Tag Archive for: आत्मवंचना

 

जग ही जिवाची आत्मवंचना (self-delusion) आहे किंवा जग ही सैतानाची निर्मिती आहे असे आम्ही मानत नाही; तर आमच्या दृष्टीने, जग हे ‘ईश्वराचे आविष्करण‌’ (manifestation) आहे. अद्यापि जरी ते अंशतःच आविष्कृत झालेले असले तरी ते प्रगमनशील आणि उत्क्रांतिमय आविष्करण आहे. आणि म्हणून जीवनाचा परित्याग करणे, संन्यास घेणे (renunciation) हे आमच्या दृष्टीने जीवनाचे ध्येय असू शकत नाही किंवा ज्यासाठी या जगाची निर्मिती झाली आहे, त्या जगालाच नकार देणे हे देखील जीवनाचे उद्दिष्ट असू शकत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 328)

साधक : आत्मवंचनेला (स्वतःची फसवणूक करणे, Self-deception) हजार तोंडं असतात आणि आमच्यामध्ये दडून बसण्याचे तिचे हजार मार्ग असतात. मग अशा वेळी व्यक्तीने तिचा शोध कसा घ्यायचा आणि त्यापासून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : सावकाशपणे करायचे हे एक दीर्घकालीन कार्य आहे. व्यक्तीमध्ये जर परिपूर्ण प्रामाणिकपणा असेल तरच हे कार्य पूर्णत्वाला जाऊ शकते. त्यासाठी व्यक्तीने सतत सावध असणे आणि सतत जागता पहारा ठेवणे आवश्यक असते; त्यासाठी तिने स्वतःच्या भावभावना-तरंगांचे आणि प्राणिक प्रतिक्रियांचे निरीक्षण करत राहिले पाहिजे; स्वतःच्या दुर्बलतेची कोडकौतुकं करण्याच्या नादात त्या गोष्टींकडे कधीच डोळेझाक करता कामा नये. (पण एवढी सतर्कता बाळगूनही) जेव्हा कधी एखादी चूक तिच्या हातून घडेल तेव्हा, मग भलेही ती चूक कितीही लहानशी असली तरीपण, प्रत्येक वेळी त्या चुकीसाठी व्यक्तीने स्वतःला जबाबदार धरले पाहिजे. व्यक्ती असे जर सातत्याने करत राहिली तर, ही गोष्ट खूपच स्वारस्यपूर्ण होते आणि उत्तरोत्तर ती अधिकाधिक सोपी होत जाते.

– श्रीमाताजी (CWM 16 : 295–296)