Tag Archive for: कार्य

साधना, योग आणि रूपांतरण – १२२

(स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय जीवनात सक्रिय असणाऱ्या एका लोकप्रिय नेत्याने, जे गीताप्रणीत योगाचे आचरण करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनी श्रीअरविंदांना विनंती केली होती की, आपल्याला मार्गदर्शन करावे. राजकीय जीवनाचा मार्ग सोडून नवीन कार्य हाती घ्यावे का असा प्रश्न त्यांनी श्रीअरविंदांना विचारला आहे. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

तुम्ही तुमच्या कार्याची आणि जीवनाची जी दिशा निवडली आहे त्यामध्ये बदल करण्याची कोणतीच गरज नाही. जोपर्यंत ते कार्य म्हणजे तुमचा स्वभावधर्म आहे असे तुम्हाला वाटते किंवा तुमच्या आंतरिक अस्तित्वाने ते कार्य करण्यास तुम्हाला प्रवृत्त केले असेल तर किंवा अन्य कोणत्याही कारणाने, ते कार्य म्हणजे तुमचा विहीत धर्म आहे, असे तुम्हाला वाटते तोपर्यंत त्यात बदल करण्याची गरज नाही. हे तीन निकष आहेत. या व्यतिरिक्त गीताप्रणीत योगाने, आचरणाची कोणती एखादी निश्चित दिशा किंवा कर्माचा किंवा जीवनाचा कोणता मार्ग नेमून दिला आहे किंवा कसे ते मला माहीत नाही.

कार्य कोणत्या वृत्तीने वा कोणत्या चेतनेने केले जाते ते सर्वाधिक महत्त्वाचे असते. त्याचे बाह्य रूप हे विविध स्वभावधर्मानुरूप बदलू शकते. ‘ईश्वरी शक्ती’ ने आपले कार्य हाती घेतले आहे आणि ती ‘शक्ती’च ते कार्य करत आहे, असा सुस्थिर स्वरूपाचा अनुभव व्यक्तीला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे असे चालू राहते; त्यानंतर कोणते कार्य करायचे किंवा कोणते कार्य करायचे नाही हे ती ‘शक्ती’च निर्धारित करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 236)

साधना, योग आणि रूपांतरण – १२१

एक गोष्ट तुम्ही जाणून घेतली पाहिजे, ती अशी की, तुमचे यश किंवा अपयश हे प्रथम आणि नेहमीच, योग्य दृष्टिकोन आणि खरे आंतरात्मिक व आध्यात्मिक वातावरण बाळगण्यावर, तसेच श्रीमाताजींच्या शक्तीला तुमच्या माध्यमातून कार्य करण्यास सहमती देण्यावर अवलंबून असते.

मला तुमच्या पत्रांवरून असे लक्षात आले की, तुम्ही त्या शक्तीचा आधार फारच गृहीत धरत आहात आणि पहिला भर स्वतःच्या कल्पना, योजना आणि कामासंबंधीच्या चर्चांवर देता. परंतु या साऱ्या गोष्टी चांगल्या असू देत किंवा वाईट, त्या योग्य असू देत किंवा चुकीच्या, त्या जर ‘सत् – शक्ती’ची साधने नसतील तर त्या असफलच होणार. तुम्ही नेहमी एकाग्र असले पाहिजे, तुमच्या सर्व अडचणींच्या निराकरणासाठी तुम्ही येथून (पाँडिचेरीहून) पाठविल्या जाणाऱ्या शक्तीवर विसंबून राहिले पाहिजे, तुम्ही त्या शक्तीला कार्य करण्यासाठी वाव दिला पाहिजे, म्हणजे त्या शक्तीची जागा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला आणि स्वतंत्र प्राणिक इच्छा किंवा आवेगाला घेऊ देता कामा नये.

यशाची ही जी अट आहे ती कधीही न विसरता, तुम्ही तुमचे कार्य करत रहा. स्वतःला त्या कार्यामध्ये किंवा तुमच्या कल्पनांमध्ये किंवा त्यासंबंधीच्या योजनांमध्ये हरवून बसू नका आणि स्वतःस खऱ्या उगमाच्या नित्य संपर्कात ठेवण्यास विसरू नका. अन्य कोणाचाही मानसिक किंवा प्राणिक प्रभाव किंवा सभोवतालच्या वातावरणाचा प्रभाव किंवा सामान्य मानवी मानसिकता यांना तुमच्या आणि श्रीमाताजींच्या शक्तीच्या व उपस्थितीच्या आड येऊ देऊ नका.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 242-243)

साधना, योग आणि रूपांतरण – ११९

(श्री अरविंद एका साधकाला पत्रामध्ये लिहीत आहेत….)

तुम्ही कार्यासाठी (ईश्वरी) ‘शक्ती’चा उपयोग करून घेतलात आणि तुम्ही जोपर्यंत त्या कार्याला धरून राहिलात तोपर्यंत त्या ‘शक्ती’चे साहाय्य तुम्हाला लाभले. त्या कार्याचे स्वरूप हे धार्मिक आहे की अ-धार्मिक ही बाब तितकीशी महत्त्वाची नसते; तर ज्या दृष्टिकोनातून ते कार्य केले गेले जाते तो आंतरिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. तो दृष्टिकोन जर आंतरात्मिक नसेल आणि प्राणिक असेल, तर अशा वेळी व्यक्ती स्वतःला त्या कार्यात झोकून देते आणि आंतरिक संपर्क गमावून बसते. दृष्टिकोन जर आंतरात्मिक असेल तर, आंतरिक संपर्क टिकून राहतो, आणि त्या कार्याला ‘शक्ती’चे साहाय्य लाभत आहे किंवा ती ‘शक्ती’चे ते कार्य करत आहे, असे त्या व्यक्तीला जाणवते आणि साधना प्रगत होत राहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 271)

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही कार्यासाठी जोपर्यंत त्या ‘शक्ती’चा उपयोग केलात आणि तुम्ही जोपर्यंत त्या कार्याला धरून राहिलात तोपर्यंत त्या शक्तीचे साहाय्य तुम्हाला लाभले. त्या कार्याचे स्वरूप हे धार्मिक आहे की अ-धार्मिक ही बाब प्रथमतः तितकीशी महत्त्वाची नसते, ज्या दृष्टिकोनातून ते कार्य केले जाते तो आंतरिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. तो दृष्टिकोन आंतरात्मिक (psychic) नसून प्राणिक (vital) असेल, तर अशा वेळी व्यक्ती स्वतःला त्या कार्यात झोकून देते आणि आंतरिक संपर्क गमावून बसते. आणि तो दृष्टिकोन जर आंतरात्मिक असेल तर, व्यक्तीचा आंतरिक संपर्क टिकून राहतो, आणि त्या कार्याला ‘शक्ती’चे साहाय्य लाभत आहे किंवा ती ‘शक्ती’च ते कार्य करत आहे, असे त्या व्यक्तीला जाणवते आणि साधना प्रगत होत राहते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 271)

कर्म आराधना – १४

एका नवीन गोष्टीच्या उभारणीसाठी आधीची गोष्ट मोडावी लागणे हे काही चांगले धोरण नव्हे. जे समर्पित झालेले आहेत आणि जे ‘ईश्वरा’साठी कार्य करू इच्छितात त्यांनी धीर धरला पाहिजे आणि गोष्टी योग्य क्षणी व योग्य पद्धतीने करण्यासाठी, वाट कशी पाहावी हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे.
*
एखादे कार्य हाती घ्यायचे आणि ते तसेच अर्धवट सोडून द्यायचे आणि पुन्हा एखादे नवीन कार्य करायला लागायचे, ही काही तितकीशी हितकर सवय नाही.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 306)