Tag Archive for: अस्वस्थता

नैराश्यापासून सुटका – २२

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

प्राणिक अस्वस्थतेमध्ये आणि उदासीनतेमध्ये रममाण होण्याची तुमची वृत्ती पुन्हा एकदा उफाळून आली आहे, असे तुम्ही लिहिलेल्या पत्रावरून दिसते. त्यासाठी तिला विशेष असे काही कारण लागत नाही, पण स्वतःचे पोषण व्हावे म्हणून ती प्रत्येक गोष्टीचाच ताबा घेते; वस्तुतः ही मज्जातंतूंच्या दुर्बलतेची केवळ जुनाट अशी सवय आहे. व्यक्ती जेवढी अधिक कुढत बसते, तेवढी उदासीनता अधिकच वाढत राहते.

त्यावर मात करण्याचे तीन मार्ग आहेत. स्वतःमध्ये रमण्यापेक्षा अन्य कोणत्यातरी गोष्टीमध्ये रस घेणे आणि त्यात स्वतःला गुंतवून ठेवणे तसेच तुमच्या मन:स्थितीचा शक्य तितका कमीत कमी विचार करणे, हा पहिला मार्ग आहे.

दुसरा मार्ग म्हणजे या प्राणिक अस्वस्थतेपासून आणि उदासीनतेपासून स्वतःला शक्य तितके विलग करणे आणि त्यांना (धीराने) सामोरे जाणे. जसे तुम्ही आत्ता करत आहात त्याप्रमाणे, त्यांचा स्वीकार करण्यास जोमाने आणि निर्धारपूर्वक नकार देणे.

तिसरा मार्ग म्हणजे ‘श्रीमाताजीं’च्या शांतीला आवाहन करण्यासाठी, मनाला ऊर्ध्वमुख करण्याची सवय लावून घेणे. ती शांती ऊर्ध्वस्थित आहे आणि तुम्ही जर स्वतःला खुले केलेत तर, ती खाली अवतरित होण्याची प्रतीक्षा करत आहे. ती शांती जर अवतरली तर, ती तुमची या दुःखभोगापासून, त्रासापासून कायमची सुटका करेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 180-181)

जीवन जगण्याचे शास्त्र – २१

जो सशक्त असतो तो नेहमीच अविचल, दृढ असतो. दुर्बलतेमुळे अस्वस्थता येते.

*

साधक : शांती (peace), अविचलता (quietness) आणि स्थिरता (calm) ग्रहण करण्यासाठी मी काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : या गोष्टी तुमच्या केवळ एखाद्या भागाला हव्याशा वाटणे पुरेसे नाही तर, त्यांची तुम्हाला अगदी संपूर्णतया आणि प्रामाणिकपणे गरज जाणवली पाहिजे.

*

श्रीमाताजी : तुम्हाला वाटते तेवढी मी तुमच्यापासून दूर नाही. तुम्ही केवळ तुमच्या मनाची आणि प्राणाची खळबळ थोडीशी स्थिरशांत केली पाहिजे; तुम्ही थोडे शांत आणि एकाग्र राहिले पाहिजे; असे केलेत तर तुम्हाला तुमच्या अंतरंगामध्ये आणि तुमच्या सभोवार माझी उपस्थिती लगेचच जाणवेल.

*

साधक : ‘क्ष’ हा सध्या खूप कष्ट सोसत आहे. त्याच्या व्यवसायात त्याच्यावर रोज एक नवीन संकट येऊन आदळत आहे आणि त्या परिस्थितीशी तोंड द्यायला तो असमर्थ आहे. आणि त्याने तुमची विशेष कृपा लाभावी यासाठी तुम्हाला प्रार्थना केली आहे.

श्रीमाताजी : त्याने जर त्याचे मन अविचल आणि हृदय शांत ठेवले तर, तो त्या परिस्थितीला (धीराने) तोंड देऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 16 : 125), (CWM 17 : 60, 68-69, 404-405)

कर्म आराधना – ०७

‘ईश्वरी इच्छा’ आपल्याकडून कार्य करवून घेत आहे, हे आम्हाला कसे आणि केव्हा कळेल, असा प्रश्न तुम्ही विचाराल. ‘ईश्वरी इच्छा’ ओळखणे अवघड नसते. ती सुस्पष्ट असते. तुम्ही योगमार्गावर फारसे प्रगत झालेला नसलात तरीही ती तुम्हाला ओळखता येते. तुम्हाला केवळ त्या इच्छेचा आवाज ऐकता आला पाहिजे, एक सूक्ष्मसा आवाज, जो इथे हृदयामध्ये असतो. एकदा का तुम्हाला हा आवाज ऐकण्याची सवय लागली की, ‘ईश्वरी इच्छे’च्या विरोधी असे जे काही तुम्ही कराल, तेव्हा तुम्हाला लगेचच अस्वस्थ वाटू लागेल. तुम्ही अयोग्य मार्गावरून तसेच चालत राहिलात तर तुम्हाला अधिकच अस्वस्थ वाटू लागेल. तरीसुद्धा तुमच्या अस्वस्थतेचे कारण म्हणून तुम्ही काही भौतिक समर्थन करू पाहाल आणि त्या वाटेवरून तुम्ही तसेच चालत राहाल तर, मग ही अंत:संवेदन-क्षमता तुम्ही हळूहळू गमावून बसता आणि अंतिमतः सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करूनही, तुम्हाला अस्वस्थता जाणवत नाही. परंतु तुम्हाला किंचितशी जरी अस्वस्थता जाणवली आणि थोडेसे थांबून, तुम्ही तुमच्या अंतरात्म्याला विचारलेत की, ”याचे कारण काय असेल?” तर तेव्हा तुम्हाला खरेखुरे उत्तर मिळते आणि मग सर्व गोष्टी अगदी स्वच्छपणे कळून येतात. जेव्हा तुम्हाला काहीसे नैराश्य किंवा थोडीशी अस्वस्थता जाणवते तेव्हा तुम्ही त्याला भौतिक समर्थन देण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा तुम्ही थांबून त्या अस्वस्थतेचे कारण शोधू पाहता, तेव्हा तुम्ही अगदी सरळ आणि प्रामाणिक असले पाहिजे. सुरुवातीला तुमचे मन एक अगदी समर्थनीय आणि चांगलेसे स्पष्टीकरण रचेल. ते स्वीकारू नका, तर त्याच्या पलीकडे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करा आणि विचारा की, “हे जे काही चालले आहे, त्यापाठीमागे नेमके काय आहे? मी हे का करत आहे?” शेवटी, मनाच्या एका कोपऱ्यात, एक छोटासा तरंग दडून बसलेला आहे असे तुम्हाला आढळेल – तुमच्या दृष्टिकोनामध्ये असलेले एखादे छोटेसे चुकीचे वळण किंवा तिढा, जो या साऱ्या अडचणींचे किंवा अस्वस्थतेचे कारण असतो, असा शोध अंतिमत: तुम्हाला लागेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 08-09)

मूल अगदी लहान असल्यापासूनच जोपासायला हवा असा एक गुण आहे, तो म्हणजे अस्वस्थ करणारी भावना (uneasiness). जेव्हा एखादी चुकीची गोष्ट हातून घडते तेव्हा स्वाभाविकपणे मनात निर्माण होणारी नैतिक असमतोलाची अस्वस्थ करणारी भावना! अमुक अमुक गोष्टी करावयाच्या नाहीत असे सांगितले असते म्हणून नव्हे किंवा शिक्षेला घाबरूनही नव्हे, तर ती अस्वस्थता स्वाभाविकपणे मनात उत्पन्न होते. उदाहरणार्थ, एखादे मूल खोड्या करून जेव्हा त्याच्या वर्गमित्राला इजा करते तेव्हा, जर ते सहज, स्वाभाविक अशा अवस्थेत असेल तर त्याला अस्वस्थ वाटते. त्याला त्याच्या अस्तित्वाच्या खोल आत कुठेतरी दुःख जाणवते, कारण त्याने जे काही केलेले असते ते त्याच्या आंतरिक सत्याच्या विरूद्ध असते.

व्यक्ती कितीही शिकलेली असो, कितीही विचार करणारी असो, तरीही अंतरंगात खोलवर असे काहीतरी असते की ज्याला पूर्णत्वाची, महानतेची, सत्याची संवेदना असते आणि या सत्याला विरोध करणाऱ्या सर्व प्रकारच्या गतिविधींची दु:खदायक संवेदना असते. आणि अवतीभोवतीच्या निंदनीय अशा उदाहरणांमुळे, बाह्य वातावरणामुळे ते मूल बिघडलेले नसेल, म्हणजेच ते त्याच्या सहज स्वाभाविक अवस्थेमध्ये असेल, तर जेव्हा त्याच्याकडून त्याच्या अस्तित्वाच्या सत्याच्या विरोधी असे काही घडते तेव्हा कोणीही काहीही न सांगता देखील, त्या मुलाला एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. आणि म्हणून त्या मुलामध्ये टिकून असलेल्या ह्या अस्तित्वाच्या सत्यावरच त्याच्या प्रगतीसाठीचे पुढचे सारे प्रयत्न आधारले गेले पाहिजेत.

…..केवळ एकच सच्चा मार्गदर्शक असतो, तो म्हणजे आंतरिक गुरु, मार्गदर्शक. जर एखाद्या मुलाला अनर्थकारक असे शिक्षण मिळाले तर, त्या शिक्षणाद्वारे ही छोटीशी आंतरिक गोष्टी नाहीशी करण्याचा जोरकस प्रयत्न होतो. आणि कधीकधी हा प्रयत्न इतका यशस्वी होतो की, त्यामुळे त्या आंतरिक मार्गदर्शकाबरोबरचा सर्व संपर्कच व्यक्ती हरवून बसते. आणि त्याचबरोबर चांगले आणि वाईट यांतील फरक ओळखण्याची शक्तीही ती व्यक्ती गमावून बसते. म्हणून मी सांगत असते की, अगदी बालपणापासूनच मुलांना आंतरिक वास्तवाची, अस्तित्वाची जाणीव करून द्यावयास हवी. हे अस्तित्व त्यांच्या अंतरंगात आहे, पृथ्वीच्या अंतर्यामी आहे, विश्वाच्या अंतर्यामी आहे आणि ती मुलं, ही पृथ्वी, हे विश्व ह्या आंतरिक सत्याचे कार्य या नात्यानेच अस्तित्वात आहेत, आणि त्याविना कशाचेच अस्तित्व असू शकणार नाही. आणि हाच विश्वाचा खरा आधार असल्याने, स्वाभाविकपणे हीच गोष्ट विजयी होणार आहे. आणि जोवर ही गोष्ट अस्तित्वात आहे तोवर तिच्या विरोधी अशी कोणतीच गोष्ट टिकून राहू शकणार नाही.

लहान मुलाला तात्विक स्पष्टीकरण देणे गरजेचे नाही, पण त्याला ह्या आंतरिक स्वास्थ्याच्या, समाधानाच्या भावनेचा अनुभव द्यायला हवा. जेव्हा एखादी चुकीची, विरोधी गोष्ट करण्यापासून ती आंतरिक छोटीशी गोष्ट त्याला अडविते, तेव्हा त्याला जो मनस्वी आनंद होतो त्याची जाणीव त्याला करून द्यायला हवी. आणि अशा प्रकारच्या अनुभवावरच सर्व प्रकारचे शिक्षण आधारित असावे. मुलाची अशी धारणा व्हायला हवी की, जर त्याला हे आंतरिक समाधान मिळाले नाही तर, काहीच टिकू शकणार नाही कारण आंतरिक समाधान हीच एकमेव गोष्ट चिरस्थायी आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 24)