Tag Archive for: अडचणी

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०८)

(१९३७ च्या सुमारास एक साधक पूर्णयोगाची साधना अंगीकारु इच्छित होता, त्यासाठी तो आश्रमात राहू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी आपल्या बुद्धीच्या आधारे स्वत:चे आध्यात्मिकीकरण करून घेतले आहे तसेच त्यांनी बुद्धिपूर्वक स्वत:चे दिव्यत्वात रुपांतर करून घेतले आहे, असे त्याचे म्हणणे होते. या विचाराने भारावलेला तो साधक ‘पूर्णयोगा’कडे वळू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी त्याला त्याच्या इच्छेनुसार तीन महिने आश्रमात राहण्याची परवानगी एका पत्राद्वारे कळवली. मात्र त्याच पत्रात त्यांनी त्याला त्याच्या वरील विचारातील फोलपण दाखवून दिले. बुद्धीच्या आधारे नव्हे, तर तिच्या अतीत होऊन, मनाच्या पूर्ण शांत, निर्विचार अवस्थेत उच्चतर चेतनेचे अवतरण झाले आणि माझे आध्यात्मिकीकरण झाले, असे त्यांनी त्याला लिहिले आहे. त्या साधकाच्या निमित्ताने, ‘पूर्णयोगा’ची साधना कोण करू शकतो यावर श्रीअरविंद यांनी प्रकाश टाकला आहे. त्या पत्रातील हा अंशभाग…)

….मानवी प्रकृती आज जशी आहे तशा त्या प्रकृतीचे पूर्णत्व हे या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व नाही, तर व्यक्तीच्या सर्व घटकांचे आंतरिक चेतनेच्या कार्याच्या माध्यमातून, आणि नंतर त्या घटकांवर कार्य करणाऱ्या उच्चतर चेतनेच्या कार्याच्या माध्यमातून, आंतरात्मिक आणि आध्यात्मिक रूपांतरण (psychic and spiritual transformation) करणे, त्या घटकांच्या साऱ्या जुन्या गतिविधी टाकून देणे किंवा त्यांचे त्या उच्चतर चेतनेने जणू स्वतःचीच प्रतिमा असावी अशा पद्धतीने परिवर्तन घडविणे आणि अशा प्रकारे कनिष्ठ प्रकृतीचे उच्चतर प्रकृतीमध्ये रूपांतरण करणे, हे या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व आहे.

….ही सावकाश चालणारी आणि अवघड प्रक्रिया आहे; मार्ग लांबचा आहे आणि अगदी आवश्यक अशा पायाभूत गोष्टी सुस्थिर करणे हे सुद्धा खूप कठीण आहे. विद्यमान असलेली जुनी प्रकृती विरोध करत राहते आणि अडथळे निर्माण करत राहते आणि एका पाठोपाठ एक अडचणी येत राहतात आणि त्यांच्यावर मात केली जात नाही तोवर त्या पुन्हापुन्हा येत राहतात. आणि म्हणूनच, (पूर्णयोगाच्या) या मार्गावरून वाटचाल करण्याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, व्यक्तीने खात्री करून घेतली पाहिजे की, आपल्याला ज्या मार्गाची हाक आली आहे तो मार्ग हाच आहे का?

– श्रीअरविंद (CWSA 35 : 585-586)

विचारशलाका १८

 

एकदा का तुम्ही आंतरिक रूपांतरणाच्या दृष्टीने चांगला प्रारंभ केला आणि जर तुम्ही जिवाच्या मुळाशी अवचेतनेपर्यंत (subconscient) प्रवास केलात तर – जे तुमच्यामध्ये तुमच्या पालकांकडून, अनुवंशिकतेतून आलेले असते – ते तुम्हाला दिसू लागते. बहुतांशी या सर्वच अडचणी तेथे आधीपासूनच असतात, जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये ज्यांची भर पडते अशा गोष्टी फारच थोड्या असतात.

 

आणि अशा गोष्टी कोणत्याही आकस्मिक क्षणीदेखील घडू शकतात; जर तुम्ही वाईट संगतीमध्ये राहिलात, वाईट पुस्तके वाचलीत, तर ते विष तुमच्यामध्ये शिरेल; अशावेळी या गोष्टींचे अवचेतनामध्ये खोलवर उमटलेले ठसे आणि तुमच्या वाईट सवयी यांच्या विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.

 

उदाहरणार्थ, असे काही लोक असतात की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय तोंडच उघडता येत नाही; ते नेहमीच तसे जाणीवपूर्वक करतात असेही नाही (तसे असेल तर ते जास्तच घातक असते.) किंवा असे काही लोक असतात की, जे इतरांच्या संपर्कात आल्यावर भांडल्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांच्या अवचेतनेमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.

 

तुम्ही जेव्हा सदिच्छा बाळगता, तेव्हा तुम्ही बाह्यत: या सर्व गोष्टी टाळण्याचा, शक्य असेल तर त्या दुरुस्त करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करता, त्यावर तुम्ही काम करता, त्यांच्याशी मुकाबला करता; आणि मग तुम्हाला अशी जाणीव होते की, या गोष्टी वारंवार वर येत आहेत, जो भाग तुमच्या नियंत्रणावाचून सुटलेला आहे अशा भागातून त्या वर येत आहेत.

 

पण जर का तुम्ही तुमच्या अवचेतनेमध्ये प्रवेश केलात, तुमच्या चेतनेला त्यामध्ये प्रवेश करू दिलात आणि काळजीपूर्वक पाहू लागलात तर मग तुम्हाला हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळ, उगम कोठे आहे त्याचा शोध लागतो; तुमचे आईवडील, आजी आजोबा कसे होते हे आता तुम्हाला कळू लागते आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षणी तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा तुम्हाला कळते, ”मी असा आहे कारण ते तसे होते.”

 

तुमच्याकडे लक्ष ठेवून असणारा, तुमची मार्गावर तयारी करून घेणारा असा पुरेसा जागृत चैत्य पुरुष (psychic being) जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्याकडे तुम्हाला साहाय्यक ठरतील अशा गोष्टी, माणसे, पुस्तके, परिस्थिती खेचून आणू शकतो. कोणा परोपकारी, कृपाळू इच्छेमुळेच जणू घडले असावेत असे छोटे छोटे योगायोग घडून येतात आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी आणि तुम्हाला योग्य दिशेला वळविण्यासाठी एखादा संकेत, कोणती तरी मदत, एखादा आधार पुरविण्यात येतो.

 

पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला, तुमच्या जिवाचे सत्य शोधून काढायचे एकदा का तुम्ही ठरविलेत, तुम्ही त्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करायला सुरुवात केलीत तर, तुमच्या प्रगतीसाठी मदत व्हावी म्हणून जणू (अज्ञातात) कोणीतरी, सगळेमिळून सर्वकाही घडवत आहेत असे तुम्हाला वाटू लागते. आणि तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तर हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळदेखील तुम्हाला दिसू लागते : “अरे! हा दोष माझ्या वडिलांमध्ये होता तर’’, “अरेच्चा, ही तर माझ्या आईची सवय आहे’’; “खरंच, माझी आजी अशी होती’’, “माझे आजोबाही असे होते;” असे तुम्हाला जाणवू लागते. किंवा मग तुम्ही लहान असताना जिने तुमची काळजी घेतली होती अशी कोणी तुमची आया असेल, किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर खेळलात, बागडलात ती तुमची बहीणभावंडे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, यांच्यात किंवा त्यांच्यात काहीतरी असलेले तुम्हाला तुमच्यामध्ये सापडेल.

 

तुम्ही जर प्रामाणिक राहिलात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे पार करू शकता, असे तुम्हाला आढळून येईल. आणि कालांतराने ज्या बंधांनिशी तुम्ही जन्माला आला होतात ते सारे बंध, त्या बेड्या तुम्ही तोडून टाकाल आणि तुमच्या मार्गावरून तुम्ही अगदी मुक्तपणे पुढे जाल. तुम्हाला जर तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर तुम्ही हे केलेच पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 261-262]

व्यक्तीच्या अंतरंगात ईश्वरी कृपेविषयी जर अशी श्रद्धा असेल की, ‘ईश्वरी कृपा’ माझ्याकडे लक्ष ठेवून आहे आणि काहीही झाले तरी ईश्वरी कृपा आहेच, आणि ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे तर, तिच्या साहाय्याने व्यक्ती कोणत्याही संकटामधून पार होऊ शकते, व्यक्ती अशी श्रद्धा नेहमीच, आयुष्यभर बाळगू शकते. या श्रद्धेच्या साहाय्याने व्यक्ती सर्व अडचणींना सामोरी जाऊ शकते, अशा व्यक्तीला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही कारण तिच्यापाशी श्रद्धा असते आणि ईश्वरी कृपादेखील तिच्यासोबत असते.

श्रद्धा अनंतपटीने शक्तिशाली, अधिक सचेत, दीर्घायू अशी शक्ती असते; …ती ईश्वरी कृपेखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसते आणि म्हणून ती ‘सत्या’वरच विसंबून असते आणि त्यामुळे तिला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही.

– श्रीमाताजी [CWM 05 : 297]

कर्म आराधना – ५२

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा यांच्यावर मात करण्याची आणि नि:शेष समर्पण साध्य करून घेण्याची केवळ साधने असतात. व्यक्ती जोपर्यंत यशावर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि ते दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजय-शक्ती प्राप्त करून घेऊच नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नाही; ग्रहण करण्याची क्षमता आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची क्षमता आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपयशाने खचून न जाता केले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 241-242]

विचार शलाका – १६

श्रीमाताजी : हे जग संघर्ष, दुःखभोग, अडचणी, ताणतणाव यांचे बनलेले आहे. ते अजूनही बदललेले नाही, ते बदलण्यासाठी काही काळ लागेल. आणि प्रत्येकाला या सगळ्यांतून बाहेर पडण्याची संधी उपलब्ध असते. जर तुम्ही ‘परमोच्च कृपे’च्या सान्निध्यावर विसंबून राहिलात, तिच्यासमोर नतमस्तक झालात तर तोच एकमेव मार्ग आहे…

प्रश्न : पण हे असे सामर्थ्य कोठे मिळवायचे ?

श्रीमाताजी : तुमच्याच अंतरंगात. ‘दैवी सान्निध्य’ तुमच्या आतच आहे. तुम्ही त्याचा शोध बाहेर घेता; अंतरंगात पाहा. ते तुमच्या आतच आहे. तेथे ‘त्या’चे सान्निध्य आहे. तुम्हाला सामर्थ्य मिळण्यासाठी इतरांकडून प्रशंसा हवी असते – तुम्हाला त्यातून ते सामर्थ्य कधीही मिळणार नाही. सामर्थ्य तुमच्या आतच आहे. तुम्हाला जर ते सामर्थ्य हवे असेल तर, तुम्हाला जे सर्वोच्च उद्दिष्ट, सर्वोच्च प्रकाश, सर्वोच्च ज्ञान, सर्वोच्च प्रेम वाटते, त्यांविषयी तुम्ही अभीप्सा बाळगली पाहिजे. पण ते तुमच्या आतच आहे – अन्यथा तुम्ही त्याच्याशी कधीच संपर्क साधू शकणार नाही. तुम्ही जर अंतरंगात पुरेसे खोलवर गेलात तर नेहमीच सरळ वर जाणाऱ्या प्रज्ज्वलित ज्योतीप्रमाणे तेथे तुम्हाला ‘त्या’चे अस्तित्व गवसेल.

आणि असे समजू नका की, हे खूप अवघड आहे. ते अवघड आहे कारण तुमची दृष्टी कायम बाह्याकडेच वळलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला ‘त्या’च्या सान्निध्याची जाणीव होत नाही.

पण जर आधारासाठी, साहाय्यासाठी तुम्ही बाहेरच्या ऐवजी अंतरंगांत लक्ष केंद्रित केलेत आणि – प्रत्येक क्षणी काय करायला हवे, त्याचा मार्ग कोणता, हे जाणण्यासाठी अंतरंगांतील सर्वोच्च ज्ञानावर एकाग्रता केलीत व प्रार्थना केलीत; आणि तुम्ही जे काही आहात व तुम्ही जे काही करता, ते सर्व तुम्ही पूर्णत्वप्राप्तीसाठी समर्पित केलेत, तर तुम्हाला तेथे अंतरंगातच, आधार असल्याचे आणि तो तुम्हाला कायमच साहाय्य व मार्गदर्शन करीत असल्याचे जाणवेल.

आणि जर काही अडचण आलीच तर तिच्याशी दोन हात करण्यापेक्षा; तिला हाताळण्यासाठी – सर्व वाईट इच्छा, सर्व गैरसमजुती आणि सर्व अनिष्ट प्रतिक्रिया यांना हाताळण्यासाठी; तुम्ही त्या अडचणीला परम प्रज्ञेकडे सुपूर्द करा. जर तुम्ही पूर्णपणे समर्पित झालात, तर तो तुमच्या चिंतेचा विषय उरतच नाही; तो त्या ‘परमेश्वरा’चा विषय बनतो, जो स्वत:च तो विषय हाती घेतो आणि त्याचे काय करायचे ते इतर कोणाहीपेक्षा तोच अधिक चांगल्या रीतीने जाणत असतो. यातून बाहेर पडण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, केवळ हाच मार्ग आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 399-400)

ईश्वरी कृपा – १२

आत्यंतिक जडभौतिक चेतनेला, आत्यंतिक जडभौतिक मनाला चाबकाने फटकारल्यावरच काम करण्याची, प्रयत्न करण्याची आणि प्रगत होण्याची सवय झालेली असते; अन्यथा ते तमस असते. आणि जेव्हा कधी मन कल्पना करते, तेव्हा ते नेहमी अडीअडचणींची, अडथळ्यांची व विरोधाचीच कल्पना करते आणि त्यामुळे गती मोठ्या प्रमाणात मंदावते. सर्व अपयशांच्या पाठीमागे ‘यश’ असते; सर्व वेदना, दुःखभोग, विरोधाभास या साऱ्यांच्या पाठीमागे ‘आनंद’ असतो; सर्व अडीअडचणींच्या पाठीमागे ‘ईश्वरी कृपा’ असते, हे पटवून देण्यासाठी अत्यंत सघन, अत्यंत स्पर्श्य आणि बरेचदा पुन्हापुन्हा येणाऱ्या अनुभूतींची आवश्यकता असते.

– श्रीमाताजी
(CWM 11 : 02)

ईश्वरी कृपा – १०

(तुम्ही केलेल्या धाव्याला ईश्वरी कृपेने प्रतिसाद दिला आणि नंतर ईश्वरी कृपेमुळे आपण संकटातून, अडचणीमधून बाहेर पडलो हे विसरलात तर काय होते, त्याबद्दल श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

तुम्ही कडीकोयंडा लावून दरवाजा बंद करून टाकता आणि त्यानंतर मग तुम्ही काहीही ग्रहण करू शकत नाही. तुमच्या अशा प्रकारच्या आंतरिक मूर्खपणापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तुम्ही स्वतः काहीच करू शकत नाही, याची तुम्हाला पुन्हा एकदा जाणीव व्हावी म्हणून, पुन्हा एखादा तीव्र झटका, एखादी भयानक अडचण आवश्यक होऊन बसते. कारण आपण शक्तिहीन आहोत याची जाणीव जेव्हा तुमच्यामध्ये वाढू लागते तेव्हाच, तुम्ही थोडेसे खुले आणि लवचीक होऊ लागता. कारण, तुम्ही जे काही करता ते तुमच्या स्वतःच्या कौशल्यावर आणि तुमच्या स्वतःच्या क्षमतांवर अवलंबून आहे असे जोवर तुम्हाला वाटत असते तोवर, तुम्ही एकच दरवाजा बंद करता असे नाही, तर खरोखरच तुम्ही एकापाठोपाठ अनेक दरवाजे बंद करत असता, अगदी कडीकोयंडे लावून ते बंद करत असता. तुम्ही जणू काही एखाद्या गढीमध्ये स्वतःला बंद करून घेता आणि मग त्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा प्रवेश होऊ शकत नाही. ही मोठीच उणीव आहे, व्यक्ती चटकन साऱ्या गोष्टी विसरून जाते. स्वाभाविकपणे ती स्वतःच्याच क्षमतांवर समाधानी राहते.

प्रामाणिक असणे खरोखरच खूप कठीण असते… आणि म्हणूनच धक्क्या-चपेट्यांची संख्या वाढते आणि ते आघात कधी कधी अधिक भयानक होतात कारण तुमच्यामधील मूर्खपणा मोडीत काढण्याचा तो एकमेव मार्ग असतो; याप्रकारे आपत्तींचे स्पष्टीकरण करता येते. फक्त जेव्हा तुम्ही अतीव वेदनादायी अशा परिस्थितिमध्ये सापडलेले असता आणि तुमच्यावर खोलवर परिणाम करेल अशा परिस्थितिला तुम्हाला सामोरे जावे लागते, तेव्हा तुमच्यातील मूर्खपणा काही अंशाने का होईना नाहीसा होतो. पण तो अगदी काही अंशाने जरी नाहीसा झाला तरी, अजूनही आतमध्ये काहीतरी शिल्लक राहतेच. आणि म्हणूनच या साऱ्या गोष्टी इतक्या दीर्घकाळ चालू राहतात…

आपण म्हणजे कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपण अस्तित्वातच नाही, आपण खरोखर अगदी कोणीच नाही, त्या दिव्य चेतनेखेरीज आणि ईश्वरी कृपेखेरीज खरोखर कोणते अस्तित्वच नाही, याची व्यक्तिला खोल अंतःकरणात जाण येण्यासाठी, जीवनामध्ये कितीतरी धक्केचपेटे आवश्यक असतात. आणि ज्या क्षणी व्यक्तिला या गोष्टीची जाण येते तेव्हा सारे (दुःखभोग) संपलेले असतात, साऱ्या अडचणी नाहीशा झालेल्या असतात. व्यक्तिला हे पूर्णपणे कळावे लागते आणि त्याला विरोध करणारे तिच्यामध्ये काहीच शिल्लक राहता कामा नये… अर्थात या गोष्टीला खूप काळ लागतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 323-324)

ईश्वरी कृपा – ०५

ईश्वरासाठी जो अभीप्सा बाळगत असतो, त्याच्यासमोर नेहमी जी कोणती अडचण उभी राहते तीच स्वयमेव त्याच्यासाठी एक प्रवेशद्वार ठरते; त्या माध्यमातून तो स्वतःच्या व्यक्तिगत पद्धतीने ईश्वराची प्राप्ती करून घेणार असतो; त्याला ईश्वराच्या साक्षात्काराप्रत घेऊन जाणारा त्याचा तो विशिष्ट मार्ग असतो.

अशी देखील वस्तुस्थिती असते की, जर एखाद्याला शेकडो अडचणी आल्या तर, त्याला होणारा साक्षात्कारही विलक्षण असतो – अर्थात, हे उघड आहे की, त्याच्यामध्ये जर धीर आणि चिकाटी असेल, आणि ज्या दोषांमुळे अडचणी निर्माण झाल्या, त्या दोषांविरुद्ध अभीप्सेच्या अग्निची ज्वाला जर तो कायम तेवती ठेवेल, तरच त्याला तो तसा साक्षात्कार होईल.

आणि लक्षात ठेवा की : सर्वसाधारणपणे ईश्वराची कृपादेखील तुमच्या अडचणींच्या प्रमाणातच असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 :143)

मानसिक परिपूर्णत्व – २०

 

(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्तर देत आहेत.)

तुमच्यासाठी या पृथ्वीवर करण्याजोगी हीच एकमेव गोष्ट शिल्लक राहिली आहे, अमुक अमुक गोष्ट करावयाची आहे हे एकदाच कायमचे ठरवून टाका ; मग बाकी भूकंप, ढासळती सभ्यता… इ. इ. बाह्य गोष्टी आहेतच. आणखी असे की, जी गोष्ट तुम्ही करणे आवश्यक आहे, ती तुम्हाला करता यावी म्हणून तुमच्या साहाय्यासाठी एक गोष्टदेखील पाठविलेली आहे. तुम्ही म्हणता, तुम्ही ठरविलेली ती गोष्ट अवघड आहे, मार्ग दूरवरचा आहे आणि त्यामानाने देण्यात आलेले प्रोत्साहन अल्प आहे पण म्हणून काय झाले? एवढी मोठी गोष्ट एवढ्या सहजासहजी मिळावी किंवा एकतर त्यात अगदी वेगाने यश प्राप्त व्हावे, नाहीतर नकोच, अशी अपेक्षा तुम्ही का बाळगता? अडचणींना सामोरे गेलेच पाहिजे आणि जेवढ्या आनंदाने तुम्ही त्यास सामोरे जाल, तेवढ्या लवकर तुम्ही त्या अडचणींवर मात करू शकाल.

…यशाचा मूलमंत्र, विजयाचा निर्धार, दृढ संकल्प कायम राखणे हीच एक गोष्ट केली पाहिजे. अशक्यता अशी कोणती गोष्टच मुळात अस्तित्वात नाही. हां, अडचणी असू शकतात, गोष्टींना वेळ लागू शकतो, पण अशक्य असे काही नाही. व्यक्तीने एकदा का अमुक एक गोष्ट करण्याचा दृढ निश्चय केला की, आज ना उद्या ती शक्य होतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 115-116)

प्रश्न : “जेव्हा व्यक्ती अडचणीमध्ये असेल तेव्हा तिने स्वत:ला विशाल, व्यापक करावे,” ह्याचा अर्थ कसा लावावा?

श्रीमाताजी : मी येथे योगमार्गावरील अडचणींविषयी बोलत आहे; आकलन करून घेण्यातल्या अडचणी, मर्यादा, अडथळ्यांसारख्या. मला म्हणावयाचे असते की तुमच्या जाणिवेच्या कक्षा विशाल करा.

अडचणी या नेहमीच अहंकारामधून उद्भवतात. म्हणजे तुम्ही परिस्थितीला, घटनांना, तुमच्या अवतीभवतीच्या माणसांना, किंवा तुमच्या जीवनातील स्थितीला ज्या कमीअधिक अहंजन्य वैयक्तिक प्रतिक्रिया देता, त्यामधून अडचणी उद्भवतात. तुमच्याहून अधिक उन्नत आणि अधिक विशाल अशा वास्तवाशी एकात्म होण्यापासून जेव्हा तुमची जाणीव तुम्हाला रोखते, म्हणजे जेव्हा व्यक्ती एक प्रकारच्या कवचामध्ये, कोशामध्ये जखडून पडल्यासारखी होते तेव्हा त्या भावनेतूनदेखील अडचणी उद्भवतात.

व्यक्ती नक्कीच असा विचार करू शकते की, तिला विशाल व्हावयाचे आहे; तिला विश्वात्मक व्हावयाचे आहे, तिच्यामध्ये अहंकार असता कामा नये; सर्व काही त्या ईश्वराचीच अभिव्यक्ती आहे, अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टींचा व्यक्ती विचार करू शकते पण हा काही खात्रीशीर उपाय नाही कारण बऱ्याचदा व्यक्तीला तिने काय करावे हे माहीत असते पण या ना त्या कारणामुळे ती ते करत नाही.

पण समजा जर का तुम्हाला क्लेश झाले, दुःखभोग, उद्रेक, वेदना किंवा अगतिकतेची भावना या साऱ्यांना सामोरे जावेच लागले – या मार्गामध्ये आड येणाऱ्या ह्या साऱ्या गोष्टी म्हणजेच तुमच्या अडचणी आहेत – अशा वेळी जर तुम्ही शारीरिक दृष्ट्या म्हणजे, तुमच्या शारीर जाणिवेने स्वत:ला व्यापक करू शकलात, जर तुम्ही स्वत:ला उलगडू शकलात – एखादा कापडाचा तागा असावा आणि घड्यांवर घड्या याप्रमाणे तो बांधलेला असावा त्याप्रमाणे तुम्ही त्या तशा घड्यांमध्ये बंदिस्त झाला आहात अशी तुम्हाला जाणीव झाली तर – तेव्हा तुम्हाला जर बांधल्याप्रमाणे, घुसमटल्याप्रमाणे वाटत असेल, तुम्हाला जर त्रास होत असेल किंवा तुमच्या हालचाली नि:शक्त होऊन जात असतील; एखादा कापडाचा खूप घटट् बांधलेला तागा असावा; एखादे खूप घट्ट, चापूनचोपून बांधलेले गाठोडे असावे अशी तुम्हाला जाणीव होत असेल तर जमिनीवर एखादा कागदाचा वा कापडाचा तुकडा उलगडावा तसे तुम्ही स्वत:वरील घड्या, सुरकुत्या दूर करू शकलात, स्वत:ला दोन्ही बाहू फैलावून ताणू शकलात, आणि जमिनीवर पडून स्वत:ला विशाल, जेवढे शक्य आहे तेवढे विशाल बनविण्याचा प्रयत्न केलात; स्वत:ला खुले करून, ज्याला मी ‘प्रकाशाचे मुख’ म्हणते त्या प्रति पूर्ण निष्क्रियपणाचा भाव राखत, खुले करू शकलात आणि स्वत:च्या अडीअडचणींमध्ये स्वत:ला परत लपेटून घेतले नाहीत, आणि त्या दुप्पट केल्या नाहीत, म्हणजेच त्यामध्ये अडकून पडला नाहीत, म्हणजे स्वत:मध्येच गुंतून पडला नाहीत तर; एवढेच नाही तर, शक्य तितके स्वत:ला उलगडविण्याचा प्रयत्न केलात, तुमची अडचण वरून येणाऱ्या त्या प्रकाशासमोर मांडलीत तर, आणि जर का तुम्ही हे सर्व क्षेत्रांमध्ये करू शकलात, आणि अगदी तुम्ही मानसिकरित्या हे करण्यामध्ये जरी यशस्वी झाला नाहीत तरी – कारण ते बऱ्याचदा अवघड असते – तुम्ही शारीरिकदृष्ट्या, अगदी भौतिक अर्थाने देखील जरी तुम्ही तशी कल्पना करू शकलात, तर जेव्हा तुम्ही स्वत:ला खुले करण्याचे, स्वत:ला ताणण्याचे, पसरविण्याचे काम पूर्ण करता तेव्हा तुमच्या अडचणींपैकी तीनचतुर्थांश अडचणी पळून गेल्या असल्याचे तुम्हाला आढळेल.

आणि त्यानंतर त्या प्रकाशाप्रत स्वत:ला ग्रहणशील बनविण्याचे शिल्लक राहिलेले थोडेसे काम पूर्ण केले की तो एक चतुर्थांश भाग देखील नाहीसा होऊन जाईल.

स्वत:च्या अडीअडचणींशी स्वत:च्या विचारांच्या साहाय्याने झगडत राहण्यापेक्षा हे कितीतरी अधिक पटीने सोपे आहे कारण जर तुम्ही स्वत:शीच चर्चा करू लागलात तर, तुमच्या मताच्या बाजूने आणि विरोधी बाजूनेसुद्धा तुम्हाला पुष्कळ युक्तिवाद आढळतील आणि ते इतके पटण्यासारखे असतील की, उच्चतर प्रकाशाशिवाय त्यांमधून बाहेर पडणेच अशक्य होऊन जाईल.

येथे तुम्ही अडीअडचणीच्या विरोधात झगडत नाही, तुम्ही स्वत:ला पटवून देण्याचा प्रयत्नही करत नाही. सूर्यासमोर सागरकिनारी वाळूमध्ये पडून राहावे त्याप्रमाणे तुम्ही केवळ स्वत:ला प्रकाशाप्रत खुले करता आणि त्या प्रकाशाला तुमच्या मध्ये कार्य करू देता, बस् इतकेच.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 285-287)