Tag Archive for: साधना

वैश्विक ‘ईश्वरी प्रेम’ सर्वांसाठी समानच असते. त्याचबरोबर व्यक्तिगत असणारा असा एक आंतरात्मिक अनुबंधदेखील (psychic connection) असतो. मूलतः तोदेखील सर्वांसाठी समानच असतो, पण त्यामध्ये प्रत्येकाशी असलेल्या विशेष नात्याला मुभा असते, आणि हे नाते मात्र सर्वांसाठी समान नसते, तर ते प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असते. आणि त्याचे त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र स्वरूप असते, ते त्याच्याच पद्धतीचे असते आणि त्याची इतरांशी तुलना करता येत नाही. इतर नात्यांशी तुलना करता ते तसेच असावे किंवा तोलूनमापून, संतुलित असावे अशी अपेक्षा इथे बाळगता येत नाही कारण ते प्रत्येक नाते अगदी स्वतंत्र असते.

…श्रीमाताजींचे प्रेम व्यक्तीला जाणवेल किंवा नाही हे ती व्यक्ती त्यांच्याप्रति खुली आहे किंवा नाही यावर अवलंबून असते, ती व्यक्ती भौतिकदृष्ट्या त्यांच्यापासून किती जवळ वा दूर आहे यावर ते अवलंबून नसते. आंतरिक नात्याबद्दल व्यक्तीला ज्या ज्या गोष्टी अचेत, जाणीवरहित (unconscious) बनवितात त्या गोष्टी तिने स्वतःमधून काढून टाकणे म्हणजे खुलेपणा (Openness). व्यक्तीला अंतरंगामध्ये जे नाते जाणवते त्याऐवजी त्या नात्याच्या बाह्याविष्करणाद्वारे त्याचे मोजमाप करणे, या संकल्पनेइतकी अन्य कोणतीच संकल्पना व्यक्तीला अचेत बनवीत नाही; (इतकेच नव्हे तर) या संकल्पनेमुळे, आंतरिक नात्याचे जे काही बाह्य आविष्करण दिसून येत असते त्याबद्दलही व्यक्ती अंध किंवा असंवेदनशील बनते. व्यक्ती श्रीमाताजींपासून भौतिकदृष्ट्या दूर अंतरावर असली किंवा ती त्यांना क्वचितच भेटत असली तरीही व्यक्तीला ते नाते जाणवते; उलट व्यक्ती भौतिकदृष्ट्या त्यांच्याजवळ असूनही किंवा ती नेहमी श्रीमाताजींच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये वावरत असली तरीदेखील, म्हणजे असे नाते असूनसुद्धा ते त्या व्यक्तीला न जाणवण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 507-508)

‘अतिमानसिक साक्षात्कार’ (supramental realization) हे आपले उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते आपण केले पाहिजे किंवा प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक परिस्थितीत, त्या साक्षात्काराकडे घेऊन जाणारे जे काही आहे ते आपण केले पाहिजे. शारीरिक चेतनेची तयारी करणे ही सद्यकालीन आवश्यकता आहे; आणि त्यासाठी संपूर्ण समता व शांती आणि वैयक्तिक मागण्या किंवा इच्छा यांपासून मुक्त असणारे शारीरिक व कनिष्ठ प्राणिक भागांमधील संपूर्ण समर्पण या गोष्टी प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. इतर सर्व गोष्टी त्यांच्या योग्य वेळी येऊ शकतील. शारीरिक समीपता ही त्या इतर गोष्टींपैकीच एक गोष्ट आहे, आत्ता त्याचा अट्टहास करण्याची खरंतर गरज नाही, मात्र शारीरिक चेतनेमध्ये आंतरात्मिक खुलेपण (psychic opening) आणि तेथे श्रीमाताजींची उपस्थिती व त्यांचे मार्गदर्शन यांची सध्या खरी आवश्यकता आहे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 491-492)

श्रीमाताजी आणि समीपता – २९

(श्रीमाताजींनी मला दूर लोटले आहे, त्या माझ्यावर नाराज आहेत, माझ्यापेक्षा त्या इतरांवर अधिक कृपा करतात अशा प्रकारच्या कल्पना, विचार हे साधकांच्या मार्गामधील अडथळे असतात, त्यापासून साधकांनी कटाक्षाने दूर राहिले पाहिजे; हे श्रीअरविंदांनी एका साधकाला पत्रामधून लिहिले आहे. असे विचार मनात निर्माणच होऊ नयेत म्हणून कोणती पथ्यं पाळली पाहिजेत, कोणत्या तीन नियमांच्या पालनापासून त्याची सुरूवात केली पाहिजे हे श्रीअरविंद येथे लिहीत आहेत…)

१) श्रीमाताजी तुमची जी काळजी घेत असतात, तुमच्यावर जे प्रेम करत असतात त्याबद्दल तुम्ही नेहमी विश्वास बाळगला पाहिजे; त्याविषयी खात्री बाळगली पाहिजे आणि त्याच्याशी विसंगत दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर, कोणत्याही सूचनांवर विश्वास ठेवता कामा नये.

२) श्रीमाताजींसोबत तुमचे जे खरेखुरे नाते आहे, त्यांच्यासोबत तुमची जी आंतरिक जवळीक आहे, त्यांच्याबाबत तुम्हाला जो एक साधासरळ विश्वास वाटतो त्यापासून, दूर नेणाऱ्या प्रत्येक भावनेला, प्रत्येक आवेगाला तुम्ही त्वरित नकार दिला पाहिजे.

३) बाह्य लक्षणांवर जास्त भर देऊ नका; (कारण) त्या बाबतीतल्या तुमच्या निरीक्षणामुळे तुमची सहजगत्या दिशाभूल होऊ शकते. तुम्ही श्रीमाताजींप्रति स्वतःला खुले ठेवा आणि तुमच्या हृदयातून, अंतःकरणातून त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. पृष्ठवर्ती प्राणिक इच्छांच्या माध्यमातून नव्हे तर, तुमच्या खऱ्या भावनांच्या गाभ्यातून त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे मग त्या तुम्हाला गवसण्याची अधिक शक्यता असते आणि मग श्रीमाताजी तुमच्या अंतरंगामध्ये, नेहमीच तुमच्या समीप असण्याची आणि त्या तुम्हाला जे प्रदान करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत ते तुम्ही ग्रहण करू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 489)

श्रीमाताजी आणि समीपता – ३४

एखाद्याचे श्रीमाताजींशी जर आंतरिक नाते असेल तर त्या नेहमी आपल्या समीप आहेत, आपल्या अंतरंगात आहेत, आपल्या अवतीभोवती आहेत असे त्याला जाणवत असते. आणि मग आपण प्रत्यक्ष श्रीमाताजींच्या जवळ असावे असा त्याचा आग्रह असत नाही. ज्यांचे श्रीमाताजींबरोबर अजून अशा प्रकारचे आंतरिक नाते निर्माण झालेले नाही त्यांनी त्यासाठी आस बाळगावी; मात्र आपण त्यांच्या प्रत्यक्षपणे समीप असावे असा आग्रह धरू नये. समजा, अगदी बाह्य सान्निध्य जरी त्यांना लाभले तरी त्यांच्या असे लक्षात येईल की, आंतरिक समीपतेखेरीज किंवा आंतरिक एकत्वाखेरीज त्या बाह्य सान्निध्याला विशेष अर्थ नाही. एखादी व्यक्ती भौतिकदृष्ट्या श्रीमाताजींच्या जवळ असूनदेखील आंतरिकदृष्ट्या मात्र ती त्यांच्यापासून खूप दूर असू शकते.

*

बाह्य परिस्थिती कशी का असेना, वृत्ती अंतर्मुख ठेवून, श्रीमाताजींशी आंतरिक संपर्क प्रस्थापित करणे ही एकमेव आवश्यक गोष्ट आहे, आणि एकदा ही गोष्ट साध्य झाली की तीच स्वत:हून इतर सर्व आवश्यक गोष्टी घडवून आणेल. काहीजण असे आहेत की, जे योगामध्ये प्रगत झाले आहेत परंतु ते प्रत्यक्षात श्रीमाताजींना वारंवार भेटतातच असे नाही. त्याचप्रमाणे असेही काहीजण आहेत की, जे प्रणाम आणि सायं-ध्यान याव्यतिरिक्त, श्रीमाताजींना वर्षातून फक्त एकदाच भेटतात आणि असे असूनही ते सारे सदोदित श्रीमाताजींच्या समीप असतात किंवा ऐक्यभावात असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 495, 496)

श्रीमाताजी आणि समीपता – ३३

श्रीमाताजींच्या प्रत्यक्ष सान्निध्यात असणे ही त्यांच्याशी आपले नाते असण्याची एक खूण आहे किंवा असे सान्निध्य लाभणे म्हणजे त्यांची आपल्यावर विशेष कृपा आहे असे मानणे किंवा असे सान्निध्य लाभणे हे वेगवान प्रगतीचे साधन आहे असे समजणे यासारख्या सर्व गोष्टी म्हणजे मनाच्या कल्पना असतात; ज्या अर्थातच अगदी स्वाभाविक असतात, मात्र त्या अनुभवातून नसतात. खरे महत्त्व असते ते आंतरिक समीपतेला!

असे काही जण आहेत जे श्रीमाताजींना दररोज भेटतात आणि असे असूनही, काही वर्षांपूर्वी ते प्रगतीच्या ज्या टप्प्यावर होते त्यापेक्षा त्यांच्यात फार काही प्रगती झाली आहे असे नाही. उलट काही जण असेही आहेत की ज्यांची अधोगतीच झाली आहे कारण, त्यामुळे (म्हणजे आपण श्रीमाताजींच्या जवळ आहोत असा अभिमान त्यांच्यामध्ये वाढीस लागल्यामुळे) त्यांच्या प्राणिक मागण्या वाढीस लागल्या. तर दुसऱ्या बाजूला असे काही जण आहेत, की जे अगदी कधीतरीच श्रीमाताजींना भेटायला येतात तरीही ते श्रीमाताजींच्या समीप आहेत आणि योगमार्गावर प्रगत झाले आहेत, आणि श्रीमाताजी त्यांचा सांभाळ करत आहेत. मी वानगीदाखल अशा एका व्यक्तीचे उदाहरण देऊ शकतो की, ती व्यक्ती श्रीमाताजींना वर्षातून एकदाच भेटते पण त्या व्यक्तीइतकी वेगाने प्रगती केलेला दुसरा कोणी नाही, तसेच त्या व्यक्तीमध्ये ज्या तीव्रतेने आणि उत्कटतेने भक्तीचे नाते विकसित झाले आहे तसे दुसऱ्या कोणामध्येही झालेले नाही.

सारांश असा की, या सर्वच बाबतीत श्रीमाताजींवर आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रकाशावर संपूर्ण विश्वास ठेवणे हे सर्वोत्तम!

– श्रीअरविंद (CWSA 32 : 494)

चैत्य पुरुष (psychic being) जेव्हा वृद्धिंगत होऊ लागतो आणि अग्रभागी येऊन मन, प्राण, शरीर यांचे शासन करू लागतो आणि त्यांच्यात बदल घडवितो तेव्हा आणि फक्त तेव्हाच वैयक्तिक कल्पना, इच्छा, सवयी गळून पडतात. तेव्हा मग, व्यक्तीचे ईश्वराशी थेट नाते निर्माण होऊ लागते आणि ईश्वराशी असलेले निकटत्व वाढीस लागते. समग्र चेतना ईश्वराशी एकत्व पावेपर्यंत हे निकटत्व वृद्धिंगत होत राहते. जेव्हा तुम्ही चैत्याच्या, अंतरात्म्याच्या (psychic) गहनतेमध्ये प्रवेश करता, तसतशा श्रीमाताजी तुमच्या समीप आहेत अशी जाणीव तुम्हाला होऊ लागते. जेव्हा मन वा प्राण हे चैत्याच्या प्रभावाखाली येऊ लागतात तसतशी त्यांच्यामध्येसुद्धा ही जाणीव वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 360)

श्रीमाताजी आणि समीपता – ३१

‘ईश्वरी प्रेम’ हे मानवी प्रेमासारखे नसते, तर ते सखोल, विशाल व शांत असते; त्याची जाणीव होण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी व्यक्तीने शांत व विशाल होण्याची आवश्यकता असते.

समर्पित व्हायचे हे ‘साधकाने त्याच्या जीवनाचे संपूर्ण उद्दिष्ट बनविले पाहिजे, त्यामुळे तो ईश्वरी शक्तीचे एक सुपात्र आणि एक साधन बनू शकेल. (मात्र) त्याचे ते पात्र कशाने भरणे आवश्यक आहे याचा निर्णय त्याने दिव्य प्रज्ञेवर आणि दिव्य प्रेमावर सोपविला पाहिजे. अमुक इतक्या कालावधीतच स्वतःची प्रगती झाली पाहिजे, स्वतःचा विकास झाला पाहिजे, विशिष्ट अनुभव अमुक इतक्या कालावधीतच आले पाहिजेत, ठरावीक कालावधीतच साक्षात्कार झाले पाहिजेत असे त्याने मनाने ठरविता कामा नये. त्यासाठी कितीही कालावधी का लागेना, त्याने वाट पाहण्याची, चिकाटी बाळगण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि त्याचे संपूर्ण जीवन म्हणजे एक प्रकारची अभीप्साच बनविली पाहिजे. आणि केवळ एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे ‘ईश्वराप्रति उन्मुखता’!

मागणी करणे, एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे हे साधनेचे रहस्य नाही, तर आत्मदान करणे हे साधनेचे रहस्य आहे. एखादी व्यक्ती जेवढे जास्त आत्मदान करते, तेवढी तिची ग्रहण करण्याची क्षमता वाढत जाते. परंतु त्यासाठी अधीरता आणि बंडखोरी या गोष्टी समूळ नष्ट झाल्या पाहिजेत. आपल्याला काही साध्यच होत नाहीये, कोणाचे साहाय्यच लाभत नाहीये; आपल्याला कोणाचे प्रेमच लाभत नाहीये, आपण श्रीमाताजींपासून दूर चाललो आहोत, जीवनात काही रामच राहिला नाहीये त्यामुळे आता मी देहत्याग करतो किंवा आध्यात्मिक प्रयत्न करणेच सोडून देतो यांसारख्या सर्व सूचनांना त्याने नकार दिला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 481-482)

श्रीमाताजी आणि समीपता – ३०

‘क्ष’ हा साधक बहुधा पुढील दोन चुका करत आहे. तो श्रीमाताजींकडून प्रेमाच्या बाह्य अभिव्यक्तीची अपेक्षा करत आहे आणि दुसरी चूक म्हणजे, खुलेपणा आणि समर्पण यांवर निरपेक्षपणे लक्ष केंद्रित करण्याऐवजी तो प्रगती करण्याच्या मागे लागला आहे. साधक नेहमीच या दोन चुका करत असतात.

जेव्हा एखादी व्यक्ती ईश्वराप्रत खुली होते, उन्मुख होते, जेव्हा ती समर्पित होते, तेव्हा तिच्या प्रकृतीची तयारी झाल्याक्षणीच आपसूकपणे त्या व्यक्तीची प्रगती होते. मात्र (त्याऐवजी) तिने फक्त प्रगतीवरच लक्ष केंद्रित केले तर त्यातून अडचणी, विरोध आणि निराशा या गोष्टी उद्भवतात कारण मन गोष्टींकडे योग्य दृष्टिकोनातून पाहत नसते.

खरंतर, श्रीमाताजी ‘क्ष’बाबत विशेष कृपावंत आहेत आणि या मार्गावर टिकून राहण्यासाठी त्याला मदत व्हावी यासाठी त्या दररोज ‘दर्शना’च्या वेळी त्याच्यामध्ये एक प्रकारची शक्ती ओतण्याचा प्रयत्न करत असतात. ‘क्ष’ने मन आणि प्राण यांमध्ये अतिशय शांत राहायला आणि आत्मनिवेदित व्हायला शिकले पाहिजे त्यामुळे तो सजग होईल आणि तो ती शक्ती ग्रहणही करू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 481-482)

श्रीमाताजी आणि समीपता – २८

ईश्वरी प्रभावाशिवाय अन्य कोणतेही प्रभाव (influences) स्वीकारायचे नाहीत, ही गोष्ट साध्य करून घेण्यासारखी आहे; कारण सहसा मानवी प्रकृती ईश्वरी प्रभाव न स्वीकारता इतरच प्रभाव स्वीकारत असते. श्रीमाताजींच्या दिव्य प्रकाशाच्या आणि दिव्य शक्तीच्या एकमेव प्रभावाखाली राहिल्याने, प्रकृतीमधील जे जे काही बदलणे आवश्यक असते ते, शांतपणे व सहजतेने बदलता येऊ शकते आणि प्रकृतीमधील जे काही विकसित करणे आवश्यक असते ते, कोणत्याही अडथळ्याविना किंवा त्रासाविना विकसित करता येऊ शकते.

*

श्रीमाताजींसोबत असणाऱ्या थेट नात्याचा मार्ग तुमच्यासाठी नेहमीच खुला असतो आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा त्याची जाणीव होईल तेव्हा तेव्हा तो मार्ग तिथे असतोच, कारण ही गोष्ट आंतरिक अस्तित्वाशी संबंधित असते. जेव्हा कधी तुम्ही अंतरंगात खोलवर प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला ते नाते गवसेलच; मात्र त्याने पृष्ठस्तरावर येऊन, बाह्य प्रकृतीचे आणि बाह्य जीवनाचे शासन (govern) करणे आवश्यक असते. आणि म्हणूनच तुम्ही अंतरंगामध्ये प्रविष्ट होण्यासाठी आणि साधनेमध्ये आंतरिक प्रगती करण्यासाठी काही वेळ द्यावा असे मला वाटते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 486-487)

श्रीमाताजी आणि समीपता – २७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

साधक : पूर्ण दिवसभर माझा प्राण आक्रंदन करत होता. श्रीमाताजी आपल्याबाबत निष्ठुर झाल्या आहेत असे त्याला वाटत होते आणि त्यांच्या प्रेमापासून तो वंचित झाला आहे असे वाटल्यामुळे, तो आकांत करत होता. त्यांच्या मौनामुळे तो कोलमडून पडतो, आणि त्यांचे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले तर तो कोमेजून जातो.

श्रीअरविंद : जो प्राण अहंकाराने, इच्छा-आकांक्षांनी, अपेक्षांनी भरलेला असतो आणि त्यामुळे जो असमाधानी होतो, सारखी कुरबुर करत राहतो आणि जो भ्रांत कल्पना आणि स्वयं-निर्मित दुःखाने भरलेला असतो, अशा परिवर्तन न झालेल्या प्राणाची ही लक्षणे आहेत.

साधक : पण माझ्यामध्येच अशीही एक प्रवृत्ती आहे की जिला ही सारी सुख-दुःखं टाळावीशी वाटतात, जिला फक्त श्रीमाताजींवर विसंबून राहण्याची इच्छा असते. मात्र माताजींकडून काहीतरी प्राप्त व्हावे अशी त्या प्रवृत्तीची इच्छा नाहीये, तर आपण श्रीमाताजींप्रति स्वतःचे आत्मदान करावे असे तिला वाटत असते, श्रीमाताजींनी आपल्यामध्ये अवतरित व्हावे आणि आपल्याला वर उचलून न्यावे यासाठी ती प्रवृत्ती प्रार्थना करत असते. ती माझ्या हृदयामध्ये आहे. आणि तिचा स्थायीभाव ‘समर्पण’ हा आहे.

श्रीअरविंद : तुम्ही जे काही सांगत आहात ते चैत्य पुरुषाचे (psychic being) आणि त्याच्या श्रीमाताजींसोबत असलेल्या नात्याचे तंतोतंत वर्णन आहे. हे खरे नाते होय. ‘पूर्णयोगा’मध्ये यशस्वी व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्यामधील अहंकारी प्राणिक प्रवृत्तीला नकार दिला पाहिजे आणि तुमची साधना या आंतरात्मिक नात्यावर (psychic relation) सुस्थिर केली पाहिजे. चैत्य पुरुष अग्रभागी येणे आणि तो तेथेच स्थिरावणे ही पूर्णयोगामधील एक निर्णायक पायरी असते.

मागच्या वेळी जेव्हा तुम्ही श्रीमाताजींना भेटला होतात तेव्हा हेच घडले होते, तुमचा चैत्य पुरुष अग्रभागी आला होता. परंतु तुम्ही तो कायम तसाच पुढे ठेवला पाहिजे. मात्र जर तुमचा प्राणिक अहंकार आणि त्याचा आक्रोश यांचेच म्हणणे तुम्ही ऐकत राहिलात तर तसे करणे तुम्हाला शक्य होणार नाही. श्रद्धा, समर्पण आणि विशुद्ध आत्मदानाचा (self-giving) आनंद यामुळे, म्हणजेच या आंतरात्मिक दृष्टिकोनामुळेच व्यक्ती ‘सत्या’मध्ये उन्नत होते आणि ईश्वराशी एकात्म पावते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 464-465)