा; ही झाली प्रामाणिकपणाची अगदी प्राथमिक श्रेणी. म्हणजे असे पाहा की, एखादी व्यक्ती स्वतःमध्ये प्रचंड अभीप्सा आहे, असा जोरकसपणे दावा करत असते, तिला आध्यात्मिक जीवन हवे आहे, असे ती म्हणत असते आणि अगदी त्याच वेळी… अगदी निर्लज्जपणे, आध्यात्मिक जीवनाच्या अगदी विरोधी अशा गोष्टी करत असते.

(प्रामाणिकपणाची आता दुसरी श्रेणी पाहूया.) बरेचदा असे घडते एखादी व्यक्ती असे म्हणते की, “मला प्रगती करायची आहे आणि मला माझ्या दोषांपासून सुटका हवी आहे” आणि अगदी त्याच वेळी, ती व्यक्ती स्वत:च्या चेतनेमध्ये असणाऱ्या दोषांना खतपाणी घालते आणि त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करून, त्यांना घालवून देऊ नये म्हणून, ते दोष दडवून ठेवण्यासाठी धडपडते.

…या दुसऱ्या श्रेणीमध्ये व्यक्तीमधील एखादा भाग अभीप्सा बाळगून असतो आणि तो म्हणत असतो आणि तसा विचारही करत असतो, त्याला असे वाटत असते की, आपल्यातील सारे दोष, अपूर्णता या गोष्टी निघून गेल्या पाहिजेत; आणि अगदी त्याच वेळी, त्याच व्यक्तीमधील इतर भाग मात्र या दोषांना आणि अपूर्णतांना दडवून ठेवतात. ते दोष आणि त्या अपूर्णता उघड होऊ नयेत, त्यांच्यावर मात करायला त्यांना कोणी भाग पाडू नये, अशा रीतीने ते अशा गोष्टी अगदी काळजीपूर्वक दडवून ठेवतात. हे अगदी सार्वत्रिक आहे.

आणि शेवटी, आपण पुरेसे पुढे गेलो असू, ‘ईश्वरा’बद्दलच्या मध्यवर्ती अभीप्सेला विरोधी असा एखादाही भाग जोपर्यंत आपल्यामध्ये असतो तोपर्यंत आपण पूर्णपणे प्रामाणिक आहोत, असे म्हणता येणार नाही. म्हणजेच सांगायचे झाले तर, परिपूर्ण प्रामाणिकपणा ही अत्यंत दुर्मिळ अशी बाब आहे. आणि बहुधा, अगदी नेहमी, स्वत:च्या प्रकृतीतील, स्वभावातील ज्या गोष्टी व्यक्तीला आवडत नाहीत त्या गोष्टी, स्वतःपासून सुद्धा लपवून ठेवण्याची ती व्यक्ती काळजी घेते, व्यक्ती त्या गोष्टींचे समर्थन करणारी स्पष्टीकरणे देत राहते.

….हा सर्व अप्रामाणिकपणा आहे. जेव्हा अस्तित्वाच्या केंद्रस्थानी दिव्य ‘उपस्थिती’ची चेतना असते, दिव्य ‘संकल्पा’ची चेतना असते आणि जेव्हा व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तित्वच जणू काही दीप्तीमान, स्वच्छ, शुद्ध, संपूर्ण पारदर्शी असते आणि ते त्या दिव्य ‘अस्तित्वा’चा सर्व तपशिलांसह आविष्कार करत असते, तेव्हा तेथे संपूर्ण प्रामाणिकपणा येतो. तेव्हा तो खराखुरा प्रामाणिकपणा असतो.

कोणत्याही क्षणी, काहीही झाले तरी, जेव्हा व्यक्तीने स्वत:ला ‘ईश्वरा’प्रत समर्पित केलेले असते, आणि फक्त दैवी संकल्पाचीच ती व्यक्ती इच्छा बाळगत असते, मग त्यावेळी व्यक्तीच्या बाबतीत काहीही घडले तरी, कोणत्याही क्षणी, नेहमी, तिच्या पूर्ण अस्तित्वानिशी पूर्ण मतैक्याने ती व्यक्ती ‘ईश्वरा’ला म्हणू शकते, ईश्वराविषयी तिची अशी भावना असते की, “सारेकाही तुझ्याच इच्छेने घडू दे.” जेव्हा हे असे उत्स्फूर्त, संपूर्णपणे, समग्रपणे असते, तेव्हा तुम्ही प्रामाणिक असता.

– श्रीमाताजी [CWM 06 : 397-398]

प्रामाणिकपणा – २३

लोक जेव्हा मला म्हणतात की, “त्यांच्याकडे इच्छाशक्ती नाही.” तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, ते प्रामाणिक नसतात. कारण जगातील कोणत्याही इच्छांपेक्षा प्रामाणिकपणा ही अधिक बलशाली शक्ती आहे. प्रामाणिकपणा कोणत्याही गोष्टीत निमिषार्धातच बदल घडवून आणू शकतो, तो त्या इच्छेला पकडतो, तिचा ताबा घेतो, तिला बाहेर ओढून काढतो आणि मग ती इच्छा संपून गेलेली असते. पण तुम्ही मात्र डोळेझाक करता आणि तुमच्या (इच्छावासनांसाठी) सबबी शोधून काढता.

– श्रीमाताजी [CWM 08 : 19]

प्रामाणिकपणा – १९

(श्रीमाताजी येथे प्राणशक्तीच्या दुर्बलतेविषयी काही सांगत आहेत.)

प्राणशक्ती (vital power) दुर्बल असेल तर तुमची अभीप्साही दुर्बल असते. असे लक्षात घ्या की, दुर्बलता हाच एक प्रकारचा अप्रामाणिकपणा असतो, दुर्बलता ही व्यक्तीने स्वत:च स्वत:ला दिलेली एक सबब असते; कदाचित ती फार जाणीवपूर्वकपणे दिलेली असते असेही नाही, पण तुम्हाला हे सांगितलेच पाहिजे की, अवचेतना (subconscient) हे असे एक स्थान आहे की, जेथे अप्रामाणिकपणा ठासून भरलेला असतो. आणि “मला अमुक एक गोष्ट करायला आवडली असती, पण ती करणे मला शक्य नाही”, असे जी दुर्बलता म्हणते, ती दुर्बलता नसून, ती अप्रामाणिकता असते. कारण जर का एखादी व्यक्ती खरंच प्रामाणिक असेल तर ती व्यक्ती जे आज करू शकत नाही ते उद्या करू शकते, आणि जे ती उद्या करू शकणार नाही ते ती परवा करू शकते आणि असे कधीपर्यंत ? तर तिला ती गोष्ट करणे जमू लागते तोपर्यंत.

….सर्व प्रकारचे दुःखभोग, सर्व दुर्बलता, सर्व अक्षमता यांचे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, या साऱ्या गोष्टी म्हणजे अंतिमत: अप्रामाणिकताच असतात. अशी अनेक ठिकाणे असतात की, जेथे अप्रामाणिकता नांदू शकते आणि म्हणून ”मी अगदी प्रामाणिक आहे”, असे जी कोणी माणसं मला नेहमी सांगत असतात, त्यांनी तसे कधीही म्हणू नये. “मी कधीच खोटे बोललेलो नाही”, असे माणसे छातीठोकपणे सांगत असतात, तोही तसाच प्रकार आहे. तुम्ही जर खरोखरच पूर्ण प्रामाणिक असतात, तर तुम्ही ‘ईश्वर’च झाला असतात, तुम्ही खरोखर कधीच खोटे बोलला नसतात, तर तुम्ही साक्षात ‘सत्य’च बनला असतात. पण, प्रत्यक्षात तुम्ही ‘ईश्वर’ही नाही किंवा ‘सत्य’ही नाही (तत्त्वरूपाने तुम्ही तसे आहात पण वास्तवात तसे नाही.) असे असल्याने, ‘सत्य’ आणि प्रामाणिकपणा यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला नेहमीच खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, हे लक्षात असू द्या.

– श्रीमाताजी [CWM 04 : 252-253]

साधनेची मुळाक्षरे – ३८

तुम्ही मानवी प्रकृतीचे रूपांतरण गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही कुरकूर न करता, किंवा कोणताही प्रतिकार न करता, स्वत:ला ‘श्रीमाताजीं’च्या व त्यांच्या ‘शक्तीं’च्या हाती सोपवा आणि त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. चेतना, घडणसुलभता (Plasticity) आणि नि:शेष समर्पण ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. ‘श्रीमाताजी’ आणि त्यांच्या ‘शक्ती’ व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, ‘श्रीमाताजी’ तुमच्यातील अंधकारामध्ये आणि तुमच्या अजागृत भागांमध्ये, अजागृत क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी जिवंत संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट निराळी असते.

तुमची समग्र प्रकृतीच ‘श्रीमाताजीं’च्या स्पर्शाला घडणसुलभ असली पाहिजे – स्वसंतुष्ट अज्ञानी मन जसे प्रश्न विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये.

माणसातील प्राण ज्याप्रमाणे स्वत:च्याच उर्मींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक ईश्वरी प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच उर्मींवर भर देणारी असता कामा नये.

माणसाची शारीरिक चेतना जशी अडथळा निर्माण करते आणि त्याच्या किरकोळ आणि काळोख्या गोष्टींमधील सुखाला ती जशी चिकटून राहते; शरीराची आत्माविहिन दिनचर्या, आळस किंवा त्याची जी जड निद्रा असते त्याला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाने जशी शारीरिक चेतना आक्रंदन करते; तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी, स्वत:ची अक्षमता, जडता आणि तामसिकता ह्यांना हटवादीपणे चिकटून राहिलेली असता कामा नये.

नि:शेष समर्पण, तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभ लवचीकता (Plasticity) आणेल; वरून प्रवाहित होणाऱ्या ‘प्रज्ञा’ आणि ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘सुसंवाद’ आणि ‘सौंदर्य’, ‘परिपूर्णता’ ह्या साऱ्या गोष्टींसाठी सातत्यपूर्ण खुलेपणा राखलात तर, तुमच्यामधील सर्व अंगांमध्ये जाणीव जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची चेतना ही अर्धचेतन चेतनेशी संबद्ध न राहता, अतिमानसिक अतिचेतन ‘शक्ती’शी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परम ‘प्रेमा’ने व ‘आनंदा’ने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 24-25)