तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच तुमच्यामध्ये प्राधान्याने असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वामध्ये आणि तुम्ही जे काही करता त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती इच्छा प्रधान असली पाहिजे. तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधींवर प्रभुत्व गाजवणाऱ्या एखाद्या भल्यामोठ्या प्रकाशपक्ष्याप्रमाणे ती इच्छा असली पाहिजे.
तुमच्या या सातत्यपूर्ण अथक प्रयत्नांमुळे, एक दिवस अचानकपणे आंतरिक द्वार खुले होईल आणि तुमच्यामध्ये एका लखलखीत, प्रकाशमान दीप्तीचा उदय होईल. त्यातून तुम्हाला तुमच्या अमर्त्यतेची खात्री पटेल. तुम्ही नेहमीच अस्तित्वात होतात आणि पुढेही असणार आहात; केवळ बाह्य रूपे नाहीशी होतात आणि तुम्ही वस्तुत: जे काही आहात त्याच्याशी तुलना केल्यास, ही बाह्य रूपे म्हणजे जणू टाकून दिलेली जीर्ण वस्त्रे असतात, याचा मूर्तिमंत अनुभव तुम्हाला येईल.
आणि तेव्हा मग, सर्व बंधनातून मुक्त झालेले तुम्ही कणखरपणे उभे राहाल. प्रकृतीने तुमच्यावर परिस्थितीचे जे ओझे लादलेले असते त्या ओझ्याखाली चिरडून जायचे नसेल तर, तुम्हाला मोठ्या कष्टाने ते ओझे वागवत पुढे चालावेच लागते, ते ओझे सहन करावेच लागते. आता मात्र तसे करावे न लागता, तुम्ही सरळ, खंबीरपणे मार्गक्रमण करू शकाल; आता तुम्ही तुमच्या नियतीबाबत सचेत झालेले असाल, आता तुम्ही तुमच्या जीवनाचे स्वामी असाल.
– श्रीमाताजी (CWM 12 : 34-35)






