Tag Archive for: अप्रामाणिकपणा

नैराश्यापासून सुटका – १६

 

प्राणाच्या असमाधानावर एकच उपाय असतो. प्राण म्हणजेच तुम्ही आहात, असे समजायचे नाही; हाच तो उपाय. जडत्वाबद्दलच्या विचारांमध्ये व्यग्र राहायचे नाही, तर ऊर्ध्वमुख व्हायचे तसेच ‘दिव्य प्रकाश’ आणि ‘दिव्य शक्ती‌’ने प्राणामध्ये प्रवेश करावा म्हणून त्यांना आवाहन करायचे; हा जडत्वावरील उपाय आहे.

*

दुःखभोगामध्ये रमणारी आणि त्याची इच्छा बाळगणारी अशी तुमच्यामध्ये जी गोष्ट असते ती मानवी प्राणाचाच एक भाग असते. या गोष्टींचेच वर्णन आम्ही प्राणाचा अप्रामाणिकपणा व त्याची विकृत अढी असे करतो. प्राणाचा तो भाग दुःख व संकटे यांच्याविरुद्ध ओरडत राहतो आणि ईश्वर, जीवन व इतर सारेजण ‘मला छळत आहेत’ असा आरोप तो करत राहतो. पण बहुतेक वेळा दुःख-संकटे येतात आणि ती टिकून राहतात याचे कारण, प्राणातील त्या विकृत भागालाच ती हवी असतात! प्राणातील त्या भागापासून तुम्ही स्वत:ची पूर्णपणे सुटका करून घेतलीच पाहिजे.

*

प्राण जर अविचल राहिला आणि त्याने मनाला गोष्टींकडे योग्य रितीने पाहू दिले तर ही निराशा येणारच नाही, हे स्वाभाविक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 139-140, 178, 186-187)

ईश्वरी कृपा – १३

अज्ञानमूलक चुकांची दुरुस्ती करणे म्हणजे अंधकार नाहीसा करण्यासारखे आहे, जणू तुम्ही दिवा लावता आणि अंधार नाहीसा होतो, पण एखादी गोष्ट चुकीची आहे असे माहीत असूनदेखील, तीच चूक पुन्हा करणे म्हणजे जणू कोणीतरी दिवा लावलेला असावा आणि तुम्ही तो हेतुपुरस्सर विझवून टाकावा… असे करणे म्हणजे, अंधाराला हेतुत: परत बोलावण्यासारखेच आहे.

…ज्यांनी स्वतःला सुधारण्याचा निश्चय केलेला असतो त्यांना साहाय्य करण्यासाठी ईश्वरी ‘कृपा’ नेहमीच उपस्थित असते आणि त्यामुळे, “स्वतःला सुधारण्यासाठी आम्ही खूप कमकुवत आहोत,’ असे ते म्हणू शकत नाहीत. ते फार फार तर असे म्हणू शकतात की, त्यांनी स्वतःला सुधारण्याचा संकल्पच अजून केलेला नाही, म्हणजे त्यांच्या अस्तित्वामध्ये कोठेतरी असे काहीतरी असते की, ज्याने तो संकल्प केलेला नसतो, आणि हे मात्र अधिक गंभीर असते.

कमकुवत असल्याचा युक्तिवाद हे एक निमित्त असते. ज्यांनी संकल्प केलेला असतो त्यांना परमोच्च सामर्थ्य देण्यासाठी ईश्वरी ‘कृपा’ असतेच.

याचा अर्थ असा की, कमकुवतपणाचा युक्तिवाद हा युक्तिवाद नसतो तर तो अप्रामाणिकपणा असतो. आणि अप्रामाणिकपणा म्हणजे शत्रुसाठी नेहमीच मुक्तद्वार असते; म्हणजे तेथे विपरित गोष्टींबाबतची एक सुप्त सहानुभूती असते आणि ती गोष्ट अधिक गंभीर असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 306-307)