Posts

एकदा का एखाद्याने योगमार्गामध्ये प्रवेश केला की, मग अगदी काहीही झाले, किंवा कोणत्याही अडचणी उद्भवल्या तरी ध्येयापर्यंत जाण्याचा निश्चय दृढ ठेवायचा, एवढी एकच गोष्ट त्याने करायची असते. खरेतर, योगाची परिपूर्ती कोणीही स्वतःच्या क्षमतेद्वारे करू शकत नाही – तुमच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या महत्तर ‘शक्ती’द्वारेच ही परिपूर्ती होऊ शकते – सर्व प्रकारच्या चढउतारांमध्ये, त्या ‘शक्ती’ला नेटाने केलेल्या आवाहनामुळे ही परिपूर्ती होऊ शकते. तुम्ही अगदी सक्रियपणे ‘अभीप्सा’ बाळगू शकत नसलात तरीदेखील, साहाय्य लाभावे म्हणून श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख राहा – ही एकच गोष्ट अशी आहे की, जी नित्य केली पाहिजे.

– श्रीअरविंद [CWSA 32 : 294]

साधनेची मुळाक्षरे – ०३

दोन गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत : हृदय-चक्राने (heart centre) त्याच्या मागे असलेल्या आणि मनाच्या चक्रांनी (mind centres) त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वांप्रत खुले होणे, उन्मुख होणे. हृदय हे चैत्य-पुरुषाप्रत खुले होते आणि मनाची चक्रं ही उच्चतर चेतनेप्रत खुली होतात आणि चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर ‘सिद्धी’चे मुख्य साधन असते. ईश्वराने आपल्यामध्ये आविष्कृत व्हावे म्हणून तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आपल्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे म्हणून त्यास हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिलीवहिली उन्मुखता (opening) घडून येते. ‘साधने’च्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे ‘अभीप्सा’, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण ह्या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची अभीप्सा बाळगत असतो त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाब देखील यामध्ये समाविष्ट असते. सुरुवातीला मस्तकामध्ये आणि नंतर मस्तकाच्या वर, जाणिवेचे एककेंद्रीकरण केल्याने दुसरी उन्मुखता घडून येते. ईश्वरी शांती, (आधी केवळ ‘शांती’, किंवा ‘शांती व सामर्थ्य’ एकत्रितपणे) ‘सामर्थ्य’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे अस्तित्वामध्ये अवतरण घडून यावे म्हणून आवाहन केल्याने, आणि आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगल्याने ही दुसरी उन्मुखता घडून येते.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 204-205)

साधनेची मुळाक्षरे – ०२

मनुष्य हा बहुतांशी त्याच्या पृष्ठवर्ती (surface) मनाच्या, प्राणाच्या आणि शरीराच्या पातळीवर जीवन जगत असतो पण त्याच्या अंतरंगामध्ये महत्तर शक्यता सामावलेला एक आंतरिक पुरुष असतो, त्या पुरुषाविषयी मनुष्याने जागे झाले पाहिजे; कारण आज त्याला या पुरुषाकडून अगदी मर्यादित, थोडासाच प्रभाव प्राप्त होत असतो आणि तो प्रभावच त्याला महान सौंदर्य, सुसंवाद, शक्ती आणि ज्ञान यांच्या नित्य शोधासाठी प्रवृत्त करत असतो. त्यामुळे, या आंतरिक पुरुषाच्या श्रेणींप्रत खुले होणे आणि तेथून बाह्य जीवन जगणे, तसेच या आंतरिक प्रकाशाने आणि शक्तीने बाह्यवर्ती जीवनाचे शासन करणे, ही योगाची पहिली प्रक्रिया असते. हे करत असताना त्याला स्वतःमध्येच त्याच्या खऱ्या आत्म्याचा शोध लागतो; तो आत्मा म्हणजे त्याच्या मन, प्राण आणि शारीरिक घटकांचे बाह्यवर्ती मिश्रण नसते तर, त्या सर्वांच्या पाठीशी असणारी ती सद्वस्तू (Reality) असते, ‘दिव्य अग्नी’ची ती ठिणगी असते. मनुष्याने स्वतःच्या आत्म्यामध्ये जगण्यास, शुद्धिकरण करण्यास तसेच उर्वरित प्रकृती ‘सत्या’भिमुख करण्यास शिकले पाहिजे. त्यानंतर, त्यापाठोपाठ ऊर्ध्वमुखी खुलेपण (opening) येईल आणि अस्तित्वामध्ये उच्चतर तत्त्वाचे अवतरण घडून येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 548)

साधनेची मुळाक्षरे – १५

तुमच्या बाजूने कोणतेही प्रयत्न नसतानादेखील दिव्य ‘शक्ती’ प्रभावीरित्या कार्य करू शकते, हे खरे आहे. तिच्या कार्यासाठी तिला तुमच्या प्रयत्नांची नव्हे तर, तुमच्या अस्तित्वाने दिलेल्या सहमतीची आवश्यकता असते.

*

‘श्रीमाताजीं’प्रत स्वत:ला उन्मुख ठेवा, त्यांचे नित्य स्मरण ठेवा आणि अन्य सर्व प्रभावांना नकार देत, श्रीमाताजींच्या ‘शक्ती’ला तुमच्यामध्ये कार्य करू द्या – हा या (पूर्ण)योगाचा नियम आहे.

*

‘श्रीमाताजीं’समोर आंतरात्मिकरित्या उन्मुख राहिल्याने, कार्यासाठी वा साधनेसाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व क्रमश: विकसित होत जाते, महत्त्वाच्या रहस्यांपैकी हे एक रहस्य आहे, साधनेचे ते केंद्रवर्ती रहस्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 721), (CWSA 29 : 109), (CWSA 32 : 154)

साधनेची मुळाक्षरे – १४

संकल्प आणि अभीप्सेच्या प्रामाणिकपणामुळे स्वतःहून घडून येणारी गोष्ट म्हणजे उन्मुखता. ‘श्रीमाताजीं’कडून येणाऱ्या दिव्य शक्तींचे ग्रहण करण्यास सक्षम होणे असा त्याचा अर्थ आहे.

*

‘श्रीमाताजीं’प्रत उन्मुख असणे म्हणजे सदोदित शांत, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण असणे; अस्वस्थ नसणे, तक्रार न करणे, निराश न होणे, त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये करू देणे, त्यांना तुम्हाला मार्गदर्शन करू देणे, तुम्हाला ज्ञान, शांती आणि ‘आनंद’ प्रदान करू देणे. तुम्ही जर स्वतःला उन्मुख, खुले राखू शकत नसाल तर, उन्मुख होण्यासाठी तुम्ही सातत्याने पण शांतपणे अभीप्सा बाळगा.

*

उन्मुखतेचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समर्पण; पण जोपर्यंत समर्पण झालेले नाही तोवर, अभीप्सा आणि स्थिरता यांद्वारे एका विशिष्ट टप्प्यापर्यंत उन्मुखता येऊ शकते.

*

तुमच्या चेतनेची जेव्हा तयारी होईल तेव्हा ‘श्रीमाताजीं’प्रति असलेल्या विश्वासामुळे, आवश्यक असणारे खुलेपण येईल. ध्यान करण्यासाठी पुरेसा वेळ आणि ऊर्जा मिळावी यासाठी तुम्ही तुमच्या सध्याच्या कामाचे नियोजन करण्यास काहीच हरकत नाही, पण जे आवश्यक आहे ते प्राप्त होण्यासाठी केवळ ध्यान पुरेसे नाही. तर तेथे ‘श्रीमाताजीं’प्रति असणारी उन्मुखता आणि श्रद्धा आवश्यक आहे; त्यामुळेच ती गोष्ट प्राप्त होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 105), (CWSA 32 : 151), (CWSA 29 : 106), (CWSA 29 : 109)

साधनेची मुळाक्षरे – १३

तुमच्यामध्ये ‘श्रीमाताजीं’च्या शक्तीचे कार्य कोणत्याही नकाराविना किंवा अडथळ्याविना चालावे यासाठी श्रीमाताजींकडे वळलेले असणे म्हणजे उन्मुख असणे, खुले असणे. मन जर त्याच्या स्वतःच्या कल्पनांमध्येच बंदिस्त राहिले आणि जर का त्याने ‘प्रकाश’ आणि ‘सत्य’ आणण्यास श्रीमाताजींना नकार दिला; जर प्राण त्याच्या इच्छावासनांनाच चिकटून राहिला आणि श्रीमाताजींची शक्ती – जी खरी प्रेरणा आणि आवेग घेऊन येत असते – तिला प्राणाने प्रवेश करू दिला नाही; जर शरीर त्याच्या स्वतःच्या इच्छा, सवयी आणि जडत्वामध्येच बंदिस्त राहिले आणि त्यामध्ये ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’चा प्रवेश होऊ देण्यास आणि कार्य करू देण्यास शरीराने संमती दिली नाही, तर ती व्यक्ती उन्मुख असत नाही. एकाच वेळी सर्व गतिविधींमध्ये संपूर्णतया उन्मुखता आढळणे शक्य नाही, परंतु प्रत्येक भागामध्ये एक मध्यवर्ती उन्मुखता असली पाहिजे आणि केवळ श्रीमाताजींच्या कार्यालाच प्रवेश करू देईल अशी प्रभावशाली अभीप्सा किंवा संकल्पशक्ती असली पाहिजे, उरलेल्या साऱ्या गोष्टी क्रमशः होत राहतील.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 151)