Tag Archive for: आदर्श

विद्यार्थ्यांना सदाचरणासाठी प्रेरित केले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांच्यावर कोणतीही गोष्ट लादता कामा नये किंवा त्यांच्यावर जबरदस्तीसुद्धा करता कामा नये; हा नैतिक शिक्षणाचा पहिला नियम आहे.

स्वतःच्या नैतिक आचरणाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उदाहरण घालून देणे, रोजच्या रोज त्यांच्याशी संवाद साधणे आणि पुस्तकांच्या आधारे त्यांच्यासमोर काही आदर्श ठेवणे ही नैतिक शिक्षण देण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे.

या पुस्तकांमध्ये लहान मुलांसाठी भूतकाळातील भव्योदात्त उदाहरणे असली पाहिजेत आणि ती उदाहरणे नैतिक धडे म्हणून असता कामा नयेत तर, त्यामध्ये विद्यार्थ्यांना गोडी वाटली पाहिजे. आणि कुमार वयातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पुस्तकांमध्ये महान व्यक्तींचे महान विचार असले पाहिजेत; त्यांच्या उच्चतम भावनांना प्रज्वलित करतील असे, सर्वोच्च आदर्शांप्रत आणि आकांक्षाप्रत त्यांना प्रेरित करतील असे साहित्यामधील उतारे त्यामध्ये असले पाहिजेत. तसेच उच्चतर आदर्श, उदात्त भावभावना आणि महान विचार जिथे मूर्तरूपात आलेले आढळतील; अशी उदात्त उदाहरणे ज्यामधून दिसून येतील अशा प्रकारच्या इतिहासातील नोंदी आणि चरित्रं यांचा समावेश त्यामध्ये असला पाहिजे. हा एक उत्तम प्रकारचा सत्संग असतो आणि त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात त्याद्वारे तात्पर्य सांगणे, उपदेश देणे टाळले पाहिजे. शिक्षक विद्यार्थ्यांसमोर ज्या महान गोष्टींचे उदाहरण ठेवत असतील त्याच गोष्टींद्वारे खुद्द त्या शिक्षकाच्या वैयक्तिक जीवनाची जडणघडण झाली असेल तर त्या गोष्टींचा मुलांवर होणारा परिणाम शतगुणित होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 01 : 390-391)

सद्भावना – २०

विद्यार्थ्यांसमोर आदर्श उदाहरण ठेवा. ते जसे घडावेत असे तुम्हाला वाटते तसे आधी तुम्ही स्वतः बना. तुम्ही निरपेक्षपणाचे, सहनशीलतेचे, आत्म-नियंत्रणाचे, स्वतःच्या छोट्याछोट्या वैयक्तिक नापसंतींवर मात करण्याचे, सातत्यपूर्ण चांगल्या खेळकर विनोदाचे, सातत्यपूर्ण सद्भावनेचे, इतरांच्या अडचणी समजून घेण्याचे उदाहरण त्यांच्या नजरेसमोर ठेवा; स्वभावातील समत्वाचे उदाहरण त्यांना घालून द्या की, ज्यामुळे मुलं भयमुक्त होतील. भीतीमुळेच ती कपटी, अप्रामाणिक आणि इतकेच काय पण धूर्तसुद्धा बनतात, आपल्याला शिक्षा होईल या भीतीने ती तशी बनतात. मात्र तुमच्याबद्दल जर त्यांना विश्वास वाटला तर ते तुमच्यापासून काहीही लपविणार नाहीत आणि मग ते निष्ठावान व प्रामाणिक व्हावेत यासाठी तुम्ही त्यांना साहाय्य करू शकाल. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यासमोर आदर्श उदाहरण ठेवले पाहिजे! श्रीअरविंद त्याविषयी म्हणतात, व्यक्तीमध्ये सर्व परिस्थितीत अविचल राहील अशी चांगली विनोदबुद्धी असली पाहिजे, स्वतःला विसरून जाण्याची क्षमता असली पाहिजे; व्यक्तीने स्वतःच्या छोट्याछोट्या त्रासदायक गोष्टी इतरांवर लादता कामा नयेत, व्यक्ती दमलेली असेल किंवा अस्वस्थ असेल, तेव्हासुद्धा तिने चिडचिडे, अधीर होता कामा नये. यासाठी काहीशा पूर्णत्वाची, आत्म-नियंत्रणाची आवश्यकता असते, की जे साक्षात्काराच्या मार्गावरील एक मोठे पाऊल असते. खरा अग्रणी (leader) बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या अटींची परिपूर्ती जो कोणी करेल, मग भलेही तो लहान मुलांच्या एखाद्या छोट्याशा गटाचा नायक का असेना, तो योगसिद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनेबाबत पुष्कळच प्रगत झालेला असतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 81)