Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १८९

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०५

ऊर्ध्वगामी उन्मुखता (upward opening) ही अपरिहार्यपणे फक्त शांती, नीरवता आणि ‘निर्वाणा’कडेच घेऊन जाते असे नाही. साधकाला आपल्या वरच्या दिशेस, जणूकाही आपल्या मस्तकाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या व्यापकतेची आणि सर्व भौतिक व अतिभौतिक प्रदेश व्यापून टाकणाऱ्या एका महान, अंतिमत: एक प्रकारच्या अनंत शांतीची, नीरवतेचीच जाणीव होते असे नाही तर, त्याला इतर गोष्टींचीही जाणीव होते. सर्व ऊर्जा ज्यामध्ये सामावलेली असते अशा एका महान ‘शक्ती’ची, सर्व ज्ञान ज्यामध्ये सामावलेले असते अशा एका महा‘प्रकाशा’ची, सर्व आनंद आणि हर्ष ज्यामध्ये सामावलेला असतो अशा एका अपार ‘आनंदा’ची साधकाला जाणीव होते. सुरूवातीला या गोष्टी अनिवार्य आवश्यक, अनिश्चित, निरपवाद, साध्या, केवल अशा स्वरूपात त्याच्या समोर येतात. निर्वाणामध्ये उपरोक्त साऱ्या गोष्टी शक्य असल्याचे त्याला वाटते.

परंतु पुढे त्याला हेही आढळते की, या ‘दिव्य शक्ती’मध्ये अन्य शक्ती सामावलेल्या आहेत, या ‘दिव्य प्रकाशा’मध्ये अन्य सारे प्रकाश, या ‘दिव्य आनंदा’मध्ये शक्य असणारे सारे हर्ष आणि आनंद सामावलेले आहेत. आणि या साऱ्या गोष्टी आपल्यामध्येही अवतरित होऊ शकतात, हेही त्याला उमगू लागते. फक्त शांतीच नव्हे तर यांपैकी कोणतीही एक किंवा सर्व गोष्टी अवतरित होऊ शकतात. एवढेच की परिपूर्ण स्थिरता आणि शांती यांचे अवतरण घडवणे हे सर्वाधिक सुरक्षित असते कारण त्यामुळे इतर सर्व गोष्टींचे अवतरण हे अधिक निर्धोक होते. अन्यथा, बाह्य प्रकृतीला एवढी ‘शक्ती’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’ किंवा ‘आनंद’ धारण करणे किंवा तो पेलणे अवघड जाऊ शकते. आपण जिला ‘उच्चतर, आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना’ असे म्हणतो, तिच्यामध्ये वरील सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो.

हृदय-चक्राच्या माध्यमातून येणारा आंतरात्मिक खुलेपणा (Psychic opening) आपल्याला मूलतः व्यक्तिगत ‘ईश्वरा’च्या, आपल्याशी असलेल्या ‘ईश्वरा’च्या आंतरिक नात्याच्या संपर्कात आणतो. हा विशेषतः प्रेम आणि भक्तीचा मूलस्रोत असतो. ऊर्ध्वमुखी उन्मुखता (Upward opening) थेटपणे आपले नाते समग्र ‘ईश्वरा’शी जोडून देते आणि ती उन्मुखता आपल्यामध्ये दिव्य चेतना निर्माण करू शकते, ती आपल्या आत्म्याचे एक किंवा अनेक नवजन्म घडवून आणू शकते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 326-327)

साधना, योग आणि रूपांतरण – १८८

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०४

सर्वोच्च आध्यात्मिक ‘आत्मा’ हा आपल्या व्यक्तित्वाच्या आणि शारीर-अस्तित्वाच्या मागे नसतो, तर तो सर्वस्वी त्याच्या पलीकडे, ऊर्ध्वस्थित असतो. आंतरिक चक्रांपैकी सर्वोच्च चक्र हे मस्तकामध्ये असते, तर सर्वात गहनतम चक्र हे हृदयामध्ये असते; परंतु जे चक्र थेटपणे ‘आत्म्या’प्रत खुले होते ते मस्तकाच्याही वर, शरीराच्या पूर्णपणे बाहेर म्हणजे ज्याला ‘सूक्ष्म शरीर’ असे संबोधले जाते, त्यामध्ये असते.

या (सर्वोच्च) आत्म्याला दोन पैलू असतात आणि त्यांच्या साक्षात्काराचे परिणाम हे या दोन पैलूंशी संबंधित असतात. एक पैलू हा अक्रिय, स्थितीमान (static) असतो. ही स्थिती व्यापक शांतीची, मुक्तीची व नीरवतेची असते. या शांत ‘आत्म्या’वर कोणत्याही कृतीचा वा अनुभवाचा काही परिणाम होत नाही. तो त्यांना निःपक्षपातीपणे आधार पुरवत असतो पण तो त्यांची निर्मिती करत असावा असे दिसत नाही, किंबहुना तो या साऱ्यापासून अलिप्तपणे, उदासीनपणे दूर उभा राहतो.

या आत्म्याचा दुसरा पैलू हा गतिशील असतो आणि विश्वात्मा म्हणून तो अनुभवास येतो, तो संपूर्ण वैश्विक कृतीला केवळ आधारच पुरवितो असे नाही तर तो ती कृती निर्माण करतो, आणि ती कृती स्वतःमध्ये सामावूनही घेतो. या वैश्विक कृतीमध्ये आपल्या शारीरिक अस्तित्वांशी संबंधित असलेल्या घटकांचाच नव्हे तर त्यांच्या अतीत असणाऱ्या सर्व घटकांचा, इहलोक आणि सर्व अन्य लोक, या विश्वाच्या भौतिक तसेच अतिभौतिक श्रेण्यांचा समावेशदेखील त्यामध्ये होतो. तसेच, सर्वांमध्ये वसत असलेला आत्मा एकच आहे याची आपल्याला जाणीव होते. इतकेच नाही तर, तो सर्वाच्या अतीत, परात्पर, सर्व व्यक्तिगत जन्माला किंवा वैश्विक अस्तित्वालाही ओलांडून जाणारा म्हणून संवेदित होतो.

सर्वांमध्ये वसत असलेल्या त्या एकामध्ये म्हणजे विश्वव्यापक आत्म्यामध्ये प्रविष्ट होणे म्हणजे अहंभावापासून मुक्त होणे. अशा वेळी, हा अहंभाव एकतर चेतनेमधील एक छोटीशी साधनभूत परिस्थिती बनून शिल्लक राहतो किंवा मग आपल्या चेतनेमधून तो पूर्णपणे नाहीसा होतो. यालाच ‘अहंभावाचे निर्वाण’ असे म्हणतात. सर्वांच्या अतीत असणाऱ्या परात्पर आत्म्यामध्ये प्रविष्ट होण्यामधून आपण वैश्विक चेतना आणि कृतीच्या पूर्णपणे अतीत होण्यास सक्षम होतो. विश्व-अस्तित्वामधून पूर्ण मुक्ती मिळविण्याचा तो एक मार्ग असू शकतो, यालाच ‘लय, मोक्ष, किंवा निर्वाण’ असे संबोधले जाते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325-326)

साधना, योग आणि रूपांतरण – १८७

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०३

खरा आत्मा (The real Self) हा पृष्ठभागावर नसतो तर तो खोल अंतरंगामध्ये आणि ऊर्ध्वस्थित असतो. अंतरंगामध्ये आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीराला आधार देणारा आत्मा असतो, आणि त्या आत्म्यामध्ये विश्वव्यापक होण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्वतःच्या आणि वस्तुमात्रांच्या ‘सत्या’शी थेट संपर्क साधण्याची क्षमता असते. त्याच्याकडे वैश्विक आनंदाची चव चाखण्याची क्षमता असते. त्याच्याकडे स्थूल भौतिक शरीराच्या दुःखभोगापासून आणि बंदिवान झाल्यामुळे आलेल्या क्षुद्रतेपासून मुक्ती मिळविण्याची क्षमता असते.

आजकाल अगदी युरोपमध्येसुद्धा, पृष्ठवर्ती भागाच्या मागे असणाऱ्या गोष्टीचे अस्तित्व वारंवार मान्य केले जात आहे, परंतु त्याचे स्वरूप समजावून घेण्यात त्यांची चूक होत आहे, त्याला ते ‘अवचेतन’ (subconscient) किंवा ‘प्रच्छन्न चेतना’ (subliminal) असे संबोधतात. वस्तुतः ते अस्तित्व त्याच्या स्वतःच्या पद्धतीने खूप सचेत असते; ते प्रच्छन्न नसते, फक्त ते पडद्याआड दडलेले असते इतकेच.

आमच्या मनोविज्ञानानुसार, ते अस्तित्व हे या छोट्या पृष्ठवर्ती व्यक्तिमत्त्वाशी, चेतनेच्या काही विशिष्ट चक्रांद्वारे जोडलेले असते, ‘योगा’मुळे आपल्याला त्यांची जाणीव होते. आपल्या आंतरिक अस्तित्वाचा काही अंशभाग या चक्रांच्या माध्यमातून बाह्य जीवनामध्ये पाझरतो, हा अंशभागच आपल्या जीवनाचा सर्वोत्तम भाग असतो आणि तो अंशभागच आपल्या कला, काव्य, तत्त्वज्ञान, आदर्श, धार्मिक आकांक्षा, ज्ञान आणि पूर्णत्वप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न या गोष्टींना कारणीभूत ठरतो. परंतु ही आंतरिक चक्रं बहुतांशी, मिटलेली किंवा सुप्त असतात. ती खुली करणे आणि त्यांना जागृत व सक्रिय करणे हे ‘योगा’चे एक ध्येय असते.

ही चक्रं जसजशी खुली होतात, तशतशा आपल्यामध्ये आंतरिक अस्तित्वाच्या शक्ती आणि शक्यता उदयाला येऊ लागतात. प्रथमतः आपल्याला एका विशाल चेतनेची आणि नंतर वैश्विक चेतनेची जाणीव होते. त्यानंतर मात्र आपण मर्यादित जीवनं असणारी छोटीछोटी विलग व्यक्तिमत्त्वं म्हणून उरत नाही, तर आता आपण वैश्विक कृतीची केंद्र बनतो आणि त्यानंतर आपला वैश्विक शक्तींशी थेट संपर्क येतो. पृष्ठवर्ती व्यक्तित्व ज्याप्रमाणे वैश्विक शक्तींच्या हातचे अनिच्छुक बाहुले असते त्याप्रमाणे आपण बाहुले बनून राहण्याऐवजी, आता आपण विशिष्ट प्रमाणात सचेत बनू शकतो आणि प्रकृतीच्या लीलेचे ‘स्वामी’ बनू शकतो. मात्र हे किती प्रमाणात घडून येऊ शकते हे आंतरिक अस्तित्वाच्या विकासावर आणि त्याच्या उच्चतर आध्यात्मिक स्तरांप्रत असलेल्या ऊर्ध्वमुखी उन्मुखतेवर अवलंबून असते. त्याचवेळी हृदयचक्र खुले झाल्यामुळे, चैत्य पुरुषाची (psychic being) मुक्तता होते, आणि मग तो चैत्य पुरुष आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’ची आणि ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर ‘सत्या’ची आपल्याला जाणीव करून देण्याच्या दिशेने प्रगत होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325)

साधना, योग आणि रूपांतरण – १७९

अतिमानसामध्ये ‘ईश्वरा’शी चेतनायुक्त ऐक्य आणि प्रकृतीचे रूपांतर हे पूर्णयोगाचे ध्येय आहे. सर्वसाधारण योगमार्ग हे ‘मना’कडून वैश्विक ‘नीरवते’च्या एखाद्या निर्गुण स्थितीमध्ये थेट निघून जातात आणि त्याद्वारे, ऊर्ध्वमुख होत, ‘सर्वोच्च’ स्थितीमध्ये विलय पावण्याचा प्रयत्न करतात. मनाच्या अतीत होणे आणि जे केवळ स्थितिमान स्थिरच आहे असे नाही, तर जे गतिमानही आहे अशा ‘सच्चिदानंदा’च्या ‘दिव्य सत्या’मध्ये प्रविष्ट होणे आणि समग्र व्यक्तित्व हे त्या ‘सत्या’मध्ये उन्नत करणे हे ‘पूर्णयोगा’चे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 412)

साधना, योग आणि रूपांतरण – २१ (भाग ०५)

(‘ध्यान’ आणि ‘कर्म’ या दोन्ही गोष्टींसंबंधीचे विचार आपण कालच्या भागामध्ये लक्षात घेतले. परिणामकारकतेच्या दृष्टीने, ‘ध्याना’पेक्षा ‘योग्य रीतीने केलेले कर्म’ हे अधिक सरस असते, असा श्रीमाताजींचा अभिप्राय असल्याचे येथे साधकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याच्या मनात ध्यानाच्या उपयुक्ततेविषयीच साशंकता निर्माण झाली. ती त्याने श्रीमाताजींपाशी मोकळेपणाने व्यक्त केली आहे.)

साधक : तर मग ध्यानाचा काहीच उपयोग नाही का?

श्रीमाताजी : नाही, तसे नाही, पण जोपर्यंत ते आवश्यक असेल तोवर ते अगदी उत्स्फूर्तपणे, सहजपणे होत राहील. अचानकपणे, एखाद्या गोष्टीकडून (उच्चतर दिव्य शक्तीकडून) तुमचा ताबा घेतला जाईल आणि त्यामुळे तुम्ही अगदी निश्चल होऊन जाल, तेव्हा तुम्हाला एखाद्या संकल्पनेच्या दर्शनावर किंवा एखाद्या मानसिक अवस्थेवर लक्ष एकाग्र करायला प्रवृत्त केले जाईल. ती गोष्ट तुमचा ताबा घेईल, तेव्हा मात्र तुम्ही तिला विरोध करता कामा नये. मग तुम्ही आवश्यक ती प्रगती साध्य करून घ्याल. आणि अशा एखाद्या अवचित क्षणी तुम्हाला असे आढळते की, तुम्हाला काहीतरी उमगले आहे आणि तुम्हाला जे आंतरिकरित्या काहीतरी गवसले आहे त्यानिशी पुन्हा अगदी पुढच्या क्षणीच तुम्ही तुमचे काम करू लागाल, परंतु त्यामध्ये कोणताही आविर्भाव, कोणतेही ढोंग नसेल.

जे ध्यानाला बसतात आणि आपण कोणीतरी असामान्य व्यक्ती आहोत असा स्वतःविषयी ग्रह करून घेतात त्यांची मला सर्वात जास्त चिंता वाटते. सर्व गोष्टींमध्ये ही गोष्ट सर्वात जास्त धोकादायक असते कारण ते लोक आत्मसंतुष्टीने इतके भरून जातात आणि विफल बनतात की, ते अशा प्रकारे प्रगतीचे सर्व मार्गच बंद करून टाकतात.

– श्रीमाताजी (CWM 05 : 44)

साधना, योग आणि रूपांतरण – २० (भाग ०४)

माझ्या दृष्टीने, माझ्या अनुभवाच्या आधारे सांगायचे तर (आणि माझा अनुभव पुरेसा दीर्घ आहे, कारण गेली सुमारे तेहतीस वर्षे मी विविध लोकांच्या संपर्कात आहे; त्यांचे प्रश्न, त्यांची योगसाधना, त्यांचे आंतरिक प्रयत्न मला माहीत आहेत; मी येथेही आणि इतरत्र, जगभरामध्ये सर्वत्र ते प्रश्न हाताळले आहेत.) मला असे वाटते की, ध्यानाद्वारे तुम्ही स्वतःमध्ये रूपांतर घडवून आणू शकत नाही… उलटपक्षी, (कर्माबाबत) मात्र मला अगदी खात्रीच आहे.

तुम्हाला जे कर्म करणेच भाग आहे, मग ते कर्म कोणतेही असो, ते जर तुम्ही केलेत आणि ते करत असताना ‘ईश्वरा’चे विस्मरण होऊ नये म्हणून काळजी घेतलीत, सतर्क राहिलात; तुम्ही जे काही कर्म केले असेल ते ‘ईश्वरा’र्पण केलेत आणि ‘ईश्वरा’ने तुमच्या प्रतिक्रियांमध्ये परिवर्तन घडवून आणावे म्हणून तुम्ही स्वतःचे आत्मदान केलेत; तुमच्या प्रतिक्रिया स्वार्थी, क्षुल्लक, मूर्ख आणि अज्ञ असण्याऐवजी तुम्ही त्या तेजोमय, उदार अशा बनविल्यात तर, (तुम्ही जर अशा रीतीने वागलात तर) तुम्ही प्रगती कराल. याप्रकारे, तुम्ही केवळ स्वतःचीच प्रगती केलेली असते असे नाही, तर तुम्ही सार्वत्रिक प्रगतीला देखील हातभार लावलेला असतो.

कमीअधिक प्रमाणात रिक्त, पोकळ ध्यान करण्यासाठी ज्यांनी सर्वसंगपरित्याग केला आहे, ध्यान करत बसले आहेत आणि त्यांनी बरीच प्रगती केली आहे, असे मला आढळले नाही; किंवा त्यांनी काही प्रगती केली असेलच तर ती अगदीच किरकोळ होती.

उलट, मी अशीही काही माणसं बघितली आहेत की, आपण योगसाधना करत आहोत असा त्यांच्यामध्ये कोणताही आविर्भाव नव्हता, परंतु ते, या पृथ्वीचे रूपांतरण करण्याच्या उत्साहाने आणि ‘ईश्वरा’चे या जगामध्ये अवतरण होणार या संकल्पनेमुळे उत्साहाने भारलेले होते आणि त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेले जे काही छोटेमोठे कार्य होते ते हृदयापासून, उत्साहाने, स्वतःमध्ये जे काही आहे ते, हातचे काहीही राखून न ठेवता, संपूर्णपणे झोकून देऊन केले होते. त्या पाठीमागे वैयक्तिक मुक्तीची कोणतीही स्वार्थी संकल्पना नव्हती, अशा लोकांनी उत्कृष्ट प्रगती, खरोखरच उत्कृष्ट प्रगती केलेली मी पाहिली आहे. आणि कधीकधी खरोखरच अशी माणसं अद्भुत असतात.

मी संन्यासी पाहिले आहेत, मठांमध्ये राहणारे लोक पाहिले आहेत, जे स्वतःला योगी म्हणवून घेतात अशी माणसंही मी पाहिली आहेत. पण अशी बारा माणसं आणि (वर सांगितल्याप्रमाणे,) उत्कृष्ट कार्य करणारी एक व्यक्ती यांची बरोबरीच होऊ शकत नाही. (म्हणजे मी हे, पृथ्वीच्या रूपांतरणाच्या आणि जगाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. म्हणजे आपण जे करू इच्छित आहोत, हे जग जसे आत्ता आहे ते तसेच राहू नये आणि ते खऱ्या अर्थाने, दिव्य चेतनेनिशी ‘ईश्वरी’ संकल्पाचे साधन बनावे या दृष्टिकोनातून मी हे म्हणत आहे.) या जगापासून दूर पलायन करून तुम्ही या जगामध्ये परिवर्तन घडवू शकणार नाही. तर इथेच राहून, विनम्रपणे, विनयाने परंतु हृदयामध्ये अर्पण भाव जागता ठेवून ते शक्य होईल. (क्रमशः)

– श्रीमाताजी (CWM 05 : 43-44)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (३०)

(एका साधकाच्या प्रश्नाला उत्तर देताना, आद्य शंकराचार्य, भगवान बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानाचा परामर्श घेऊन झाल्यावर मग, श्रीअरविंद त्यांनी स्वतः मांडलेल्या तत्त्वज्ञानाविषयी थोडे अधिक स्पष्टीकरण येथे करत आहेत.)

विश्वाचे मी जे स्पष्टीकरण केले आहे त्यामध्ये, येथे (पृथ्वीवर) असलेल्या आपल्या अस्तित्वाचा अर्थ म्हणून आध्यात्मिक उत्क्रांतीचे मूलभूत तथ्य मी समोर ठेवले आहे. ही आध्यात्मिक उत्क्रांती म्हणजे आरोहणांची एक मालिकाच असते. त्यामध्ये शारीरिक अस्तित्व आणि चेतना यांपासून प्राणमय पुरुषाकडे, म्हणजे ज्या अस्तित्वावर जीवन-शक्तीचे वर्चस्व असते त्या अस्तित्वाकडे आरोहण होत असते. तेथून पुढे, पूर्ण विकसित मनुष्यामधील मनोमय पुरुषाकडे आरोहण होत असते. त्यानंतर, मानसिक चेतनेच्या अतीत असणाऱ्या परिपूर्ण चेतनेकडे म्हणजे ‘अतिमानसिक’ चेतनेकडे, आणि ‘विज्ञानमय’ पुरुषाकडे, म्हणजे आध्यात्मिक अस्तित्वाची संपूर्ण चेतना असणाऱ्या ‘सत्य-चेतने’ कडे (Truth-Consciousness) आरोहण होत राहते.

‘मन’ ही काही आपली अंतिम सचेत अभिव्यक्ती असू शकत नाही कारण मन म्हणजे मूलतः अज्ञान असते, की जे ज्ञान मिळविण्यासाठी धडपडत असते; केवळ ‘अतिमानसिक सत्य-चेतना’च आपल्याला शुद्ध आणि समग्र ‘आत्म-ज्ञान’ आणि ‘जगत-ज्ञान’ प्रदान करू शकते; त्या चेतनेच्या माध्यमातूनच आपल्याला आपल्या खऱ्या, सत् अस्तित्वाची प्राप्ती होऊ शकते आणि आपली आध्यात्मिक उत्क्रांती परिपूर्णतेला जाऊन पोहोचू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 396-397)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२९)

महत्तर चेतना जर मनाच्या अतीत असेल आणि त्या चेतनेप्रत आपण पोहोचू शकलो तरच आपण त्या ‘परब्रह्मा’ला जाणू शकतो आणि त्यामध्ये प्रवेश करू शकतो. अशा प्रकारची महत्तर चेतना असते किंवा नाही यासंबंधीची कोणतीही बौद्धिक अटकळ, तार्किक विचार यांच्या आधारे आपण प्रगतिपथावर फार दूरवर जाऊन पोहोचू शकत नाही. परब्रह्माची अनुभूती मिळविण्यासाठी, तेथपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, आणि त्यामध्येच जीवन जगण्यासाठी आपल्याला एका मार्गाची आवश्यकता असते. आपल्याला जर तो मार्ग सापडला तर, बौद्धिक अटकळ आणि तर्क हे अपरिहार्यपणे अगदी दुय्यम स्थानी जाऊन पडले पाहिजेत आणि (तसे झाल्यास) त्यांच्या असण्याचे प्रयोजनच शिल्लक राहणार नाही. तरीही तत्त्वज्ञान, ‘सत्या’ची बौद्धिक अभिव्यक्ती या गोष्टी शिल्लक राहू शकतील. आणि प्रामुख्याने, या महान शोधाला अभिव्यक्त करण्याचे साधन म्हणूनच त्या गोष्टी असतील आणि ती परब्रह्माची अनुभूती मानसिक परिभाषेमध्ये मांडता येत असेल, आणि शक्य असेल तेवढ्या प्रमाणात ती मांडली तर, आशय तेवढा शिल्लक राहील आणि तोही अशा लोकांसाठी शिल्लक राहील की जे अजूनही मानसिक बौद्धिक स्तरावरच जीवन जगत आहेत.

(बुद्धीच्या आधारे ‘परतत्त्वा’चे, ‘सत्या’चे आकलन करून घेण्याच्या भारतीय किंवा पाश्चात्त्य चिंतनांबद्दल विस्ताराने ऊहापोह करून झाल्यानंतर, हे प्रयत्न कसे अपुरेच ठरतात, यासंबंधी श्रीअरविंद यांनी आधी सांगितले आहे. आणि आता, ‘पूर्णयोगा’च्या परिभाषेत ‘सत्य’ कशाला म्हणायचे हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत…)

अखिल ब्रह्माचा ‘बुद्धिपूर्वक विचार’ केल्याने नव्हे तर, चेतनेच्या परिवर्तनामुळे व्यक्ती अज्ञानातून ‘ज्ञाना’कडे जाऊ शकते. हे ‘ज्ञान’ अशा प्रकारचे असते की, आपण जे जाणतो ते आपण स्वतः बनतो. बाह्यवर्ती चेतनेमधून थेट आणि सखोल आंतरिक चेतनेमध्ये प्रवेश करणे, अहंकार आणि शरीराच्या कक्षा ओलांडून चेतना विशाल करणे, आंतरिक संकल्प आणि अभीप्सेद्वारा चेतना उन्नत करणे आणि मनाच्या अतीत होईपर्यंत चेतनेचे आरोहण करत करत, तिला ‘प्रकाशा’प्रत खुली करणे, आत्मदान आणि समर्पणाच्या माध्यमातून अतिमानसिक ‘ईश्वरा’चे अवतरण घडविणे आणि परिणामतः मन, प्राण आणि शरीराचे रूपांतर घडविणे हा ‘सत्या’प्रत जाण्याचा ‘पूर्णयोगा’चा मार्ग आहे. याला इथे आम्ही ‘सत्य’ असे संबोधतो आणि आमच्या ‘योगा’मध्ये (‘पूर्णयोगा’मध्ये) तेच आमचे ध्येय असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 352 and 355)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२८)

जग हे माया आहे, ते मिथ्या आहे या मताशी मी सहमत नाही. ‘ब्रह्म’ हे जसे विश्वातीत ‘केवलतत्त्वा’मध्ये आहे तसेच ते येथेही आहे. ज्या गोष्टीवर मात करणे आवश्यक आहे अशी एक गोष्ट म्हणजे ‘अज्ञान’. जे अज्ञान आपल्याला अंध बनविते आणि आपल्या अस्तित्वाचे सत्य स्वरूप ओळखण्यास तसेच, या जगामध्ये आणि जगाच्या अतीतही असणाऱ्या ‘ब्रह्मा’चा साक्षात्कार करून घेण्यास आपल्याला प्रतिबंध करते, त्या अज्ञानावर आपण मात केली पाहिजे.

– श्री अरविंद (CWSA 29 : 391)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२७)

(उत्तरार्ध)

(‘ईश्वरा’प्रति आत्मदान करण्याची प्रेरणा) ही प्रेरणा प्राणिक इच्छा नसते तर ती आत्म्याची प्रेरणा असते; (त्या पाठीमागे) एक तर्कही असतो पण तो मनाचा तर्क नसतो, तर तो आत्म्याचा आणि जीवात्म्याचा तर्क असतो. तेथेही एक मागणी असते, पण ती मागणी म्हणजे प्राणिक लालसा नसते तर ती आत्म्याची अंगभूत अभीप्सा असते. जेव्हा, “मी तुझा अमुक कारणासाठी शोध घेत आहे, मी तुझा त्या करणासाठी शोध घेत आहे,” अशी भाषा जाऊन तेथे, “मी तुझा शोध केवळ तुझ्यासाठीच घेत आहे,” असा बदल घडून येतो; म्हणजे जेव्हा निव्वळ आत्मदान घडून येते तेव्हा अशा प्रकारची अभीप्सा उदयाला येते. कृष्णप्रेम (रोनाल्ड हेनरी निक्सन नावाचे एक ब्रिटिश साधक, यांनी वैष्णव संप्रदायाचा स्वीकार केला.) जेव्हा म्हणतात, ‘ज्ञान नको, हेही नको आणि तेही नको, तर फक्त कृष्णच हवा,” तेव्हा त्यांना ‘ईश्वरा’च्या या अदभुत आणि अनिर्वचनीय केवलाविषयी बोलायचे असते.

‘ईश्वरा’ची ओढ ही खरोखरच एक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आपल्यामधील जीवात्मा ‘ईश्वरा’कडे ओढला जातो कारण त्याला त्या महत्तर ‘आत्म्या’ची अनिवार्य हाक आलेली असते. जीवात्मा आपल्या आराध्य दैवताकडे अनिवार्यपणे ओढला जातो, कारण ‘ईश्वरा’शिवाय त्याचे अस्तित्वच असू शकत नाही. कारण जीवात्मा हा जीवात्मा असतो आणि ‘ईश्वर’ हा ‘ईश्वर’ असतो. ‘ईश्वरा’साठीच ईश्वराचा शोध, अन्य कशासाठीही नाही, असे आम्ही जेव्हा म्हणत असतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो हे स्पष्ट व्हावे म्हणून, (अर्थात जेवढे स्पष्ट करण्याजोगे होते तेवढे) मी हे सर्व लिहिले आहे. स्पष्टीकरण करण्याजोगे असू देत वा नसू देत, आध्यात्मिक अनुभूतीची ही एक सर्वात प्रभावी वास्तविकता असते. ‘आत्मदानाची प्रेरणा’ ही या वास्तविकतेची केवळ एक अभिव्यक्ती असते.

परंतु याचा अर्थ असा होत नाही की, मी तुमच्या ‘आनंदा’च्या मागणीवर आक्षेप घेत आहे. जोपर्यंत तुमच्या व्यक्तित्वाच्या कोणत्याही एखाद्या भागाला तशी गरज असते, तोपर्यंत तुम्ही खुशाल त्याची मागणी करू शकता, कारण जोपर्यंत आपल्यामध्ये सदोदित असलेली निरपवाद आंतरिक हाक, स्वतःला पृष्ठस्तरावर नेण्यासाठी जोर लावत नाही तोपर्यंत (आनंद, प्रकाश, शक्ती, ज्ञान, शांती इत्यादी) याच गोष्टी व्यक्तीला ‘ईश्वरा’कडे घेऊन जाणाऱ्या असतात. आणि ही आंतरिक हाक खरोखरच अगदी आरंभापासूनच असते आणि पाठीशी असते – ती आध्यात्मिक सुस्पष्ट अनिवार्यता असते, आत्म्याची ‘ईश्वरा’प्रति असलेली ही निखालस (absolute) गरज असते.

त्या ठिकाणी ‘आनंद’ असताच कामा नये, असे काही माझे म्हणणे नाही. आत्मदान म्हणजेच स्वयमेव एक अपार ‘आनंद’ असतो, आणि जेव्हा ते आत्मदान स्वत:सोबत ‘आनंद’ घेऊन येते, तेव्हा ते एक अनिर्वचनीय ‘आनंद’ जागृत करते आणि इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा, (निःस्वार्थी आत्मदान करणे) या पद्धतीद्वारे हा ‘आनंद’ लवकर गवसतो, म्हणून एखादी व्यक्ती असे म्हणू शकते की, “निःस्वार्थी आत्मदान ही सर्वोत्तम नीती आहे.” अर्थातच केवळ एक ‘नीती’ म्हणून ती व्यक्ती ते आत्मदान आचरणात आणत नाही. ‘आनंद’ हे फल असते, पण या फलासाठी आत्मदान केले जात नाही, तर ते स्वयमेव आत्मदानासाठी आणि साक्षात ‘ईश्वरा’साठीच केले जाते – यामध्ये अगदी सूक्ष्मसा फरक आहे; तो मानसिक आहे असे वाटेल, पण त्यामध्ये खरोखरच फरक असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 12-13)