Tag Archive for: तत्त्वज्ञान

सत्त्वगुणाच्या माध्यमातून प्रगत होणे, ही पारंपरिक योगमार्गातील एक सर्वसाधारण संकल्पना आहे. पतंजलीप्रणीत योगामध्ये सांगितल्याप्रमाणे यमनियमाद्वारे असेल, किंवा बौद्धमतातील अष्टांगमार्गाद्वारे असेल किंवा भक्तिपंथातील साधुता यांसारख्या साधनांचा अवलंब करून, त्याद्वारे शुद्धीकरण आणि पूर्वतयारी करणे, या साऱ्या पारंपरिक योगाच्या संकल्पना आहेत.

पूर्णयोगामध्ये सत्त्वाच्या माध्यमातून विकसन होत नाही, तर येथे सत्त्वाची जागा समतेच्या जोपासनेद्वारा आणि आंतरात्मिक रूपांतरणाद्वारे (psychic transformation) घेतली जाते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 424)

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही आत्ता जशी व्यापकता आणि स्थिरता बाळगली आहे तशी ती नेहमी टिकवून ठेवलीत आणि हृदयामध्ये देखील जर श्रीमाताजींबद्दल सदोदित प्रेम असेल तर मग सारे काही निर्धोक असते. कारण येथे योगाचा दुहेरी पाया रचण्यात आलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे येथे उच्चतर चेतना ही तिची ऊर्ध्वस्थित शांती, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांसहित अवतरित होते आणि ज्या चैत्य अस्तित्वामुळे सर्व प्रयत्न आणि सर्व उत्स्फूर्त गतिविधी खऱ्या ध्येयाप्रत वळलेल्या राहतात, ते चैत्य अस्तित्व खुले होते. (हा असतो तो दुहेरी पाया.)

श्रीअरविंद (CWSA 30 : 466)

चेतना जेव्हा संकुचित असते, ती व्यक्तिगत असते किंवा शरीरामध्येच बंदिस्त झालेली असते तेव्हा ईश्वराकडून काही ग्रहण करणे अवघड जाते. ही चेतना जेवढी जास्त व्यापक होते, तेवढी ती अधिक ग्रहण करू शकते. एक वेळ अशी येते की, जेव्हा ती विश्वाएवढी व्यापक झाल्याचा अनुभव येतो. तेव्हा समग्र ईश्वरच स्वतःमध्ये सामावून घेता येऊ शकेल असे तिला जाणवते.

*

व्यापकता (wideness) आणि स्थिरता (calmness) या गोष्टी योग-चेतनेचे अधिष्ठान असतात. आणि अनुभूती येण्यासाठी व आंतरिक विकास होण्यासाठी ती सर्वोत्तम परिस्थिती असते. शारीरिक चेतनेमध्ये जर व्यापक स्थिरता प्रस्थापित करता आली आणि त्या स्थिरतेने जर संपूर्ण शरीर आणि त्याच्या सर्व पेशी भरून गेल्या, तर तो शरीराच्या रूपांतरणाचा (transformation) पाया बनू शकतो. खरे सांगायचे तर, ही व्यापकता किंवा स्थिरता असल्याशिवाय रूपांतरण शक्यच नाही.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 274) & (CWSA 29 : 125)

अचंचलता किंवा अविचलता, स्थिरता, शांती आणि निश्चल-निरवता या प्रत्येक शब्दांना अर्थांच्या त्यांच्यात्यांच्या अशा खास छटा आहेत आणि त्यांची व्याख्या करणे तितकेसे सोपे नाही.

Quiet म्हणजे अचंचलता, अविचलता – ही अशी एक अवस्था असते की, जेथे कोणतीही अस्वस्थता किंवा चलबिचल नसते.

Calm म्हणजे स्थिरता – ही एक अक्षुब्ध, अचल अशी अवस्था असते की, जिच्यावर कोणत्याही क्षोभाचा परिणाम होऊ शकत नाही. अविचलतेच्या तुलनेत स्थिरता ही अधिक सकारात्मक अवस्था असते.

Peace म्हणजे शांती – ही त्याहूनही अधिक सकारात्मक अवस्था असते; शांतीसोबतच एक सुस्थिर व सुसंवादी विश्रामाची आणि मुक्ततेची भावनासुद्धा येते.

Silence म्हणजे निश्चल-निरवता – (ही शांतीहूनही अधिक सकारात्मक अवस्था असते.) ही अशी एक अवस्था असते की, जेथे प्राणाचे किंवा मनाचे कोणतेही तरंग उमटत नाहीत. किंवा तसे नसेल तर, मग तेथे एक प्रगाढ अविचलता असते आणि त्या अविचलतेला कोणतीही पृष्ठवर्ती हालचाल भेदू शकत नाही किंवा त्यात बदल घडवू शकत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

(पूर्वार्ध)

श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या आधीपासूनच अस्तित्वात असते. सर्वसाधारणपणे असे आढळते की, व्यक्ती अनुभवाच्या बळावर नाही, तर श्रद्धेच्या बळावर योगसाधनेला सुरुवात करते. ही गोष्ट फक्त योगमार्ग आणि आध्यात्मिक जीवनाबाबतीतच लागू पडते असे नाही; तर ती सामान्य जीवनात सुद्धा लागू पडते. कार्यप्रवण व्यक्ती, संशोधक, नवज्ञान-शोधक (inventors), ज्ञाननिर्माते (त्यांच्या वाटचालीला) सुरुवात करतात ती श्रद्धेनेच. जोपर्यंत एखादी गोष्ट सिद्ध होत नाही किंवा घडून येत नाही तोपर्यंत अगदी निराशा जरी आली, अपयश आले, किंवा विरोधी पुरावा सापडला, नकार मिळाला तरीदेखील ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहतात; कारण त्यांच्यामधीलच कोणीतरी त्यांना सांगत असते की, (तुम्ही ज्याचा पाठपुरावा करत आहात) त्यामध्ये तथ्य आहे, त्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे, ती गोष्ट साध्य केली पाहिजे.

अंधश्रद्धा चुकीची नाही का, असे रामकृष्ण परमहंस यांना विचारले असता, ते तर पुढे जाऊन असे म्हणाले की, श्रद्धा एकाच प्रकारची असू शकते आणि ती म्हणजे अंधश्रद्धा. कारण श्रद्धा ही एकतर अंधच असते अन्यथा ती श्रद्धाच नसते, मग ती इतर काहीतरी असते – मग ते तर्कशुद्ध अनुमान असेल, पुराव्याने सिद्ध केलेली प्रचिती असेल किंवा स्थापित झालेले ज्ञान असेल. (उत्तरार्ध उद्याच्या भागात)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 92-93)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही. मला असे वाटते की, (जे लोक अमुक एका गोष्टीला अंधश्रद्धा असे संबोधतात) त्या गोष्टीवर ते पुराव्याविना विश्वास ठेवणार नाहीत, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असावा. परंतु पुराव्यानंतर जो निष्कर्ष निघतो तो निष्कर्ष म्हणजे श्रद्धा नसते, तर तो निष्कर्ष म्हणजे एक मानसिक प्रचिती असते किंवा तो त्यातून झालेला बोध असतो.

श्रद्धा ही अशी एक गोष्ट असते की, जी पुराव्याच्या किंवा ज्ञानाच्या आधी व्यक्तीकडे असते आणि ज्ञानाप्रत किंवा अनुभूतीप्रत घेऊन जाण्यासाठी ती तुम्हाला मदत करते. ईश्वर अस्तित्वात आहे याचा कोणताही पुरावा देता येत नाही, परंतु जर माझी त्यावर श्रद्धा असेल तर, मला दिव्यत्वाची अनुभूती येऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 91)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २७

ज्या ऊर्जेमुळे व्यक्तीला सत्कृत्य करण्याची प्रेरणा मिळते आणि जी ऊर्जा व्यक्तीला दुष्कृत्य करण्यापासून रोखते ती ऊर्जा म्हणजे ‘संकल्पशक्ती’ होय.

*

संकल्प हा चेतनेचाच एक भाग असतो आणि मनुष्यामध्ये तो (कनिष्ठ) प्रकृतीच्या गतीविधींचे नियंत्रण करणारा मुख्य घटक असलाच पाहिजे.

*

आपण जर सातत्याने संकल्पाचा उपयोग करत राहिलो तर आपल्या अस्तित्वाचे इतर घटकदेखील हळूहळू त्या संकल्पाची आज्ञा प्रमाण मानू लागतात आणि मग आपल्या कृतीदेखील प्राणिक भावना वा इच्छावासनांनुसार न होता, त्या संकल्पाच्या बरहुकूम होऊ लागतात. उर्वरित सर्व गोष्टी (भावना, इच्छा इ. स्वयमेव) जर कल्पनेमध्ये किंवा कृतीमध्ये आणल्या गेल्या नाहीत आणि त्यांना जर संकल्पाची जोड दिली गेली नाही आणि त्या मनात उमटतील तेव्हा नुसते त्यांचे अवलोकन केले आणि त्यांना नकार दिला तर, थोड्याशा संघर्षानंतर त्या गोष्टी क्षीण होत जातात आणि कालांतराने नाहीशा होतात.

*

साधकामध्ये जोवर ध्येय साध्य करून घेण्याची इच्छा आणि दृढ संकल्प नसतो तोवर ती ‘दिव्य शक्ती’सुद्धा निश्चित आणि चिरस्थायी परिणाम निर्माण करू शकत नाही.

*

साधकामध्ये जोपर्यंत वरून होणारे ‘दिव्य शक्ती’चे कार्य किंवा अंतरंगातील गहनतर ‘दिव्य संकल्पा’चे कार्य सातत्यपूर्ण रितीने घडून येत नाही तोपर्यंत मानसिक इच्छेची आवश्यकता असतेच.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 718, 716, 716, 720, 720)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १५

उत्तरार्ध

पूर्णयोगामध्ये साधकाने प्रत्येक आदर्शवादी मानसिक संस्कारांच्या अतीत जाणे अभिप्रेत असते. संकल्पना आणि आदर्श हे मनाशी संबंधित असतात आणि या गोष्टी केवळ अर्धसत्य असतात; कोणतातरी एखादा आदर्श मी मानतो यामध्येच मन बरेचदा संतुष्ट असते; आदर्शवादाच्या आनंदामध्ये ते संतुष्ट असते आणि तेव्हा जीवनामध्ये मात्र कोणताही बदल न होता ते आहे तसेच राहते किंवा बदल झालाच तर तो बदल अगदी आंशिक आणि बरेचदा वरकरणी असतो.

आध्यात्मिक साधक हा केवळ आदर्शवादामध्ये रममाण होऊन, साक्षात्काराच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांकडे पाठ फिरवीत नाही; ‘दिव्य सत्या’चा केवळ आदर्श ठेवणे नव्हे तर, ते सत्य प्रत्यक्षात उतरविणे – मग ते परलोकामध्ये असो किंवा इहलोकामध्ये असो – हे त्याचे ध्येय असते. आणि तो हे ध्येय जर इहलोकामध्ये प्रत्यक्षात उतरवू इच्छित असेल तर, मन आणि प्राण यांच्यात रूपांतरण घडविणे आवश्यक असते आणि (तुमच्यामध्ये चालू असणाऱ्या) श्रीमाताजींच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याला समर्पित झाल्याशिवाय हे रूपांतरण घडू शकत नाही.

‘निर्गुण-निराकार’ ईश्वराचा (Impersonal) शोध घेण्यासाठी धडपडणे हा अशा लोकांचा मार्ग असतो की, जे या जीवनापासून दूर जाऊ पाहतात; आणि ते सहसा ही गोष्ट त्यांच्या स्व-प्रयत्नाच्या बळावर करू पाहतात; परंतु उच्चतर ‘शक्ती’प्रत स्वतःला खुले करून अथवा समर्पणाच्या मार्गाने ते ही गोष्ट करत नाहीत; पण निर्गुण-निराकार ईश्वर हा काही कोणी साहाय्य करणारा किंवा मार्गदर्शन करणारा नसतो; तर तो प्राप्त करून घ्यायचा असतो आणि प्रत्येक मनुष्याला त्याच्या त्याच्या मार्गाने आणि त्याच्या प्रकृतीच्या क्षमतेनुसार तो प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वर मोकळीक देतो. तर दुसरीकडे, श्रीमाताजींप्रत खुले राहिले आणि समर्पण केले तर निर्गुण-निराकार ईश्वराबरोबरच ‘सत्या’च्या अन्य प्रत्येक पैलूचा देखील व्यक्ती साक्षात्कार करून घेऊ शकते.

समर्पण हे अगदी अनिवार्यपणे प्रगमनशीलच (progressive) असले पाहिजे. कोणतीही व्यक्ती अगदी प्रारंभापासूनच संपूर्ण समर्पण करू शकत नाही, त्यामुळे व्यक्ती जेव्हा स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करते तेव्हा व्यक्तीला तेथे समर्पणाचा अभावच आढळतो, परंतु हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे, समर्पणाचे तत्त्वच न स्वीकारण्याचे आणि एकेक पायरी, एकेक क्षेत्र ओलांडत स्थिरपणे, प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये क्रमाक्रमाने समर्पणचा अवलंब करत करत वाटचाल न करण्याचे कोणतेच कारण दिसत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 141)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०७

पूर्णयोगामध्ये आत्म-निवेदनाचे (self-consecration) आणि आत्म-दानाचे (self-giving) सर्वसाधारण तत्त्व सर्वांसाठी समानच आहे पण प्रत्येकाचा आत्म-निवेदनाचा आणि आत्म-दानाचा स्वतःचा असा एक मार्ग असतो. ‘क्ष‌’ या साधकाचा मार्ग हा ‘क्ष‌’साठी चांगला आहे, तसाच तुम्ही निवडलेला मार्ग हा तुमच्यासाठी चांगला आहे, कारण तो तुमच्या प्रकृतीशी मिळताजुळता आहे. अशा प्रकारची लवचीकता आणि विविधता योगामध्ये नसती आणि सर्वांना एकाच साच्यामध्ये बसवावे लागले असते तर योग म्हणजे चैतन्यमय शक्ती न राहता, तो एक अलवचिक अशी मानसिक यंत्रणा ठरला असता.
*

योगमार्ग ही एक जिवंत, चैतन्यमय गोष्ट असली पाहिजे. व्यक्तीपरत्वे विभिन्नता असते आणि (एक प्रकारे) ती आवश्यकदेखील असते. पण त्या विभिन्नतेला न मानता, ज्याला चिकटून राहावे असे कोणते एकच एक मानसिक तत्त्व किंवा पद्धती म्हणजे योगमार्ग, असे असता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 103), (SABCL 24 : 1463)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०३

पूर्णयोगामध्ये केवळ ईश्वराचा साक्षात्कार अपेक्षित नाही तर संपूर्ण आत्मनिवेदन (consecration) अभिप्रेत आहे, तसेच जोपर्यंत ईश्वरी चेतनेचे आविष्करण करण्यासाठी व्यक्तीचे आंतरिक व बाह्य जीवन सुपात्र ठरत नाही आणि जोपर्यंत व्यक्तीचे जीवन हे ईश्वरी कार्याचाच एक भाग बनून राहत नाही तोपर्यंत, आंतरिक व बाह्य जीवनामध्ये परिवर्तन घडवत राहणे हे या योगामध्ये अभिप्रेत आहे. याचा अर्थ असा की, निव्वळ नैतिक आणि शारीरिक उग्र तपस्येहून कितीतरी अधिक अचूक आणि कठोर असे आंतरिक अनुशासन (discipline) येथे अभिप्रेत आहे.

पूर्णयोगाचा मार्ग हा इतर बहुतांश योगमार्गांपेक्षा अधिक विशाल व अधिक दुःसाध्य आहे. त्यामुळे, आपल्याला अंतरात्म्याकडून हाक आली आहे आणि अंतिम ध्येयाप्रत वाटचाल करत राहण्याची आपली तयारी आहे, या गोष्टीची खात्री पटल्याशिवाय व्यक्तीने या मार्गात प्रवेश करता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)