ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे (हृदयामध्ये) पोषण करायचे; ती सतत सावध, जागृत, व जिवंत ठेवायची. त्यासाठी एकाग्रतेची – ईश्वरावरील एकाग्रतेची आवश्यकता असते. एकाग्रता करताना त्यामध्ये, ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांच्याप्रत समग्रपणे व नि:शेषतया समर्पित होता यावे, हा दृष्टिकोन असणे आवश्यक असते.
हृदयामध्ये लक्ष एकाग्र करा. त्यात प्रवेश करा, तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या चेतनेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत खोलवर बुडी मारा, आत खोल… खोल…खोलवर… जा.
तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत, प्रशांत गाभाऱ्यामध्ये एक ज्योत तेवत आहे. तेच तुमच्या अंतरीचे ‘ईश्वरत्व,’ तेच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.
– श्रीमाताजी (CWM 03 : 01)






