Tag Archive for: आस

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा लागला, तरी न थकता, निराश न होता, नाउमेद न होता किंवा अधीर न होता प्रयत्न करत राहण्याची व्यक्तीच्या अंगी असलेली क्षमता म्हणजे तितिक्षा (endurance). थकवा, निराशा इत्यादी गोष्टी आल्या तरी व्यक्तीने आपले उद्दिष्ट किंवा आपला निर्धार ढासळू देता कामा नये किंवा प्रयत्न करणे सोडून देता कामा नये, हे देखील तितिक्षेमध्ये अभिप्रेत असते.

*

“मी पुन्हा प्रयत्न करीन”, असे नुसते म्हणणे पुरेसे नाही. आवश्यकता आहे ती सतत, अविचलपणे, निराश न होता प्रयत्न करत राहण्याची. गीतेमध्ये म्हटले आहे त्याप्रमाणे ‘अनिर्विण्णचेतसा‌’ प्रयत्न करत राहण्याची आवश्यकता आहे.

तुम्ही जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे त्याच्यासाठी साडेपाच वर्षांचा कालावधी हा खूप मोठा कालावधी आहे, असे तुमचे म्हणणे आहे. पण तुम्ही म्हणताय तेवढ्या कालावधीत, जर एखाद्या योग्याला, स्वतःच्या प्रकृतीमध्ये पूर्णपणे परिवर्तन करता आले आणि त्याला ईश्वराचा अगदी निर्णायक सघन असा अनुभव आला तर, तो योगी आध्यात्मिक मार्गावर वेगाने घोडदौड करणारा आहे, असेच म्हटले पाहिजे. आध्यात्मिक परिवर्तन ही अगदी सोपी गोष्ट आहे, असे आत्तापर्यंत कोणीच कधीही म्हटलेले नाही. सर्व आध्यात्मिक साधक हेच सांगतील की, ती अतिशय अवघड गोष्ट असते पण ती खरोखरच प्रयत्न करण्याजोगी गोष्ट आहे.

ईश्वरप्राप्ती व्हावी अशी एकमेव आस जर एखाद्या व्यक्तीला लागली असेल तर ती व्यक्ती निश्चितच, कोणतीही काचकूच न करता किंवा त्यासाठी किती काळ लागतोय किंवा त्यामध्ये किती अडचणी येत आहेत किंवा त्यासाठी किती कष्ट उपसावे लागत आहेत, याची कोणतीही तक्रार न करता, स्वतःचे संपूर्ण आयुष्य त्यासाठी देऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 117) & (CWSA 30 : 18)

साधना, योग आणि रूपांतरण – १२५

कर्माची आध्यात्मिक परिणामकारकता ही अर्थातच आंतरिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. कर्मामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला अर्पण-भाव हा महत्त्वाचा असतो. याच्या जोडीला, एखादी व्यक्ती जर कर्म करताना श्रीमाताजींचे स्मरण करू शकत असेल किंवा एका विशिष्ट प्रकारच्या एकाग्रतेद्वारे श्रीमाताजींच्या उपस्थितीची तिला जाणीव होत असेल किंवा एक शक्ती हे कार्य करत आहे, हे कार्य सांभाळत आहे, याची जर व्यक्तीला जाण असेल तर त्यामुळे आध्यात्मिक परिणामकारकता अधिकच वाढीला लागते. पण मनावर मळभ आलेले असताना, नैराश्य आलेले असताना किंवा संघर्षाच्या प्रसंगी व्यक्ती जरी या गोष्टी करू शकली नाही तरी, त्या कर्माची प्रारंभिक प्रेरकशक्ती असणारे प्रेम वा भक्ती या साऱ्याच्या पाठीमागे तशीच टिकून राहू शकते; ही शक्ती त्या मळभाच्या मागे उपस्थित राहू शकते आणि अंधकारानंतर पुन्हा सूर्यासारखी पूर्ववत उदय पावू शकते.

सर्व साधना ही अशीच असते आणि म्हणूनच या अंधकारमय क्षणांमुळे व्यक्तीने नाउमेद होता कामा नये, तर (ईश्वरविषयक) मूळ उत्कट आस (urge) आपल्या अंतरंगामध्ये तशीच टिकून आहे आणि हे अंधकारमय क्षण हा प्रवासामधील केवळ एक टप्पा आहे, तो टप्पा ओलांडल्यानंतर तो स्वतःच आपल्याला एका महत्तर प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, याची व्यक्तीला जाणीव असली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 242)

सद्भावना – २१

व्यक्तीने अगदी दक्ष आणि पूर्णपणे स्व-नियंत्रित असले पाहिजे, पूर्ण धीरयुक्त असले पाहिजे आणि कधीही अपयशी न होणारी सद्भावना तिच्याकडे असली पाहिजे. व्यक्तीकडे विनम्रतेची अगदी छोटीशी मात्रा का असेना, पण व्यक्तीने तिच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये आणि स्वतःकडे असलेल्या प्रामाणिकतेवर कधीच संतुष्ट असता कामा नये. व्यक्तीला नेहमीच अधिकाची आस असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 440)