Tag Archive for: अवतार

आत्मसाक्षात्कार – १६

(जडभौतिक विश्व आणि आंतरात्मिक व आध्यात्मिक विश्व यांच्या अतीत असणाऱ्या ‘परमसत्या’च्या, ‘परमज्ञाना’च्या विश्वाबद्दल येथे संवाद चालू आहे. श्रीमाताजी असे सांगत आहेत की, “हे विश्व उदयाला आले आहे; पण ते अजून संपूर्णपणे अस्तित्वात यायचे आहे. आणि त्यासाठी केवळ एकटा अवतार पुरेसा नाही तर, त्यासाठी ईश्व रप्राप्तीची अभीप्सा बाळगणाऱ्या अनेक माणसांची आवश्यकता आहे.’’ हे ऐकल्यानंतर, एका साधकाने त्यांना प्रश्न विचारला आहे की, आम्ही त्यामध्ये सहभागी होण्यासाठी काय केले पाहिजे?)

श्रीमाताजी : त्यासाठी व्यक्तीने स्वतःच्या अस्तित्वाचा, ‘पुरुषा’चा, ‘आत्म्या’चा साक्षात्कार करून घेतला पाहिजे; स्वतःच्या अस्तित्वाचे जे परम‘सत्य’ आहे, त्याच्याशी सचेत (conscious) नाते जोडले पाहिजे; ते नाते कोणत्याही रूपातील असले, ते कोणत्याही मार्गाने जोडलेले असले, तरी त्याने काही फरक पडत नाही, परंतु हाच एकमेव मार्ग आहे.

प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतरंगामध्ये एक सत्य वागवत असते आणि त्या सत्याशीच व्यक्तीने ऐक्य साधले पाहिजे, तेच सत्य ती जगली पाहिजे. या सत्याप्रत पोहोचण्यासाठी आणि त्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्तीला जो मार्ग अनुसरावा लागेल तोच मार्ग व्यक्तीला त्या (उपरोक्त) परम‘ज्ञाना’च्या अधिकाधिक निकट घेऊन जाईल. म्हणजे असे म्हणता येईल की, (अंतिमतः) वैयक्तिक साक्षात्कार आणि परम‘ज्ञान’ या दोन्ही गोष्टी अगदी एकच आहेत.

– श्रीमाताजी (CWM 10 : 136)

विचार शलाका – २९

…‘अवतार’ कोणत्या कारणासाठी जन्म घेतात? तर मानवाला पुन्हा पुन्हा अधिकाधिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी; त्याच्यामध्ये उच्च, उच्चतर, अधिकाधिक उच्चतर अशी मानवता विकसित व्हावी यासाठी; दिव्य जीवाचा अधिकाधिक महान विकास व्हावा यासाठी; जोवर आपले परिश्रम पूर्णत्वाला जात नाहीत, आपले कार्य सिद्धीस जात नाही आणि या जडभौतिक विश्वामध्येसुद्धा ‘सच्चिदानंद’ परिपूर्णतेने भरून जात नाही, तोवर या पृथ्वीवर पुन्हा पुन्हा अधिकाधिक स्वर्गलोकाचे अवतरण घडविण्यासाठी, अवतार जन्माला येत असतात. केवळ स्वतःच्या किंवा काही मोजक्या लोकांच्या मुक्तीसाठी जर एखादा परिश्रम करत असेल आणि जरी तो त्यात यशस्वी झाला तरी त्याचे कार्य हे लहानच असते. परंतु जो अखिल मानवजातीच्या पूर्णत्वासाठी, शुद्धतेसाठी, आनंदासाठी, जिवाच्या शांतीसाठी प्रयत्नशील राहतो आणि त्यासाठीच जीवन जगतो, तो जरी अयशस्वी झाला किंवा जरी त्याला त्यामध्ये आंशिकच यश मिळाले किंवा काही काळापुरतेच यश मिळाले तरी, त्याचे ते कार्य अनंतपटीने महान असते.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 90)